वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ७. उत्तरकाण्ड - अध्याय 77 › ७२. मूळकासुराचा वध

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088302 · अभंग क्र. ७२

72.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय बाहत्तरावा ॥
मूळकासुराचा वध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

श्रीरामभेटीला बिभीषण निघाला, अयोध्येचे वर्णन :

रणी बिभीषण पडिला । तो प्रधाने सावध केला ।
जैसा नदीस बुडता काढिला । थडीचिया जनी हो ॥१॥
रावणानुज होवोनि सावधान । प्रधानांप्रति बोले वचन ।
आता कर्तव्य काय आपण । इये समयी करावे ॥२॥
प्रधान म्हणती राजाधिराजा । शरण जावे श्रीरघुराजा ।
सिंहाचे प्रसादें अजा । गजमस्तकीं आरुढली ॥३॥
गदापाणि म्हणे धन्य जिणें । आजि राघवासि भेटणें ।
हाचि निश्चय करोनी मने । प्रधानांसीं निघाला ॥४॥
चवघांचिया समवेत । बिभीषण मार्गी जात ।
म्हणे आजि भेटेल गरुडध्वज । क्षेम देईल उचलोनि भुज ।
सांगेन जीवींचें निजगुण । अधोक्षज देखिलिया ॥६॥
नेत्रां होईल पारणे । धणीवरी सुख घेईन मने ।
पूर्णिमा देखोनि चकोर वदने । चंद्राकारणें पसरिती जैसे ॥७॥
ऐसा मार्ग क्रमित मेदिनीं । उल्लास न माये अंतःकरणी ।
तंव पुढे देखिली राजधानी । रघूमत्तरायाची ॥८॥
सुवर्णकळाश रत्नजडित । पताका अंबरीं रामनामांकित ।
काळ धाके न राहे तेथ । पुरी साकेत शोभे ऐसी ॥९॥
अयोध्यानगरींचे जन । करिती श्रीरामकीर्तन ।
घरोघरी वेदाध्ययन । पुराण व्याख्यान ठायी ठायी ॥१०॥
जनी अयोध्येसीं वसतां । नेणती जन्ममरणवार्ता ।
नाही दरिद्राची कथा । नित्य स्मरतां रामनाम ॥११॥
शरयुतीर अति पावन । सेविता राहिले मुनिजन ।
पायवाट स्वर्गा गमन । करावयालागूनी ॥१२॥
अयोध्येचे स्मरणमात्रें । मोक्ष वोळंगे पाणियातें ।
इतर इजसमान नव्हेत तीर्थे । काशी‍आदि करोनी ॥१३॥
काशी हृदयी परम कृपण । मरणांतीं मुक्ति दे दान ।
अयोध्या ईहूनि उदार गहन । स्मरणे पावन मोक्ष दे ॥१४॥
यालागी वाल्मीकासि कवीश्वरीं । वर्णिली अयोध्या प्रथम पुरी ।
मोक्षदानी अति उदारी । निजथोरी जियेची ॥१५॥

श्रीरामांची भेट व त्यांना निवेदन :

ऐसिये अयोध्येमाजी रघुनाथ । राज्य करी बंधूसमवेत ।
तेथे बिभीषण शरणागत । राजसदना उजू आला ॥१६॥
भद्रासनीं रविवंशभूषण । दक्षिणे वसिष्ठ ब्रह्म पूर्ण ।
परिवेष्टीइइत बंधू आदि लक्ष्मण । सेवे सावधान तिष्ठती ॥१७॥
दुरोनी देखिला श्रीरघुनाथ । बिभीषणें घातला दंडवत ।
जोडले करी प्राणिपात । श्रीरामासि पै केला ॥१८॥
श्रीरामे उठोनि ते समयी । शरणागता धरोनि हॄदयीं ।
आलिंगिला गोहीं बाही । जेंवी माता बाळका ॥१९॥
बैसकेस दे रत्नजडित पट । देवोनि बैसवला निकट ।
म्हणे शरणागता बहुत कष्ट । झाले ऐसे दिसतसे ॥२०॥
चंद्राच्या तुटतीं जेंवीं कळा । तेंवी तुझे देखोनि मुखकमळा ।
वोहट पडिला हर्षकळा । आनंदजिव्हाळा न देखो ॥२१॥
जीवनेंवीण वल्ली । सुकोन शुष्क जाहली ।
जैसी हृदयींची काजळी । दिसतसे मुखावरी ॥२२॥
कोण हृदयींची चिंता । ते मज निवेदी पौलस्तिसुता ।
श्रीरामाची देखोनि मुखावरी । सुखा झाले बिभीषणा ॥२३॥
पौलस्ति म्हणे कलमोद्भवजनका । स्वर्गगमनपुरीच्या नायका ।
दिनमणिकुळदीपका । अपूर्व एक देखिले ॥२४॥
वारीमृणालाचा तंतु । त्यामाजि गुंतला ऐरावतु ।
मशकें भूगोळ मुखांतुं । दंतदाढा रगडिला ॥२५॥
मर्कटें समुद्र शोषिला । मृगजळीं वंध्यापुत्र बुडाला ।
जंबुके सिंह विदारिला । सशानें भेडसाविला शार्दूळ ॥२६॥
छायेनें पुरुष गिळोन । उरगें गरुडावरी केले आरोहण ।
पिपीलिकेचा जो नंदन । तेणे मेरु उपटिला ॥२७॥
ऐसे वर्तले नृपचूडामणी । जंबुके सिंहाचा कवळ नेला हिरोनी ।
ऐसे झाले मजलागूनी । देवाधिदेवा विधिजनका ॥२८॥
ऐसियासि ऐका वृत्तांत । कुंभकर्णाचा जो मूळक सुत ।
तेणे प्रसन्न करोनी उमाकांत । अद्‍भूत वर पावला ॥२९॥
वरदबळेंकरुन । युद्ध केले अति दारुण ।
समस्त मारोनी राक्षससैन्य । माझे राज्य हरितलें ॥३०॥
श्रीराम म्हणे गा गदापाणी । केली रावणकुळा खंडणी ।
पुत्रासहित रणी । निद्राप्रिय मारिला ॥३१॥
हा तै काय नव्हता । किंवा अन्यत्र स्थळी गेला होता ।
याची सांगे समूळ कथा । जे ऐकता सुख होय ॥३२॥

रामांना मूळकासुराची कथा निवेदिली :

ऐसे बोलिलें नलिनीदळानेत्रें । ते परिसोनि बिभीषणें पवित्रें ।
सांगों आदरिले चरित्र । निजाग्रजसुताचें ॥३३॥
गदापाणि म्हणे कनकमृगारी । याचे मातेचिया उदरी ।
पूर्वी पुत्रद्वय जन्मले सुरारी । माजी रणपंडित ॥३४॥
कुंभ निकुंभ नामे प्रसिद्ध । काळावरी जयांचे बिरुद ।
तयांमागें अतिमंद । पित्याचे मूळीं लागला ॥३५॥
जन्मता सांडिला बाहेरी । निशा राक्षसीनें वाढविला घरी ।
याचे मुळें सर्वा बोहरी । देवाधिदेवें श्रीरामे केली ॥३६॥
सर्व कुळाचा झाला नाश । कुंभकर्णस्त्रियेनें नगरास ।
आणोनि वाढविला कोणास । कळो नाही दिधले ॥३७॥
जेंवी पुरिला अग्निहोत्रींचा वन्ही । प्रकट परी न देखे कोणी ।
ऐसा वाढला लंकाभुवनीं । पुढे तपा निघाला ॥३८॥
प्रसन्न करोनि चंद्रमौळी । वर मागितला तये वेळी ।
अमर करी भूमंडळी । देवीं दैत्यीं न मारावें ॥३९॥
मानवादि गंधर्व विद्याधर । किंपुरुष चारण असुर ।
पक्षी श्वापदें जीव क्रूर । मज वधीं तत्पर न व्हावे ॥४०॥
होय म्हणोनि अंधकरिपु । म्हणे मनींचा सिद्ध संकल्पु ।
या इतुकियांचें हातें वपु । मरण न पवे संग्रामी ॥४१॥
मग उपदेशून मंत्रावळी । कैलासा गेला इंदुमौळी ।
मागे मूळकासुरें भूमंडळी । आम्हा दुःख दीधलें ॥४२॥
शरणागत ऐसे बोलिल्यावरी । स्वामीची मनोदेवता आश्चर्य करी ।
क्षण एक निवांत दूषणारी । निजासनी बैसला ॥४३॥

त्याच्या मरणाचा उपाय वसिष्ठांनी सांगितला :

क्षणैक ध्यानस्थ गौतमश्वशुर । मग बोलता झाला उत्तर ।
याचे वधाचा प्रकार । समस्ता प्रति पुसतसे ॥४४॥
तंव वसिष्ठ म्हणे श्रीरघुनाथा । याची ऐसी मरणाची कथा ।
यासी वधील जनकदुहिता । नारदे मज सांगितले ॥४५॥
सद्‍गुरूमुखींचें ऐसे वचन । श्रीरामचंद्रें परिसोन ।
प्रधान पाचारिले सज्ञान । सुमंतादि थोर ॥४६॥
आज्ञा केली श्रीरघुवीरें । सुग्रीवादि येवोनि वानरे ।
सेना सज्जोनि वाद्ये तुरे । नानापरींची वाजिन्नलीं ॥४७॥
जानकीस पुरुषवेश दिधला । अलंकारभूषणीं मिरविला ।
तंव बिभीषण बोलता झाला । पारणे कीजे राजेंद्रा ॥४८॥
आजि कार्तिकद्वादशी । पारणे सारोनि प्रयाणासि ।
मग करावे लंकेसी । राक्षसवधाकारणें ॥४९॥
तंवा बोलिला श्रीरघुनंदन । आणी मूळकासुर मारुन ।
मग करु भोजन । हे प्रतिज्ञा निश्चित ॥५०॥
तुज राज्य दिधल्यावीण शरणागता । आम्हा भोजनी नाही अर्हता ।
ऐसे वदोनि श्रीरघुनाथा । स्फुरणें बाहु वाढत ॥५१॥

सीता पुरुषवेशाने निघाली :

पुरुषवेश सालंकारी । शृंगारिली जानकी सुंदरी ।
निजधनुष्य घेवोनि करी । अश्वावरी बैसविली ॥५२॥
प्रधान सेना सैनिक । परिवेष्टित कपिकटक ।
मध्ये शोभे रघुनायक । जानकी सम्यक पृष्ठभागीं ॥५३॥
मग श्रीरामे काय केले । पुष्पकासि पाचारिलें ।
त्यावरी बैसोनि सहदळें । लंकापुर पावले ॥५४॥
ऐसे चालता निजभारीं । पंचघटिका भरता पुरी ।
प्रवेशला जैसे पुष्पावरी । षट्‍पद बहुसाल ॥५५॥
तडागाचे निकट पाळीं । पक्षी जैसे पावती सकुळीं ।
तैसा निजसैन्येंसीं आतुर्बळी । लंकाप्रदेशीं पावला ॥५६॥
देखोनिया निजलंका । लतामृग चढले तवका ।
शिळा पाषाण तरु अनेका । करी घेवोनि चालिले ॥५७॥
त्रिकूट वेढिला वानरी । देखोनिया सुरारी ।
आश्चर्य करी ते अवसरी । दडोनि राहिला निजगृहीं ॥५८॥

मूळकासुराला अपशकुन, युद्धाला प्रारंभ :

वार्ता ऐकोनि मूळकासुर । कीचित सेना सज्जोनि सत्वर ।
पश्चिमद्वारें चालिला थोर । अपशकुन पै झाले ॥५९॥
निजरथाच्या ध्वजावरी । वायस येवोनि शब्द करी ।
पुढे एक द्विज मोकळे शिरी । मार्गी येता देखिला ॥६०॥
अशुद्धाचा शिरवा पडे । रथींचा वारु चालता अडे ।
आंख मोडोनि दुखंडें । धुरेचीं पै होती ॥६१॥
सारथि उलंडला धरणी । मूळकासुरें उडी टाकोनी ।
दुसरे रथी आरुढोनी । संग्रामासी निघाला ॥६२॥
अपशकुनें भयभीत सैन्य । तयासि अभय देवोन ।
करिता झाला तुंबळ रण । वानरेसीं भिडोनियां ॥६३॥
वानर टाकितें झाले शिळा । राक्षस तोडिती शरजाळा ।
अद्‍भूत संग्राम मांडला । वीरे वीर पडखळिले ॥६४॥
तंव हनुमंते रुद्रावेशें । सोडिलीं पर्वताचीं शिसे ।
देखोनि तोडिलीं रजनीचरेशें । उपरी काय आरंभिले ॥६५॥
ईशानदत्त वरद बाण । कार्मुकीं योजिले मंत्र जपून ।
ते वानरसेनेवरी येता रघुनंदन । देखोनि धनुष्य घेतले ॥६६॥
कार्मुकीं बाण रघुराजे । योजिला जपोनि मंत्रबीजें ।
जयाचेनि निजदिव्यतेजें । दशदिशांमाजि बिंबती ॥६७॥
ऐसे श्रीरामाचे शर । यमदंडकाहूनि कठोर ।
सुटले तेणे अंबर । व्यापिले दिसे ते समयी ॥६८॥
बाणे बाणा निवारिलें । आकाश निर्मळ जाहलें ।
वर्षाकाळ गेलिया आगमन केले । शरदऋतूनें पै जैसे ॥६९॥
देखोनि श्रीराघवाचें संधान । राक्षसें आश्चर्य मानोन ।
काय बोलता झाला वचन । बिभीषणासी परियेसा ॥७०॥
अगा ये पूर्वजा बिभीषणा । तुवा साह्य आणिले श्रीरघुनंदना ।
तरी मज त्याची नाही गणना । शिवप्रसादेंकरोनि ॥७१॥
माझा मृत्यु यांचेनि हस्ते । नाही जाण तू निभ्रांतें ।
साटोप धरोनि युद्धाते । वृथा मरावया आलेती ॥७२॥
पूर्वी श्रीरामे कपट केले । छळोनि वालीसी वधिले ।
ते मत येथे काही न चाले । मज मूळकासमोर ॥७३॥
ऐसे राक्षसाचे वचनी । श्रीरघुराजें विचारोनि मनी ।
धनुष्यी बाण लावोनी । पुढारला पै होय ॥७४॥
मूळकासुरा हटकोन । श्रीराम करिता झाला संधान ।
मागे जानकी सरसावोन । पाठीसी उभी राहिली ॥७५॥

सीतेची शंकरांना प्रार्थना :

श्रीराम मूळकासुर परस्परें । युद्धी भिडती आवेशें थोरे ।
मागोनी जानकीने त्वरे । धनुष्या हात घातला ॥७६॥
शितीं लावोनि श्रीरामदत्त बाण । वोढी काढोनि आकर्ण ।
मनी स्मरोनि श्रीरामचरण । काय आठविती पै झाली ॥७७॥
म्हणो अहो जी सदाशिवा । म्या जरी एकाग्रचित्तें सेवा ।
करोनि भजलें असेन राघवां । तरी हा बाण मूळका वधों ॥७८॥
माझा पिता विदेही जनक । राज्यराष्ट्रापाळक ।
सत्य असेल तरी ह अचुक । राक्षसा बाण भेदील ॥७९॥
श्रीराम एकपत्नीव्रतधारी । हे सत्य असेल जरी ।
तरी त्या माझ्या निजशिरीं । कुंभकर्णपुत्र मरेल ॥८०॥
अनसूया जे पतिव्रता । तिणे मज अनुग्रहिलें वनी वसतां ।
तियेचें प्रसादें राक्षससुता । मरण होवो या शरें ॥८१॥
वसिष्ठ सद्‍गुरू ब्रह्म पूर्ण । जरी एकबुद्धीं केले असेल भजन ।
लक्ष्मण शेषावतार सत्य जाण । तरी येणे बाणे मरण राक्षस पावो ॥८२॥
ऐसे भावोनियां मानसी । शर सोडिला घोषीं आकाशी ।
प्रळय झाला दिग्गजांसी । चंद्रसूर्ये भूमि सेविली ॥८३॥
नक्षत्रे खचली पृथ्वीवरी । पर्वत उलंडले सागरी ।
मर्यादा सांडूं पाहती भारी । संकट येवोनि पडिले वीरा ॥८४॥
वानरदळीं केला गजर । राक्षससैन्यीं हाहाकार ।
नभोमार्गे शर । मूळकासुरावर येवो सरला ॥८५॥

मूळकासुराचा वध :

राक्षसपुत्र करी निवारण । तंव अकास्मात येवोनि बाण ।
शिर छेदोनि रणी जाण । सीतेच्या भातां निघाला ॥८६॥
मूळकासुर पडिला रणी । जेंवी पर्वत खचे मेदिनी ।
उरले सैन्य वानरगणी । शिळावरीं कूट केले ॥८७॥
जेंवी तडागीं तुंबळा । फुटतां पसरे चहूंकडे जळ ।
तेंवी कुंभकर्णपुत्राचें दळ । दशदिशा लंघितें झाले ॥८८॥
जानकीचेनि हस्ते जाण । मूळकासुर पावला मरण ।
ऐसे देखोनि सुरगण । पुष्पवर्षाव करिता झाला ॥८९॥
विजयी झाला श्रीरघुनाथ । विजयी कपि आनंदभरित ।
विजयी बिभीषण शरणागत । निजराज्यीं स्थापिला ॥९०॥
याउपरी पुष्पकविमानीं । बैसोनि जानकीसह कोदंडपाणी ।
बंधुवर्गेसीं अयोध्याभवनीं । प्रवेशता पै झाला ॥९१॥
वानरा आज्ञा देऊन । निजस्थाना पाठविले जाण ।
यापरी वर्तले ते सावधान । श्रोतृजन परिसोत ॥९२॥
म्हणाल हे मूळीचें नव्हे निरुपण । वाल्मीके कथिले जाण ।
तरी हे कथा अप्रमाण । ऐसे संती न म्हणावें ॥९३॥
वाल्मीके शतकोटि केले । ते एक महेशें पाहिले ।
भागत्रय करोनि वाटिलें । हे प्रसिद्ध जाणता ॥९४॥
मृत्युलोकी जो भाग । तो युगानुयुगी झाला भंग ।
काही एक उर्वरित कथाभाग । लोकोद्धारण राहिला ॥९५॥
याकारणें वाल्मीक ऋषी । वदला नाही कथा ऐसी ।
म्हणातां कुष्ठ लागे वाचेसीं । ऐसे पंडित जाणती ॥९६॥
अबद्ध सुबद्ध रामायण । श्रीरामाचे चरित्र गहन ।
श्रवणें भवदोषखंडन । सादरे जरी ऐकिजे ॥९७॥
पक्षियाचे उच्चारें गणिका । विमानी बैसोनि वैकुंठलोका ।
गेली हा तुम्हांसि ठाऊका । नाममहिमा रामाचा ॥९८॥
श्रीरामाकथासागर । याचा कोणा कळेल पार ।
भोक्ता एक श्रीशंकर । जेणे शतकोटि विभागिलें ॥९९॥
एका जनार्दना शरण । जानकीसहित श्रीरघुनंदन ।
अयोध्येसी सुखसंपन्न । येवोनि राज्यभार चालवीत ॥१००॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
मूळकासुरवधो नाम द्विसप्ततितमोऽध्यायः ॥७२॥ ओंव्या ॥१००॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग