सांडावी हे भीड अधमाच
3137.
सांडावी हे भीड अधमाचे चाळे । मद्यपीर बरळे भलत्या छंदे ॥१॥
ऐसे तव तुम्ही नाही जी दिसत । का हे अनुचित वदलेती ॥धृपद॥
फांटा झाला त्यासी नाही वोढा वारा । बेरसाचा खरा हा तो गुण ॥२॥
तुका म्हणे नाही ज्याच्या बापा ताळ । तो देखे विटाळ संता अंगी ॥३॥
अर्थ :
ज्येष्ठ श्रेष्ठ असो अधम लोकांची कोणत्याही प्रकारची भीडभाड न ठेवणे, त्यांची कोणत्याही प्रकारची लोक मर्यादा न धरणे हे अधम लोकांचे चाळेच असतात जसा मद्यपी त्यांच्या छंदामध्ये भलतेच काहीतरी बरळत असतो अगदी त्याप्रमाणे. हे जणहो तुम्ही तर असे दिसत नाही मग असे अयोग्य तुम्ही का बोलत आहात ? वाटेल तसे बडबडणे, कोणत्याही प्रकारचे तारतम्य नसणे, जसे तोंडात येईल तसे ओरडणे हा तर गुणधर्म गाढवाचा असतो. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला स्वत:च्या बापाचाच ताळमेळ नाही त्यालाच संतांच्या अंगी विटाळ म्हणजे कोणत्याही प्रकारचे दोष दिसत असतात.
