॥ श्रीएकनाथमहाराजकृत
16.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
सुंदरकांड
॥ अध्याय सोळावा ॥
रावण सैन्याचा संहार
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
अपमानामुळे उद्विग्न झालेल्या इंद्रजिताचे पलायन व बिळात प्रवेश
इंद्रजित पावोनि अपमान । अतिशये जाला उद्विग्न ।
हनुमंताचे बळलक्षण । सर्वथा संपूर्ण लक्षेना ॥१॥
हनुमंताची धैर्यवृत्ती । हनुमंताची संग्रामशक्ती ।
हनुमंताची सवेग गती । अतर्क्यस्थिती लक्षेना ॥२॥
अतर्क्य हनुमंताची गती । ते लक्षेना नाना युक्ती ।
इंद्रजिताची खुंटली मती । रणी मारूती नाटोपे ॥३॥
रणी नाटोपे मारूती । आपुलें पूर्वशौर्य कीर्ती ।
वानरे नेली निंदेप्रतीं । सलज्ज चित्ती इंद्रजित ॥४॥
इंद्राते रणी जिंकोन । पावलों इंद्रजित अभिधान ।
वानरांसी करिता रण । तृणसमान मज केले ॥५॥
मी एक गाढा वीर सृष्टी । ऐसा फुगारा होता पोटी ।
रणी वानरे पुरवोनि पाठी । तृणासाठीं मज केले ॥६॥
जळो माझी धैर्यशक्ती । माझी जळो वीरवृत्ती ।
रणी नाटोपे मारूती । कीर्ति अपकीर्ति मज माझी ॥७॥
भंगिला रथ आणि सारथि । भस्म केली शस्त्रसंपत्ती ।
रणी न जिंकवे मारूती । क्षीणशक्ति इंद्रजित ॥८॥
न चले शस्त्रास्त्रयुक्ती । न चले मल्लविद्याव्युत्पत्ती ।
कपट न चले वानराप्रती । चिंतावर्तीं इंद्रजित ॥९॥
कोणी एखादी युक्ती । न चले ह्या वानराप्रती ।
जळो माझी यश:कीर्ती । चिंतावर्ती इंद्रजित ॥१०॥
माझ्या वरदाची वरोक्ती । मारू न शके मज मारूती ।
धरोनि नेलिया रामाप्रती । विटंबिती वानरे ॥११॥
रावणे आणिले सीतेसी । बांधून नेईल मज रामापासी ।
तेथे करिता अपमानासीं । वानरांसी कोण वारी ॥१२॥
रावणे होऊनि भिकारी । चोरोनि आणिली सीता सुंदरी ।
वानरे करोनि जुंझारी । मज निर्धारी नेईल ॥१३॥
अंगदाच्या पाळण्यासीं । खेळणें बांधिले दशमुखासी ।
पौलस्तीनें मागतां त्यासी । अपमानेंसीं सोडिला ॥१४॥
मुंडोनि दाढ्या मिशांसी । मसी लावोनियां मुखांसीं ।
पांच पाट काढोनि शिरासीं । ऐसा लंकेसी धाडिला ॥१५॥
मज धरोनि नेलिया मारूती । माझी होईल तैसीच गती ।
कांही नचले उपपत्ती । चिंतावर्ती इंद्रजित ॥१६॥
पुच्छी बांधोनि हनुमंता । येथोनि मज धरोनि नेतां ।
धांवण्या कोणी नये सर्वथा । परम चिंता इंद्रजितां ॥१७॥
सुबद्ध धाक घेतला पोटी । रणी वानरा देवोनि पाठी ।
इंद्रजित पळे उठाउठी । पुच्छासाठीं धाकोनी ॥१८॥
पळता न पळवे पुढे । पडिले पुच्छाचे बिरडें ।
तेथल्या विवरामाजी दडे । बहु माकडें गांजिलें ॥१९॥
दुस्तर धाक घेतला मनी । गुप्त विवर अशोकवनी ।
इंद्रजित गेला पळोनी । सुलीन होवोनि दडाला ॥२०॥
मारूतीचा विवेक व पुच्छाशी विचारविनिमय :
हनुमंत वीर जगजेठी । न लागेचि पळत्यापाठीं ।
समूळ विचारोनि पोटी । विवेकदृष्टीं राहिला ॥२१॥
इंद्रजिताचे निजमरण । सर्वथा नाही मजअधीन ।
तरी का वृथां करू निर्वाण । आंगवण का नासूं ॥२२॥
इंद्रजितासी मज मारिता । क्षण न लगे पै आता ।
ब्रह्मवरदाची वार्ता । मिथ्या सर्वथा मी न करी ॥२३॥
ऐसऐसिया विवेकदृष्टीं । हनुमान न लागे इंद्रजितापाठीं ।
सैन्य अवलोकिले दृष्टी । धांवे कडकडाटीं वधावया ॥२४॥
पुच्छ म्हणे स्वामीनाथा । कवळोनि राखिलें समस्ता ।
तू भागलासि युद्ध करिता । मज वधार्था दे आज्ञा ॥२५॥
हनुमंत म्हणे तुझेनि बळे । म्या महावीरां मांडिले छळे ।
आता विभांडोनिया दळें । रणकल्लोळें विचरोनि ॥२६॥
मी जाते तू घाली वैरण । ऐसेनि भरडू राक्षसधान्य ।
डोळ उरती जे सघन । रणकंदन करू त्यांसी ॥२७॥
मारावया सैन्यसंभार । करोनि पुच्छासी विचार ।
मग दिधला भुभु:कार । निशाचर खळवळले ॥२८॥
मारूतीने व शेपटीने केलेला सैन्याचा संहार :
हनुमान देखोनि महाबळी । असुरीं मांडिली तंव फळी ।
शस्त्रे सुटली समकाळीं । नभू भूतळीं न समाती ॥२९॥
अतिरथी महारथी । अखपती गजपती ।
शस्त्रे हाणिती पदाती । रणी मारूती लक्षोनि ॥३०॥
शस्त्रघाताच्या समेळी । हनुमान नाचत गोंधळीं ।
पुच्छे शस्त्रांची करोनि होळी । रणसमेळीं विचरत ॥३१॥
हनुमान रणी निघटघट । वीर हाणिती सुभट ।
हाणीतां शस्त्रे होती पीठ । हाहा कटकटा राक्षसा ॥३२॥
करावया सैन्यसमाप्ती । रणी खवळला मारूती ।
सर्व मारका निजशक्ती । रणी व्युत्पत्ति अवधारा ॥३३॥
अश्वी अश्वातें मारित । गजीं गजाते संहारित ।
रथी रथ उपडित । मारुनी मत्त सारथी ॥३४॥
पायींचें पायी रगडित । वीरे वीर पै झोडित ।
ध्वज छत्रेंसीं मोडित । रणी मारित अति मारे ॥३५॥
पुच्छी कवळोनि गजकोटी । हनुमान उसळोनि आपटी ।
गजीं गज ते उपटी । पडिली सृष्टी गजदळें ॥३६॥
विदारितां कुंभस्थळें । निघती गजांची मुक्ताफळें ।
रणी पाडिलीं गजढिसाळें । पुच्छबळें उपडोनी ॥३७॥
शायसीं प्रयुते मत्त हस्ती । पुच्छे केली रणसमाप्ती ।
हस्तींच्या पिष्टकारोनि अस्थी । लाविली ख्याती कपिपुच्छे ॥३८॥
पुच्छ रिघोनि सैन्यतळी । महावीरां बांधोनि मोळी ।
आपटितां त्यांसी भूतळीं । जाहली रांगोळी सैन्याची ॥३९॥
खर उष्ट्र अश्वतर । पुच्छी बांधोनि अपार ।
तळी उभे अश्वसंभार । घाये चकचूर करी त्यांचा ॥४०॥
पुच्छे करिता महामार । रणी उठला हाहाकार ।
येरीकडे हनुमान वीर । करी वीरमार तो ऐका ॥४१॥
एक मारी महामार । असंख्य रगडिले पायांतळी ।
अमित मारिले मुष्टिसमेळीं । नखे चिरफळी एकैकां ॥४२॥
एक मारिले जानुचक्री । वीरी केली बहुमारी ।
एक मारिले अर्धचंद्री । गिरिवरी मारिले ॥४३॥
आंवळोनियां उरावरी । वीर मारिले शतसहस्त्री ।
तळवे हाणोन उपराउपरीं । लक्षांतरी मारित ॥४४॥
भुभुःकार देता अति तवकें । एके निमाली उपधाकें ।
एके पडिली अधोमुखें । मेलीं अनेके अंगवातें ॥४५॥
देता भुभुःकार प्रबळ । रणी उठला हलकल्लोळ ।
भेणे करोनि मूत्रमळ । प्राण तत्काळ सांडिले ॥४६॥
हनुमंताचे गिरागजरीं । वाजंत्री निमाले नादेंकरीं ।
जो तो रणी शंख करी । आपांपरी राक्षसा ॥४७॥
सभोंवता पुच्छाचा आवर्त । मध्ये मारीत हनुमंत ।
जाला सैन्यासी अंत । आला प्राणांत राक्षसा ॥४८॥
पुच्छे पुरविली पाठी । होऊं नेदी कुटुंबभेटी ।
लंका पाहू नेदी दृष्टी । जीवासाठी राक्षसा ॥४९॥
रणी मारिता हनुमंत । पुच्छ पळों नेदी नगरांत ।
जो तो येवोनि युद्धाआंत । पडे मूर्च्छित अति धाके ॥५०॥
एक घाये झालीं वेडी । एके पडली उपडीं ।
एके नागवीं उघडीं । मेली मढी होवोनि ठेली ॥५१॥
झाडिला इंद्रजिताचा पादाडा । केला सैन्याचा नितोडा ।
रामनामे हनुमान गाढा । केला झगडा निजटे ॥५२॥
रथ भंगिले कोट्यनुकोटी । मारिल्या अश्वगजांच्या थाटी ।
छत्रे भंगोनि लोळती सृष्टी । ध्वजा कोट्यनुकोटी विखरलिया ॥५३॥
अशुद्ध वाहतें गडाडी । तेचि रणनदी गाढी ।
जाहल्या प्रेतांच्या दरडी । गजकरवडी तेचि ग्राह ॥५४॥
तीर तरती सपिच्छ । तेचि रणनदीचे मत्स्य ।
वोडणें वाहती ते कच्छ । सर्प सपुच्छ रणभालें ॥५५॥
मेद मांस अति दुर्गम । तोचि दोही तीरींचा कर्दम ।
वीर मिसळले विक्रम । सुसरी परम दो भागीं ॥५६॥
मोक्षसुखाची सुरवाडी । रणनदी वाहे पुराडी ।
सर्वस्वत्यागें घालिती उडी । त्या त्यां जोडीतें तो जाय ॥५७॥
ध्वजेंसी वाहे रहंवरू । तेंचि शिडेंसहित तारू ।
तेथे तारक श्रीरामचंद्रु । पापपरू पावती ॥५८॥
रिघोनियां रणसमुद्रीं । जो बैसे या तारवावरी ।
त्यासी श्रीराम सूत्रधारी । परपारीं पावती ॥५९॥
या तारूवातें दृढ जो धरी । त्यासी श्रीराम स्वये तारी ।
या तारवाची कीर्ति जो करी । राम परपारीं पाववी ॥६०॥
उदो म्हणुनि भद्रकाळी । घेवोनि आली भूतावळी ।
खाती मांसाच्या वडवाळी । रूधिरांजुळी प्राशित ॥६१॥
या रणाचिया युद्धख्याती । जो आवडी नित्य गातीं ।
श्रीराम सुखावोनि चित्ती । त्यांसी तारी स्वानंदे ॥६२॥
आनंदें नाचे क्षेत्रपाळ । शिरें चौडकें वाहे वेताळ ।
भूते मिळोनिया सकळ । रणगोंधळ नाचती ॥६३॥
बहुता दिवसांचें धरणे । दिधले हनुमंते पारणे ।
अवघे घालिती लोटांगणें । विजयी होणें रणरंगीं ॥६४॥
काळिजें घेवोनि हाती । रणी यक्षिणी वाणे देती ।
शंखिणी डंखिणी वाणे घेती । मग भक्षिती स्वानंदे ॥६५॥
पिकें पिकली रणनगरी । राक्षसदातांच्या राशी थोरी ।
भूते मोजती कुडवेवरी । पाहे क्रीडेंसीं हनुमंत ॥६६॥
देव ब्राह्मण दिधले भैरवांसी । बलुतें दिधले वेताळासी ।
खळें दान ते भूतांसी । महाकाळीसी राजभाग ॥६७॥
खळें मातेरें मारकोसी । मेसको तिचे घरची दासी ।
वेसपेंडी सटवीसी । पाळीच्या भार्यासी काळिका ॥६८॥
अग्रपिकाची व्युत्पत्ती । विभागिली स्वये मारूतीं ।
पश्चिम धान्याची महाख्याती । रघुपति विभागील ॥६९॥
करोनि सैन्याचा नितोडा । काधोनि पुच्छाचा पै वेढा ।
देवळाचा पहिला हुडा । हनुमान गाढा बैसला ॥७०॥
गेला देखोन हनुमंत । सबळ वीर समस्त ।
आणिक घायाळ कुंथत । स्वनगरांत निघाले ॥७१॥
एक कण्हत एक कुंथत । एक हुंबत एक हुंबरत ।
एक पाणी पै मागत । एक खुणा हात दावोनी ॥७२॥
एक रडत एक पडत । एक अतिशये चडफडित ।
एक अति दुःखे तडफडित । एक खुरंडत कटिभंगें ॥७३॥
एकाचे फुटलेम कपाळ । एक ते अशुद्धबंबाळ ।
एकाची ओढे अंतरमाळ । एक तळमळ अति घातें ॥७४॥
एकाच्या मस्तका झाला भंग । एकाचें पर्वती चेंदलें अंग ।
एकाचे चरण पडिले व्यंग । एका क्षयरोग शाळताळीं ॥७५॥
पाडोनि राक्षसांचे दांत । मुष्टिघाते घातले घशांत ।
नखे नाके छेदिलीं बहुत । वीर कुंथत अति लाजें ॥७६॥
रण शोधावया देख । अशोकवनी न येती लोक ।
पुच्छे लाविलासे धाक । एकाएकी धांवती ॥७७॥
लंकेतील नागरिकांचा आक्रोश :
समस्त सैन्या केली बोहरी । कळकाळिती नरनारी ।
बोंब सुटली घरोघरी । लंकानगरीं आकांत ॥७८॥
काळतोंडी रावणाची थोरी । चोरोनि आणिली सीता सुंदरी ।
केली राक्षसांची बोहरी । महामारी वानरे ॥७९॥
दशमुख तो काळमुखा । सीता चोरोनि आणिली देखा ।
मारविलें सकळ कटका । दुःखे लंकालंवाडिली ॥८०॥
मुळींच राजा झाला भिकारी । त्यावरी निंद्य कर्म चोरी ।
तेही हरण परनारी । आली महामारी राक्षसा ॥८१॥
इंद्रजित ठार झाल्याचा प्रवाद :
रणी रावण मरता । तै लंकालोक स्वस्थ होता ।
करविलें इंद्रजिताचे घाता । रणी हनुमंतावरी धाडूनी ॥८२॥
करिता अखयाचा कैवार । रणी मारविला ज्येष्ठकुमर ।
शंख करिती निशाचर । दशवक्त्र हडबडिला ॥८३॥
इंद्रजित मेला किंवा जीत । हे कोणी न सांगती मात ।
तेणे हडबडिला लंकानाथ । केला घात वानरे ॥८४॥
रावणाचा विलाप :
शोधूं जावे जंव रणासीं । भूतीं भक्षिलें प्रेतासी ।
तेथे ओळखी कायसी । रावणासी अति दुःख ॥८५॥
रणी निमाला ज्येष्ठ सुत । रावण मुखीं धुळी घालित ।
दाही मुखीं शंख करित । आक्रंदत अति दुःखे ॥८६॥
दुःखे गडबडा लोळे । केश सुटले मोकळे ।
अश्रुधारा स्त्रवती डोळे । पिटी कपाळे अति दुःखे ॥८७॥
इंद्रजिताच्या केले घाता । काय करावे म्या आता ।
रणी न धरवे हनुमंता । परम चिंता रावणा ॥८८॥
ब्रह्मयाने सांगितले मजपासीं । गळा बांधोनि वानरासी ।
इंद्रजित आणील तुजपासी । असत्य त्यासी का जाले ॥८९॥
ब्रह्मयाचे ब्रह्मवाणीसीं । नाही विटाळ असत्यासी ।
भय नाही इंद्रजितासी । निश्चयेंसी मी जाणे ॥९०॥
ब्रह्मदेवास पाचारण केल्यावरून ब्रह्मदेव स्वतः च अशोकवनात जातात :
पाचारोनि चतुरानन । त्यासी पुसे दशानन ।
इंद्रजित आणील कपि बांधोन । ते सत्य वचन करावे ॥९१॥
इंद्रजिताची स्थिती गती । राक्षस आणू न शकती ।
वनी बैसला मारूती । राक्षसघाती महावीर ॥९२॥
मीच जावोनि अशोकवना । इंद्रजिताची विवंचना ।
समूळ आणोनियां मना । दशानना सांगेन ॥९३॥
ऐसे सांगोनि लंकापती । वना आला प्रजापती ।
हनुमंते ब्रह्मयाप्रती । घातले क्षिती लोटांगण ॥९४॥
ब्रह्मदेव हनुमंत संवाद :
ब्रह्मा हनुमंता सांगत । आला राक्षसांसी अंत ।
अवश्य तुवा करावा घात । लंकानाथ न मारूनी ॥९५॥
कुंभकर्ण आणि लंकानाथ । यांसी वधील श्रीरघुनाथ ।
लक्ष्मण वधील इंद्रजित । येरांचा अंत वानरी ॥९६॥
हनुमान सांगे ब्रह्मयासी । माझी आवडी आहे ऐसी ।
भेटी घेवोनि रावणेंसी । करू लंकेसी वाताहात ॥९७॥
ब्रम्हा सांगे हनुमंतासी । इंद्रजित तुझेनि भयेंसीं ।
लपाला विवरप्रदेशी । मी त्यजापासीं जातसें ॥९८॥
तुज न लागे पाशबंधन । हे मज आहे निजज्ञान ।
माझे ऐकावे वचन । ब्रह्मबंधन मानावे ॥९९॥
इंद्रजित घालील ब्रह्मपाशासी । तुंवां बद्ध मानोनि आपणासी ।
स्वये जावे गा लंकेसी । रावणासी भेटावया ॥१००॥
रावणाची घ्वावी भेटी । आवडी आहे तुझे पोटी ।
ब्रह्मपाश मानोनि कंठी । यावे त्रिकूटी लंकेसी ॥१०१॥
इंद्रजिताचेनि हस्तपातें । हनुमान मानी पाशबंधातें ।
ब्रह्मदेवा तुझेनि हातें । ब्रह्मबंधातें मानीन ॥१०२॥
ब्रह्मा म्हणे ऐसेंचि घडे । माझेनि हातें वाडेंकोडें ।
हनुमंता पाशबंधनी पडे । रावणापुढें न्यावया ॥१०३॥
इंद्रजिते वानरा देवोनि पाठी । विवरी पळता अति संकटी ।
अनुतापला कपाळ पिटी । उडाली पुष्टी वाढिवेची ॥१०४॥
इंद्रजित अति लज्जायमान । विवरामाजी बैसोन ।
वानरा ब्रह्मपाशीं बंधन । करी ते विंदान अवधारा ॥१०५॥
एकाजर्दना शरण । वानरा ब्रह्मपाशबंधन ।
बंधनीं मारूती निर्बंधन । कथाविंदान अवधारा ॥१०६॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
हनुमत्कृतरावणसैन्यवधो नाम षोडशोऽध्यायः ॥१६॥
॥ ओव्या १०६ ॥ श्लोक ६ ॥ एवं संख्या ११२ ॥
