वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ७. उत्तरकाण्ड - अध्याय 77 › ७७. श्रीरामांचे सर्वांसह वैकुंठगमन

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088301 · अभंग क्र. ७७

77.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय सत्त्याहत्तरावा ॥
श्रीरामांचे सर्वांसह वैकुंठगमन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

अयोध्या सांडोनि अर्ध योजन । पुढे निघाला श्रीरघुनंदन ।
देखोनि तीर शरयूचें पावन । तेथे वस्तीसी राहिला ॥१॥
त्या शरयूचा महिमा कैसा । जो देवांसी अगम्य सहसा ।
जाते वर्णिता महेशा । पार न कळे निर्धारी ॥२॥
मानससरोवरी जन्मली । उत्तरेची दक्षिणें चालिली ।
भागीरथीसी मिळती झालीं । आपुलेनि पूर्वपुण्यें ॥३॥
ऐसे शरयूतीर मनोहर । स्नानें निष्पाप होती नर ।
तया तीरीं श्रीरघुवीर । प्रस्थानासी उतरला ॥४॥
तंव येरीकडे चतुरानन । समस्त देवांसीं परिवारोन ।
दिव्य विमानी सुरगण । आपुल्याला बैसले ॥५॥
जैसे हंस आपुल्याला मेळी । उडोनि बैसती तडागाचे पाळीं ।
तैसे देव तये काळी । परिवारेसीं मिरवले ॥६॥
गगनी विमानांची दाटी । ऋषी मिळाले कोट्यानुकोटी ।
पाहती अंतरी लक्षोनि जगजेठी । श्रीरामाते ते काळी ॥७॥
विमानचे ज्योतीचेनि प्रभावें । दशदिशा तेज हेलावे ।
तयामाजी ब्रह्मदेवे । पुष्पवृष्टि करिजेली ॥८॥
अंजळि भरोनि कुसुमेंकरीं । टाकिते झाले श्रीरामावरी ।
तयाचे सुवासें पवन अंबरी । पांगुळला सुगंधें हो ॥९॥
अप्सरा नृत्य करिती गगनी । गंधर्व स्वसुरें गाती गाणीं ।
तंव ब्रह्मा तये क्षणी । श्रीरामासी बोलता झाला ॥१०॥
विधता म्हणे श्रीरामचंद्रा । भाग्ये देखिलासी गुणसमुद्रा ।
परिवारेंसीं या नरेंद्रा । भक्तजनां सुख द्यावे ॥११॥
तू वैकुंठाचा नायक । तुज नेणती मतिमंद लोक ।
तू यज्ञभोक्ता पुण्यश्लोक । अचिंत्य अव्यक्त स्वरुप तुझे ॥१२॥
तू गुणातीत निर्विकार । तू निष्कर्म निरुपचार ।
ऋतिशास्त्रांसी न कळे पार । तू अगोचर निजवेदा ॥१३॥
तुज नाही जन्ममरणवार्ता । तू सर्वसाक्षी सर्वभर्ता ।
तुझे ध्यान कैलासनाथा । रात्रंदिवस हेंचि पै ॥१४॥
स्वस्वरुपीं समाधान । निजदेह होय मिथ्या जाण ।
ऐसेपरीचे साधुजन । आत्मनिष्ठें राहती ॥१५॥
जैसा बहुरुपिया नाना सोंगें धरी । त्यागितां एकदेहधारी ।
तैसा तू रामा हेंही करी । आत्मसाक्षात्कारीं राहून ॥१६॥
भुजंग सांडी त्वचेतें । काय हानि होय देहातें ।
तैसे श्रीरामा मानी निजस्वरुपातें । ठायी ठेवी देवाधिदेवा ॥१७॥
ऐसे ब्रह्मा बोलिल्यावरी । मग श्रीराम रणकेसरी ।
स्नानें करोनि दिव्यशरीरी । बंधूंसहित पै झाला ॥१८॥
शरयूचें करोनि स्नान । बंधूंसमवेत श्रीरघुनंदन ।
दिव्य देह शोभायमान । धरिला जाण श्रीरामे ॥१९॥
ते शरीर धरिले कैसे । जया देही देहत्व नसे ।
जाणोनिया देवीं ऐसे । पूजाविधान पै केले ॥२०॥
दिव्य देह श्रीरामाचा । देखोनि सकळ बोलती वाचा ।
म्हणती आजि दिन दैवाचा । उदय झाला बहु दिवसां ॥२१॥
सिद्ध गंधर्व किन्नर । ऋषी तापस विद्याधर ।
पन्नग देव राक्षस वानर । उल्हास थोर पावले ॥२२॥
सर्वांचे झाले पूर्ण मनोरथ । दिव्यदेही देखिला श्रीरघुनाथ ।
भला भला म्हणो लागले तेथ । श्रीरामासी ते काळी ॥२३॥
तदनंतर श्रीरघुनंदन । विधत्याप्रति बोले वचन ।
म्हणे सत्यलोकानायका हे जन । मजसमागमें स्वर्गां येताती ॥२४॥
यांसि तुम्ही उद्धरावें । मनोरथ पूर्ण करावे ।
सामोपचारें स्वर्गा न्यावे । भोग भोगावया तेथींचे ॥२५॥
हे मजबरोबर रमले वनवासी । अन्न‍उदकेंवीण झाले क्लेशी ।
आता सुख होय जेणे प्रकारेंसीं । तेंचि यांसी करावे ॥२६॥
ब्रह्मा म्हणे पौलस्त्यारी । हे युक्ती विचरिली बरी ।
तू भक्तकाजकैवारी । ऐसी श्रुतिपुराणें गर्जती ॥२७॥
ऐसे स्रष्ट्याचें वचन । सुधारसापरीस गोड गहन ।
समस्ती जनी ऐकोन । शरयूस्नान पै केले ॥२८॥
पूर्व देह त्यागितां । कोणा नाही दैन्यचिंता ।
उल्हासोनि श्रीरघुनाथा । अंतकाळीं स्मरती हो ॥२९॥
दिव्य देह धरोनि समस्तीं । विमानी बैसोनि शोभती ।
चतुष्पादादि पक्षियाती । स्वर्गाप्रती निघाले ॥३०॥
पर्वत वृक्ष अयोध्येचे जाण । सर्वही विमानी आरुढोन ।
श्रीरामासवे करिती गमन । जाते झाले ते समयी ॥३१॥
श्रीरामासवे बैसोनि विमानी । जाते झाले स्वर्गालागूनी ।
पुढे जया जे लोक नेमिले तेथोनी । आपुलाले स्थळा पावले ॥३२॥
जेंवी विहंगम एक होऊन । उडाले आकाशी करिती गमन ।
पुढे पसरले दश दिशां जाण । तैसे वानरगण निजलोका गेले ॥३३॥
जनोलोक तपोलोक । आणि वैकुंठ कैलास सत्यलोक ।
यांचे अधिकारी जे जे देख । ते त्या त्या स्थळा पै गेले ॥३४॥
श्रीराम वैकुंठासि गेला । सवे अयोध्येचा लोक नेला ।
नगरी कोणी नाही राखिला । पक्षिआदिकरोनी ॥३५॥
रविसुते रविलोकीं । जावोनि राहिला सुखी ।
इतर तापस राक्षस ऋषी । सत्यलोकी राहिले ॥३६॥
करिता श्रीरामस्मरण । स्वर्गी राहिले लोकगण ।
वाल्मीके इतकें कथिले जाण । रामायण साजिरे ॥३७॥
श्रीराम वैकुंठा करिता गमन । मार्गी भेटले पुरंदरादि देवगण ।
तयांची पूजा घेवोन । निजधामा चालिला ॥३८॥
वैकुंठा जाता श्रीरामासी । मार्गी उद्धरले देवऋषी ।
जयांची इच्छा होती जैसी । मनोरथ पूर्ण केले त्यांचे ॥३९॥
ऐसा लीलाविग्रही श्रीरघुनाथ । खेळ खेळूनि उद्धरिला भक्त ।
नाममात्रें मोक्ष देत । एक वेळ आठवलिया ॥४०॥
ब्रह्मचर्य धरोनि व्रत । वैकुंठा गेला जानकीकांत ।
ऐसे ऐकोनि श्रोते आक्षेपिते । म्हणते झाले वक्तया ॥४१॥
ब्रह्मचर्यव्रत धरोन । निजधामा गेला श्रीरघुनंदन ।
हा नेम धरावया कारण । काय असे सांगिजे ॥४२॥
व्रत धरावया श्रीरघुपती । काय कारण वाटे चित्ती ।
ते सांगिजे आम्हांप्रती । संदेहनिवृत्तीकारणें ॥४३॥
ऐसे ऐकोनि श्रोतयांचे वचन । अंगें निवाला एका जनार्दन ।
म्हणे तुमच्या प्रश्नाचें खंडन । मधुरा वाणी करीतसें ॥४४॥
ब्रह्मचर्य धरावया व्रत । काय कारण श्रीरघुनाथ ।
सावध होवोनि तुम्ही संत । अनन्यभावें ऐकावे ॥४५॥
पुढिलें श्रीकृष्ण अवतारीं । पूर्ण प्रकटावया श्रीहरी ।
भोगोनि सोळा सहस्त्र नारी । ब्रह्मचारी म्हणविणें ॥४६॥
भोगोनि भोग अभोक्ता । ऐसी प्रकट करावया कथा ।
उल्हास थोर अच्युता । दाखविता निजमहिमा ॥४७॥
याकारणें ब्रह्मचर्यव्रत । धरिता झाला श्रीरघुनाथ ।
पुढील रसाळ चरित्र । प्रकट करावयालागूनी ॥४८॥
तंव श्रोते म्हणती कविश्वरा । रामावतारीं स्त्रियां अपारा ।
दान दिधल्या काय कारण चतुरा । सुवर्णाच्या अग्निहोत्रीं ॥४९॥
होम करिता प्रतिदिनीं । सुवर्णस्त्री देतसे दानी ।
तयाचे फळ आम्हांलागूनी । काय असे ते सांगावे ॥५०॥
वक्ता म्हणे अहो जी स्वामी । तुमचे प्रश्ननदीचे संगमीं ।
रामकथासिंधु मिळालों मी । ऐसे भावितसें मानसी ॥५१॥
तुमचे प्रश्नकथेची वृद्धी । तुमचे वचनलोभें समाधी ।
तुमचे कृपेनें कैवल्यपदीं । पाविजे हो दातारा ॥५२॥
तुमचेनि प्रश्नें श्रीरामस्मरण । होतसे अधिकाधिक जाण ।
तुमचे प्रश्नें भवदोष-दहन । ब्रह्मपूर्ण होइ‍जे ॥५३॥
तुमचे प्रश्नाचे उत्तर । द्यावया मी कोण किंकर ।
परी सलगी करोनि सादर । तुम्हांप्रति सांगतसें ॥५४॥
रामावतारीं स्त्रिया दान । केल्या म्हणोनि पावला श्रीकृष्ण ।
पूर्वसंचित अवश्य जाण । भोगणे पडे देवादिकां ॥५५॥
पूर्वी स्त्रिया देवोनि दान । त्या कृष्णावतारी पावला जाण ।
यालागी श्रुतिप्रमाण । दिधल्यावांचोन न पाविजे ॥५६॥
नादसमुपतिष्ठतु । याचा ऐसा असे अर्थु ।
स्वमुखें बोलिला श्री‍अच्युत । पूर्वदत्त पाविजे ॥५७॥
यापरी श्रोतयांचे आक्षेप‍उत्तर । कवीनें देवोनि त्याचे प्रत्युत्तर ।
पुढे कथासमाप्तीचा विचार । आरंभिला जाणावा ॥५८॥
सवेंचि आठवलें माझिया चित्ता । ते परिसावे जी श्रोतां ।
जानकीवियोगें श्रीरघुनाथा । कष्ट अपार पै झाले ॥५९॥
एकपत्नीव्रताचे नेमे । क्लेश भोगिले श्रीरामे ।
आणि वनफळे भक्षिलीं उत्तमें । तेणेकरोनी श्रम झाला ॥६०॥
ऐसी दोनी व्रते अति दुस्तरें । धरिली होती श्रीरघुवीरें ।
ती श्रमरुप जाणोनी चतुरे । कृष्णावतारी त्यागिलीं ॥६१॥
व्रतनेमाचा धरोनि वीट । अवतार धरिला अति श्रेष्ठ ।
करावया पूर्णत्व प्रकट । ऐसी लीला धरियेली ॥६२॥
घेवोनि कृष्णरुपाची बुंथी । लीलाविग्रहीं श्रीपती ।
आसक्त होवोनि वनितीं । चोरावया हिंडतसे ॥६३॥
भोगी गौळियांच्या नारी । दही चोरी घरोघरी ।
दांवीं बांधिता सुंदरी । यशोदा आश्वर्य पावली ॥६४॥
ऐसा लीलाविग्रही जनार्दन । तोचि दाशरथी रघुनंदन ।
प्रकट करोनि पूर्णपण । खेळ खेळे नानापरी ॥६५॥
रामायणींचा एक श्लोक । भवबंधच्छेदक समर्थ देख ।
कथून गेला वाल्मीक शतकोटि संख्या हो ॥६६॥
श्लोकार्थ अथवा एक चरण । जो नर सादर करी श्रवण ।
तो पढियंता श्रीरामा पूर्ण । मुमुक्षांमाजि आगळा ॥६७॥
श्रीराम‍उच्चारें गणिका । तत्काळ गेली वैकुंठलोका ।
हा निश्चय होता कैलासनायका । ध्येयमूर्तिं म्हणोनि ॥६८॥
उत्तरकांड संपते‍अंतीं । वैकुंठा गेला लक्ष्मीपती ।
ऐसे चरित्र ठेवोनि त्रिजगती । उद्धरावयाकारणें ॥६९॥
एका जनार्दना शरण । झाले उत्तरकांड संपूर्ण ।
पुढे श्रोती करावे श्रीरामस्मरण । राम राम म्हणावें ॥७०॥
आदिपासोनि अंतींवरी । श्रीरामकथा अमृतलहरी ।
सादर जो श्रवण करी । तोचि संसारी धन्य होय ॥७१॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
श्रीराम‍अयोध्याजनसमवेतवैकुंठपप्रवेशो नाम सप्तसप्ततितमोऽध्यायः ॥७७॥

॥ उत्तराकांड समाप्त ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग