संचित हे जळे ज्ञानाच
210.
संचित हे जळे ज्ञानाचेनि मुळे ।
ज्ञान ते आकळे संतसंगे ॥१॥
म्हणऊनी संग धरावा संतांचा ।
मने काया वाचा निर्धारू हा ॥२॥
इंद्रियांच्या वृत्ति स्थिरावती मागे ।
साधूचेनि संगे पाहे बरे ॥३॥
द्वैताचा हाराश वासनेचा नाश ।
तुटतील पाश संतसंगे ॥४॥
अहंकार जाय ममता देहीची ।
आसक्ति कामाची संतसंगे ॥५॥
बहेणि म्हणे संग असावा निःसंग ।
तोचि पांडुरंग पंढरीचा ॥६॥
