(भुपाळ्यांवरील अभंग)
3474.
(भुपाळ्यांवरील अभंग)
जळो माझे कर्म वाया केली कटकट । झाले तैसे तंट नाही आले अनुभवा ॥१॥
आता पुढे धीर काय देऊ या मना । ऐसे नारायणा प्रेरिले ते पाहिजे ॥धृपद॥
गुणवंत केलो दोष जाणायासाठी । माझे माझे पोटी बळकट दूषण ॥२॥
तुका म्हणे अहो केशीराजा दयाळा । बरवा हा लळा पाळियेला शेवटी ॥३॥
अर्थ :
देवा माझे कर्म जळून जावो तुमच्याशी केलेली कटकट वाया गेली आहे आणि संताच्या मुखातून तुमचे जे वर्णन ऐकले त्याचा अनुभव तर मला अजून आलाच नाही. अहो नारायणा मला तुमचा कोणत्याही प्रकारचा अनुभव आतापर्यंत आला नाही त्यामुळे तुमची सेवा करण्याविषयी मनाला धीर तरी कसा देऊ तुमचा काहीतरी अनुभव माझ्या मनाला तुम्ही दिला पाहिजे आणि सेवा करण्याविषयी माझ्या मनाला तुम्ही प्रेरणा दिली पाहिजे. देवा तुम्ही मला गुणवंत केले केवळ इतरांचे दोष जाणून घेण्यासाठीच परंतू माझ्यामध्येच किती दोष आहेत हे माझे मलाच माहीत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, अहो केशीराजा तुम्ही दयाळू आहात शेवटी का होईना तुम्ही माझ्याविषयी दयाळूपणा दाखवला व माझा लळा पूर्ण केला हे फार बरे झाले.
