आवडे हे रूप गोजिरे स
3138.
आवडे हे रूप गोजिरे सगुण । पाहाता लोचन सुखावले ॥१॥
आता दृष्टीपुढे ऐसाचि तू राहे । जो मी तुज पाहे पांडुरंगा ॥धृपद॥
लांचावले मन लागलीसे गोडी । ते जीवे न सोडी ऐसे झाले ॥२॥
तुका म्हणे आम्ही मागावी लडिवाळी । पुरवावी आळी मायबापे ॥३॥
अर्थ :
हे हरी तुझे गोजिरे सगुण रुप मला फार आवडते ज्यावेळी माझ्या डोळयाने तुझे गोजिरे सगुण रुप मी पाहिले त्यावेळी माझे डोळे फार सुखावले आहेत. हे पाडूरंगा जोपर्यंत मी तुला माझ्या दृष्टीने पाहात आहे तोपर्यंत असाच माझ्या दृष्टीपुढे तू उभा रहा. देवा माझे मन तुझे गोजिरे सगुण रुप पाहाण्यासाठी लाचवले आहे. माझ्या मनाला तुझ्या गोजिऱ्या सगुण रुपाची गोडी लागली आहे आणि तेच गोजिरे सगुण रुप माझा जीव कधीही सोडणार नाही असेच झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आम्ही तुमची लाडकी लेकरे आहोत आम्ही लाडाने तुम्हाला काहीही मागावे आणि तुम्ही आमचे हट्ट पूर्ण करावेत हेच योग्य आहे.
