संत तुकाराम महाराज ह
1.
संत तुकाराम महाराज हरिपाठ
नमिला गणपति माऊली सारजा । आतां गुरुराजा दंडवत ॥१॥
गुरुरायाचरणीं मस्तक ठेविला । आल्या स्तुतीला द्यावी मती ॥२॥
गुरुराया तुजऐसा नाही सखा । कृपा करुनी रंका धरी हाती ॥३॥
तुका म्हणे माता पिता गुरु बंधु । तूंचि कृपासिंधु पांडुरंगा ॥४॥
2.
पहाटेच्या प्रहरीं म्हणा हरि हरी । तया सुखा सरी नाही दुजे ॥१॥
केशव वामन नारायण विष्णु । कृष्ण संकर्षणु राम राम ॥२॥
माधवा वामना श्रीधरा गोविंदा । अच्युत मुकुंदा पुरुषोत्तमा ॥३॥
नरहरी भार्गवा गोपाळा वासुदेवा । हृषीकेशा पावा स्मरणमात्रें ॥४॥
तुका म्हणे एका नामी भाव । राहे होय साह्य पांडुरंग ॥५॥
3.
अयोध्या मथुरा काशी अवंतिका । कांची हे द्वारका माया सत्य ॥१॥
मोक्ष पुर्या ऐशा नित्य वाचे स्मरे । प्राणी तो उद्धरे स्मरणमात्रें ॥२॥
नित्य नित्य मनी हरि आठवावा । तेणेंचि तरावा भवसिंधु ॥३॥
तुका म्हणे ऐसा नामाचा महिमा । राहील जो नेमा तोचि धन्य ॥४॥
4.
यमुना कावेरी गंगा भगीरथी । कृष्णा सरस्वती तुंगभद्रा ॥१॥
नर्मदा आठवी वेळोवेळी वाचे । नाही भय साचे प्राणियासी ॥२॥
जयाचे संगती प्राणी उद्धरती । दर्शनेंच होती मुक्ति प्राप्त ॥३॥
तुका म्हणे नामी एकनिष्ठ भाव । तेथें वासुदेव सर्व काळ ॥४॥
5.
प्रातःकाळी नाम पवित्रचि घ्यावें । तेणें विसरावें जन्ममृत्यु ॥१॥
नळ युधिष्ठिर जनक जनार्दन । स्मरणेंचि धन्य होती प्राणी ॥२॥
न करा आळस नाम घेतां वाचे । नाही भय साचे प्राणियांसी ॥३॥
तुका म्हणे वाचे गाईल गोविंद । होईल परमानन्द नामे एका ॥४॥
6.
कश्यप गौतम भारद्वाज अत्री । ऋषि विश्वामित्र नाम थोर ॥१॥
जमदग्नि मुनि वसिष्ठ वर्णिला । तिन्ही लोकी झाला वंद्य एक ॥२॥
नाम घेतां नुरे पाप ताप दैन्य । होय थोर पुण्य उच्चारिता ॥३॥
तुका म्हणे ऐसी उच्चारिता वाणी । तेथें अंतःकरणी सुख होय ॥४॥
7.
अहिल्या द्रौपदी सीता तारा चारी । मुख्य मंदोदरी पतिव्रता ॥१॥
नामे घेतां त्यांची वाणी हे पवित्र । होय कुळगोत्र उद्धरण ॥२॥
संकल्प विकल्प सांडोनिया दुरी । वाचे हरि हरी उच्चारावे ं ॥३॥
नाही बद्धकता तया संसाराची । जाचणी यमाची मग कैंची ॥४॥
8.
व्यास अंबरीष वसिष्ठ नारद । शौनक प्रल्हाद भागवत ॥१॥
नित्य स्मरण करी यांचें जरी प्राणी । पुन्हा नाही खाणी चौंर्याशींची ॥२॥
शुक पराशर मुनि पुंडलीक । अर्जुन वाल्मीक नाम गाती ॥३॥
बली बिभीषण भीष्म रुक्मांगद । बकदाल्भ्य शुद्ध महाऋषि ॥४॥
तुका म्हणे यांची नामे येता वाणी । प्रत्यक्ष तो प्राणी देवाऐसा ॥५॥
9.
गीता भागवत वेद उच्चारिता । पापाची तो वार्ता कोठे राहे ॥१॥
सकळ वासना नामी जे रंगली । साधने राहिली मग कैंची ॥२॥
म्हणोनिया नेम ऐसा तारी जीवा । होय तोचि देवा आवडता ॥३॥
उगवला दिवस जाय तो क्षणांत । विचारूनि हित वेगी करा ॥४॥
तुका म्हणे स्मरा वेगी विठोबासी । न धरा मानसी दुजे कांहीं ॥५॥
10.
तीर्थांचे जें मूळ व्रतांचें जें फळ । ब्रह्म तें केवळ पंढरीये ॥१॥
तें आम्ही देखिले आपुले नयनी । फिटली पारणीं लोचनांची ॥२॥
जिवींचा जिव्हाळा सुखाचा शेजार । उभे कटी कर ठेवूनिया ॥३॥
जगाचा जनिता कृपेचा सागर । दीनां लोभपर दुष्टां काळ ॥४॥
सुरवरा चिंतनीं मुनिवरां ध्यानीं । आकार निर्गुणीं तोचि असे ॥५॥
तुका म्हणे नाही श्रुती आतुडले । आम्हा सांपडलें गीती गाता ॥६॥
11.
राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥१॥
कस्तुरी मळकट चंदनाची उटी । रुळे माळ कंठी वैजयंती ॥२॥
मुकुट कुंडले श्रीमुख शोभले । सुखाचे ओतिलें सकळही ॥३॥
कांसे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सावळा बाइयांनो ॥४॥
सकळही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाही ॥५॥
12.
आवडे हें रूप गोजिरें सगुण । पाहतां लोचन सुखावले ॥१॥
आतां दृष्टीपुढें ऐसाचि तू राहे । जों मी तुज पाहें पांडुरंगा ॥२॥
लांचावलें मन लागलीसे गोडी । ते जीवे न सोडी ऐसे झालें ॥३॥
तुका म्हणे आम्ही मागावें लडिवाळी । पुरवावी आळी मायबापें ॥४॥
13.
शंख चक्र गदा रुळे वैजयंती । कुंडले तळपती दोन्हीं कानी ॥१॥
मस्तकी मुकुट नवरत्नहार । वरी पीतांबर पांघुरला ॥२॥
रत्नहिरेजडित कटी कडदोरा । रम्य शोभे हिरा बेंबीपाशी ॥३॥
जडित कंकण कर्णी शोभे मुद्रिका । लाचावला तुका भेटीसाठीं ॥४॥
14.
नेणें जप तप योग युक्ति ध्यान । करिता चिंतन रात्रंदिवस ॥१॥
नेणें कांहीं देवा झालों उतराई । मागें लागों पाहीं बाळ जैसा ॥२॥
भाव-गंगोदकें आम्ही शुद्ध पाहें । प्रक्षाळिले पाय विटेसहित ॥३॥
जन्मली जान्हवी ज्या ठायी उत्तम । हारावया श्रम भाविकांचे ॥४॥
तुका म्हणे आम्ही झालों पुण्यवंत । सेविले अमृत रामतीर्थ ॥५॥
15.
परिमळमिश्रित करूनि उटणे । नारायण तेणे तोषविला ॥१॥
पय घृत दहि मधु ते शर्करा । गोशृंगधारा अखंडित ॥२॥
करोनि संयुक्त ओपियली ईशा । पंचामृतें तैशी पंचविधि ॥३॥
तुका म्हणे जेथे गंगे जन्म झाला । प्रसाद दिधला आम्हालागी ॥४॥
16.
आपुलिया घरी कष्ट तरी करी । आणोनि घागरी गंगोदक ॥१॥
करोनि विनंती विनवितो तुम्हां । स्नान पुरुषोत्तमा करा वेगी ॥२॥
उत्तम वस्त्रानें पुसावे तें अंग । करोनि अभ्यंग सर्वांगासी ॥३॥
परिधान वस्त्रे केलें पीतांबरे । तेणें हें साजिरे रूप दिसे ॥४॥
तुका म्हणे नेत्र पाहतां निवाले । ध्यान संचारलें हृदयामाजीं ॥५॥
17.
मन हा मोगरा अर्पूनी ईश्वरा । पुनरपि संसारा येणे नाही ॥१॥
मन हें सेवंती अर्पूनी भगवंती । पुनरपि संसृती येणे नाही ॥२॥
मन हें तुळसी अर्पूनी हृषीकशी । पुनरपि जन्मासी येणे नाही ॥३॥
तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा । तया वास व्हावा वैकुंठासी ॥४॥
18.
नामपुष्प शुद्ध गळा घाला हार । विवेक सारासार तुरा लावूं ॥१॥
बोध भाळीं बुका क्षमा तुलसीदळ । वाहता गोपाळ संतोषतो ॥२॥
गाइलीया गुण संतोषें तयानें । करिता कीर्तने आल्हादे तो ॥३॥
आल्हादे हा देव कीर्ति वाखाणिता । पवाडे सांगता याचे यास ॥४॥
याचे यास करू सर्व निवेदन । वारील हा शीण संसारींचा ॥५॥
संसाराचा वारा लागो नेदी अंगा । भावे पांडुरंगा आळवितो ॥५॥
तुका म्हणे आतां उजळली आरती । भावे तो श्रीपती ओंवाळूंया ॥७॥
19.
शब्दाचिया भावे केला उपचार । तेणें सर्वेश्वर संतोषला ॥१॥
शब्दाचिया करे करविलें भोजन । धाला नारायण तेणें सुखें ॥२॥
शब्दाचिया करे करविले आचमन । तांबूल अर्पून फळे पुष्पे ॥३॥
तुका म्हणे अन्नाआधी धूपदीप । उपचार अल्प समर्पिले ॥४॥
20.
मजलागी नाही ज्ञानाची ती चाड । वाचे घेत गोड नाम तुझें ॥१॥
नेणतें लेकरुं आवडीचें नातें । बोले वचनातें आवडीनें ॥२॥
भक्तिविण कांहीं वैराग्य तें नाही । घातला विठाई भार तुज ॥३॥
तुका म्हणे नाचूं निर्लज्ज होउनी । नाही मझे मनी दुजा भाव ॥४॥
21.
पूजूं नारायण शब्दाचे सुमनें । मंत्रपुष्प तेणें वाहियेलें ॥१॥
भावाचे पै हाती जोडुनी ओंजळ । समर्पिले जळ शुद्ध भावे ॥२॥
मुखशुद्धी तांबूल दिले तुळसीदल । आनंद सकळ ओसंडला ॥३॥
तुका म्हणे आतां उरले नाही । नामाविण कांहीं बोलावया ॥४॥
22.
समाधान चित्ताचें चरणा आलिंगन । पायावरी मन स्थिरावलें ॥१॥
जैसे केलें तैसे घालूं लोटांगणा । करू प्रदक्षिणा नमस्कार ॥२॥
प्रार्थितों मी तुज राहे माझे पोटीं । हृदयसंपुटीं देवराया ॥३॥
क्षेम आलिंगन दिली पयीं मिठी । घेतलीसे लुटी अमूप हो ॥४॥
तुका म्हणे आतां आनंदीआनंद । गाऊ परमानंद मनासंगें ॥५॥
23.
काय उपचार करू पांडुरंगा । हेंचि मज सांगा विचारूनी ॥१॥
कोणता पदार्थ उणा तुजपासी । बोलाया वाचेशीं मौन पडे ॥२॥
शंकर-शेषादि करिती स्मरण । तेथें माझें मन गाऊ शके ॥३॥
इंद्र सुरवर वाहती सुमनें । तेथे म्या वाहणे ं काय एक ॥४॥
परी आवडीनें जोडूनी ओंजळ । बुका वाहूं माळ तुळसीची ॥५॥
उणें पुरें तुम्ही करूनियां सांगा । जिवालागीं मग सुख तेव्हा ॥६॥
तुका म्हणे माझी ऐकावी प्रार्थना । तुम्ही नारायणा सेवकाची ॥७॥
24.
कैसे करू ध्यान कैसा पाहू तुज । वर्म दावी मज याचकासी ॥१॥
कैसी भक्ति करू सांग तुझी सेवा । कोण्या भावे देवा आतुडसी ॥२॥
कैसी कीर्ति वाणू कैसा लक्षीं जाणू । जाणुं हा कवणूं कैसा तुज ॥३॥
कैसा गाऊ गीती कैसा ध्याऊं चित्तीं । कैसी स्थिति मति न कळे मज ॥४॥
तुका म्हणे जैसे दास केलें देवा । तैसे हें अनुभवा आणीं मज ॥५॥
25.
काय तुज कैसे जाणावें गा देवा । आणावे अनुभवा कैशापरी ॥१॥
सगुण निर्गुण स्थूल की लहान । न कळे अनुमान मज तुझें ॥२॥
कोणता निर्धार करू हा विचार । भवसिंधु पार तारावया ॥३॥
तुका म्हणे कैसे पाय आतुडती । न पडे श्रीपती वर्म ठावें ॥४॥
26.
स्तुती करू तरी कोण माझी मती । वेदा पडे भ्रांति हें आश्चर्य ॥१॥
परी हा जिव्हाग्रीं रामकृष्णहरी । बैसवीं लौकरी यातीगुण ॥२॥
रूप गुण कीर्ति कृपाळू उदार । वर्णावया पार ब्रह्मा नेणे ॥३॥
रूपी नामी शिव होऊनिया वेडा । वर्णिला पवाडा रामनामी ॥४॥
तुका म्हणे मज नेणवेचि शिव । नाही राहिला वाव बोलावया ॥५॥
27.
नामाचा प्रताप न वर्णवेचि मज । सांग गरुडध्वज राहे तेथें ॥१॥
मम वाचा किती परतल्या श्रुती । वेद मुखें श्रुती मौन ठेले ॥२॥
वर्णूं नेणें शेष नामाचा पवडा । चिरलिया रांडा जिव्हा त्याच्या ॥३॥
अनुसरली रमा वर्णावया श्रीहरी । पायांची किंकरी होऊनि ठेली ॥४॥
तुका म्हणे आम्ही मानव किंकर । वर्णावया पार न कळे तुझा ॥५॥
28.
आम्ही मानवानी वर्णावे ते काय । सुरवर पाय वंदिताती ॥१॥
गणेश शारदा करिती गायन । आदिदेव गण श्रेष्ठ श्रेष्ठ ॥२॥
जयाच्या गायना तिष्ठतो शंकर । तयासी पै पार न कळे तुझा ॥३॥
तुका म्हणे आम्ही किंकर ते किती । इंद्राची ती मती नागविली ॥४॥
29.
अगा महाविष्णु अनंत भुजांच्या । आम्हा अनाथांच्या सोयरीया ॥१॥
न कळे महिमा वेद मौनावती । तेथे माझी मति कोणीकडे ॥२॥
काय म्या वर्णावे तुझ्या थोरपणा । सहस्रवदना शक्ति नव्हे ॥३॥
रविशशी जेथें तेजे सामावती । तेथें माझी मती कोणीकडे ॥४॥
तुका म्हणे आम्ही बाळ तू माऊली । करावी साउली करुणेची ॥५॥
30.
नमो विश्वरूपा अगा मायबाप । अपारा अमूपा पांडुरंगा ॥१॥
विनवितो रंक दास मी सेवक । वचन तें एक आइकावे ॥२॥
तुझी स्तुती वेद करिता भागला । निवांतचि ठेला नेति नेति ॥३॥
ऋशि मुनि बहु सिद्ध कविजन । वर्णिता तुझे गुण न सरती ॥४॥
तुका म्हणे तेथे काय माझी वाणी । जे तुझी वाखाणी कीर्ति देवा ॥५॥
31.
विनविजे ऐसे भाग्य नाही देवा । पायांशीं केशवा सलगी केली ॥१॥
धीटपणे पत्र लिहिले आवडी । पार नेणें थोडी मति माझी ॥२॥
जेथे वेदा तुझा न कळेचि पार । तेथें मी अपार काय वानू ॥३॥
जैसे तैसे माझे बोल अंगिकारी । बोबड्या उत्तरी गौरवितो ॥४॥
तुका म्हणे विटेवरी जी पाऊलें । तेथें म्यां ठेविले मस्तक हे ॥५॥
32.
त्रिगुण आटीव वाचेचा पसारा । पडेल विचार सर्व रस ॥१॥
आदि मध्य अंती नाही अवसान । जीवनीं जीवन मिळुनी गेले ॥२॥
रामकृष्ण नाम माळ ही साजिरी । ओंविली गोजिरी कर्णी मनी ॥३॥
तुका म्हणे तनु झाली हे शीतल । आवडी सकळ ब्रह्मानंदे ॥४॥
33.
इतुके करी देवा ऐकें वचन । समूळ अभिमान जाळीं माझा ॥१॥
इतुके करी देवा आइकें हे गोष्टी । सर्व समदृष्टी तुज देखे ॥२॥
इतुके करी देवा विनवितो तुज । संतचरण रज वंदी माथां ॥३॥
इतुके करी देवा आइकें हे मात । हृदयी पंढरीनाथ दिवसरात्री ॥४॥
भलतियां भावे तारी पंढरीनाथा । तुका म्हणे आतां शरण आलो ॥५॥
हरिपाठ समाप्त.....
