गुण लावण्य संपत्ती ।
425.
गुण लावण्य संपत्ती ।
पांडुरंग बाळमूर्ती ।
सर्व सुखाची विश्रांती ।
चरणी लोळती महा सिध्दी ॥१॥
विटे पाउले समान ।
कासे क्षीराब्धी परिधान ।
हात कटावरी ठेवून ।
तुळशीसुमन वनमाळा ॥२॥
कटी मेखळा कटिसूत्र ।
उदर नाभी ते पवित्र
सांठवले बीजमात्र ।
नाना लोकरचनेचे ॥३॥
ह्रदयी श्रीवत्सलांछन ।
पदक एकाकळी भूषण ।
मुख नासीक लोचन ।
निढळी चंदन कस्तुरिक ॥४॥
मुगुटी सूर्यप्रभा झळाळ ।
श्रवणी कुंडलांचे ढाळ ।
नेत्री करुणेचे कल्लोळ ।
निववीत भक्तजना ॥५॥
गरुड हनुमंत सन्मुख ।
मुख्य सेवेचे सेवक ।
विराजला पुंडलीक ।
चंद्रभागावाळुवंटी ॥६॥
निळा उभा कर जोडून ।
चरणांवरी ठेऊनिया मन ।
तयासी तृप्तीचे भोजन ।
नामसंजीवनी दिधली ॥७॥
