एक मागणे हृषीकेशी ।
4071.
एक मागणे हृषीकेशी । चित्त द्यावे सांगतो वचनासी ।
मज अंतर तुझ्या चरणासी । न पडे ऐसी कृपा करी ॥१॥
नको दुजी बुद्धी आणीक । रिद्धीसिद्धी परलोक ।
तू स्वामी मी सेवक । खंडणा नको करू ऐसी ॥धृपद॥
मना येईल तो जन्म देई । भलते कुळी भलते ठायी ।
ते मी साकडे घालीत नाही । हृदयींहुनी तूंवा न वजावे ॥२॥
इतुले करी भलत्या परी । भलत्या भावे तुझे द्वारी ।
राहेन दास होऊनि कामारी । वदो वैखरी नित्य नाम ॥३॥
नको विचारू दुसरे आता । शरण आलो जी पंढरीनाथा ।
तुकयाबंधु म्हणे रे अच्युता । आहेसि तू दाता दानशूर ॥४॥
अर्थ :
हे ऋषीकेशी माझे एक मागणे आहे मी तुम्हाला ते सांगतो तेवढे तुम्ही माझ्या शब्दाकडे तुमचे चित्त दयावे. तुमच्या चरणात व माझ्यात अंतर पडणार नाही असेच कृपादान तुम्ही माझ्यावर करा. यावाचून मला इहलोक परलोक याचे ऐश्वर्य रिध्दी सिध्दी यांची इच्छा उत्पन्न होईल अशी बुध्दी देऊ नकोस. तू स्वामी असावा आणि मी सेवक असावा देवा यामध्ये फक्त तू खंडन करु नकोस. देवा तुझ्या मनाला येईल त्या ठिकाणी मला तू जन्माला घाल अगदी कोणत्याही कुळात कोणत्याही ठिकाणी मला तू जन्माला घाल. देवा मला कुठेही जन्माला घालण्याबद्दल मी तुला कोणत्याही प्रकारचे साकडे घालीत नाही. परंतू माझ्या हृदयामधून तू जाऊ नयेस. देवा तू एवढेच कर की कोणत्याही प्रकारे, कोणत्याही पध्दतीने मी तुझ्या दारामध्ये काम करणारा दासाप्रमाणे होऊन राहीन आणि माझ्या वाणीने तुझे नित्य नाम वदत राहावे. तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबा म्हणतात, हे जी पंढरीनाथा तुम्ही दुसरे कोणताही विचार करु नका मी तुम्हाला शरण आलो आहे. तू मोठा दात
