केले तरी आता साचची क
2881.
केले तरी आता साचची करावे । विचारिले द्यावे कृपादान ॥१॥
संकल्पासी नाही बोलिला विकल्प । तुम्हा पाप पुण्य कळे देवा ॥धृ॥
उदार विख्यात तुम्ही भूमंडळी । ऐसी ब्रीदावळी गर्जतसे ॥२॥
तुका म्हणे अहो रखुमाईच्या वरा । उपरोध धरा माझा आता ॥३॥
अर्थ :
हे देवा तुम्हाला खरोखरच माझे कल्याण करायचे असेल तर तुम्ही कृपा करुन ते करा आणि विचार करुन मला कृपादान दयावे. देवा कोणताही चांगला संकल्प करण्याचा ठरवला तर ते करु नये असे कोठेही सांगितले आहे काय आणि तुम्हाला पाप आणि पुण्य हे तर चांगलेच कळते. देवा सर्व भूमंडळावर तुम्ही उदार आहात अशी ब्रीदावळी गर्जत आहे व ही तुमची ब्रीदावळी सर्वत्र विख्यात आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अहो रुक्मिणीच्या वरा तुमची जगामध्ये उदार अशी किर्ती विख्यात आहे मग माझे तुम्ही कल्याण का करत नाही माझाच तुम्ही संकोच का करता ?
