ऐसा तव मोळा । तुमचा
2820.
ऐसा तव मोळा । तुमचा नसेल गोपाळा ॥१॥
मागत्याची टाळाटाळी । झिंज्या ओढोनि कपाळी ॥धृपद॥
नसेल ना नवे । ऐसे धरियेले देवे ॥२॥
तुका म्हणे झाला । उशीर तो विठ्ठला ॥३॥
अर्थ :
हे गोपाळा तुमची अशी रीत नाही ना, की तुम्हाला कोणी काही मागावयास आले तर त्याची टाळाटाळी करण्यासाठी कपाळावर केस ओढून डोके दुखण्याचे निमित्त करुन झोपून राहायचे. अशी नवी रीत तर धरली नसेल ना या देवाने ? तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुमच्याकडून कधीही उशीर झाला नाही तरी हे विठ्ठला मला भेट देण्यासाठी यावेळी तुमच्याकडून उशीर झाला आहे.
