वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 12. संत सेना न्हावी › 1. संत सेनान्हावींचा अभंग गाथा › 1. संत सेनान्हावि संपूर्ण अभंग गाथा एकूण अभंग 143 › 3. संत महात्म्य वर्णन

संत महात्म्य वर्णन

🙏 12. संत सेना न्हावी · ABH-073753 · अभंग क्र. ३

३.
संत महात्म्य वर्णन

१३.
उदार तुम्ही संत । मायबाप कृपावंत ॥१॥
केवढा केला उपकार । काय वाणू मी पामर ॥२॥
जडजीवा उद्धार केला । मार्ग सुपंथ दाविला ॥३॥
सेना म्हणे उतराई । होता न दिसे कांहीं ॥४॥

१४.
तुम्ही संत दयानिधी । तारा सांभाळा दुर्बुद्धि ॥१॥
तुम्हा आहे शरणागत । तरी तारावा पतित ॥२॥
अधिकार नाही । न कळे भक्तिभाव कांहीं ॥३॥
वागवा अभिमान । सेना आहे याती हीन ॥४॥

१५.
आजि सोनियाचा दिवस । दृष्टी देखिले संतांस ॥१॥
जीवा सुख झालें । माझें माहेर भेटलें ॥२॥
अवघा निरसला शीण । देखता संतचरण ॥३॥
आजि दिवाळी दसरा । सेना म्हणे आले घरा ॥४॥

१६.
म्हणविलो विठोबाचा दास । शरण जाईन संतांस ॥१॥
सदा सुकाळ प्रेमाचा । नासे दुष्ट मळ बुद्धीचा ॥२॥
ऐकतां हरीचें कीर्तन । अभक्त भक्ति लागे जाण ॥३॥
उभा राहे कीर्तनांत । हर्षे डुले पंढरिनाथ ॥४॥
सेना म्हणे हेंचि सुख । नाही ब्रह्मयासि देख ॥५॥

१७.
मायबाप कृपावंत । तुम्ही दयाळू संत ॥१॥
घातला भार तुमच्या माथा । आवडे तें करा आतां ॥२॥
चिंतुनि आलो पायांपाशी । न धरी वेगळें मशी ॥३॥
सेना म्हणे पायी मिठी । घातली न करा हिंपुटी ॥४॥

१८.
तेचि एक संत जाणा । आवडती नारायणा ॥१॥
पांडुरंगा वांचोनि कांहीं । न जाणे दुसरे पाही ॥२॥
मुखी नाम अमृतवाणी । धाले मनी डुल्लती ॥३॥
सेना म्हणे पायी माथां । त्यांच्या ठेवियला आता ॥४॥

१९.
संतसंगतीनें थोर लाभ झाला । मोह निरसला मायादिक ॥१॥
घातले बाहेरा काम क्रोध वैरी । बैसला अंतरीं पांडुरंगा ॥२॥
दुजियाचा वारा लागूं नेदी अंगा । ऐसे पांडुरंगा कळो आले ॥३॥
संतांनीं सरता केला सेना न्हावी । ब्रह्मादिक पाही नातुडे जो ॥४॥

२०.
उदार तुम्ही संत । मायबाप कृपावंत ॥१॥
केवढा केला उपकार । काय वाणू मी पामर ॥२॥
जड जीवा उद्धार केला । मार्ग दाखविला सुपंथ ॥३॥
सेना म्हणे उतराई । होता कांहीं दिसेना ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग