तरलो म्हणऊनि धरिला त
3102.
तरलो म्हणऊनि धरिला ताठा । त्यासी चळ झाला फांटा ॥१॥
वायाविण तुटे दोड । मान सुख इच्छी मांड ॥धृपद॥
ग्वाहीविण मात । स्थापी आपुली स्वतंत्र ॥२॥
तुका म्हणे ऐसी किती । नरका गेली अधोगती ॥३॥
अर्थ :
माझा उध्दार झाला आहे मी तरलो गेलो आहे असा जो म्हणतो त्याला भ्रम झाला आहे असे समजावे आणि त्या भ्रमानेच तो आडमार्गाला गेला आहे असे समजावे. जसे कापसाचे कच्चे बोंड तुटून खाली पडून व्यर्थ वायालाच जाते त्याप्रमाणे हा दांभिक मनुष्य अभिमानी मनुष्य आपल्याला सुख मिळावे चार लोकांमध्ये मानसन्मान मिळावा याची इच्छा करत असतो या विचाराने तो देखील वाया जातो. वेदाने सांगितलेल्या ग्वाहीला हा प्रमाण मानत नाही आणि आपले स्वतंत्र मत हा स्थापन करत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, असे कितीतरी ताठा धरणारे अभिमान धरणारे लोक नरकाला व अधोगतीला गेलेले आहेत.
