गौळणी
१८ गौळणी
१३४.
गोपिका वेल्हाळा । अवघ्या मिळोनी सकळा ।
चालिल्या यमुना जळा । तंव सन्मुख देखिला सांवळा वो ॥१॥
राधा म्हणे बहु चालक होसी । नसतां आळ का आम्हांवर घेसी ।
त्यां देखिले येशोदेसी । हा लबाडा लटका ऋषीकेशी बा ॥२॥
यशोदा म्हणे कवटाळिणी । नसती खोडा करिता देखूनी ।
सांगता गार्हाणे येऊनी । गुणातीत हा चक्रपाणी वो ॥३॥
राधा म्हणे यशोदा सुंदरी । चोरटा शिंदळ तुझा मुरारी ।
आम्हा ठाऊक अंतरी । हा न करी तें करी काय सांगु वो ॥४॥
हा ब्रह्मांडनायक । येणे मोहिले तिन्ही लोक ।
सेना म्हणे यदुनायक । कर्मातीत परिपूर्ण वो ॥५॥
१३५.
दूती जाणवित स्वामिनी । काम दाटला ह्रदयभुवनीं ।
कोपा नयेची सारंगपाणी । सेजे पाहतां न दिसे नयनी ॥१॥
मज भेटवागे श्रीहरी । लागला वेध त्याचा अंतरीं ।
ध्यानीं बिंबलागे मुरारी । प्राण रिघो पाहे जरी ॥२॥
गोड न लगे काम धंदा कांहीं । नावरे चीर चोळी पाही ।
सुमनसेज रुपती बाई । चित्त वेधले हरी पायी हो ॥३॥
वृत्ति स्वानंदीं निमग्न । गेली देहभाव विसरून ।
रंगी रंगली परिपूर्ण । धन्य धन्य सेना म्हणे ॥४॥
१३६.
गाय चारी घननीळा । सवे गोपाळांचा मेळा । मोहिलें वेणुनादे सकळा ।
स्वानंदे गाई नाचती । गोपिका परमानंदे गाती । गोपाळ प्रेमे डुल्लती ॥१॥
भला भला तू श्रीहरी रे ॥ धृ. ॥ वेडे वांकुडे पांगुळे । बोबडे मुके आंधळे ।
धांवता पडे अडखळे । हरी म्हणे गोपाळांसी । तुम्ही बैसा मजपाशीं । मिळवितों गाईसी ॥ भला० २ ॥
नसो संगती ऋषीकेशी । आम्हा गाई वळी म्हणसी । आम्हा दुरी दवडीसी ।
मज ठाऊक अंतरीं । तुज ओळखी खरीच । भला०३ ॥
गाय पाळुनी दुधासी । आपण सगळेची खाशी । आम्हा धमकावुनी ठेविसी ।
काय सांगूं तुझी मात । भेद नाही तुम्हा आम्हांत । सेना म्हणे गोपीनाथ । समाधान कर्तारे । भला० ॥४॥
१३७.
पोवा घोंगडी घेऊनी पाही । संगें गोपाळ घेउनि गाई ।
वृंदावनी आले लवलाही । वेणू वाजविला सुस्वरें बाई हो ॥१॥
उतावेळ झाल्या गौळणी । वेणुनाद पडियेला कानी ।
भोवत्या पाहती अवलोकुनी । नयना न दिसे सारंगपाणी हो ॥२॥
विसरल्या कामधंदा । सासु सासर्याची नाही मर्यादा ।
कोण जाणे त्या कोण जावा नणंदा । वृत्ति वेधली परमानंदा हो ॥३॥
अवघा हरपला देहभाव । पुसिला जन्ममरणाचा ठाव ।
वृत्ति स्वानंदे मुराली पहावो । सेना म्हणे भाग्य उदया हो ॥४॥
१३८.
जाती मिळोनि पांच सात गवळणी ।
गोरस विकूं मथुरे लागोनी ।
वाटे आडवोनी । दान मागे चक्रपाणी ॥धृ.॥
सोडी सोडी मज जाऊ दे हरी ।
नको वाटा आडवूं म्हणे मुरारी ।
घरी जावा नणंदा जाचिती की भारी ॥१॥
म्हणती गवळणी हरिसि हसुनी ।
देऊं तुज लागिं नवनीत चोरुनी ।
जाऊ पाहती ठकवूनी हरीसी गवळणी ॥२॥
ब्रह्मांडाचा नायक म्हणे गोपिकांसी ।
ब्रह्मज्ञानी महान चाळविले ऋषी ।
गाई गोपाळ चोरिले नाडिले ब्रम्हयासी ॥३॥
भक्तिभावे गौळणी रिघाल्या शरण ।
वृत्तिसहित बिंबल्या अवघ्या परिपूर्ण ।
सेना म्हणे विसरल्या कार्य आठवण ॥४॥
१३९.
ऐक येश्वदे साजणी । या कृष्णाची करणी ।
दही दूध खातो चोरुनी । टाकी माजणे फोडोनी ॥धृ.॥१॥
सांभाळ आपुला हरी गे । उगा न राहे क्षणभरी गे ।
येणे धमकाविल्या पोरि गे । काय सांगों भांडखोरी गे ॥२॥
करी करणे कळेना गे । ह्रदयीं धरितो सुना गे ।
भोग भोगितो शहाणा गे । आंगी लागूं देईना गे ॥३॥
हा दिसतो भोळा गे । येऊनि घालितो डोळा गे ।
सावळा करितो गोळा गे । नाही काळ वेळा गे ॥४॥
सावळा जगजेठी गे । चित्त चोर कपटी गे ।
हा न कळे वेद श्रुती गे । येणे हरली काम वृत्ती गे ॥५॥
हे बाळक नंदाचें । भाग्य फळले गवळ्याचे ।
सेना म्हणे धन्य साचे । पुण्य त्या गोपींचें ॥६॥
१४०.
राधा जाणवित दूती । कामे व्यापिले न गमे राती ।
का बा गोवळा नये निश्चिती । यानें वेधली चित्तवृत्ती ॥धृ.॥
मज दाखवागे हरिसी । ध्यान लागले मानसी ।
त्याविण न गमे दिवसनिशीं । डोळा ऋषीकेशी दावा मज ॥१॥
मिळोनि गोपींनीं मोहिला । की सत्यभामेने दान केला ।
नारद हरिसी घेऊनि गेला । नेणो गुंतला सदैवा घरी ॥२॥
धाडिलें गरुडासी । वेगी आणावे हनुमंतासी ।
अभिमान होता सत्यभामेसी । नेउनिया सभेसी विटंबिली ॥३॥
माया लाघवी सुत्रधारी । बोलता बोल खुंटली वैखरी ।
धरिला गोपिकांनीं अंतरी । सेना म्हणे धन्य त्या नगरी हो ॥४॥
१४१.
कृष्ण आला ऐकुनि गोपिका सुंदरी । विव्हळ झाल्या पहावया हरी ।
एकी त्या धांवल्या नगरा बाहेरी । कायावाचा मनें वेधल्या नारी ॥धृ.॥
आनंदल्या गवळणी हरी आला मथुरेसी । मोहियलें मन देखोणी रूपासी ।
झाली उतावीळ पहावया ऋषीकेशी । नेत्रिचें काजळ लाविले मुखासी ॥१॥
एक ती बैसली होती पति शेजारी । नग्नचि धांवत आली बाहेरी ।
विसरुनी चीर ठेवि माथियावरी । देहभाव हरपला देखोनि मुरारी ॥२॥
एकी त्या ताटक घातले पायी । विरुद्या जोडवीं कंठाचे ठाई ।
घेऊनि पाल्होर खोविले डोई । बाळ्या वाक्या बांधिल्या कानाचे ठायी ॥३॥
एकीनें कडिये घेतला दह्याची माथण । बाळक ठेविले शिंकीया जाण ।
नाही पुत्रलोभ देखोनी कृष्ण । निजसु मनीली नाही आठवण ॥४॥
करिता मंथन हरिआला ऐकुनि कानी । तैशीच धांवली रवी दोर घेऊनी ।
नाकीचे मुक्ताफळ खोविलें वेणीं । मोतियाची जाळी घाली गुडघ्यालागुनी ॥५॥
कृष्णसखा मीनल्या अवघ्या सुंदरी । लाज भय मोह शंका दवडविल्या दुरी ।
सेना म्हणे वृत्ति झाली तदाकारी । परतुनि संसारा नुरेचि उरी ॥६॥
१४२.
सोडिल्या शिदोरी । काला करी दही भात ॥१॥
घ्यारे अवघे समस्त । हरी गोपाळांसि देत ॥२॥
कांही न ठेवा उरी । आजी देतो पोटभरी ॥३॥
सेना बैसला द्वारी । प्रसाद वाटितो श्रीहरी ॥४॥
१४३.
श्रीगुरुनिवृत्तिराय सांप्रदाय दाविला । अलंकापुरवासिनी अधिकार तया दिधला ॥१॥
आदिनाथें मूळ गुप्त होते ठेविले । निवृत्तिकृपेनें ज्ञानदेवें प्रगट केलें ॥२॥
बुडता भवसागरी जगा काढिलें बाहेरी । दावियेला तारु विठ्ठल या ती अक्षरीं ॥३॥
विटेवरी उभा नीट वैकुंठींचा राणा । दावियली खूण म्हणे न्हावीयाचा सेना ॥४॥
गाथा समाप्त
