वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 12. संत सेना न्हावी › 1. संत सेनान्हावींचा अभंग गाथा › 1. संत सेनान्हावि संपूर्ण अभंग गाथा एकूण अभंग 143 › 1. विठ्ठल महात्म्य

विठ्ठल महात्म्य

🙏 12. संत सेना न्हावी · ABH-073751 · अभंग क्र. १

१.
विठ्ठल महात्म्य

विटेवरी उभा नीट कटावरी कर । वाट पाहे निरंतर भक्ताची गे माये ॥१॥
श्रीमुकुट रत्‍नाचा ढाळ देती कुंडलांचा । तुरा खोंविला मोत्याचा तो गे माय ॥२॥
कंठी शोभे एकावळी । तोडर गर्जे भूमंडळी । भक्तजनाची माउली तो गे माये ॥३॥
सोनसळा पीतांबर । ब्रीद वागवी मनोहर । सेना वंदि निरंतर तो गे माय ॥४॥

२.
विटेवरी उभा नीट देखिलागे माये । निवाली कांती हरपला देहभाव ॥१॥
तें रूप पाहतां मन माझें वेधले । नुठेचि कांहीं केलें तेथुनि गे माये ॥२॥
अवघे अवघियाचा विसर पडियेला । पाहतां चरणाला श्रीविठोबाच्या ॥३॥
सेना म्हणे चला जाऊ पंढरीसी । जिवलग विठ्ठलासी भेटावया ॥४॥

३.
जो हा दुर्लभ योगिया जनासी । उभाचि देखिला पुंडलीकापासी ॥१॥
हारपलें दुजेपण फिटला संदेह । निमाली वासना गेला देहभाव ॥२॥
विठेवरी उभा पंढरीचा राणा । सेना म्हणे बहु आवडतो मना ॥३॥

४.
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा । आनंदें केशवा भेटतांचि ॥१॥
या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी । पाहिली शोधोनी अवघी तीर्थे ॥२॥
ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार । ऐसे वैष्णव डिंगर दावा कोठे ॥३॥
ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक । ऐसा वेणुनादीं काला दावा ॥४॥
ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर । ऐसे पाहतां निर्धार नाही कोठे ॥५॥
सेना म्हणे खूण सांगितली संतीं । यापरती विश्रांती न मिळे जीवा ॥६॥

५.
समचरण विटेवरी । पाहतां समाधान अंतरीं ॥१॥
चला जाऊ पंढरीसी । भेटुं रखुमाई वरासी ॥२॥
होती संतांचिया भेटी । सांगू सुखाचिया गोष्टी ॥३॥
जन्ममरणाची चिंता । सेना म्हणे नाही आतां ॥४॥

६.
विटेवरी उभा । जैसा लावण्याचा गाभा ॥१॥
पायी ठेउनियां माथा । अवघी वारली चिंता ॥२॥
समाधान चित्ता । डोळा श्रीमुख पाहतां ॥३॥
बहू जन्मी केला लाग । सेना देखे पांडुरंग ॥४॥

७.
जेथें वेदा न कळे पार । पुराणासी अगोचर ॥१॥
तो हा पंढरीराणा । बहु आवडतो मना ॥२॥
सहा शास्त्र शिणलीं । मन मौनचि राहिली ॥३॥
सेना म्हणे मायबाप । उभा कटी ठेउनी हात ॥४॥

८.
ब्रह्मादिक पडती पाया । जे शरण पंढरीराया ॥१॥
मोक्ष मुक्ती लोटांगणी । उभ्या तिष्ठती आंगणी ॥२॥
सूर्यसुत शरणागत । येउनी चरणी लागत ॥३॥
काया मनें वाचा । सेना शरण विठोबाचा ॥४॥

९.
मोक्ष आणि मुक्ति । हे तो तुम्हांसी आवडती ॥१॥
एका नामावांचून कांही । नसे आवडी आम्हा पाही ॥२॥
तुम्ही करावा जतन । तुमचा आहे ठेवा राखून ॥३॥
सेना म्हणे देई भेटी । कृपावंता जगजेठी ॥४॥

१०.
शरण जाऊ कोणासी । तुजविण ऋषीकेशी ॥१॥
पाहतां नाही त्रिभुवनी । दुजा तुज ऐसा कोणी ॥२॥
पाहिला शोधुनी । वेदशास्त्र पुराणीं ॥३॥
सेना म्हणे पंढरीराया । शरण सांभाळी सखया ॥४॥

११.
देहूडे ठाण सुकुमार गोजिरें । कल्पद्रुमातळीं उभा देखिलारे ॥१॥
मनी वेध लागला त्या गोपाळाचा । जो जिवलग गोपगोपिकेचा ॥२॥
जी सावळी सगुण घनानंद मूर्ति । पाहतां वेधली माझी चित्तवृत्ती ॥३॥
जो उभाचि राहिला व्यापुनी सकळ । भेटिलागीं सेना व्हावी उतावळी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग