वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ५. सुन्दरकाण्ड - अध्याय ४२ › १३. त्रिजटेचे स्वप्न

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088239 · अभंग क्र. १३

13.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

सुंदरकांड

॥ अध्याय तेरावा ॥
हनुमंताकडून वनविध्वंस

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

मणी पाहून श्रीरामांना पूर्वींच्या गोष्टींचे स्मरण होईल ते सीता सांगते :

मणि देवोनि वानराहाती । स्वये बोले सीता सती ।
मणि देखोनि रघुपती । स्मरेल चित्ती तिघांतें ॥१॥
कौसल्या माता आणि सीता । आठवेल दशरथ पिता ।
तिघे आठवती श्रीरघुनाथा । कोण्या अर्था ते ऐका ॥२॥
पूर्वी समुद्रमंथनीं । तेथे निघाला कौस्तुभमणी ।
तो घेता श्रीविष्णूंनी । इंद्र ते क्षणी तळमळी ॥३॥
ब्रह्मशापाच्या शापोक्तीं । सिंधुनिमग्न सर्व संपत्ती ।
त्यांतील कौस्तुभ श्रीपती । माझा मजप्रती देइजे ॥४॥
इंद्र मणि मागे करोनि ग्लानी । विष्णु त्यास दे फणिमणि बदलोनी ।
इंद्रें देखतांचि नयनी । केला कंठमणि आल्हादे ॥५॥
इंद्रे नमुचीचिया युद्धासी । साह्य नेलें दशरथासी ।
राये निर्दाळोनियां दैत्यासी । युद्धी इंद्रासी जयो दिधला ॥६॥
युद्धी इंद्र संतोषोनी । दिधला दशरथासी कंठमणी ।
राये निजनगरासी आणोनी । दिधला प्रियपत्‍नी कौसल्ये ॥७॥
कौसल्येनें अति प्रीतीसी । तो मणि दिधला जानकीसी ।
तिणें घालोनी वेणीसीं । वनवासासीं आणियेला ॥८॥
तोचि मणि हनुमंताहातीं । खूण पाठवितां श्रीरघुपती ।
राजा माता सीता सती । तिघे आठावती श्रीरामा ॥९॥
ही खूण देवोनि तत्वता । आणावें गा श्रीरघुनाथा ।
हेंचि कार्य प्रमाणतां । तुझे माथा कपिराया ॥१०॥
हनुमान म्हणे न करी चिंता । शीघ्र आणीन श्रीरघुनाथा ।
साष्टांगें सीता नमिली माथा । येरी हनुमंता कुरवाळी ॥११॥

खूण स्वीकारल्यावर कुरापत काढावी म्हणून मारूती सीतेची आज्ञा मागतात :

खूण पुसोनि सीतेपासीं । हनुमान विचारी मानसी ।
युद्ध न करिता राक्षसांसी । श्रीरामापासीं नवजावे ॥१२॥
येथे कलहासी कारण । रावणाचे अशोकवन ।
नंदनवनासीं समान । ते विध्वंसीन निजबळे ॥१३॥
ऐकोनि वनविध्वंसनकथा । कोप येईल लंकानाथा ।
धाडील असंख्य गजरथां । दृढ युद्धार्था महावीर ॥१४॥
युद्ध करावया सैन्यासी । निर्दाळोनि त्या राक्षसांसी ।
इंद्रजिता करोनि कासाविसी । श्रीरामापासीं मग जावे ॥१५॥
मारोनि राक्षसांच्या कोडी । लंका करोनि कडाफोडी ।
मग श्रीरामापासीं जाता गोडी । ऐसी आवडी हनुमंता ॥१६॥
इतकें करोनि जाता । सुख कपिकुळा समस्ता ।
सुख होईल श्रीरघुनाथा । सुख हनुमंता युद्धाचे ॥१७॥
सीतेचे न घेता आज्ञापन । मज विध्वंसितां नये वन ।
सीतेसी पुसावया जाण । करी विंदान हनुमंत ॥१८॥
पुढती सीतेस लोटांगण । येरी म्हणे बा शीघ्र करी गमन ।
हनुमंत खालती घाली मान । लज्जायमान बोलेना ॥१९॥
सीताशुद्धि सांगावया जाण । उल्लास न देखे संपूर्ण ।
दिसतोसी अति उद्विग्न । काय कारण मज सांगे ॥२०॥
बोले तुझे करिता शोधन । नाही अन्न ना जीवन ।
क्षुधेने जावू पाहे प्राण । सिंधूल्लंघन न करवे ॥२१॥
ऐकोनि हनुमंताचे वचन । सीतेसी आले पै रूदन ।
यासी न देता समाधान । केंवी गमन मी करवी ॥२२॥
याचे न पुसता स्वागत । नाही केले अभ्यागत ।
महा पापिणी मी येथ । धाडितें श्रीरामभक्त भुकेला ॥२३॥
ऐके सखया हनुमंता । शिणलासी मज शोधिता ।
जीवे ओवाळीन तत्वता । सांगेन आता ते करी ॥२४॥
हे घोवोनि करकंकण । लंकेमाजी जावोनि आपण ।
घेवोन चतुर्विध अन्न । करी भोजन यथेष्ट ॥२५॥
हनुमान पुसे सीतेपासीं । अन्नाची चवी आहे कैसी ।
सीता विस्मित मानसी । तरी तुम्हांसी काय भक्ष्य ॥२६॥
जे खाताती लवण । त्यांसी शीघ्र ये म्हातारपण ।
चुना लावोनि तांबूलभक्षण । दंत भग्न तेणे त्यांसीं ॥२७॥
आम्ही रामदूत वानर । वनवासी निरंतर ।
नित्य वनफळांचा आहार । सत्य साचार जानकी ॥२८॥
माझे मोडोनि कांकण । लंकेमाजी फळे पूर्ण ।
आवडतील ती घेवोनि जाण । फळभोजन करी बापा ॥२९॥
सीते ऐके माझे शीळ । मी तंव स्वयंपाकी केवळ ।
ज्यासी मनुष्याचा विटाळ । ते फळ अपवित्र वानरा ॥३०॥

पुढील परिणामांचे गंभीर स्वरूप ओळखून सीतेचा अनिश्चय :

स्वहस्ते तोडोनि फळसंभार । स्वये भक्षूं आम्ही वानर ।
आतळल्या सुरनर । ते फळ वानरे भक्षूं नये ॥३१॥
सीता म्हणे या वनाआंत । मधुर सुंदर फळे अद्‌भुत ।
तुवा लावितांचि हात । करील घात रावण ॥३२॥
तू निमालिया हनुमंत । तोचि मजला प्राणांत ।
दुःखे निमेल श्रीरघुनाथ । समवेत सौमित्रा । ३३ ॥
श्रीराम निमाल्यापाठीं । निमती सुग्रीव कपींच्या कोटी ।
भरत शत्रुघ्न जगजेठी । उठाउठी निमती ॥३४॥
या फळांसी लावितां हात । येवढा होईल अनर्थ ।
हनुमान म्हणे असो वृत्तांत । जातो येथोनि भुकेला ॥३५॥

मारूतीच्या उद्वेगाचा आविष्कार :

वन दिसताहे सफळ । माझेंचि कपाळ निष्फळ ।
निरोप नेदी जनकबाळ । काळवेळ मज आली ॥३६॥
मार्गी क्षुधेने जातील प्राण । श्रीरामांपांसी सांगेल कोण ।
तुझी न होईल सोडवण । विघ्न दारूण ओढवले ॥३७॥
क्षुधा नव्हे हा कल्पांत । माझा होईल प्राणांत ।
ऐसे बोलता हनुमंत । सीता ह्रदयांत कळवळली ॥३८॥

सीतेचा कळवळा व भूक निवारण्याची आज्ञा :

जंव होय क्षुधाहरण । पडली फळे खाईं संपूर्ण ।
घालितें श्रीरामाची आण । फळे तोडोन न खावीं ॥३९॥

मारूतीचा आनंद :

ऐकोनि सीतेचा आणेसी । हनुमान खाजवी दोन्ही कुशी ।
हे मानले मज मानसी । आला वृक्षांसी पै अंत ॥४०॥

पुढील कार्याचा विचार व प्रारंभ :

सांडोनि सीता वनपैसार । दूरी जावोनि बैसला वानर ।
करावया फळाहार । करी विचार मारूती ॥४१॥
मेळवी प्रळयकाळाग्नी । अभिमंत्री जठराग्नी ।
मग बैसला फळभोजनीं । सावधान हनुमंत ॥४२॥
भोजनसमयीचें अतीत । मुख्य द्विज मुखाआंत ।
आधी यांसी करोनि तृप्त । धर्मयुक्त भोजन ॥४३॥
द्विजीं न घेता अवदान । स्वये घेवो नये अन्न ।
प्रथम द्विजांचें भोजन । करी सर्वज्ञ मारूती ॥४४॥
द्विज दोन्ही पंक्तीं सादर । पुच्छा आज्ञा देवोनि वानर ।
वेगी अर्पी फळसंभार । रूचिकर स्वादिष्ठ ॥४५॥
देखोनि साकरेचे टेक । निंबरसेंसी आवश्यक ।
आधी सेवूं पित्तशामक । मग अनेक फळे भक्षूं ॥४६॥
उपडोनियां निंबोणी नारंगी । साकरनिंबोणी मातुलिंगी ।
मेळवोनि साकरेच्या भागीं । मग आरोगी गटगटां ॥४७॥
श्रीरामाची आण पाळित । वृक्ष उपडोनियां सांडित ।
पडली फळे खाय हनुमंत । आज्ञा नेमस्त सीतेची ॥४८॥
आंबे जांबळें फणस जंबेरी । कर्दळीफळांचा गटका करी ।
पिंपळ्या मिरें घोस माझारी । लोणच्यावरी भक्षित ॥४९॥
द्विजांसीं सांगे हनुमंत । भोक्ता म्हणा श्रीरघुनाथ ।
द्विज कांही न बोलत । अतित लोलुप रसस्वादा ॥५०॥
द्वीपद्राक्षांचे घड । खर्जुरीफळें अति गोड ।
पुच्छे पुरविलें कोड । करोनि उपाड झाडांचा ॥५१॥
हनुमान आपोशन न मोडी । बैसली बैसका न सोडी ।
पुच्छ करी वाढावाढी । फळे झोडित आहेचि ॥५२॥
चोरें बोरें मोहे भोकरें । आवलें उंबरें टेंबरें ।
भोक्ता श्रीराम येणे उत्तरें । फळे वानरे भक्षिलीं ॥५३॥

विशेष वर्णन :

धामणें येरमणें तोरणे । झेपे जेथ पाण्यावळें गोंदणें ।
पिकल्या करवंदांचे खाणे । श्रीरामर्पणें गटकावी ॥५४॥
पिकलीं खाय गटगटां । हिरवी खाय तोंडपालटा ।
जारसे खाय मटमटा । सुरा श्रेष्ठां विटावित ॥५५॥
ऊसरसें भरली मांदणी । जेंवी तान्हेला प्राशी पाणी ।
तेंवी ते नेलें प्राशूनी । ढेकर देवोनी पाहत ॥५६॥
डोळे मिचकावी देवांकडे । आंगठा दावी दैत्यांकडे ।
वांकुल्या दावी दानवांकडे । मानवाकडे घुलकावी ॥५७॥
हनुमंताचे अंगवातें । सुगंधसुमनें पारिजातें ।
चंदनागुरू तरू समस्ते । उन्मूळती समूळी ॥५८॥
भोंवता पुच्छाचा आवर्त । पक्षी किलकिलती गगनाआंत ।
वृक्ष कडकडां मोडित । होत आवर्त वृक्षांसी ॥५९॥
उपडोनियां पोफळी । मुखशुद्धीच्या पै मेळी ।
पोफळी घाली दाढेतळीं । वनरांगोळी मांडिली ॥६०॥
शाल ताल तमाल नारिकेळी । उपडोनियां केली वरवाळी ।
घेता राक्षसांसवें फळी । हातातळी हाणाया ॥६१॥
ऐसी युद्धाची सामग्री । रचोनियां देवद्वारी ।
हनुमंत बैसलासें शिखरीं । त्याहून दूरी वृक्ष टाकी ॥६२॥

रक्षकांची गडबड व त्यांना समुद्रात बुडविले :

ऐकोनि वनभंग आघाता । बनकर भयें चकित ।
राक्षसिणी उठल्या समस्त । ज्या का विरूप विक्राळा ॥६३॥
स्वयंभू वृक्षांचे उत्पाट । मोडल्या सारणी रहाट पाट ।
विचित्र गृहें केली पीठ । केलीं सपाट लतागृहें ॥६४॥
न लावी देवालयां हात । माडिया गोपुरे समस्त ।
अंतरगृहें विध्वंसित । तेरें विस्मित बनकर ॥६५॥
राक्षस वृक्षातळीं निद्रित । जे का सबळ राखणाईत ।
ते वृक्ष उपडोनि समस्त । केले दूरस्थ हनुमंत ॥६६॥
तंव बनकर जागृत होत । तो वृक्षमात्र न दिसती तेथ ।
तेणे ते जाहले अति विस्मित । केले विपरीत महेशें ॥६७॥
मागोनि आणिले महेशापासी । ते वृक्ष नेले कैलासासीं ।
किंवा उडाले आकाशी । बनकरांसी लक्षेना ॥६८॥
दुर्धर रावणाचे शासन । मिथ्या वनविध्वंसन ।
आम्ही देखतो हे स्वप्न । म्हणोनि नयन लाविले ॥६९॥
तंव त्या राक्षसी कळवळित । वानर नव्हे हा काळ वृत्तांत ।
संचरोनि वनांआंत । राक्षसा घात करू आला ॥७०॥
ऐकोनि बनकर धांवती । कोठे कोठे तो मारूती ।
धरा धरा तो बहुता हाती । रावणाप्रति नेऊ आम्ही ॥७१॥
बनकर अति दुर्धर । एकवटले चवदा सहस्त्र ।
स्वये धरावया वानर । अति सत्वर धांवले ॥७२॥
एक विंधिती बहुतकांडे । एक हाणिती गोफणगुंडे ।
एक सवेग हाणिती धोंडे । हनुमान पुढे लक्षोनी ॥७३॥
बनकर आले अति गर्जत । हनुमान बैसला सावचित्त ।
करावया बनकरांचा घात । पुच्छ प्रेरित साटोपे ॥७४॥
पुच्छघात अति उद्‌भट । धरिता ओढोनि करी पीठ ।
शस्त्रे करोनिया सपाट । वीर उद्‌भट गांजिले ॥७५॥
वाजता पुच्छाचा पै साट । बनकरां भोंवलासे आट ।
पुच्छे कवळिले सगट । ह्र्दयस्फोट राक्षसा ॥७६॥
जो जो पळोनि जाय जिकडे । पुच्छ आडवें तिकडें तिकडे ।
राक्षसा ओढवले सांकडें । मागे पुढे रिघवेना ॥७७॥
ऐसे गोवोनि बनकरांसी । हनुमंते बांधोनि पुच्छासी ।
निक्षेपिले समुद्रासी । मत्स्य मगरांसी आहारार्थ ॥७८॥
भूते जाहली दीनवदन । बनकर चवदा सहस्त्र जाण ।
दिधले सागरी मीनां भोजन । आम्हांसी लंघन चुकेना ॥७९॥
तंव बोलली महाकाळी । हनुमान मारील राक्षस बळी ।
मेदमांससरूधिरांजुळी । भूतां सकळ अति तृप्ति ॥८०॥
दिधले मीनां मीनभोजन । देईल भूतांसी भूतभोजन ।
वृक जंबूक घारी गीध जाण । तृप्तिभोजन काळासी ॥८१॥
भूते पुसती जगदंबेसी । ऐसे होईल कवणे दिवसीं ।
येच क्षणी येच दिवसी । तृप्ति सर्वांसी हनुमंते ॥८२॥
चवदा सहस्त्र वनकरांसी । हनुमान निर्दाळी पुच्छेंसी ।
तेणे भयभीत राक्षसी । सीतेपासीं पुसताती ॥८३॥

राक्षसी याबद्दल सीतेजवळ चौकशी करितात :

कोण कोणाचा कैंचा थोर । येथे आला हा वानर ।
तुज करोनि नमस्कार । कोण विचार दृढ केला ॥८४॥
तुझ्या घेवोनि आज्ञेसी । येणे मारिले बनकरांसी ।
तुझेनि बोले वन विध्वंसी । तुवा द्वद्वासीं पेटविले ॥८५॥
सीतेभोंवत्या राक्षसी । कलकल करिती चौपासी ।
धरा मारा बांधा केशीं । इणें वानरासी चेतविलें ॥८६॥

सीतेचे उत्तर :

सीता निःशंक मानसी । भय न मानी राक्षसींसीं ।
यथोचित बोले त्यांसी । राक्षसांपासीं बहु मावा ॥८७॥
मारीच होवोनि मृगवेषी । प्रतारिता श्रीरामासी ।
स्वये मुकला निजदेहासी । राक्षसांपासी बहु मावा ॥८८॥
शूर्पणखा सुंदरतेसीं । छळों आली लक्ष्मणासी ।
कपटें नाडिले नासिकासी । राक्षसांपासीं बहु मावा ॥८९॥
छळोनि हरावया सीतेसी । रावण जाहला संन्यासी ।
मूळींच भीक लागली त्यासी । राक्षसांपासी बहु मावा ॥९०॥
अमित मावा राक्षसांपासीं । कोण कोणाचा वानरवेषी ।
हे काय पुसता मजपासी । निजमावा तुम्ही जाणा ॥९१॥

हनुमंताची डरकाळी ऐकून राक्षसींची तारांबळ :

राक्षसी देखानि सीतेपासीं । हनुमान गुरूकावी तयांसीं ।
वेगी पळती विव्हळतेंसी । अति भयासीं भयभीत ॥९२॥
एकी चळाचळा कांपती । एकी फळफळा मूतती ।
एकी भयें भुली भूलती । एकी पडती मूर्च्छिंत ॥९३॥
बोंब न करवे गाढी । जिव्हेसी वळली बोबडी ।
एकी अंधारी देती दडी । आंत तो तोडी पै एकी ॥९४॥
एक भयचकित भीती । नेसणीं गळालीं नेणती ।
नागवीं रावणापासी जाती । मग सांगती वनबोंब ॥९५॥
एकी त्या भयाचें निर्भरें । राक्षसा म्हणती पळा रे त्वरे ।
पुच्छे मारिलीं बनकरें । घायवारे घेतलें ॥९६॥
एकी दडती सीतेपाशीं । एकी पळती चौंपासीं ।
आपपर नसे राक्षसींसी । हनुमंतासी देखोनि ॥९७॥
करिता हनुमंते गर्जन । सीता जाहली निर्बंधन ।
श्रीरामभक्तांचे वचन । बंधमोचन तत्काळ ॥९८॥

रावणाकडे वृत्तांत निवेदन त्यामुळे रावणाचा
क्षोभ व प्रतिकारासाठी सैन्याची योजना :

राक्षसी सांगती रावणापासी । वानरवीर प्रतापराशी ।
विध्वंसोनियां वनासी । बनकरांसी मारिले ॥९९॥
नेणो कैचा वीर वानर । बळे जैसा काळाग्निरूद्र ।
सीतेसवी करोनि नमस्कार । केला मार बनकरांसी ॥१००॥
जे प्रदेशीं जनकबाळी । ते वन राखिलें पुष्पी फळी ।
येरा वनांची केली रवंदळी । वृक्षा समूळी उपडोनी ॥१०१॥
सीतेसी करोनि एकांत । मग मांडिला वनविघात ।
ऐसा ऐकोनि वृत्तांत । लंकानाथ क्षोभला ॥१०२॥
पाचारोनि घरटीकार । त्यांसी सांगे दशशिर ।
धरोनि आणावा तो वानर । वन विचित्रा विध्वंसी ॥१०३॥
रावणासी राक्षसी सांगती । घरटीकार बापुडे किती ।
त्याच्या पुच्छाची दुर्धर शक्ती । लाविली ख्याती बनकरां ॥१०४॥
चवदा सहस्त्र वनकरांसी । भारा बांधोनियां पुच्छेसीं ।
निक्षेपिले समुद्रांसीं । जळचरांसी आहारार्थ ॥१०५॥
रणी मर्दोनि राक्षसांसी । मेदमांसें तृप्ति भूतांसी ।
द्ध्यावया आवंतिलें महाकाळीसी । आजिचे दिवसी हनुमंते ॥१०६॥
धरोनि आणावया वानर । तेथे कायसे घरटीकार ।
मूळ करोनि विचार । दुर्धर भार प्रेरावा ॥१०७॥
ऐसे राक्षसी सांगती । सवेंचि चळचळां कांपती ।
बहुता नाटोपे तो मारुती । दुर्धर शक्ती पुच्छाची ॥१०८॥
सीतेपासील वन सकळ । नाही मोडिलें देउळ ।
वानर दिसे स्वधर्मशीळ । त्यावरी प्रबळ प्रतापी ॥१०९॥
ऐकोनि राक्षसींचे वचन । दचकला तो दशानन ।
सभा जाहली कंपायमान । बलसंपन्न वानर ॥११०॥
ऐकोन वनविध्वंसन । रावण जाहला कंपायमान ।
आपुलिया बलासमान । योद्धे दारूण अनिवर्तीं ॥१११॥
युद्ध देखिलिया दृष्टी । नाही परतायाची गोष्टी ।
रणपाडे कोट्यनुकोटी । महाहठी रणगाढे ॥११२॥
किंकर नांवे अति दुर्धर । नांवाजिले महावीर ।
पाचारोनि ऐशीं सहस्त्र । धरावया वानर धाडिले ॥११३॥
रावण जाणे आमुची ख्याती । शेखी धाडी वानराप्रतीं ।
वानर बापुडे ते किती । इतुक्यांहातीं केंवी उरे ॥११४॥
ऐसे करोनि गर्जन । शस्त्रास्त्री सनद्ध पूर्ण ।
धावोनि आले अवघे जण । अशोकवना ठाकिले ॥११५॥

मारूतीने सर्व सैन्याचा विध्वंस करून रावणाकडे निरोप धाडला :

अशोकवनाच्या प्रासादांत । पुढिल्या दुर्धर तोरणांत ।
नेटका बैसला हनुमंत । काळवृत्तांत प्रळयाग्नि ॥११६॥
वानरा देखतांचि दृष्टी । शस्त्रे कवळोनियां मुष्टी ।
किंकर धांविन्नले उठाउठी । शस्त्रवृष्टी समकाळे ॥११७॥
शूल मुद्गल गदा फरश । त्रिशूल तोमर पट्टिश ।
चेंडुचक्रें लहुडी परश । केली बहुवश शस्त्रवृष्टी ॥११८॥
खंगला भंगला तुटला । शस्त्रास्त्री निवटला ।
घायीं तिळप्राय जाला । म्हणती निमाला वानर ॥११९॥
किंकरी पिटिली टाळी । म्हणती वानर आतुर्बळी ।
आम्हांसी न करिता रणफळी । रणरांगोळी होऊनि गेला ॥१२०॥
ऎंशी सहस्त्र महावीर । बळे हाणिती निशाचर ।
जैसी पर्वती पर्जन्यधार । तैसा वानरी शस्त्रपात ॥१२१॥
किंकरी पिटतां टाळी । आम्ही यशस्वी रणकल्लोंळी ।
ते देखोनि हनुमान बळीं । क्रोधानळी खवळला ॥१२२॥
स्वये पुच्छाची पाठी थापटी । पुच्छासी सांगे गुह्य गोष्टी ।
मारावया राक्षसांच्या कोटी । निजबुद्धिप्रतापें ॥१२३॥
ऐसी सांगितली गुह्य गोष्टी । लांगूल त्राहाटिले उठाउठी ।
निधा ठिला गिरिकूटीं । लंकात्रिकूटीं आकांत ॥१२४॥
राक्षसांचा प्राणहर । दुर्धर केला भुभुःकार ।
तेणे किंकरांचा संभार । जाहला भूमिभार दचकोनी ॥१२५॥
धाके टवकारिल्या दृष्टी । शस्त्रे गळालीं निजमुष्टीं ।
राक्षसी धाक घेतला पोटी । पुच्छे पाठी पुरविली ॥१२६॥
धाके राक्षस पळोनि जाती । पुच्छे बांधोनि मारी मारूती ।
एक मारिले शिळाघातीं । पर्वतपातीं समस्त ॥१२७॥
मारोनि राक्षस समस्त । वानर स्वानंदे गर्जत ।
श्रीरामाचा निजदूत । नामे हनुमंत मारुती ॥१२८॥
येथे मारोनि दशकंधर । विजयी स्वामी रामचंन्द्र ।
विजयी लक्ष्मण महावीर । विजयी वानरेन्द्र सुग्रीव ॥१२९॥
मी आलो असे सीताशुद्धीसी । म्या विध्वंसिले या वनासी ।
जावोनि सांगा रावणापासी । म्या राक्षसांसी मारिले ॥१३०॥
एकाजनार्दना शरण । आले हनुमंतासी स्फुरण ।
करीन थोरथोरा निर्दळण । रणकंदन अवधारा ॥१३१॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
हनुमद्वन विध्वंसो नाम त्रयोदशोऽध्यायः ॥१३॥
॥ ओव्या १३१ ॥ श्लोक २४ ॥ एवं संख्या १७४ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग