चंचळ मानस चुकले, चिद
221.
चंचळ मानस चुकले, चिद्रूप ।
चढले प्रताप जियेचा हा ॥१॥
तेचि चंद्रभागा तेथे करी वास ।
पुंडलीका ध्यास अखंडत्वे ॥२॥
द्रवोनिया चित्त दृश्य हारपले ।
चिद्रूप संचले चिदाकाशी ॥३॥
भागली संचिते भाग होता शरीरी ।
भाविली पंढरी भाव-बळे ॥४॥
गाइले हे वेदी पुराणे गर्जती ।
गौरव वर्णिती श्रुती जिचा ॥५॥
बहेणि म्हणे ऐसी चंद्रभागा जाण ।
तेथे अनुष्ठान भक्त करी ॥६॥
