वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

सिकविला तैसा पढो जाण

🙏 3. संत तुकाराम · ABH-077387 · अभंग क्र. २८७९

2879.
सिकविला तैसा पढो जाणे पुसा । कैची साच दशा तैसी अंगी ।
स्वप्नींच्या सुखे नाही होत राजा । तैसा दिसे माझा अनुभव ॥१॥
कासया हा केला जिव्हे अळंकार । पायासी अंतर दिसतसे ॥धृपद॥
दर्पणींचे धन हाती ना पदरी । डोळा दिसे परी सत्याचिये ।
आस केली तरी लाळचि घोंटावी । ठकाठकी तेवी दिसतसे ॥२॥
कवित्व रसाळ वदविली वाणी । साक्ष ही पुराणी घडे ऐसी ।
तुका म्हणे गुरे राखोनि गोंवारी । माझी म्हणे परि लाभ नाही ॥३॥

अर्थ :
जसे आपण पोपटाला शिकवू त्याप्रमाणे पोपट शिकेल परंतू त्या शब्दाचा अर्थ स्वतः शिकून घेण्याची कला त्याच्या अंगात असेल काय ? स्वप्नामध्ये कोणी राजा झाला तर तो खरोखर राजा होतो काय त्याप्रमाणेच माझा परमार्थातील अनुभव देखील व्यर्थ दिसत आहे. कशासाठी मी माझ्या जीभेला कवित्वेचे अलंकार परिधान केले असेल त्यामुळे मला हरीचे चरण अंतरल्याचे दिसत आहे. दर्पणामध्ये म्हणजे आरशात दिसणारे धन हातातही येत नाही आणि पदरातही पडत नाही परंतू डोळयाने पाहिले तर ते अगदी सत्य दिसते. आरशातील धनाची अपेक्षा जर केली तर केवळ लाळच घोटीत बसावे लागते. त्याप्रमाणेच माझा परमार्थ देखील फसवाफसवीचा मला दिसत आहे. देवा पुराणामध्ये अशी साक्ष आहे की तुझी किर्ती गायिली की तुझी प्राप्ती होते त्यामुळेच तर मी माझ्या रसाळ वाणीतून तुझे कवित्व वर्णन केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, एखादा गुराखी दुसऱ्यांची गुरे राखतो आणि आपला लौकिक वाढवण्यासाठी लोकांना सांगतो की ही गुरे माझीच आहेत परंतू त्याच्या या खोटया बोलण्याने त्याला लाभ मात्र काही होत नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग