पिंगळा महाद्वारी बोल
8.
पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा ।
डौर फिरवितो डुगडुग ऐका ॥धृ॥
वरल्या आळीला तुम्ही सावद राहावे ।
पाटीलबुवाला मग लावून सवे ।
चिठी येईल बा मग पडेल ठावे ॥१॥
मधल्या आळीला एक बायको फीरे ।
तिजला तुम्ही साधा मग पडेल पुरे ।
नाही तरी पाटलोबा तिची पळतील गुरे ॥२॥
आणिक एक बारे सुटेल तांतडी ।
पाटीलबुवाची मग पडेल माडी ।
तिची पांच पोरे लागतील देशोधडी ॥३॥
आणिक एक ऐका कैंचे नवल झाले ।
गांवच्या पांड्यांनी पाटलास नागविले ।
सार्या कागदाचे शून्य एकचि केले ॥४॥
हिंडता फिरतांना एक शकुन सांगे ।
त्याच्या सत्तेने ह्या आळीस वागे ।
संतांघरचा बा एक तुकडा मागे ॥५॥
हे जरी न ऐकाल तरी दुसरा येईल ।
सरते शेवटी बा काळ बांधून नेईल ।
एका जनार्दनी बा आमुचे काय जाईल ॥६॥
