शिकल्या शब्दाचे उत्प
2878.
शिकल्या शब्दाचे उत्पादितो ज्ञान । दर्पणींचे धन उपर वाया ॥१॥
अनुभव कइ होईन भोगिता । साकडे ते आता हेचि आले ॥धृपद॥
गाये नाचे करी शरीराचे धर्म । बीजनाम वर्म तुमचे दान ॥२॥
तुका म्हणे केला उशीर न साहे । द्याल तरी आहे सर्व सद्धि ॥३॥
अर्थ :
दर्पणामध्ये म्हणजे आरशात वरवर दिसणारे धन हे व्यर्थ असते परंतू खरे धन बाहेरचे असते त्याप्रमाणे मी जे शब्द शिकलो ज्या शब्दाचे ज्ञान मी ग्रहण केले ते शाब्दिक ज्ञान हे व्यर्थच आहे. त्या शाब्दिक ज्ञानापेक्षा मला त्या शब्दाचा अर्थ अनुभव केव्हा प्राप्त होईल व त्याचा आनंद मी केव्हा भोगेल याचेच साकडे मला पडले आहे. देवा तुझ्या नामाच्या छंदामध्ये मी नाचतो गायन काम करतो परंतू ते तर शरीराचे धर्म आहे परंतू तुझ्या त्या नामबीजाचे जे गुह्य आहे ते मला समजावे याकरता तुझे कृपेचे दान हवे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आणि देवा ते कृपादान मला देण्यासाठी तुम्ही उशीर केला तर ते मला सहन होणार नाही कारण तुम्ही जर मनात आणले तर सर्व काही तुमच्याकडे सिध्द म्हणजे तयारच आहे.
