वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ६. युद्धकाण्ड - अध्याय ८४ › ६१. हनुमंताचा गौरव

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088186 · अभंग क्र. ६१

61.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय एकसष्टावा ॥
राम – रावण – युद्धवर्णन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रावणाची गर्वोक्ती व गर्जना :

परिघें नमिलें रघुपती । ते न देखेच लंकापती ।
अति गर्वाची गर्वोन्मती । अंधवृत्ती होवोनि ठेली ॥१॥
गर्वे गर्जत रावण । श्रीरामाते लक्षून ।
झणें करिसी पलायन । दशानन देखोनी ॥२॥
वानरांचा आश्रय धरून । मजसी करु आलासि रण ।
त्यांसहित तुज निवटीन । अर्धक्षण न लागता ॥३॥
आम्हा राक्षसांचे भक्ष । देखा मनुष्य प्रत्यक्ष ।
वानरभार सावकाश । कोशिंबिरीस न पुरती ॥४॥
ते तुम्ही आज मजसी । रणी भिडलां रणमारेंसीं ।
तै उबगलेती जगासी । पाहू आता पुरुषार्था ॥५॥
स्त्रिये मारिले ताटकेसी । मारिले मारीच मृगासी ।
इतुक्यासाठीं आपणासी । संभावितोसी वीरवृत्ती ॥६॥
जुने कीडखादले कांबिट । ओढिता मोडले अवचट ।
तेणे बळे वीर उद्‌भट । तुज मर्कट मानिती ॥७॥
बापुडे परशुराम ब्राह्मण । त्यापुढे तुझी आंगवण ।
वनी धाडिलें भेडसावून । ते विंदान येथे चालेना ॥८॥
युद्ध न करवेचि समरांगणीं । वाळी मारिला कपटेंकरोनी ।
तेणे निर्भात्सिले ते क्षणी । लाज मनी असेना ॥९॥
नळाच्या हाती तरती शिळा । तो सेतु रामे बांधिला ।
मूर्ख बोलती या बोला । ताठा चढला तुज तेणे ॥१०॥
आता जाणवेल बळ । करोनि दावी रणकल्लोळ ।
म्हणोनि गर्जत तोंडाळ । पण मनी प्रबळ धुकधुक ॥११॥

परिघ तुटल्यावर रामांनी जमिनीवरुन युद्ध सुरु केले :

जेंवी का पुळियीचा कांटा । पुढे तिखट मागे पोंचटा ।
तेंवी रावण वीर लाठा । रणचौहटां गर्जत ॥१२॥
येरीकडे रघुनंदन । ध्वज तुटला देखोन ।
तळी उतरला आपण । रणकंदन करावया ॥१३॥
म्हणोनिया स्यंदन । स्वये सोडी रघुनंदन ।
रथाचें मज कार्य कोण । करीन रण निजांगीं ॥१४॥
आरुढोनि रथासी । जरी निवटीन रावणासी ।
लौकिकी प्रथा होईल ऐसी । सामर्थ्य रामासीं असेना ॥१५॥
रथबळेंकरोनि जाण । रणी निवटिला रावण ।
एवढी अपकीर्ति साहे कोण । म्हणोनि आपण उतरला ॥१६॥

रावणाची गर्जना :

ते देखोनि रावण । अधिक गर्जे संतोषोन ।
राम विरधि केला जाण । हाक फोडून गर्जत ॥१७॥
अहंरावण निजमदेंसीं । सज्जोनि निर्वाणशस्त्रासी ।
वेगी चालिला क्रोधावेशीं । रणी रामासीं भिडावया ॥१८॥
निजाभिमानाची सामग्री । रावणे घेवोनि झडकरी ।
पतंग झेंपावे दीपावरी । तेंवी श्रीरामावरी चालिला ॥१९॥

स्वर्गात प्रचंड खळबळ व श्रीविष्णूंची प्रार्थना :

देखोनि रावणाच्या बळा । स्वर्गी सुटला खळबळा ।
आकांत सुरसिद्धा सकळा । जगतीतळा आकांत ॥२०॥
दुर्धर देखोनि रावण । स्वर्गी सुरसिद्धगण ।
मिळोनिया सकळ जन । विष्णूचें स्तवन आरंभिले ॥२१॥
धांव पाव गा आच्युता । भक्तवत्सला अनाथनाथा ।
पावावें सुरकार्यार्था । लंकानाथा निवटावया ॥२२॥
साह्य होवोनि श्रीरामासी । निवटोनियां लंकेशासी ।
संरक्षावे निजभक्तांसी । बंदिमोचनासी करवोनी ॥२३॥
राम वधीना रावण । तै बंदिमोचन करी कोण ।
कष्टताती सुरगण । त्यांचे स्थापन करावे ॥२४॥
ऐसी भाकितां करुणा । कळो सरली रघुनंदना ।
देवांचा देव रामराणा । सुखी सुरगणा करीतसे ॥२५॥
राम रणरंगधीर । सुखी करावया सुरवर ।
हाती धरोनि धनुष्यशर । वधावया दशशिर तिष्ठत ॥२६॥

आत्माराम व अहंरावण युद्ध, श्रीराम युद्धार्थ सिद्ध :

विचित्र शस्त्रे विदग्धें । रावण हाणी निजमदें ।
राम छेदील निमेषार्धे । श्रोते आनंदें परिसोत ॥२७॥
आत्माराम अहंरावण । दोघांचें युद्ध अति दारुण ।
अंतरक्रियेचें विंदान । सावधान परिसावे ॥२८॥
महामायेचे करोनि लाघव । बंदी घातले इंद्रादिदेव ।
सेवा घेतसे अपूर्व । नित्य विषय भरडणें ॥२९॥
सेविलेंचि पुनःपुनःजाण । अहर्निशी विषयसेवन ।
दळिलेंचि पिष्टपेषण । निजबळे जाण करवित ॥३०॥
काल भोगिलें ज्या विषयासी । सवेंचि आज आणावी त्यासी ।
उसंत नाही अहर्निशी । उबग चित्तासीं उपजेना ॥३१॥
दशेंद्रियें अलोलिक । तेंचि रावणाचे दशमुख ।
केव्हांही न पवे तृप्तिसुख । जरी त्रैलोक्य चघळिलें ॥३२॥
विचित्र वानसेचें जुंबाड । तेचि अनावर बाहुदंड ।
कवळितां सगळें ब्रह्मांड । न पुरे कोड दशमुखा ॥३३॥
उघडी ममतेची दांताळी । चाटीत लोभाची अवाळीं ।
विकल्पाचे चाकळे चघळी । सदा काळी समसमित ॥३४॥
ओढोनि कामाचा मेढा । संकल्पबाण धडपुढा ।
विंधावया रावण गाढा । श्रीरामापुढां चालिला ॥३५॥
निजहितीं कळवळा पूर्ण । ज्यांसीं अत्यंत असेल जाण ।
त्यांही सर्वांगाचे कान । करुनि श्रवण करावे ॥३६॥
श्रीरामरावणांचें रण । वदावया मज कैंचे वदन ।
अंग पंगु मुके दीन । अर्थज्ञान मज कैंचें ॥३७॥
ऐसिया मज अनाथासी । जनार्दने निजावेशीं ।
आज्ञापिले अति प्रीतीसी निजगुणासी गावया ॥३८॥

मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिम् ।
यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् ॥१॥

त्या अतुलनीय युद्धाचे वर्णन :

भगवंताची कृपा घडे । तै पांगुळही पर्वत चढे ।
मुकियासी वाचा जोडे । बाले होडें बृहस्पतीसी ॥३९॥
उपनिषदांचा मथितार्थ । त्याच्या जिव्हाग्रीं नित्य नाचत ।
वेद वोसंगा रिघत । सावचित्त वाचेसीं ॥४०॥
राजांक लागे जियेसीं । राजपदीं चढे ते दासी ।
राजवर्गी मानिती तिसी । समर्थाची ऐसी निजकृपा ॥४१॥
जनार्दने तैसे केले । रंक रजपदीं बैसविलें ।
रामचरित्र बोलविलें । मधुर बोले मजकरवी ॥४२॥
मजमाजी प्रवेशोन । माझे वदनी घालोनि वदन ।
वक्ता एक जनार्दन । रसाळ रामायण वदवीत ॥४३॥
माझे जे का मीपण । साचार एका जनार्दन ।
तेणे निजसामर्थ्येकरोन । निजनिरुपण चालत ॥४४॥
चतुराची कळा ऐसी । केवळ कोरड्या काष्ठासी ।
जवळी घेवोनि प्रीतींसीं । युक्तिविशेषीं कमावित ॥४५॥
तंति लावोनि अद्‍भुत । रागोद्धार करी त्यांत ।
सज्जनांते रिझवित । ते कळा निश्चित कर्त्याची ॥४६॥
ऐकता चतुर्विध जन । सकळ पावती समाधान ।
हे काष्ठसामर्थ्य नव्हे जाण । कळा संपूर्ण कर्त्याची ॥४७॥
त्या यंत्राचे परी जाण । माझेनि वदने स्वये आपण ।
वक्ता एक जनार्दन । श्रीरामगुण गातसे ॥४८॥
निजवैभव प्रकाशावयासी । मजहातें लिहविलें ग्रंथासी ।
संबंध नाही मजसी । जेंवी साईखड्यासी सूत्रधार ॥४९॥
असो आता परिहारता । परिहार नावडे श्रीगुरुनाथा ।
स्वयेंचि कर्ता करविता । या बोलाचाही वक्ता श्रीगुरु ॥५०॥

अतींद्रियता :

पुढे रामरावणवृत्तांत । विषयाचा मेढा लंकानाथ ।
ओढी काढोनि उपरमत । श्रीरघुनाथ विंधावया ॥५१॥
विचित्र संकल्पाचे अनुसंधान । परिसा त्याचेंही लक्षण ।
ममताभालीं अति दारुण । बळे रावण वर्षला ॥५२॥
ते देखोनि रघुपती । बाण सोडिला शूरवृत्ती ।
तेणे ममतेची केली शांती । तेही स्थिती अवधारा ॥५३॥
जरी असावे दुजेपण । ममता त्यासी करी कंदन ।
चरचरीं रघुनंदन । ममता पूर्ण निमाली ॥५४॥
ममतेच्या निजशरीरीं । राम व्यापक बाह्यांतरीं ।
तेणेंचि जाहली बोहरी । धनुष्य करी छेदिलें ॥५५॥
दुजेपणाच्या निजनेटीं । सबळ रावणाची धनुर्वटी ।
विवेकाची आगी मोठी । धनुष्य मुष्टीचें जाळिलें ॥५६॥
भेटी होता विवेकममतेसीं । वैराग्यभडका वेगेंसीं ।
उठिला तेणे आवेशी । विषयधनुष्यासी जाळिलें ॥५७॥
निर्वाणींचें विषयधनुष्य । जळतां दुःख रावणास ।
घालोनिया श्वासोच्छवास । उद्विग्नमानस स्वये झाला ॥५८॥
विशेष धनुष्याची सामग्री । संग्रहिली होती भारी ।
त्याची सांडी झाली पुरी । निःशेष करी श्रीराम ॥५९॥
आता कायसी रथगती । म्हणोनि झाला पदाती ।
सक्रोध भाला घेवोनि हाती । स्वये रघुपती हाणों आला ॥६०॥
निजरथा मागे सांडोन । पायी धांवोनि रावण ।
लक्षोनिया रघुनंदन । हाणी दारुण धगधगित ॥६१॥
ते देखोनिया जाळ । डळमलीना रघुनंदन ।
सबाह्य शांतीचे कल्याण । क्रोधाचरण तेथे न चले ॥६२॥
आधी सहजचि रघुनाथा । सबाह्य शांतिचा परिघ होता ।
तेणे क्रोधा प्राणांतव्यथा । निजसत्ता विसरला ॥६३॥
अप्राप्तकामें क्रोध उठी । श्रीरामाते पाहता दृष्टी ।
अप्राप्तीची कायसी गोष्टी । पूर्णकाम सृष्टी राम ॥६४॥
श्रीरामाचे स्मरतां नाम । दृष्टी वोळंगती सकळ काम ।
भक्तकामकल्पद्रुम । तो क्रोधा श्रीराम केवि साधे ॥६५॥
देखता श्रीरामाची मूर्ती । अप्राप्तता निमाली निश्चिती ।
झाली क्रोधाची उपशांती । लंकापती थोंटावला ॥६६॥
तेणे आवेश दशशिरीं । मग प्रपंचकोशाभीतरीं ।
निजांगीं होती कामना सुरी । तिखट भारी आशाधार ॥६७॥
तेणे आवेश दशशिरीं जाण । रघुनंदन सोडी नैराश्याचा बाण ।
तेणे आशासुरी उठविली जाण । कामना संपूर्ण निवटिली ॥५८॥
सवेंचि रावण अत्युग्र । अविद्येचे निजशास्त्र ।
सोडिले वासनेचें वज्र । श्रीरघुवीर दंडावया ॥६९॥
श्रीराम धनुर्धारी नेटक । वज्र निवटावया देख ।
निर्वासनेचा तोमर चोख । एकाएक सोडिला ॥७०॥
राम धनुर्वाडा विचित्र । वज्‍रावरी योजिला तोमर ।
तेणे भेदोनि सत्वर । केला दशवक्त्र तटस्थ ॥७१॥
अंतर्बाह्य दोन्ही रणें । केली दारुण रावनें ।
तितुकीं निरसिली रघुनंदने । अर्धक्षणे करोनिया ॥७२॥
बाह्यारण शस्त्रास्त्रीं । कामक्रोधादिक अंतरी ।
सामर्थ्य होते दशाशिरी । रामे क्षणमात्रें उडविलें ॥७३॥
द्वेषबुद्धि रावण । करिता श्रीरामाचे ध्यान ।
अंतर क्षाळलें संपूर्ण । झाली बोळवण कामक्रोधा ॥७४॥
शुद्धांतः करणे रावण । निंदेचे मिषे जाण ।
स्तविता झाला रघुनंदन । श्रोते सावधान परिसोत ॥७५॥
लौकिक योद्धे रणाप्रती । सरल्या शस्त्रास्त्रसंपत्ती ।
तोंडबळे बडबडती । वल्गैजती इतस्ततां ॥७६॥

रावणाची प्रतिक्रिया व त्या दृष्टीने रामास आव्हान :

साधावया मोक्षश्री । रावण अवस्था भारी ।
निंदेमाजी स्तवन करी । निजगजरीं अति वोजा ॥७७॥
रावण अत्यंत विचक्षण । वरी वेदशास्त्रसंपन्न ।
करिता झाला वर्णन । रघुनंदनस्वरुप ॥७८॥
सूक्ष्मयुक्तिकुशळतेसीं । सोडोनियां वाच्यांशासी ।
अंगीकारोनि लक्ष्यांशासी । श्रीरामासी बोलत ॥७९॥
आधी त्वंपद तो रावण । ते शोधोनियां जाण ।
आता तत्पद श्रीरामाचे पूर्ण । स्वरुपवर्णन करीतसे ॥८०॥
तत्पद आत्मारामीं जाण । शुद्ध श्रीरामाचे वर्णन ।
सूक्ष्म सर्वगत सनातन । पावावया जाण गर्जत ॥८१॥
निंदेचेनि मिषे जाण । शुद्ध श्रीरामाचे वर्णन ।
सुक्ष्म सर्वगत सनातन । स्वये रावण अनुवादे ॥८२॥
रावण म्हणे श्रीरामासी । किती आता कपट करिसी ।
ठकोनि मारिले वाळीसी । तैसे मजसी चालेना ॥८३॥
आणिक किती सांगों आता । तुवा पूर्वी ठकविलें बहुता ।
कोण म्हणोनि होसी पुसता । तेंही तत्वता सांगेन ॥८४॥
तुज धरोनिया मानसी । बहुत निघाले साधावयासी ।
शेखी ठकवोनि तयांसी । दृश्य नव्हेसी सर्वथा ॥८५॥
लपोनि त्यांचा सर्वांगी । सर्वथा न दिससी जगी ।
शिणतां साधनी अनेगीं । तोंड वेगी न दाविसी ॥८६॥
कपटविद्या करोनि गाढी । तीमाजी देसी बुडी ।
वेडा लाविलीं बापुडीं । वाळोनि कर्वडीं पै केली ॥८७॥
चौघी देवोनि श्रीरामा । आपणा म्हणविसी आत्मा ।
छळून घेसी भजनधर्मा । अति दुर्गमा साधनी ॥८८॥
तुजलागीं मंत्र घेती । असंख्य पुरश्चरणें करिती ।
शेखी तेही छळिले निश्चिती । निजात्मप्राप्ती चुकविली ॥८९॥
ते मजसी न चले मत । मी जाणतसें समस्त ।
मंत्रामाजी जो मंत्रार्थ । तो तू निश्चित श्रीरामा ॥९०॥
मंत्रमंत्रामाजी अक्षर । ॐनमो ईत्यादि उच्चार ।
अक्षरीं अक्षर तू रघुवीर । हे मी साचार जाणत ॥९१॥
पाठकें छळोनियां जाण । साधनी लाविले वेदपठण ।
कोरडी वाचेची ठणठण । लावूनि पूर्ण गोंविलें ॥९२॥
करिता दशग्रंथपठण । तेथेंचि छळिले संपूर्ण ।
उदात्त अनुदान स्वरित जाण । वाद विचक्षण घालिती ॥९३॥
ऐसे ठकवोनियां तयांसी । बापुडीं वेडा लाविलीसी ।
तैसे न चले मजसी । तुझे लपणीसी जाणत ॥९४॥
वेदंमूळ तो ॐकार । तेथे तुझी लपणी थोर ।
अकार उकार मकार । त्रिमात्रा स्वर त्रिगुणातीत ॥९५॥
ऐसे पाठक ठकविले । तैसेचि पंडित नाडिले ।
बापुडियां कांही न कळे । गोंवून घातले विवादीं ॥९६॥
शास्त्रश्रवण साधन शुद्ध । त्यासही छळिले प्रसिद्ध ।
केले अभिमानाचे विरुद्ध । बहुविध बहुयुक्तीचे ॥९७॥
मजसी न चले ते विंदान । मी जाणातसें संपूर्ण ।
शास्त्रांमाजील जाणपण । लपणी जाण ते तुझी ॥९८॥
तेही घातले आडवाटा । चढला जाणपणाचा ताठा ।
तेणे न मनी पै वरिष्ठा । फुगारा मोठा गर्वाचा ॥९९॥
पंडितां न कळे हे स्थिती । शास्त्रांमाजी जे जे युक्ती ।
जाणिवा तेथे तुझी वसती । हे सांगती आणिका ॥१००॥
जेंवी गूळ‍उंसाचा घाणा । मुखींचा रस भरे भाणा ।
शब्दसोपटीं आपण जाणा । रितेपणा करकरी ॥१॥
शास्त्रांमाजी जे जे युक्ती । ते ते केवळ चैतन्यस्फूर्ती ।
तेही वंचोनि तयांप्रती । अहंमती भुलविले ॥२॥
भोळी बापुडीं याज्ञिकें । यज्ञद्वारा भरलीं एके ।
त्यांसी गोंविलें कौतुके । स्वर्गसुखे दावोनिया ॥३॥
कुंड साधिती अति व्युत्पत्ती । मेखळा परिमित साधिती ।
वेदी साधिती अति निगुतीं । मंडपप्रीतिकरोनियां ॥४॥
इध्मा बर्हि त्रिसंधान । विचित्र दर्भांचे परिस्तरण ।
त्याहीवरी पात्रासादन । युक्ती करोन मंडित ॥५॥
आणिती ओषधिसंभार । होमद्रव्य अति विचित्र ।
मेषश्येनादि परिकर । आणिती सत्वर यागासीं ॥६॥
अति युक्ति साधूनि अरणी । मंथन करिती कष्टेंकरोनी ।
तेथे प्रकटला जो अग्नी । तो कुंडीं आणोनी स्थापिती ॥७॥
तथे ॐकार वषट्कार । मंत्रघोषाचे उच्चार ।
ऋत्विज करिती अपार । स्वाहास्वधाकारविनियोगें ॥८॥
होते पोते उद्वाते । सुस्नात सावधचित्ते ।
आज्ञा पुसोनि यजमानातें । अवदानातें अर्पिती ॥९॥
न मम म्हणता यजमान । ऋत्विज सोडिती अवदान ।
तेणे बळे याज्ञिक जन । स्वर्गभुवन वांछिती ॥११०॥
पुण्यक्षयें तेथून पडती । परी नैश्वर्य न मानिती ।
ऐसी ठकलीं नेणो किती । ते मजप्रती चालेना ॥११॥

अहंयज्ञ व रावणाची गर्जना :

तेथील लपणीचें सूत्र । मी जाणतसें ।
कर्माकर्मीं सूक्ष्म सार । स्वरुपें साचार लपतोसी ॥१२॥
अग्नि आज्य समिधा समग्र । कर्माकर्मी सुक्ष्म तू साचार ।
याज्ञिकां न कळे हे सूत्र । कर्मठपणे फार व्यापिले ॥१३॥
यजमानाच्या क्रियाशक्ती । तेचि तुझी निजस्थिती ।
संन्यासीही त्याच रीती छळणोक्ती नाडिले ॥१४॥
विरजाहोम करोनि एक । जाळिले म्हणती कामादिक ।
शेखी तिळतांदूळ जाळिले देख । कामक्रोधादिक अनसूट ॥१५॥
गुरुपासोनि महावाक्य । ज्याकारणें घेतलें देख ।
ते राहिले सकळिक । पूज्यत्वें चोख भुलविले ॥१६॥
आम्ही पूज्य परमहंस । म्हणोनि भुलविले त्यांस ।
विरले महावाक्यास । पंचीकरणास विसरले ॥१७॥
सांडोनि स्वानंदस्फूर्ती । पूज्यत्वें भुलविले यती ।
तैसेंचि केले योग्यांप्रती । सांगूं किती कपटकर्म ॥१८॥
एक ते पै बापुडीं । तुज पहावया लवडसवडी ।
निघाले अति तांतडी । ते घातले कडादीं योगाचिये ॥१९॥
वारियावरी गालिसी । नाना सिद्धींसीं गोंविसी ।
ऐसा ठकवोनियां लपसी । वेडा लाविसी योगियां ॥२०॥
मग काढिता कडाडी । चढसी वैकुंठीचिया पहाडीं ।
नातरी शेषफडेबुडीं । निद्रामीषें लपतोसी ॥२१॥
तेथोनि काढिता निर्धारी । भेणे लपसी दशावतारीं ।
रुप धरिता सिंहशूकरीं । लाज निर्धारी तुज नाही ॥२२॥
साधता न साधसी बहुता । तो मज सांपडलासी आता ।
झणें होसी तू दुश्चिता । तेथोनि आता ढळो नेदीं ॥२३॥
ऐसा सिंहनादे रावण । गर्जता झाला आपण ।
तंव सारथि अति विचक्षण । तेणे विंदान साधिले ॥२४॥
राम धनुष्य तोडितां जाण । सोहं भावाचा मेढा कठिण ।
ठेविला होता आच्छादून । तो आणोन दीधला ॥२५॥
हाती पडता धनष्यबाण । निष्कपट रणांगण ।
साधावया वीर रावण । काय आपण बोलत ॥२६॥
श्रीरामे रणख्याती । करोनि सकळा दिधली मुक्ती ।
उरले जे तयांप्रती । लंकापती । लंकापति अनुवादे ॥२७॥
आजीवरी म्या केले कपट । रामे त्याचे केले सपाट ।
आता झालों मी चोखट । दशकंठ अति शुद्ध ॥२८॥
सकळ सैन्यासमवेत । युद्धी नाटोपे रघुनाथ ।
तो मी एकांगी लंकानाथ । राम निश्चित साधीन ॥२९॥
करोनि लोटांगण तुम्हांसी । विनवितो मी सकळांसी ।
जो खड्गातें हातवशी । तेणे शिव पूजेसी भेदिले ॥१३०॥
तुम्हांसी शंकराची आण । कोणी न करावे युद्धत्राण ।
साक्षी होवोनि आपण । आंगव्ण पहावी ॥३१॥
श्रीराम आणि रावण रणी । युद्धी भिडती निर्वाणबाणीं ।
जय अपजय दोन्ही । कोण कोणालागूनी पै होतो ॥३२॥
ऐसी सकळा विनवण । करिता झाला रावण ।
ते ऐकोनि रघुनंदन । स्वसैन्यालागून विनवित ॥३३॥
रावणाच्या निजमानसी । बहुत दिवसें आधी ऐसी ।
समरांगणीं श्रीरामासी । निजांगेसीं भिडावें ॥३४॥
ते रावणाचे मनोरथ । आजि फळले समस्त ।
रणी भेटलों मी रघुनाथ । तेणे बहुत हरिखेल ॥३५॥
माझ्याही हेंचि मानसी । रावणाच्या मनोरथासी ।
सिद्धि पाववीन रणभूमीसी । मुक्ति रावणासी देऊनी ॥३६॥
यालागी तुम्ही समस्त । युद्धी व्हावे निवांत ।
राम आणि लंकानाथ । कैसे रणांत भिडतील ॥३७॥
साक्षी होवोनियां तुम्ही । पहावी दोघांची रणभूमी ।
जाणोनि रिघे जो संग्रामी । आणि दुर्गमी तयासी ॥३८॥
जाणोनि निघेल युद्धासीं । अदंडें दंडीन मी त्यासी ।
ऐसे बोलता राघवासी । कांप सकळांसी पै आला ॥३९॥
वेदतुल्य तुझी आज्ञा । कोण करु शके अवज्ञा ।
लागले श्रीरामचरणा । तुझी वंद्य आज्ञा आम्हांसी ॥१४०॥
तंव रावण अति कडाडीं । गर्जोनियां हाक फोडी ।
बाण काढोनियां तांतडी । राम निर्वडी विंधूं पाहे ॥४१॥
परम प्रीति लंकानाथा । रणी श्रीरामासी भिडतां ।
कोण बाणली अवस्था । सावध श्रोतां परिसावी ॥४२॥
भेदोनिया ब्रह्मांडासी । विश्वात्मक श्रीरामासी ।
देखता रावण हर्षासीं । निजधर्मासी विसरला ॥४३॥
एका जनार्दना शरण । श्रीरामासी करिता रण ।
स्वये विसरोनि रावणण । श्रीराम आपण होईल ॥१४४॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटिकायां
रामरावणयुद्धप्रसंगो नाम एकषष्टितमोऽध्यायः ॥६१॥
ओंव्या ॥१४४॥ श्लोक ॥१॥ एवं ॥१४५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग