अनुभव तो नाही तुमच्य
2880.
अनुभव तो नाही तुमच्या दर्शनी । अइकिले काने वदे वाणी ।
जेविल्याचा कैसा अनुभव अंतरी । म्हणता मांडे पुरी काय होते ॥१॥
नाही नाही गेली तळमळ दातारा । का जी हरीहरा चाळविले ॥धृपद॥
पत्री कुशळता भेटी अनादर । काय ते उत्तर येईल मानू ।
अंतरी सबाह्यी का नाही पारिखे । करूनि पारिखे वर्ततसा ॥२॥
आलो आलो ऐसी दाऊनिया आस । वाहो बुडत्यास काय द्यावे ।
तुका म्हणे अहो चतुरा शिरोमणि । किती माझी वाणी तुम्ही कोठे ॥३॥
अर्थ :
देवा मी तुमचे दर्शन प्रत्यक्ष घेतले नाही तुमचा अनुभवही घेतला नाही परंतू संतांच्या मुखाने जे कानाने ऐकले तेच मी लोकांना सांगत आहे. देवा जर जेवणच केले नाही तर त्या जेवणाच्या गोडीचा अनुभव अंतरंगात कसा येईल मांडे पुरी केवळ नुसते असे म्हटले तर काय होणार आहे ? हे दातारा तुमच्या अनुभवाची तुमच्या दर्शनाची तळमळ अजूनही माझ्या अंतकरणातून गेलेली नाही हरीहरा तुम्ही मला का फसविले आहे ? आपल्या मित्रांना किंवा आप्टेष्टांना कोणालाही पत्रामध्ये चांगली कुशलता दाखवायची आणि चांगले पत्रामध्ये बोलायचे परंतू प्रत्यक्षात भेट झाली तर त्याचा अनादर करायचा आपले असे बोलणे कोणाला मान्य होईल काय ? देवा तुम्ही अंतरंगात आणि बाह्यरंगात दोन्हीकडे सारखे का वागत नाही मला परके करुन माझ्याशी परकेपणाने का वागता ? एखादया पाण्यात बुडणाऱ्याला आलो आलो मी तुला वाचवतो तुझी मदत करतो अशी अपेक्षा दाखवायची परंतू करायचे मात्र काहीच नाही अशा वागण्याला काही अर्थ आहे काय ? तुकाराम महाराज म्हणतात, अहो चतुरांच्या शिरोमणी माझी वाणी कोठे आणि तुम्ही कोठे माझी वाणी ती केवढी आहे तरीही मी तुमच्याशी कोडकौतुक आणि बोलत आहे ?
