(बाळक्रीडा अभंग)
3868.
(बाळक्रीडा अभंग)
नेदी दुःख देखो दासा नारायण । ठेवी निवारून आल्या आधी ॥१॥
आधी पुढे शुद्ध करावा मारग । दासांमागे मग सुखरूप ॥२॥
पर्वतासि हात लाविला अनंते । तो जाय वरते आपेआप ॥३॥
आपल्याआपण उचलिला गिरी । गोपाळ हे करी निमित्यासि ॥४॥
निमित्य करूनि करावे कारण । करिता आपण कळो नेदी ॥५॥
दिनाचा कृपाळु पतितपावन । हे करी वचन सांच खरे ॥६॥
सांगणे हे लगे सुखदुःख दासा । तुका म्हणे ऐसा कृपावंत ॥७॥
अर्थ :
नारायणाला आपल्या दासाचे दु:ख पाहावतच नाही त्यामुळे दु:ख येण्याच्या अगोदरच ते निवारण करुन तो ठेवतो. नारायण अगोदर दासांचा पुढचा मार्ग शुध्द करतो आणि मग सुखाने दासांच्या मागे मागे रहातो. इंद्राने गोकुळवाशीयांवर क्रोधित होऊन अतिवर्षाव करुन गोकुळवाशीयांना त्रास देणे चालू केले त्यावेळी भगवंताने सर्व गोकुळवाशीयांना आपल्या बरोबर घेऊन गोवर्धन पर्वताजवळ नेले गोवर्धन पर्वताला भगवंताने नुसता हात लावला तो पर्वत आपोआप वरती जाऊ लागला. कृष्णाने तर हात लावल्याबरोबर आपोआप गोवर्धनगिरी पर्वत वरती उचलला गेला परंतु कृष्णाने गोपाळांना सांगितले की, तुम्हीही तुमचे हात लावा त्यांचे निमित्त करुन त्यांनीही गोवर्धनगिरी पर्वत उचलण्यास हातभार लावला असे भासविले. कोणतेही कार्य करत असताना भगवंत कोणाला तरी निमित्त करुन ते कार्य करतो. परंतु आपणच ते कार्य केले आहे असे भगवंत कोणालाही कळू देत नाही. देवाने गोवर्धनगिरी पर्वत उचलून दीनाचा कृपाळू पतित पावना हे त्याचे वचन त्याने खरे करुन दाखविले. तुकाराम महाराज म्हणतात, त्याच्या निजदासांना सुखदु:ख देवाला सांगावे लागत नाही त्य
