(भुपाळ्यांवरील अभंग)
3473.
(भुपाळ्यांवरील अभंग)
का गा किविलवाणा केलो दीनांचा दीन । काय तुझी हीन शक्ती जालीसी दिसे ॥१॥
लाज येते मना तुझा म्हणविता दास । गोडी नाही रस बोलिलीया सारिखी ॥धृपद॥
लाजविली मागे संतांची ही उत्तरे । कळो येते खरे दुजे एकावरूनि ॥२॥
तुका म्हणे माझी कोणे वदविली वाणी । प्रसादावाचूनि तुमचिया विठ्ठला ॥३॥
अर्थ :
देवा तू मला असा केविलवाणा दीनापेक्षाही दीन का केले आहे मला तुझी शक्तीहीन झाल्यासारखी का दिसत आहे ? देवा स्वत:ला तुझा दास म्हणून घेताना देखील माझ्या मनाला लाज वाटते कारण तुम्ही जे शब्द बोलले आहात त्याप्रमाणे वर्तणूक करत नाहीत त्यामुळे तुमच्याशी बोलण्यातही मला आता कोणत्याही प्रकारचा रस किंवा गोडी राहिली नाही. देवा मागे संतांनी तुझ्याविषयी खूप काही सांगितले आहे तुझा पराक्रमही त्यांनी सांगितला आहे परंतू त्यांच्या त्या बोलण्याला तू लाज आणली आहेस कारण तुझा मी भक्त आहे माझी अवस्था आज तुझ्यामुळे अशी आहे आणि दुसऱ्या भक्ताचीही अवस्था अशीच असणार हे लगेच कळून येते. तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला तुमच्या कृपाप्रसादावाचून माझ्या वाणीला एवढे परखडपणे कोणी बोलाविले असेल ?
