॥ श्रीएकनाथमहाराजकृत
49.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
उत्तरकांड
॥ अध्याय एकूणपन्नासावा ॥
सीता व वाल्मीकी भेट
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
ऋषिपुत्रांकडून सीता दृष्टीस पडल्याची वाल्मीकींना वार्ता कळते :
सीता वनी हिंडतां ऐकली । शोक करितीं ऋषिपुत्री देखिली ।
ते समस्त येवोनि वाल्मीकाजवळी । नमस्कार करिते पै झाले ॥१॥
ते समस्तही मधुरवचनी । अहो जी ब्रह्मात्मजशिष्या वाल्मीकमुनी ।
अपूर्व एक देखिले नयनी । एक स्त्री रुदन करितसे ॥२॥
रुपे तरी मन्मथजननी । सुंदर सुकुमार दीर्घस्वनीं ।
रुदन करितसे वनी । अभिप्राय मुनि न कळे तिचा ॥३॥
नैव देवी न गंधर्वी नासुरी नच किन्नरी ॥
एवं रुपा मया नारी दृष्टपूर्वा महीतले ॥१॥
नव्हे देवांची देवता । नव्हे गंधर्वांची कांता ।
नव्हे असुरांची वनिता । किन्नरयोषिता ते नव्हे ॥४॥
नव्हे जळींची जळदेवता । नव्हे ऋषींची ऋषिकांता ।
ऐसिया रुपाची देखिली योषिता । महीतळामाझारी ॥५॥
तरी स्वामी आपुले नयनी । पहावी तेथवरी कष्टोनी ।
तिचा अभिप्राय देखता मुनी । सर्वथा कळेल तुम्हांसी ॥६॥
गंगातीरी करी रुदन । जैसी अनाथ कोणी नाही दीन ।
तियेची काकुळती न देखवे म्हणोन । कृपाळुवा तुम्हा श्रुत केले ॥७॥
शोका योग्य नव्हे ते सती । परी बहुत दुःखे करी ग्लांती ।
यालागी स्वामींनी शीघ्रगती । तीते दृष्टी पहावे ॥८॥
तिचे करावे पूजन । तरी तुम्हा अयोग्य अगणिक पुण्य ।
त्याहीवरी तुम्ही धर्मपरायण । मानेल तैसे करावे ॥९॥
तुमच्या निकट ना दुरी । रुदन करितसे सुंदरी ।
मज तारिता नाही म्हणोनि शरीरी । अत्यंत दुःख करितसे ॥१०॥
तुम्हांसि आली शरणागत । हे स्वामींनीं जाणिजे निश्चित ।
ऐसे ऐकोनि तयांसी वदत । धर्मनीति जाणता ऋषि ॥११॥
सीता होती तेथे वाल्मीकी आले, तिचे सांत्वन :
तो जो वाल्मीक महाऋषी । तपस्तेजें तपोराशी ।
जेथे मैथिली होती त्या प्रदेशीं । पूजा घेवोनि पै आला ॥१२॥
सवे ऋषी शिष्यपरिवारित । घेऊन वाल्मीक धांवत ।
जेथे जानकी होती तेथ । शिष्यांसहित पै आला ॥१३॥
देखिली सीता तत्क्षणीं । म्हणे होय हे राघवपत्नी ।
कैसी जानकी देखिली नयनी । ते सावधान अवधारा ॥१४॥
जैसी वणव्यानें आहाळली वल्ली । की जीवनेंवीण धान्यें करपलीं ।
की जळावेगळी मासोळी । तैसी तळमळी पै सीता ॥१५॥
ऐसे देखोनि सीतेसी । मधुरवचनी वाल्मीक महऋषी ।
म्हणे माते तू श्रीरामाची जाया होसी । अजात्मजाची ज्येष्ठ सून तू ॥१६॥
मिथिलाभूमीचा जनक राजा । तयाची सत्य तू आत्मजा ।
या पतिव्रतांहूनि तुझा । धर्म आगळ धरणिजे ॥१७॥
तू आलीस ज्या कार्यालागूनी । ते मज कळले जाण मनी ।
त्रैलोक्यी वर्ततें ते तपेकरुनी । मज ठाऊके असे सीते ॥१८॥
तू निष्पाप पतिव्रते । ऐसे ठाऊके आहे माते ।
आता माझिया पूजेतें । दुःख सांडोनी अंगीकारीं ॥१९॥
वाल्मीकींकडून सीतेला आश्रमांत आश्रय :
जैसी आपुले गृहीं वससी । तैसेचि राहे माझे आश्रमसन्निधीसीं ।
मग पूजोनियां ऋषीं । स्वाश्रमासी सीता नेली ॥२०॥
मग तो वाल्मीक महामुनी । त्यासवे सीता देखोनी ।
ऋषिपत्न्या आणि तपस्विनी । सामो-या येत्या पै झाल्या ॥२१॥
ऋषि सीतेसहित आला देखोन । मुनिपत्न्यांही करुनि नमन ।
म्हणती स्वामी आलेती सीता घेवोन । थोर सुख आम्हा झाले ॥२२॥
हे सुदर चांफेगोरटी । दुःख करिता श्रमली मोठी ।
सवेंचि वाल्मीक जगजेठी । बोलतसे ऋषिपत्न्यांसी ॥२३॥
हे सीता म्हणाल कोण । वना यावया काय कारण ।
भ्रतारें का सांडिली अवगुण । काय इचा देखिला ॥२४॥
ऋषिस्त्रियांना सीतेची कथा सांगितली :
तरी सावकाश करोन चित्त । ऐका धरणिजेचा वृत्तांत ।
इचा भ्रतार श्रीरघुनाथ । जेणे रावणांत समूळ केला ॥२५॥
हे राया दशरथाची सून । जनक विदेहाचे कन्यारत्न ।
निष्पाप पतिव्रता जाण । काही कार्य लक्षोन वना आली ॥२६॥
ते कोण कार्य म्हणाल चित्ती । तरी मी सांगतो तुम्हांप्रती ।
पुढील भविष्य जाणोनि सत्यार्थीं । करावया हे आली ॥२७॥
इचेनि माझे वचन सत्य । इचेनि माझे तप सफळित ।
इणें मज करोनि अनुग्रह येथ । वनवासासी पै आली ॥२८॥
हे मिथ्या वाटे लोकांप्रती । हे आदिमाया चिच्छक्ती ।
इचा महिमा नेणती । ब्रह्मा आदि करोनी ॥२९॥
इसीं तुम्ही स्नेह करुन । आपल्या समीप राहवून ।
क्षणक्षणां इचें समाधान । ब्रह्मत्वे पूर्ण करावे ॥३०॥
गौरवोनि मुनिपत्न्यांसी । मग तो वाल्मीक महाऋषी ।
शिष्यांसहित निजाश्रमासी । अति संतोषीं पै आला ॥३१॥
पुढील कथानुसंधान । लक्ष्मण करिता अयोध्यागमन ।
कथा रम्य रामायण । समूळ तोडी भवबंधन । करिता श्रवण एकचित्ते ॥३३॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
सीतावाल्मीकदर्शनं नाम नवचत्वारिंशोऽध्यायः ॥४९॥
ओंव्या ॥३३॥ श्लोक ॥१॥ एवं ॥३४॥
