वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ५. सुन्दरकाण्ड - अध्याय ४२ › १२. सीतेचा रावणास नकार

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088238 · अभंग क्र. १२

12.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

सुंदरकांड

॥ अध्याय बारावा ॥

सीता - हनुमंत यांचा संवाद

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

सीता मारूतीला पूर्ववृत्तांत कथन करण्याची सूचना करिते :

एकाएकी अशोकवनां आंत । आला देखोनि हनुमंत ।
त्यासी समूळ वृत्तांत । पुसे साद्यंत जानकी ॥१॥
मज वनवासी असता । तै तू नव्हतासी हनुमंता ।
कैंचा आलासी तू आता । निजवृत्तांता सांगावे ॥२॥
कैसेनि राम देखिला दृष्टी । तुज रामासीं कैसेनि भेटी ।
कैशा कैशा केलिया गोष्टी । जेणे पोटी अति प्रीति ॥३॥
कैसा बाणला तो वचनार्थ । साधावया श्रीरामाकार्यार्थ ।
हनुमान प्राणेंसीं साह्यभूत । तो गुह्यार्थ मज सांगे ॥४॥
श्रीराम भेटलिया कैसे सुख । श्रीरामवचनीं कैसे पीयूख ।
श्रीरामसंगे कैसा हरिख । योगपरिपाक मज सांगे ॥५॥
श्रीरामांचे ठाणमाण । रूपरेखागुणलक्षण ।
कैसा आहे लक्ष्मण । जीवींची खूण मज सांगे ॥६॥
ऐकता श्रीरामाची कथा । दुःख शोक नाठवे चित्ता ।
निमे संसारभयव्यथा । कथा ऐकता आनंद ॥७॥
याचलागीं तुजप्रतीं । कथा पुसे मी पुढतपुढतीं ।
कथेमाजी निजविश्रांती । जाण मारूती निश्चित ॥८॥

रामकथाश्रवणाचे फळ :

केलिया कथेचे श्रवण । नाही मनन निदिध्यासन ।
ते कथा जाय वाळोन । जीवनेंविण जेंवी धान्य ॥९॥
श्रद्धें श्रीरामकथाश्रवण । ऐकती त्यांचे निजमहिमान ।
मननें मन होय उन्मन । अहं विरोन होय सोहम् ॥१०॥
चित्त ते होय चैतन्य । बुद्धि समसाम्य समाधान ।
कर्मचि होय ब्रह्म पूर्ण । इंद्रियाचरण चिन्मात्र ॥११॥
ऐसी श्रीरामस्वरूपावस्था । सादरे पुसतां पै सीता ।
ठक पडियेलें हनुमंता । कथावार्ता विसरला ॥१२॥
धन्य धन्य हनुमंताचे ज्ञान । करिता श्रीरामाचे कीर्तन ।
आठवविसरातें गिळोन । सावधान स्वये जाहला ॥१३॥

हनुमंताचे कथन :

सीता पुसे श्रीरामकथा । तेचि श्रीरामस्वरूपसंस्था ।
हनुमंत होय सांगता । यथार्थता स्वरूप ॥१४॥
लक्ष्मणाचे निजलक्षण । ठाणमाण गुणलावण्य ।
समूळ सांग आपण । सावधान अवधारा ॥१५॥
सांगावया श्रीरामकथा । उल्लास हनुमंताच्या चित्ता ।
देखोनि सीतेची सादरता । होय सांगता स्वानंदे ॥१६॥

श्रीरामवर्णन :

श्रीराम रूपे अति सुरूप । रूपे जिंकिला कंदर्प ।
परी तो रूपेंचि अरूप । चित्स्वरूप श्रीराम ॥१७॥
श्रीराम राजीवलोचन । जगाचे नयनाचें नयन ।
परी तो देखणा डोळेवीण । देखणेंपण हे जानकी ॥१८॥
दृश्य देखणे हे तंव गौण । श्रवणान्त देखणे नयन ।
देखण्यास देखणेपण । श्रीराम पूर्ण देखतसे ॥१९॥
कुंडले वर्णिती साकार । एक म्हणती मकराकार ।
श्रवणें मावळती विकार । निर्विकार निजलेणें ॥२०॥
श्रीरामाचे श्रवणें । श्रवणा होती निजभूषणें ।
श्रवण श्रवणाचें लेणें । श्रवणें देखणे परब्रह्म ॥२१॥
परमार्थाचें निजबीक । निरपेक्ष ते नासिक ।
तेणेंवीण ते निर्नासिक । कैचें सुख साक्षेपे ॥२२॥
श्रीरामाची नासिकास्थिती । प्राणिप्राणां नित्यविश्रांती ।
श्रीरामप्राणें प्राण्यां गती । त्यासी विश्रांति श्रीराम ॥२३॥
श्रीरामाचा मुखशशांक । नित्यानंद निष्कलंक ।
ब्रह्मादि देवा सुखदायक । जीवशिवां सुख श्रीराम ॥२४॥
जीवशिव दोन्ही अधर । श्रीराम अधरीं जाहले सधर ।
मिळणीं मिळती एकाकार । शिवसुखसार श्रीराम ॥२५॥
श्रीराममुखींची दंतपंक्ती । जेंवी ओंकारमाजी श्रुती ।
श्रुतीची ही विश्रांती । श्रीराममूर्तिमुखचंद्र ॥२६॥
श्रीरामाचे निजनिढळीं । सच्चिदानंद हेचि त्रिवळी ।
त्याचे ललाटभाग्यमेळीं । लोकी सकळीं नांदिजे ॥२७॥
प्रेमकेशरसमेळा । टिळक रेखिला पिंवळा ।
निर्धारू अक्षता निढळा । राम प्रेमळां पढियंता ॥२८॥
अहंमृग विंदिला निर्लोभेंसीं । सोहं काढोनि मृगनाभीसीं ।
तेही अर्पिली श्रीरामासी । निजांगासी चर्चोनी ॥२९॥
जन विजन विवंचून । काढिला निजधैर्यचंदन ।
त्याचेंही सुगंध काढून । उद्वर्तन श्रीरामा ॥३०॥
त्यजूनि स्वधर्मकर्मफळा । तेचि मुक्ताफळमाळा ।
शोभे श्रीरामाच्या गळा । राम प्रेमळा पढियंता ॥३१॥
ओंकार तोचि कंबुकंठ । तेथोनि वेदांसी वाहती वाट ।
गर्जती विधिवादें उद्‌भट । होती प्रकट त्रिकांडीं ॥३२॥
त्वंपदतत्पदातीत । ह्रदयीं पदक सदोदित ।
साधु चिद्रत्‍नजडित । लखलखित निजतेजें ॥३३॥
म्हणती कांसे कशिला पीतांबर । श्रीरामकासे चिदंबर ।
झांकी शून्यत्वाचे छिद्र । कांसे अछिद्र श्रीराम ॥३४॥
श्रीरामकांसेसी दृढ भारी । एकपत्‍नीव्रतधारी ।
कांसे लागलियातें तारी । भवसागरी तारक ॥३५॥
श्रीराम आकळे सगळा । भक्तिभावार्थ कटी मेखळा ।
क्षुद्रघंटिकाज्वाळमाळा । जाहल्या सकळा ऋद्धिसिद्धि ॥३६॥
सूक्ष्ममध्याची रचना । अभिमान होता पंचानना ।
श्रीराममध्य देखोनि नयना । लाजोनि राना तो गेला ॥३७॥

श्रीरामदर्शनाचे फळ :

पाहता श्रीराममध्यासीं । सिंहाडे जडले मेखळेसी ।
सर्वस्वें लोभले श्रीरामासी । जावों रानासी विसरले ॥३८॥
श्रीरामचरणींची स्थिती । श्रीराम गतीची निजगती ।
श्रीराम गतीसी विश्रांती । जाण निश्चिती जानकिये ॥३९॥
श्रीरामचरणांचें निजभूषण । वांकीनें वेदा आणिले उणे ।
ते तंव धरोनि ठेले मौन । रामकीर्तन हे गर्जे ॥४०॥
चहू वाचां परात्पर । चरणी गर्जे तोडर ।
श्रीरामपद चिन्मात्र । श्रीरामचंद्र परब्रह्म ॥४१॥
लक्षितां श्रीरामाचे ठाण । त्यासी ठेंगणें गगन ।
पाहता श्रीरामाचे मन । पडिले मौन श्रुतिशास्त्रां ॥४२॥
पाहता श्रीरामाचे गुण । सगुण दिसताहे अगुण ।
श्रीरामे हरिले त्रिगुण । निजनिर्गुण श्रीराम ॥४३॥
लक्षितां श्रीरामलक्ष्मण । जो लक्षी तो विचक्षण ।
लक्ष्यालक्षविलक्षण । लक्षणालक्षण त्या नाही ॥४४॥
श्रीराममुखींची अक्षरे । अमृतापरीस अति मधुरें ।
सभाग्य सेविती श्रवणद्वारे । आनंदरस भरे सर्वांगी ॥४५॥
देखिता श्रीरामाचे मुख । फिकें होय समाधिसुख ।
स्वप्नीहीं न देखे दुःख । हरिखें हरिख कोंदाटे ॥४६॥
कोंदाटले परब्रह्म । ब्रह्मरूप क्रियाकर्म ।
हरपले धर्माधर्म । जाहला उपरम वेदवादा ॥४७॥

लक्ष्मणाचे वर्णन :

ऐसा श्रीराम नेटका । तैसाचि सौमित्र निजसखा ।
दोघा अभिन्नत्व देखा । भिन्न आवांका दिसताहे ॥४८॥
घालोनिया लोटांगण । तुज कुशल कल्याण ।
स्वये पुसे लक्ष्मण । पुसे कल्याण श्रीराम ॥४९॥

ते ऐकून त्याचा सीतेवर परिणाम :

ऐसे हनुमंते सांगता । तटस्थ ठेली श्रीरामकांता ।
आपाआपणा विसरे सीता । हनुमंताचेनि बोले ॥५०॥
हनुमंते बोलाआंत । अवघाचि आणिला श्रीरघुनाथ ।
तेणे सीतेचा मनोरथ । सदोदित स्वानंदे ॥५१॥
हर्ष न माये पोटी । संतोषाचिया कोटी ।
तेणे सुखे सीता गोरटी । घातली मिठी हनुमंता ॥५२॥
वानर वदे मनुष्यवाणी । श्रीरामकथा त्याचे वदनी ।
जिये कथेच्या श्रवणी । भवबंधनीं निर्मुक्त ॥५३॥
ऐकता वानराच्या गोष्टी । सत्य श्रीरामासी जाहली भेटी ।
निरसोनिया दुःखकोटी । ओतिली सृष्टी सुखरूपें ॥५४॥
हर्षाचिया लवलाह्या । स्वानंदे पसरोनि बाह्या ।
आलिंगिलें कपिराया । जिंवी का माया प्रियपुत्रा ॥५५॥
सीतेसी सुख जाहलें गाढे । पुत्रसुख ते तृण यापुढें ।
हनुमंत वाडेंकोडें । प्रेमपडिपाडें पढियंत ॥५६॥

रामलक्ष्मणांचे क्षेमकुल ऐकून सीतेला झालेला आनंद :

श्रीराम भर्ता लक्ष्मण दीर । दोघे सुखसंपन्न वीर ।
हे ऐकतांचि उत्तर । सुख अपार मज जाहलें ॥५७॥
श्रीरामस्वरूपाची कथा । जे वदलासि गा हनुमंता ।
तेणे सुखे ब्रह्मसायुज्यता । न ये तुकितां तुकासी ॥५८॥

सीता हनुमंताची स्तुती करतें :

श्रीरामकथा अनुवादोन । तुवा मज केले सुखसंपन्न ।
तुज मी वदेन वरदान । सावधान अवधारी ॥५९॥
हनुमंता होई चिरंजीवी । ते ही जीवित्व ज्ञानानुभवी ।
नित्य नवे सुखसंभवीं । श्रीरामपदवीवैभवें ॥६०॥
तुज कळिकाळ कांपे चळीं । ऐसा होसी आतुर्बळी ।
यश पावसी भूमंडळी । नामसमेळीं श्रीरामे ॥६१॥
निरसोनिया विज्ञाना । श्रीरामभजने प्रबुद्ध प्रज्ञा ।
ज्ञेय मुकलें ज्ञेयपणा । श्रीरामस्मरणाचेनि बळे ॥६२॥
श्रीरामाचिया स्मरणी । अपयश निमे तत्क्षणीं ।
यश न माये त्रिभुवनी । नामस्मरणीं प्रताप ॥६३॥
चिरंजीव सुखानुभवी । बळ प्रज्ञा आणि यशस्वी ।
याहून तुझी अधिक पदवी । देवीं दानवीं देखिजे ॥६४॥
शतयोजन सिंधु अगाध । तुवा लंघिला जैसे गोष्पद ।
त्यापुढे कायसे माझे वरद । प्रज्ञाप्रबुद्ध हनुमंत ॥६५॥
तुज म्हणो नये वानर । सुरासुरा दुर्धर ।
धांडाळोनि लंकापुर । निशाचरे गांजिलीं ॥६६॥
एकला एक हनुमंत । रावणाचे सभेआंत ।
राक्षसा करोनि आकांत । लंकानाथ गांजिला ॥६७॥
लंकेमाजी कडोविकडी । गांजिल्या राक्षसांच्या कोडी ।
रावणाची सभा उघडी । केली रोकडी तुवा एके ॥६८॥
देखतांही दशानन । सभेमाजी घालोनि खाण ।
तुवा नागविले राक्षसजन । शेखी रावण गांजिला ॥६९॥
एवढा करिता आकांत । येथे आला हनुमंत ।
नाही कळलें लंकेआंत । ऐसा समर्थ तू एक ॥७०॥
ऐसा प्रतापिशिरोमणी । पावलासी अशोकवनी ।
तूंचि जनक तूंचि जननी । राम घेवोनी शीघ्र यावे ॥७१॥
तुझी होवोनियां दासी । तुझे चरण झाडीन केशी ।
शीघ्र आणावें श्रीरामासी । म्हणोनि पायांसी लागली ॥७२॥

मारूतीराया सीतेजवळ खूण मागतात :

आले हनुमंतासी स्फुरण । व्यर्थ कशाला करिसी रूदन ।
वेगे देई आपुली खूण । श्रीरघुनंदन आणावया ॥७३॥
तुज मी आणिली खूण मुद्रा । तेणे तू ओळखसी वानरा ।
खूण देई श्रीरामचंद्रा । सत्य कपीन्द्रा मानावया ॥७४॥
काय करिसी देवोनि खूण । न लगे भाक न लगे आण ।
मज आठवली युक्ति आन । सावधान अवधारी ॥७५॥

किंवा पाठीवर बसून येण्याचे सांगतात :

पृष्ठी बैसल्या सीता । तेच क्षणी श्रीरघुनाथा ।
तुज भेटवीन आता । विलंब वृथा करू नको ॥७६॥
शुद्धि सांगावया श्रीरघुनाथा । तुज येथे सांडोनि जाता ।
राक्षसी केलिया तुझ्या घाता । शुद्धि वृथा होईल ॥७७॥
येथे मजचि देखता । रावण वधूं आला होता ।
दैवे चुकविलें अनर्था । सांडोनि जाता मज नये ॥७८॥
शूर्पणखा केली नकटी । तुझा राग तिचे पोटी ।
तुज मारील उठाउठी । महा खोटी राक्षसी ॥७९॥
सांडोनि जाणे न घडे गोष्टी । वेगी बैसे माझे पृष्ठीं ।
करीन श्रीरामासी भेटी । विकल्प पोटी धरूं नको ॥८०॥
लंका त्रिकूट कनकगिरी । उपडोनि आपुलें बळेंकरी ।
एके उड्डाणे समुद्री । नेईन पैलतीरीं जानकीये ॥८१॥
करोनि एकचि उड्डाण । भेटवीन रामलक्ष्मण ।
वाहतो श्रीरामाची आण । करी आरोहण पृष्ठ भागीं ॥८२॥
तुज म्या नेतां अति त्वरेसीं । राक्षसमहावीरशूरांसी ।
वेगे न येववेल मजपासीं । त्या मशकांसी काय ठावे ॥८३॥
आलिया इंद्रजित कुंभकर्ण । त्यांसी रणी विभांडून ।
रावणातेंही गांजोन । भेटवीन श्रीरामा ॥८४॥

मार्गात अडथळे किंवा अपघात होण्याची भीती सीता व्यक्त करते :

सीता म्हणे गा अवधारी । बैसता तुझे पाठीवरी ।
तुझिया वेगे उड्डानकरीं । पडेन सागरी हिसळोनी ॥८५॥
पडता समुद्राप्रतीं । मत्स्य मगर मग भक्षिती ।
तेव्हा तू पडसी आवर्ती । केंवी मारूती म्या यावे ॥८६॥
का धांवणे आलिया मागे वेगी । तू परतसील युद्धालागीं ।
समरांगणीं युद्धभागीं । मी रणरंगी पडेन ॥८७॥
मज पडतांचि क्षिती । क्षोभोनि राक्षस मज मारिती ।
हेही न घडे गा युक्ती । केंवी मारूती म्या यावे ॥८८॥
मज मारिलियापाठीं । जरी त्वा मारिल्या राक्षसकोटी ।
सुख नव्हे श्रीरामाचे पोटी । बुद्धि खोटी हे हनुमंता ॥८९॥

मारूतीचे उत्तर व सीतेची शंका :

सीते ऐक सावध गोष्टी । मज न लगे आटाआटी ।
माझे पुच्छ कोपलियापाठीं । मारील कोटी राक्षस ॥९०॥
तुज मी राखीन राहीं स्वस्थ । माझे पुच्छ प्रतापवंत ।
करील राक्षसांचा घात । अर्बुदांत जरी आले ॥९१॥
सीता म्हणे तू अल्प मारूती । पुच्छ तंव तुझे किती ।
केंवी राक्षसा लावील ख्याती । सत्यत्व चित्ती मानेना ॥९२॥

मारूतीचे शेपटीच्या प्रभावाचे वर्णन व तिला अभिवचन :

सीते म्हणसी वानर किती । काय पुच्छाची शक्ती ।
पाहे माझी स्वरूपस्थिती । म्हणोनि मारूती वाढला ॥९३॥
विंध्याद्रि मेरू मांदार । त्यांहूनि वाढला वानर ।
जैसा प्रळयकाळीं रूद्र । तैसा दुर्धर जाहला ॥९४॥
सीते नेणसी माझे सत्व । पाहे माझे स्वरूप प्रभाव ।
देव दानव आणि मानव । राक्षस सर्व गांजीन मी ॥९५॥
माझे पुच्छ पाहे प्रतापवंत । राक्षस मारोनियां समस्त ।
सगळी लंका तुजसमवेत । निमेषार्धांत नेईन ॥९६॥
विकल्प सांडोनिया पोटी । सीते बैसे माझे पृष्ठी ।
करीन श्रीरामासी भेटी । सुखसंतुष्टी स्वानंदे ॥९७॥
तुज न्यावया श्रीरामाप्रती । पाहे माझी दुर्धर शक्ती ।
विकल्प सोडोनियां चित्ती । बैस मारूतीपृष्ठभागी ॥९८॥
दुर्धर देखोनि मारूती । देव दानव चळीं कांपती ।
निधडी निःशंक सीता सती । अनुवादती स्वधर्म ॥९९॥

श्रीरामांशिवाय अन्य पुरूषाचा स्पर्श वर्ज :

मज भेटावया श्रीरघुपती । निधडी शक्ती तुज मारूती ।
तुझी देखोनि अचलस्थिती । मज निश्चिती मानले ॥१००॥
एका रामावांचोनि जाण । परपुरूषीं आरोहण ।
तेंचि पतिव्रतेसीं दूषण । वेदपुराणसंमत ॥१०१॥
सांडोनि राम उत्तम पुरूष । नरवानरीं गात्रस्पर्श ।
तो पातिव्रत्या महादोष । हा इतिहास हरिहरा ॥१०२॥
अंगोअंगीं प्रवेशून । करिता गुरूपत्‍नीरक्षण ।
तेंचि विधूसीं दूषण । जाहला संपूर्ण प्रायश्चित्ती ॥१०३॥
तैसेंचि मज खांदी वाहता । दोषी होसील हनुमंता ।
मी तंव नयें गा सर्वथा । दोहींचे माथा महादोष ॥१०४॥
परपुरूषीं अनुसरोन । एकाकी सहगमन ।
करिता दोघांही दूषण । सत्य जाण हनुमंता ॥१०५॥

मारूती सीतेला आपली व श्रीरामांची जनळीक सांगतात :

ऐसे जानकी बोलता । हांसों आले हनुमंता ।
मज श्रीरामाची अति आप्तता । समूळ कथा अवधारी ॥१०६॥
म्या अंजनीस पुसिली गोष्टी । माझा स्वामी कोणता सृष्टी ।
ते म्हणे सगर्भ कांसोटी । देखे जो दृष्टी तो स्वामी ॥१०७॥
श्रीराम निजला तरूतळवटीं । मज बैसता वृक्षसंपुटीं ।
सगर्भ ब्रह्मचर्यकांसोटी । देखे दृष्टी श्रीराम ॥१०८॥
राम सांगे सौमित्रासी । गर्भी ब्रह्मचर्य वानरासी ।
सगर्भकौपिन पाहे यासी । आश्चर्यासीं सांगत ॥१०९॥
ऐकोनि श्रीरामांचे वचन । माझे ठायी हे लक्षण ।
दोघे मनुष्य हीन दीन । स्वामी तयांतें केवी मानूं ॥११०॥
सेवक सबळ स्वामी निर्बळ । तो स्वामीच सकळ विकळ ।
पहावया श्रीरामांचे बळ । रणकल्लोळ म्या केला ॥१११॥
वृक्ष सांडिले शतानुशत । निर्वाणीं सोडिले पंच पर्वत ।
निद्रा न सांडोनि श्रीरघुनाथ । वृक्ष पर्वत छेदिले ॥११२॥
श्रीराम कृपाळु पै पुरा । बाणी न मारोनि वानरा ।
बाणपिसारीं सोडिला वारा । मज अंबरा उडविलें ॥११३॥
बाणपिच्छाचें झडाडें । हात पाय जाहले देव्हडे ।
दांत विचकिले म्या माकडें । उगवी वेढे निजपुच्छा ॥११४॥
ऐसी पडता मुरकुंडी । पिता पवन लवडसवडीं ।
येवोनियां अति तांतडी । बुद्धि गाढी सांगितली ॥११५॥
श्रीराम परमात्मा परिपूर्ण । त्याची पाहता आंगवण ।
तुझा तत्काळ जाईल प्राण । श्रीरामार्पण देह करी ॥११६॥
रामाज्ञें विकावें जीवित्व । श्रीरामसेवेसी देह विक्रीत ।
श्रीरामासवे नित्य तृप्त । द्वंद्वनिर्मुक्त तू होसी ॥११७॥
ऐकोनि पितयाचे वचन । काया वाचा मनें अनन्य शरण ।
मस्तकी वंदोनि श्रीरामचरण । श्रीरामार्पण देह केला ॥११८॥
राम ध्यानी राम मनी । श्रीराम नित्य निदिध्यासनीं ।
राम कानी राम नयनी । वस्ती वदनी श्रीरामनामा ॥११९॥
श्रीराम आसनी शयनी । श्रीराम नित्य गमनागमनीं ।
श्रीराम सुस्वादुभोजनीं । जागृतिस्वप्नीं श्रीराम ॥१२०॥
ऐसा मी अनन्य श्रीरामभक्तीं । तुझा विकल्प परपुरूषार्थी ।
सावध ऐक तेही अर्थी । अतिगुह्योक्ती सांगेन ॥१२१॥

आणि स्वतः चे गुप्त रहस्य सीतेला सांगतात :

गर्भी ब्रह्मचर्यकौपीन । अंजनी माता न देखे नग्न ।
माझ्या लिंगाचें दर्शन । स्त्रष्टा आपण पावेना ॥१२२॥
ऐसी देखोनि माझी स्थिती । मुद्रिका देवोनि माझे हाती ।
मज धाडिलें वो तुजप्रती । तुझ्या चित्ती विकल्प ॥१२३॥
श्रीरामे सांगितली खूण । करविलीं वल्कले परिधान ।
तुज नेसतां न ये जाण । श्रीराम आपण नेसविलीं ॥१२४॥

सीता विचारते की श्रीरामांची आज्ञा काय आहे ?
शोध घ्यावा की सीतेला आणावी ?

खूण सांगता हनुमंता । चित्ती चमत्कारली सीता ।
विकल्प सांडोनि तत्वता । गुज एकांता अनुवादे ॥१२५॥
श्रीरामाज्ञा वंद्द आम्हांसी । श्रीरामे काय सांगितले तुजपासी ।
तुवा आणावें सीताशुद्धीसी । किंवा सीतेसी आणावे ॥१२६॥
जरी आणविले सीतेसी । तरी मी येईन तुजसरसीं ।
आणविलें असेल शुद्धीसी । तरी वेगेंसी त्वा जावे ॥१२७॥

हनुमंताचे उत्तर व सीतेचा त्याला निरोप :

ऐसे तिणे पुसतां । गहिंवर आला हनुमंता ।
धन्य धन्य सती सीता । निर्लोभता सज्ञान ॥१२८॥
सावध अवधारी वो माते । असत्य न बोले मी येथे ।
रामे आणविलें शुद्धीतें । हेंचि निश्चिते श्रीरामाज्ञा ॥१२९॥
सीता म्हणे हनुमंता । विलंबू न करावा सर्वथा ।
शीघ्र जावोनिया जाता । शुद्धि रघुनाथा सांगावी ॥१३०॥
माझी कृपा आहे हनुमंता । तरी जाऊन शीघ्रता ।
शुद्धि सांगावी श्रीरघुनाथा । चरणी माथा ठेवोनी ॥१३१॥
सीतानेत्रीं अश्रू मुखीं दीन । करिता हनुमंता गमन ।
वानरे अंगुष्ठ दांतीं धरून । लोटांगण सीतेसी ॥१३२॥
ऐकोनि सीताकरूणावचन । तेणे हनुमंता आले स्फुरण ।
शीघ्र देई आपली खूण । आतांचि गमन मी करितो ॥१३३॥
मुद्रिका देवोनि जाण । निरोपें सांगितली खूण ।
तेंवीच त्वा देखोनि भूषण । मुखें वचन मज सांगे ॥१३४॥
तुवा निज वस्त्रा भूषणांसी । सांडिलें किष्किंधें वानरांपासी ।
तेंचि दाविता श्रीरामासी । उकसाबुकशीं स्फुंदत ॥१३५॥
ऐसी तुझी वो अवस्था । अतिशयेंसीं श्रीरघुनाथा ।
नित्य स्मरणी सीता सीता । प्रियकांता पढियंती ॥१३६॥
सत्य मानी लंकागमन । तैसे देई निजभूषण ।
तैसेंचि सांगे मुखें वचन । श्रीराम पूर्ण सुखावे ॥१३७॥

सीता मारूतीला खुणेचा मणी देते व लक्ष्मणाला क्षमा करण्यास कळवितें :

ऐसे हनुमंते सांगता । सुखे सुखावोनि सीता ।
वेणिये मणी माथा होता । धाडी रघुनाथा खुणेंसीं ॥१३८॥
श्रीरामसुखे सुखसमेळा । मनशिळेचा युक्त टिळा ।
निजहस्ते लावी कपाळा । हेही गोळांगूळा खूण सांगे ॥१३९॥
माझे ऐकतांचि उत्तर । कागावरी सोडी ब्रह्मास्त्र ।
ही गुह्य गोष्टी सांगता गंभीर । श्रीराम साचार मानील ॥१४०॥
काग हिंडता तिही लोका । कोणाही नव्हे आवांका ।
शरण आला रघुकुळटिळका । मग दर्भशिखा निवारिली ॥१४१॥
वामनेत्र घेवोनि जाण । कागाचा वांचविला प्राण ।
हे सांगता निजखूण । श्रीरघुनंदन सुखावे ॥१४२॥
ऐसी शस्त्रास्त्रे तुजपासी । तरी का धांवण्या न धांवसी ।
मृगापाठी धाडिलासी । तेणे रूसलासी श्रीरामा ॥१४३॥
तो अपराध करोनि क्षमा । धांवण्या येवोनि श्रीरामा ।
बंधमोचन करी आम्हा । पुरूषोत्तम कृपाळुवा ॥१४४॥
लक्ष्मणासीं लोटांगण । तुझे म्या व्यर्थ केले छळण ।
त्या पापाचें फळ हे जाण । मज रावण गांजितो ॥१४५॥
छळणपाप अति अद्‌भुत । सीता आणि श्रीरामाआंत ।
आडवे आले सिंधुपर्वत । दूरी दूरस्थ निर्बंध ॥१४६॥
छळणपापाची हे ख्याती । पापिष्ठ रावणाचिये हाती ।
बंदीं पडली सीता सती । श्रीरघुपति क्षोभला ॥१४७॥
छळणपाप अति दारूण । ना श्रीराम ना लक्ष्मण ।
राक्षसांचें नित्य छळण । मज म्या पूर्ण छळियेले ॥१४८॥
लक्ष्मणासी लोटांगण आता । अनन्य शरण श्रीरघुनाथा ।
शुद्धि सांगता हनुमंता । अति शीघ्रता पावावें ॥१४९॥
एकाजनार्दना शरण । पुढे गोड निरूपण ।
वानर वनविध्वंसन । करील निर्दळण राक्षसा ॥१५०॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
सीताहनुमत्संवादो नाम द्वादशोऽध्यायः ॥१२॥
॥ ओव्या १५० ॥ श्लोक २४ ॥ एवं संख्या १७४ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग