वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 38. शुद्ध पंचरत्न हरीपाठ › 1. पाच संतांचे हरिपाठ › 1. 5 संतांचे हरिपाठ › 2. संत ज्ञानेश्वर हरिपाठ

गजर

🙏 38. शुद्ध पंचरत्न हरीपाठ · ABH-081475 · अभंग क्र. १

गजर

बोला… पुंडलिक वरदे हरी वि..ठ्ठ…ल…..
पंढरीनाथ भगवान कि जय..!
श्री…. ज्ञानदे….व….. तुका….राम..
ज्ञाने….श्वर… महाराज की…. जय.!
जगद्गुरू तुका…राम महाराज कि जय..!
“शान्तीब्रह्म एकनाथ महाराजक की जय”

गजर झाल्यावर पुढीले …….
जय जय राम कृष्ण हरी
( भजन म्हणावे )

1.

रूप पाहता लोचनी
रूप पाहता लोचनी ।
सुख जाले वो साजणी ॥
तो हा विठ्ठल बरवा ।
तो हा माधव बरवा ॥धृपद॥
बहुता सुकृतांची जोडी ।
म्हणुनि विठ्ठली आवडी ॥
सर्व सुखाचे आगर ।
बाप रखुमादेवीवर ॥

तो हा विठ्ठल बरवा ।
तो हा माधव बरवा ॥ धृपद ॥

(विठोबा रखुमाई भजन म्हणावे.)

(सर्व अभंगाच्या शेवटी धृपद आहे, ते प्रत्येक अभंगाच्या शेवटी म्हणावे.)

1.
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवोनिया ॥१॥
तुळसीहार गळा कांसे पीतांबर ।
आवडे निरंतर हेची ध्यान ॥२॥
मकरकुंडले तळपती श्रवणी ।
कंठी कौस्तुभमणि विराजित ॥३॥
तुका ह्मणे माझे हेचि सर्व सुख ।
पाहीन श्रीमुख आवडीने ॥४॥

तुळसी हार गळा कांसे पीतांबर ।
आवडे निरंतर तेंचि रूप ॥२॥

2.
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।
तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥२॥
असोनी संसारी जिह्वे वेगु करी ।
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे ।
द्वारकेचे राणे पांडवा घरी ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥

2.

चहूं वेदी जाण साहि शास्त्री कारण ।
अठराही पुराणे हरीसी गाती ॥१॥
मंथुनी नवनीता तैसे घे अनंता ।
वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग ॥२॥
एक हरी आत्मा जीवशिवसमा ।
वाया तू दुर्गमा न घाली मन ॥३॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ ।
भरला घनदाट हरि दिसे ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥

3.

त्रिगुण असार निर्गुण हे सार ।
सारासार विचार हरिपाठ ॥१॥
सगुण निर्गुण गुणाचे अगुण ।
हरिविणे मन व्यर्थ जाय ॥२॥
अव्यक्त निराकार नाही ज्या आकार ।
जेथोनि चराचर हरिसी भजे ॥३॥
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी ।
अनंत जन्मांनी पुण्य होय ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥

4.

भावेविण भक्ति भक्तिविण मुक्ति ।
बळेविण शक्ति बोलू नये ॥१॥
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित ।
उगा राहे निवांत शिणसी वाया ॥२॥
सायास करिशी प्रपंच दिननिशी |
हरिसी न भजसी कवण्या गुणे ॥३॥
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे ।
तुटेल धरणे प्रपंचाचे ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥

5.

योगयागविधि येणे नोहे सिद्धि ।
वांयाची उपाधि दंभ धर्म ॥१॥
भावेविण देव न कळे नि:संदेह ।
गुरुविणे अनुभव कैसा कळे ॥२॥
तपेविण दैवत दिधल्याविण प्राप्त ।
गुजेविण हित कोण सांगे ॥३॥
ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात ।
साधूंचे संगती तरणोपाय ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥

6.

साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला ।
ठायीच मुराला अनुभवे ॥१॥
कापुराची वाती उजळली ज्योति ।
ठायीच समाप्ति झाली जैसी ॥२॥
मोक्षरेखे आला भाग्ये विनटला ।
साधूंचा अंकिला हरिभक्त ॥३॥
ज्ञानदेवा गोडी संगति सज्जनी ।
हरि दिसे जनी वनी आत्मतत्वी ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥

7.

पर्वताप्रमाणे पातक करणे ।
वज्रलेप होणे अभक्तांसी ॥१॥
नाही ज्यासी भक्ति ते पतित अभक्त ।
हरीसी न भजत दैवहत ॥२॥
अनंत वाचाळ बरळती बरळ ।
त्या कैचा गोपाळ पावे हरी ॥३॥
ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान ।
सर्वाघटी पूर्ण एक नांदे ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥

8.

संतांचे संगती मनोमार्ग गती ।
आकळावा श्रीपति येणे पंथे ॥१॥
रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा ।
आत्मा जो शिवाचा राम जप ॥२॥
एकतत्व नाम साधिती साधन ।
द्वैताचे बंधन न बाधिजे ॥३॥
नामामृत गोडी वैष्णवा लाधली ।
योगिया साधली जीवनकळा ॥४॥
सत्वर उच्चार प्रह्लादी बिंबला ।
उद्धवा लाधला कृष्ण दाता ॥५॥
ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ ।
सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥६॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥

9.

विष्णुविणे जप व्यर्थ त्याचे ज्ञान ।
रामकृष्णी मन नाही ज्याचे ॥१॥
उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा ।
रामकृष्णी पैठा कैसा होय ॥२॥
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान ।
तया कैचे कीर्तन घडेल नामी ॥३॥
ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान ।
नामपाठ मौन प्रपंचाचे ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥

रामकृष्ण हरी ( भजन म्हणावे )

10.

त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी ।
चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ ॥१
नामासी विन्मुख तो नर पापिया ।
हरिवीण धावया नपवे कोणी ॥२॥
पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मीक |
नामे तिन्ही लोक उद्धरती ॥३॥
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरिचे ।
परंपरा त्याचे कुळ शुद्ध ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥

11.

हरि उच्चारणी अनंत पापराशी ।
जातील लयासी क्षणमात्रे ॥१॥
तृण अग्निमेळे समरस झाले ।
तैसे नामे केले जपता हरी ॥२॥
हरि उच्चारण मंत्र हा अगाध ।
पळे भूतबाधा भेणे तेथे ॥३॥
ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ ।
न करवे अर्थ उपनिषदां ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥

12.

तीर्थ व्रत नेम भावेविण सिद्धि ।
वायाचि उपाधि करिसी जना ॥१॥
भावबळे आकळे येऱ्हवी नाकळे ।
करतळी अवळे तैसा हरि ॥२॥
पारियाचा रवा घेता भूमीवरि ।
यत्न परोपरी साधन तैसे ॥३॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण ।
दिधले संपूर्ण माझे हाती ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥

13.

समाधि हरीची समसुखेविण ।
न साधेल जाण द्वैतबुद्धि ॥१॥
बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे ।
एका केशीराजे सकळसिद्धि ॥२॥
ऋद्धिसिद्धिनिधि अवघीच उपाधि ।
जंव त्या परमानंदी मन नाही ॥३॥
ज्ञानदेवा रम्य रमले समाधान ।
हरीचे चिंतन सर्वकाळ ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥

14.

नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी ।
कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टी । १
रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप ।
पापाचे कळप जळती पुढे ॥२॥
हरि हरि हरि मन्त्र हा शिवाचा ।
म्हणती जे वाचा तया मोक्ष ॥३॥
ज्ञानदेवा पाठ नारायण नाम ।
पाविजे उत्तम निजस्थान ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥

15.

एक नाम हरि द्वैत नाम दुरी ।
अद्वैत कुसरी विरळा जाणे ॥१॥
समबुद्धि घेता समान श्रीहरी ।
शमदमा वैरी हरी झाला ॥२॥
सर्वांघटी राम देहादेही एक ।
सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी ॥३॥
ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा ।
मागिलिया जन्मा मुक्त झालो ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥

16.

हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ ।
वाचेसी सुलभ रामकृष्ण ॥१॥
रामकृष्णनामी उन्मनी साधिली ।
तयासी लाधली सकळ सिद्धि ॥२॥
सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठी आले ।
प्रपंची निवाले साधुसंगे ॥३॥
ज्ञानदेवा नाम रामकृष्णी ठसा ।
तेणे दशदिशा आत्माराम ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥

17.

हरिपाठ कीर्ति मुखी जरी गाय ।
पवित्रचि होय देह त्याचा ॥१॥
तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप ।
चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे ॥२॥
मातृपितृ भ्राता सगोत्र अपार ।
चतुर्भुज नर होऊनि ठेले ॥३॥
ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधले ।
निवृत्तीने दिधले माझ्या हाती ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥

18.

हरिवंशपुराण हरिनाम संकीर्तन ।
हरिविण सौजन्य नेणे काही ॥१॥
त्या नरा लाधले वैकुण्ठ जोडले ।
सकळही घडले तीर्थाटन ॥२॥
मनोमार्गे गेला तो येथे मुकला ।
हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य ॥३॥
ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी ।
रामकृष्णी आवडी सर्वकाळ ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥

जय जय विठोबा रखुमाई
( भजन म्हणावे )

19.

नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी ।
पापे अनंत कोडी (कोटी) गेली त्यांची ॥१॥
अनंत जन्मांचे तप एक नाम ।
सर्व मार्ग सुगम हरिपाठ ॥२॥
योगयागक्रिया धर्माधर्म माया ।
गेले ते विलया हरिपाठी ॥३॥
ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म ।
हरिविणे नेम नाही दुजा ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥

20.

वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन ।
एक नारायण सार जपा ॥१॥
जप तप कर्म हरिवीण धर्म ।
वाउगाचि श्रम व्यर्थ जाय ॥२॥
हरिपाठी गेले ते निवांतचि ठेले ।
भ्रमर गुंतले सुमनकळिके ॥३॥
ज्ञानदेवा मन्त्र हरिनामाचे शस्त्र ।
यमे कुळ गोत्र वर्जियेले ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥

21.

काळ वेळ नाम उच्चारिता नाही ।
दोन्ही पक्ष पाहे उद्धरती ॥१॥
रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण ।
जडजीवा तारण हरि एक ॥२॥
हरिनाम सार जिह्वा या नामाची ।
उपमा त्या दैवाची कोण वाणी ॥३॥
ज्ञानदेवी सांग झाला नामपाठ ।
पूर्वजा वैकुण्ठ मार्ग सोपा ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥

22.

नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ ।
लक्ष्मीवल्लभ तया जवळी ॥१॥
नारायण हरि नारायण हरि ।
भुक्ति मुक्ति चारी घरी त्यांच्या ॥२॥
हरिविणे जन्म नरकचि पै जाणा ।
यमाचा पाहुणा प्राणी होय ॥३॥
ज्ञानदेव पुसे निवृत्तीसि चाड ।
गगनाहुनि वाड नाम असे ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥

23.

सात पांच तीन दशकांचा मेळा ।
एकतत्वी कळा दावी हरि ॥१॥
तैसे नव्हे नाम सर्व मार्गा वरिष्ठ ।
येथे काही कष्ट न लगती ॥२॥
अजपा जपणे उलट प्राणाचा ।
तेथेही मनाचा निर्धारु असे ॥३॥
ज्ञानदेवा जिणे नामेविण व्यर्थ ।
रामकृष्णी पंथ क्रमियेला ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥

24.

जप तप कर्म क्रिया नेम धर्म ।
सर्वाघटी राम भावशुद्ध ॥१॥
न सोडी रे भावो टाकी रे संदेहो ।
रामकृष्णी टाहो नित्य फोडी ॥२॥
जाति वित्त गोत कुळ शीळ मात ।
भज का त्वरित भावनायुक्त ॥३॥
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी ।
वैकुण्ठ भुवनी घर केले ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥

25.

जाणीव नेणीव भगवंती नाही ।
हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा ॥१॥
नारायण हरि उच्चार नामाचा ।
तेथे कळीकाळाचा रीघ नाही ॥२॥
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी ।
ते जीव जंतूसी केवी कळे ॥३॥
ज्ञानदेवा फळ नारायण पाठ ।
सर्वत्र वैकुण्ठ केले असे ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥

26.

एक तत्व नाम दृढ धरी मना ।
हरीसी करुणा येईल तुझी ॥१॥
ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद ।
वाचेसी सद्गद जपे आधी ॥२॥
नामापरते तत्व नाही रे अन्यथा ।
वाया आणिक पंथा जाशी झणी ॥३॥
ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी ।
धरूनि श्रीहरि जपे सदा ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥

27.

सर्व सुख गोडी सर्व शास्त्रे निवडी।
रिकामा अर्धघडी राहू नको ॥१॥
लटिका व्यवहार सर्व हा संसार ।
वाया येरझार हरिवीण ॥२॥
नाममंत्र जप कोटी जाईल पाप ।
रामकृष्णी संकल्प धरुनि राहे ॥३॥
निजवृत्ति काढी सर्व माया तोडी ।
इन्द्रिया सवडी लपू नको ॥४॥
तीर्थी व्रती भाव धरी रे करुणा ।
शांति दया पाहुणा हरि करी ॥५॥

हरि मुखे म्हणा हरि…….. ॥धृपद॥

विणेकऱ्याणे खालील सुचना (मोठ्याने द्यावी)
वारकरी सांप्रदायिक पद्धतीनुसार विणेकऱ्याणे खाली बसलेल्या सर्वाना ही चाल म्हणेपर्यंत उठून उभे राहण्यास सांगावे.
शक्यतो पायात बूट/चप्पल, तोंडात बिडी, सिगारेट, तंबाखू, पान, गुटखा, मावा, खर्रा, इत्यादीचा त्याग करण्याची स्पष्ट पण आदरपूर्वक (द्वेषपुर्वक नको) सुचना पुन्हा द्यावी.
चाल म्हणण्यासाठी १ व्यक्ती गुणवान असावा (बाहेरून आमंत्रित) जोडीदार स्थानिक (शक्यतो त्याच गावातील) कारण या कृतीने वारकरी सांप्रदायिक सद्भावना वाढते, आणि गुणवानाच्या संगतीने गुणवान तयार होतो. (दररोजच्या हरीपाठासाठी)

ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवी ज्ञान ।
समाधि संजीवन हरिपाठ ॥६॥

28.

नामसंकीर्तन साधन पै सोपे ।
जळतील पापे जन्मांतरीची॥1॥
न लगे सायास जावे वनांतरा ।
सुखे येतो घरा नारायण ॥धृपद॥
ठायीच बैसोनि करा एकचित्त ।
आवडी अनंत आळवावा ॥2॥
रामकृष्णहरि विठ्ठल केशवा ।
मंत्र हा जपावा सर्वकाळ॥3॥
याविण असता आणीक साधन ।
वाहातसे आण विठोबाची ॥4॥
तुका म्हणे सोपे आहे सर्वांहूनि ।
शाहाणा तो धणी घेतो येथे ॥5॥

29.

देवाचिया द्वारी उभा क्षणभरी
तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ॥
पुण्याची गणना कोण करी ॥२॥धृपद॥
असोनि संसारी जिव्हे वेगु करी ॥
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणे ॥
द्वारकेचा राणे पांडवां घरी ॥४॥

॥ इति श्री ज्ञानदेव महाराज कृत हरिपाठ समाप्त ॥

ज्ञानोबा....माउली तुकाराम
(भजन म्हणावे)

30.
गुरुपरंपरेचे अभंग प्रारंभ
सुचना:
या पुढील सर्व अभंगाचे धृपद हे स्वतंत्र असून ते हे प्रत्येक अभंगाच्या शेवटी म्हणावे.

सत्य गुरुराये कृपा मज केली ।
परी नाही घडली सेवा कांही ॥१॥
सापडविले वाटे जाता गंगास्नाना ।
मस्तकी तो जाणा ठेविला कर॥धृ॥
भोजना मागती तूप पावशेर ।
पडिला विसर स्वप्नामाजी ॥२॥
कांही कळे उपजला अंतराय ।
म्हणोनिया काय त्वरा जाली ॥३॥
राघव चैतन्य कैशव चैतन्य ।
सांगितली खुण माळिकेची ॥४॥
बाबाजी आपुले सांगितले नाम ।
मंत्र दिला राम कृष्ण हरि ॥५॥
माघशुद्ध दशमी पाहुनि गुरुवार ।
केला अंगीकार तुका म्हणे ॥६॥

सापडविले वाटे जाता गंगास्नाना ।
मस्तकी तो जाणा ठेविला कर॥धृ॥

31.

माझिये मनीचा जाणोनिया भाव ।
तो करी उपाव गुरुराजा ॥१॥
आवडीचा मंत्र सांगितला सोपा ।
जेणे गुंफ़ा कांही कोठे ॥धृपद॥
जाती पुढे एक उतरले पार ।
हा भवसागर साधुसंत ॥२॥
जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी ।
उतार सांगडी तापे पेटे ॥३॥
तुका म्हणे मज दावियेला तारू ।
कृपेचा सागरु पांडुरंग ॥४॥

आवडीचा मंत्र सांगितला सोपा ।
जेणे गुंफ़ा कांही कोठे ॥धृपद॥

32.

घालुनिया भार राहिलो निश्चिती ।
निरविले संती विठोबासि ॥१॥
लावूनिया हात कुरवाळिला माथा ।
सांगितली चिंता न करावी ॥धृपद॥
कटी कर समचरण साजिरे ।
राहिला भीवरे तीरी उभा ॥२॥
खुंटले सायास आणिक या जीवा ।
धरिले केशवा पाय तुझे ॥३॥
तुज वाटे आता ते कर अनंता ।
तुका म्हणे संता लाज माझी ॥४॥

लावूनिया हात कुरवाळिला माथा ।
सांगितली चिंता न करावी ॥धृपद॥

33.

माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव ।
आपणचि देव होय गुरू ॥1॥
पढिये देहभाव पुरवी वासना ।
अंती ते आपणा पाशी न्यावे ॥धृ॥
मागे पुढे उभा राहे सांभाळीत ।
आलिया आघात निवाराया ॥2॥
योगक्षेम त्यांचा जाणे जडभारी ।
वाट दावी करी धरूनिया ॥3॥
तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी ।
पाहावे पुराणी विचारूनी ॥4॥

पढिये देहभाव पुरवी वासना ।
अंती ते आपणा पाशी न्यावे ॥धृ.॥

34.

आदिनाथ उमा बीज प्रगटले ।
मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती ।।१।।
तेची प्रेममुद्रा गोरक्षा दिधली ।
पूर्ण कृपा केली गहिनीनाथा ।।२।।
वैराग्ये तापला सप्रेमे निवाला ।
ठेवा जो लाधला शांतीसुख ।।3।।
निर्व्दंव्द नि:शंक विचरता मही ।
सुखानंद हृदयी स्थिरावला ।।४।।
विरक्तीचे पात्र अन्वयाचे मुख ।
देऊनी सम्यक अनन्यता ।।५।।
निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण ।
कुळ हे पावन कृष्ण नामे ।।६।।

तेची प्रेममुद्रा गोरक्षा दिधली ।
पूर्ण कृपा केली गहिनीनाथा ।।२।।

35.

आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा ।
मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ।।१।।
मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला ।
गोरक्ष वोळला गहिनीप्रती ।।२।।
गहिनीप्रसादे निवृत्ती दातार ।
ज्ञानदेवा सार चोजाविले ।।3।।

मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला ।
गोरक्ष वोळला गहिनीप्रती ।।२।।

36.

अवघेंचि त्रैलोक्य आनंदाचे आतां ।
चरणी जगन्नाथा चित्त ठेले ॥१॥
माय जगन्नाथ बाप जगन्नाथ ।
अनाथांचा नाथ जनार्दन ॥२॥
एका जनार्दनी एकपणे उभा ।
चैतन्याची शोभा शोभतसे ॥३॥

माय जगन्नाथ बाप जगन्नाथ ।
अनाथांचा नाथ जनार्दन ॥२॥

37.

अवघाची संसार सुखाचा करीन ।
आनंदे भरीन तिन्ही लोक ।।१।।
जाईन गे माये तया पंढरपुरा ।
भेटेन माहेरा आपुलिया ।।२।।
सर्व सुकृताचे फळ मी लाहीन ।
क्षेम मी देईन पांडुरंगी ।।3।।
बापरखुमादेवीवरू विठ्ठालाची भेटी ।
आपुल्या संवसाठी करुनी ठेला ।।४।।

जाईन गे माये तया पंढरपुरा ।
भेटेन माहेरा आपुलिया ।।२।।

38.

श्रीगुरु सारीखा असता पाठीराखा |
इतरांचा लेखा कोण करी ||१||
राजयाची कांता काय भीक मागे |
मनाचिया जोगे सिध्दी पावे ||२||
कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला |
काय ऊणे त्याला सांगा जोजी ||३||
ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो |
आता उद्धरलो गुरुकृपे ||४||

राजयाची कांता काय भीक मागे |
मनाचिया जोगे सिध्दी पावे ||२||

गुरुपरंपरेचे अभंग समाप्त

ज्ञाने..श्वर माउली….
ज्ञानराज ..माउली.. तुकाराम
भजन म्हणावे.

विनवणी भजन म्हणावे

39.
हेचि दान देगा देवा ।
तुझ्या विसर न व्हावा ॥१॥
गुण गाईन आवडी ।
हेचि माझी सर्व जोडी ॥२॥
न लगे मुक्ति आणि सम्पदा ।
संत संग देई सदा ॥३॥
तुका म्हणे गर्भवासी ।
सुखे घालावे आम्हासी ॥४॥

गुण गाईन आवडी ।
हेचि माझी सर्व जोडी ॥२॥

भजन – जय विठ्ठल जयजय विठ्ठल ।

40.
बोलिली लेकुरे ।
वेडी वाकुडी उत्तरे ॥१॥
करा क्षमा अपराध ।
महाराज तुम्ही सिद्ध ॥२॥
नाही विचारिला ।
अधिकार म्या आपुला॥३॥
तुका म्हणे ज्ञानेश्‍वरा ।
राखा पाया पै किंकरा ॥४॥

करा क्षमा अपराध ।
महाराज तुम्ही सिद्ध ॥२॥

भजन – ज्ञानदेव तुकाराम ।

41.
(सर्वाना उभे राहण्यास सांगावे व आरतीची तयारी करावी.)

झाले समाधान ।
तुमचे देखिले चरण ॥१॥
आतां उठावेसे मना ।
येत नाही नारायणा ॥२॥
सुरवाडिकपणे ।
येथे सापडले केणे ॥३॥
तुका म्हणॆ भोग ।
गेला निवारला लाग ॥४॥

आतां उठावेसे मना ।
येत नाही नारायणा ॥२॥

42.

(देवाच्या समोर उभे राहून आरती ओवाळन्यास सांगावे.)

करुनी आरती ।
चक्रपाणि ओवाळिती ॥१॥
आजि पुरले नवस ।
धन्य काळ हा दीवस ॥२॥
पाहा वो सकळा ।
पुण्यवंत तुम्ही बाळा ॥३॥
तुका वाहे टाळी ।
उभा सन्निध जवळी ॥४॥

आजि पुरले नवस ।
धन्य काळ हा दीवस ॥२॥

43.

प्रेम सप्रेम आरती ।
गोविंदाते ओवाळीती ॥१॥
धन्य धन्य ते लोचनी ।
नित्य करिती अवलोकन ॥२॥
बाळा प्रौढा आणि मुग्धा ।
ओवाळिती परमानन्दा ॥३॥
नामा म्हणे केशवाते ।
देखुनी राहिलो तटस्थे ॥४॥

धन्य धन्य ते लोचनी ।
नित्य करिती अवलोकन ॥२॥

44.

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिका भेटी परब्रम्हा आले गा ।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥

जयदेव जयदेव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा । राहीच्या वल्लभा ।
पावे जीवलगा । जयदेव जयदेव ॥धृ॥

तुळसीमाळा गळा कर ठेऊन कटी ।
कांसे पीताबंर कस्तुरी लल्लाटीं ।
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरुड हनुमंत पुढे उभे राहाती ॥२॥
जयदेव जयदेव...... ॥धृ॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमाजी स्नाने जे करिती ।
दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ति ।
केशवासी नामदेव भावे ओवाळिती ॥३॥

45.

आरती ज्ञानराजा । महा कैवल्य तेजा ।
सेविती साधु संत । मनु वेधला माझा ॥१॥
आरती ज्ञानराजा ॥धृ॥

लोपले ज्ञान जगी । हित नेणती कोणी ।
अवतार पांडुरंग । नांव ठेविले ज्ञानी ॥२॥
आरती ज्ञानराजा ॥धृ॥

प्रगट गुह्य बोले । विश्व ब्रह्माचि केले ।
रामा जनार्दनी । पायी टकचि ठेले ॥३॥
आरती ज्ञानराजा ॥धृ॥

46.

आरती तुकारामा । स्वामी सद्‍गुरुधामा ।
सच्चिदानंद मूर्ति । पाय दाखवी आम्हा ॥१॥
आरती तुकारामा ॥धृ॥

राघवे सागरांत । पाषाण तारिले ।
तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले ॥२॥
आरती तुकारामा ॥धृ॥

तुकिता तुळनेसी ।
ब्रह्म तुकासी आले ।
म्हणोनि रामेश्वरे ।
चरणी मस्तक ठेविले ॥३॥
आरती तुकारामा…॥धृ॥

47.

आरती एकनाथा ।
महाराजा समर्था ।
त्रिभुवनी तूचि थोर ।
सदगुरु जगन्नाथा ॥१॥
आरती एकनाथा.॥धृ॥

एकनाथ नाम सार ।
वेदशास्त्रांचे गुज ।
संसार दु:ख नासे ।
महामंत्रांचे बीज ॥२॥
आरती एकनाथा... ॥धृ॥

एकनाथ नाम घेता ।
सुख वाटले चित्ता ।
अनंत गोपाळ दासा ।
धणी न पुरे गाता॥३॥
आरती एकनाथा... ॥धृ॥

(देवाला आरती द्यावी. व नंतर विणेकऱ्यास, नंतर ईतरांना. )
(कर्पूरगौरं इत्यादी वारकरी सांप्रदायात म्हणत नाहीत.)

48.
(उभे असलेल्या सर्वांना उजव्या बाजूने स्वतः भोवती एक प्रदक्षिणा घालावी, तशी सुचना द्यावी.)

घालीन लोटांगण वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहीन रुप तुझे ॥१॥
प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन ।
भावे ओवाळीन म्हणे नामा ॥२॥
वारकरी संप्रदायात मंत्र पुष्पांजली म्हटल्या जात नाही,

भजन – विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई

49.

कृपाळु सज्जन तुम्ही सन्तजन ।
हेचि कृपादान तुमचे मज ॥१॥
आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा ।
कीव माझी सांगा काकुळती ॥२॥
अनाथ अपराधी पतित आगळा ।
परि पाया वेगळा नका करु ॥३॥
तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी ।
मग मजहरी उपेक्षिना ॥४॥

आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा ।
कीव माझी सांगा काकुळती ॥२॥

50.

हेचि व्हावी माझी आस ।
जन्मोजन्मी तुझा दास ॥१॥
पंढरीचा वारकरी ।
वारी चुको नेदी हरी ॥२॥
संतसंग सर्वकाळ ।
अखंड प्रेमाचा कल्लोळ ॥३॥
चंद्रभागे स्नान ।
तुका मागे हेंचि दान ॥४॥

पंढरीचा वारकरी ।
वारी चुको नेदी हरी ॥२॥

51.

आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा।
माझिया सकळा हरीच्या दासा ॥१॥
कल्पनेची बाधा न हो कवणे काळी।
ही संतमंडळी सुखी असो ॥२॥
अहंकाराचा वारा न लागो राजसा ।
माझिया विष्णुदासा भाविकांसी ॥३॥
नाम म्हणे तया असावे कल्याण ।
ज्या मुखी निधान पांडुरंग ॥४॥

कल्पनेची बाधा न हो कवणे काळी।
ही संतमंडळी सुखी असो ॥२॥

52.

मागणे ते तुजप्रती आहे ।
देशील तरी पाहे पांडुरंगा ॥१॥
या संतासी निरवी हेचिमज देई ।
आणिक दुजेकांही न मागो देवा ॥२॥
तुका म्हणे आता उदार तू होई ।
मज ठेवी पायी संतांचिया ॥३॥

या संतासी निरवी हेचिमज देई ।
आणिक दुजेकांही न मागो देवा ॥२॥

ज्ञानदेव तुकारा….म तुकाराम… तुकाराम… तुकाराम

गजर

बोला… पुंडलिक वरदे हरी विठ्ठल…..
श्री…. ज्ञानदे….व….. तुका….राम..
पंढरीनाथ भगवान की.. जय..!
ज्ञाने….श्वर… महाराज की…. जय.!
जगद्गुरू तुका…राम महाराज की… जय..!
“शान्तीब्रह्म एकनाथ महाराजक की.. जय”
धर्म की.. जय हो,
अधर्म का.. नाश हो…,
प्राणियों में.. समभाव हो,
विश्व का.. कल्याण हो…,
गोहत्या.. बंद हो !
जय…. श्री….राम,
हर-हर महा……देव..

सर्वांनी विणेकऱ्याचे दर्शन घ्यावे.
(हरिपाठ समाप्त.)

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग