वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ६. युद्धकाण्ड - अध्याय ८४ › २६. नरांतकवध

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088132 · अभंग क्र. २६

26.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय सव्विसावा ॥
हनुमंत – कुंभकर्ण युद्ध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

क्रोधाविष्ट कुंभकर्णाकडून वानरसैन्याचा संहार :

रणी मारिले निशाचर । कुंभकर्णासी क्रोध फार ।
गिळावया पै वानर । अति सत्वर धांवला ॥१॥
संमुख येता कुंभकर्ण । मागा न सरती वानरगण ।
अंगदे आश्वासिलें पूर्ण । करावया रण उद्यत ॥२॥

ते निवृत्ता महामायाः श्रुत्वांगदवचस्तदा ।
नौष्ठिकीं बुद्धिमास्थाय सर्वे संग्रामकांक्षिणः ॥१॥
अथ वृक्षान्महाकायाः शृंगाणि सुमहांति च ।
वानरास्तुर्णमुत्पाट्य कुंभकर्णमभिद्रवन् ॥२॥

अंगदाचा वानरसैन्याला धीर :

देवोनि रामनामाचा धीर । अंगदे परतविलें वानर ।
करोनि वाढिवेचा गजर । धांवले समोर कुंभकर्णा ॥३॥
सांडोनि शरीराची आस । मरणावरी घालोनि कांस ।
वानरवीरां विशेष । अति उल्लास संग्रामी ॥४॥
रामनामाच्या गजरी । मरण घालून तोडरी ।
कुंभकर्णासी समरीं । युद्ध वानरी माडलें ॥५॥
कुंभकर्ण आवेशें येत । त्यासी वानरवीर समस्त ।
शिळा शिखरें पर्वत । स्वये हाणित साटोपे ॥६॥
कुंभकर्ण रागेंकरीं । वानरा करावया बोहरी ।
धरोनिया दोही करी । मुखाभीतरीं घालीत ॥७॥
वानर घालिता मुखांतरी । स्ववेंचि निघती कर्णद्वारीं ।
बैसोनियां नाकावरी । भुभुःकारीं गर्जत ॥८॥
रिघोनियां कर्णद्वारी । वानर चढले मुगुटावरी ।
एक बैसले ध्वजाग्रीं । एक छत्राग्रीं वळंघले ॥९॥
वानर गेले हातोहात । मुख राहिले हकहकित ।
चवी न लभेचि निश्चित । समसमित अवाळीं ॥१०॥
जिव्हा राहिली वणवणीत । आसावले ठेले दांत ।
कांही नाढळे मुखांत । चरफडित कुंभकर्ण ॥११॥
वानर नाढळती घांसासीं । राग आला कुंभकर्णासी ।
मारावया वानरांसी । अति आवेंशीं चालिला ॥१२॥
छेदावया वानरांचा कंद । कुंभकर्णा आला क्रोध ।
तंव पावला अंगद । रणबंधसमवेत ॥१३॥

अंगदः कुमुदो नीलो गवाक्षो गवयो हरिः ।
मैंदोऽथ द्विविदश्चैव जांबवान्विनतस्तथा ॥३॥
युगपद्व्यहनन्सर्वे कुंभकर्ण महाबलम् ।
तस्य गात्रे विनिक्षिप्ताः शिलाः शैलनिभास्तदा ॥४॥
ध्वजं रथं खरांश्चैव शूलं चैव न्यपातयन् ॥५॥

अंगद वानरसेनानींसमवेत कुंभकर्णाचा रथ व सारथी पाडतो :

कोपे येता कुंभकर्ण । अंगदादि दाही जण ।
उठावले वानरगण । कोण कोण ते ऐका ॥१४॥
अंगद कुमुद नीळ प्रख्यात । गवाक्ष गवय आणि विनत ।
मैंद द्विविद जांबवत । हरि विख्यात महावीर ॥१५॥
इहीं दहा जणीं वीरी । क्षोभे कुंभकर्णावरी ।
शिळा शिखरें पर्वत गिरी । बहु तरुवरी हाणिल्या ॥१६॥
कुंभकर्णाच्या अंगावरी । शिळा शिखरें होत चुरी ।
पिष्ट होइजे तरुवरी । महावीरी हाणिता ॥१७॥
अंगदाची प्रबळ शिळा । न भेदीच त्याच्या शळा ।
रथ सांडोनि उडाला । गजबजिला कुंभकर्ण ॥१८॥
रथ सारथी सहस्रखर । ध्वज पताका सहितछत्र ।
अवघा केला चकचूर । अंगदवीरे गर्जोनी ॥१९॥
अंगदे थोर केली ख्याती । कुंभकर्ण केला विरथी ।
तेणे गदा घेतली हाती । कोपानुवृत्तीं धांविन्नला ॥२०॥

सोऽवप्लुत्य रथाद्विरो गदामुद्यम्य सत्वरम् ।
वेगेनाभ्युत्पपाताशु पक्षवानिव पर्वतः ॥६॥
स कुम्भकर्णः संक्रुद्धः शूलमुद्यम्य वीर्यवान् ।
शतानि सप्त चाष्टौ च सहस्त्राणि च वानराः ॥७॥
प्रकीर्णाः शेरते भूमौ कुंभकर्णनिपातिताः ।
षोडशाष्टौ च दश च सहस्र वापि वानरान् ॥८॥
संपारिष्वज्य बाहुभ्यां निष्पिपेष स राक्षसः ॥९॥

कुंभकर्णाचा आवेशः

रथ सारथि होता चूर । उडोनि गेला निशाचर ।
गदाशूळेंसीं सशस्र । मारू वानर धांवला ॥२१॥
अंगदवाक्यप्रबोधनीं । वानरवीर रणांगणी ।
पाठी देणे नाही कोणी । भिडती रणी साटोपे ॥२२॥
कुंभकर्ण शूळहस्तें । एके घाये वानराते ।
सात शते आठ शते । खोंचून अमितें पाडिलीं ॥२३॥
पसरोनिया दोन्ही हात । सोळा शत अठरा शत ।
दहा सहस्र असंख्यात । कपि मारीत आवेशी ॥२४॥
वानरवीर असंख्यात । कुंभकर्णे खेंव्याआंत ।
रगडूनियां अपरिमित । रणी बहुत पाडिले ॥२५॥
वानरवीरांचियां श्रेणी । कुंभकर्णे पाडिल्या रणी ।
अशुद्ध प्रवाहे धरणी । जाली चिडाणी मेदमांसें ॥२६॥
वानरवीर पडता रणी । सुषेण वैद्यशिरोमणी ।
श्रीरामचरणरज घालोनी । वानरश्रेणी उठविल्या ॥२७॥
मांस भक्षावया तेथ । कुंभकर्ण असे पहात ।
वानर उठले समस्त । अति विस्मित तेणे जाला ॥२८॥
भक्ता साह्य श्रीरघुनाथ । मरों नेदी निजभक्त ।
रामनामे पै गर्जत । कपि समस्त उठले ॥२९॥
रणी वाढला कुंभकर्ण । त्यासी करावया रण ।
कपि पावले पांच जण । शिळापाषाणद्रुमयोद्धे ॥३०॥

ऋषभः शरभो नीलो गवाक्षो गंधमादनः ।
पंचवानरशार्दूलाः कुंभकर्णमुपाद्रवन् ॥१०॥
शैलैर्वृक्षैस्तलैः पादैर्मुष्टिमिश्च महाबलाः ।
कुंभकर्ण महाकायं सर्वतो व्यहनन्द्दढम् ॥११॥
स्पर्शनिव प्रहारांस्तान्मन्यमानो न विव्यथे ।
ऋषभं तु महावेगं बाहुभ्यां परिषस्वजे ॥१२॥
कुंभकर्णभुजाभ्यां तु पीडितो वानरोत्तमः ।
पपात ऋषभो भूम्यां मुखादागतशोणितः ॥१३॥

ऋषभ वगैरे वानरवीरांकडून वृक्षशिलादिकांनी कुंभकर्णावर प्रहार :

पांचही वीर संग्रामशीळ । ऋषभ शरभ आणि नीळ ।
गवाक्ष गवय अति प्रबळ । वीरशार्दूळ संग्रामी ॥३१॥
नीळ निजांगे आपण । घेऊन पर्वत पाषाण ।
संमुख ठोकिला कुंभकर्ण । रणी गर्जोन साटोपे ॥३२॥
लागता पर्वतांचा घात । कुंभकर्ण रुधिरोक्षित ।
तेणे रागे मुष्टिघात । नीळासीं देत निजहस्ते ॥३३॥
लागतांचि मुष्टिघात । तेणे नीळ रुधिर वमित ।
विकळ पडिला मूर्च्छित । जेंवी पर्वत वज्‍रघातें ॥३४॥
नीळ पडतांचि मूर्च्छित । श्रीरामस्मरणान्वित ।
सवेंचि होवोनि सावचित्त । आला गर्जत संग्रामा ॥३५॥
शिळा शिखरें प्रचंड शैल । तळघातें शाल ताल ।
मुष्टी हाणिती वर्मस्थळ । संग्रामकुशळ कपियोद्धे ॥३६॥
पांचही वीर एकीभूत । होवोनियां संग्रामांत ।
कुंभकर्णासी भिडत । आले गर्जत साटोपे ॥३७॥
ऐसे लागता प्रहार । कुंभकर्ण केला जर्जर ।
ते घाय मानूनि निशाछर । रणी दुर्धर खवळला ॥३८॥
ऋषभवीर आतुर्बळी । आकळोनियां करतळी ।
खेंव देवोनि रांगोळी । केला तत्काळी कुंभकर्णे ॥३९॥
अति बळे बळवंत । ऋषभवीर अति विख्यात ।
स्वये रुधिरातें वमित । रणी मूर्च्छित पाडिला ॥४०॥

मुष्टिना शणभं चापि जानुना नीलमाहवे ।
आजघान गवाक्षं च तलेनेंद्ररिपुस्तदा॥१४॥
शरैरामर्दितस्तत्र सुगंधो गंधमादनः ।
दत्तप्रहार व्यथिता मुमुहुः शोणितोक्षिताः ॥१५॥
निपेतुश्चापि मेदिन्यां निकृत्ता इव किंशुकाः ।
तेषु वानरमुख्येषु पातितेषु महात्मसु ॥१६॥
वानराणां सहस्त्राणि कुंभकर्णं प्रदुद्रुवुः ।
ते वानराः खमुत्पत्य सन्नदन्तो महाबलाः ॥१७॥
तं नखैर्दशनैश्चेव जानुभिर्मुष्टिभिस्तलैः ।
कुंम्भकर्णं महाकायं ते निजघ्नु प्लवंगमाः ॥१८॥

कुंभकर्ण ऋषभास मूर्च्छित करुन चौघा वानर वीरांचा संहार करतो :

ऋषभा पाडोनि मूर्च्छापन्न । उरले जे का चवघे जण ।
त्यांवरी धांवता कुंभकर्ण । रणी गर्जोन साटोपे ॥४१॥
शरभें हाणितला पर्वत । येरें दिधला मुष्टिघात ।
पर्वत पिष्ट करोनि तेथ । शरभ मूर्च्छित पाडिला ॥४२॥
नीळे हाणिता शिळाशिखर । रागे दिधला पांपर ।
लातां शिखर करोनि चूर । नीळ महावीर पाडिला ॥४३॥
गवाक्ष वीर अति विख्यात । कुंभकर्णाचे पाडिले दांत ।
येरें हाणोनि तळघात । रणी मूर्च्छित पाडिला ॥४४॥
गंधमादन वीर दारुण । शालतालवृक्षीं जाण ।
हाणोनियां कुंभकर्ण । रुधिरें पूर्ण न्हाणिला ॥४५॥
रागे त्रिशूळ हाणिता जाण । गगना गेला गंधमादर ।
कुंभकर्ण स्वये उडोन । धरी धांवोन साटोपे ॥४६॥
सुगंध देखोनि गंधमादन । त्याचे केले अंगमर्दन ।
ऐसे पाडिले पांची जण । केले गर्जन कुंभकर्णे ॥४७॥
पळावया वानरभार । धांविन्नला निशाचर ।
तंव ते निधडे महावीर । युद्धा सत्वर मिसळले ॥४८॥
करोनिया रामानामस्मरण । गगना उडोनि वानरगण ।
शिळा पर्वत पाषाण । शाल ताल पूर्ण हाणिती ॥४९॥
कुंभकर्ण आतुर्बळी । हाणोनियां निजशूळीं ।
शिळावृक्षपर्वतजाळी । छेदून तत्काळी सांडिले ॥५०॥
मारावया वानरकोटी । धांविन्नला उठाउठी ।
वानरवीर जगजेठी । कंठी मुकुटी झोंबले ॥५१॥
कुंभकर्णाचे आंगावरी । चालिल्या वानरांच्या हारी ।
एक चिरिती नखाग्री । एक दशनाग्रीं मारिती ॥५२॥
एक गुडघा हाणिती तळी । मुष्टिघाते आतुर्बळी ।
एक हाणिती करतळी । तनु रक्ताळी तिही केली ॥५३॥
वानर मिळोनि समस्त । निष्ठुर हाणोनिया घात ।
कुंभकर्ण रुधिराक्त । केला रणांत वानरी ॥५४॥
ऐसे वानरी करिता रण । कोपा चढला कुंभकर्ण ।
शूळ घेवोनि आपण । कपिकंदन मांडिलें ॥५५॥

बाहुभ्यां वानरान्सर्वानाकृष्य सुमहाबलः ।
भक्षयामास संक्रुद्धो गरुडः पन्नगानिव ॥१९॥
मर्दयन्वानरान्संक्रुद्धो राक्षसोत्तमः ।
मांसशोणितसंक्लेदां कुर्वन्भूमिं स राक्षसः ॥२०॥
वज्रहस्तो यथा शक्रः पाशहस्तो यथांतकः ।
शूलहस्तो बभौ युद्धे कुंभकर्णो महाबलः ॥२१॥
यथा शुष्काण्यरण्यानि ग्रीष्मे दहति पावकः ।
तथा वानरसैन्यानि कुंभकर्णो ददाह सः ॥२२॥

कुंभकर्णाकडून वानरसैन्याचा संहार :

हाणिता शूळाचा आघात । वानर उडती आकाशांत ।
कुंभकर्णे पसरोनि हात । कपि समस्त आकळिले ॥५६॥
एक रगडोन भक्षित । एक सगळेचि गिळित ।
एक शिळातळीं मर्दित । एक चघळित दांतातळीं ॥५७॥
रणी मारिता प्लवंगम । जालामांसशोणितकर्दम ।
रणभूमि अति दुर्गम । वानरा परम प्रळयांत ॥५८॥
इंद्र वज्रे करी पर्वतछेदन । पाशहस्तें यम घे प्राण ।
तेंवी शूळाघाते कुंभकर्ण । वानरा कंदन करीतसे ॥५९॥
जेंवी का शुष्कवनीं तृणें । ग्रीष्मीं जाळिजे हुताशने ।
तेंवी वानरपाळीगणें । कुंभकर्णे त्रासिलीं ॥६०॥

ततस्ते वध्यमानास्तु कुंभकर्णेन वानराः ।
राघवाभ्याशमाजग्मुर्व्ययिता नष्टचेतसः॥२३॥

दुःखित वानरसैन्य श्रीरामांकडे येते व हनुमंताचे आक्रमण :

कुंभकर्ण करिता घात । वानरा आश्रय श्रीरघुनाथ ।
त्यापासी आले समस्त । दुःखाभिभूत कपिकुळें ॥६१॥
कुंभकर्णाच्या आटाटी । श्रीरामे लक्षोनिया दृष्टी ।
वानर आले कोट्यनुकोटी । रणी संकटी त्रासूनी ॥६२॥
वानरसैन्याची महाआटी । हनुमंते देखोनिया दृष्टी ।
रागे उठला कडकडाटीं । फोडावया घाटी कुंभकर्णाची ॥६३॥
सीताशुद्धी करिता जाण । दिर्घ देखिला कुंभकर्ण ।
त्यासींच आपण करावे रण । हा संकल्प पूर्ण हनुमंती ॥६४॥
बळी वाखाणिला कुंभकर्ण । त्यासींच करोनिया रण ।
त्याची पहावया आंगवण । उल्लास पूर्ण हनुमंता ॥६५॥
आजी माझे भाग्य समर्थ । प्रसन्न जाला श्रीरघुनाथ ।
रणी सांपडला कुंभकेत । युद्धपुरुषार्थ तुकावया ॥६६॥

हनुमाशैलशृंगाणि शतशोऽथ सहस्त्रशः ।
ववर्ष कुंभकर्णस्य शरीरे वानरर्षभः ॥२४॥
तानि पर्वतशृंगाणि शूलेन परमाहवे ।
बिभेद परमायत्तः कुंभकर्णो मदोत्कटः ॥२५॥
ततो हरीणां तदनीकमुग्रं दुद्राव शूलं निशितं प्रगृह्य ।
तथौ च तस्यापततः पुरस्थान्महीधराग्रं हनुमान्प्रगृह्य ॥२६॥

हनुमंत शेपटीच्या साहाय्याने कुंभकर्णाची धांदल उडवितो :

पहिलें पुच्छाचे करोनि रण । पाहू कुंभकर्णाची आंगवण ।
नातोपे तरी आपण । देवोनि उड्डाण निर्दळूं ॥६७॥
ऐसे विचारोनि हनुमंत । पुच्छाग्रें प्रेरिदां पर्वत ।
वर्षे पर्वत शतानुशत । असंख्यात ते वेळां ॥६८॥
शतानुशत पर्वत । पुच्छ लागवेगे वर्षत ।
तेणे कुंभकर्ण साशंकित । गिरि तोडित शूळहस्ते ॥६९॥
पर्वत सहस्रें सहस्र । तोडितां श्रमला निशाचर ।
झणाणिले त्याचे कर । कपि दुर्धर पुच्छाग्रें ॥७०॥
ऐसे त्याचे पुच्छ बळी । करोनि राक्षसा रवंदळी ।
केली लंकेची पै होळी । आतुर्बळी कपिपुच्छ ॥७१॥
पुच्छाग्रबळें जाण । केले अखयाचें निर्दळण ।
इंद्रजितासी रणी गांजोन । करावया रण कपिपुच्छ ॥७२॥
कपिपुच्छ प्रतापवंत । धाक लाविला लंकेआत ।
निधडा वीर हनुमंत । ऐसे निश्चित मानले ॥७३॥
ऐसा कपिपुच्छाचा धाक । कुंभकर्णे घेतला देख ।
हनुमंत आला पै संमुख । देवोनि हाक साटोपे ॥७४॥
जैसा अचळ गिरिवर । तैसा कुंभकर्णासमोर ।
उभा ठेला हनुमान वीर । शैलशिखर झेलीत ॥७५॥
कुंभकर्ण मदोन्मत्त । सैरां धांवे शूळहस्त ।
पुढे देखोन हनुमंत । साशंकित तो जाला ॥७६॥
हाणिता पुच्छाभिघात । कुंभकर्ण चांचरी जात ।
झणाणिला शूळहस्त । शूळ गळत रणांगणी ॥७७॥
शूळ रणी गळोनि पडत । तेणे कुंभकर्ण क्रोधान्वित ।
शूळ घेवोनि धांवत । रणी हनुमंत मारावया ॥७८॥

सशूलमाविध्य तडित्प्रकाशं गिरिर्यथा प्रज्वलिताग्रशृंगम् ।
स तेन वीरोभिहतस्तानांतरे स विहृलः शोणितमुद्वमन्मुखात् ॥२७॥
रणे बभासे हनुमान्महायशा यथातपांते सजलो बलाहकः ॥२८॥

अकुंभकर्णाचा हनुमंतावर शूळप्रहरः

कुंभकर्णाची आंगवण । पहावया हनुमंत आपण ।
पुढे राहिला सावधान । मरण मारुन प्रतापी ॥७९॥
याच्या अंगी किती शक्ती । घावो हाणील कैशा रीती ।
ते पाहावया मारुती । सावधवृत्तीं राहिला ॥८०॥
मारावया हनुमंत । कुंभकर्ण शूळहस्त ।
रागे रणरंगी गर्जत । स्वये धांवत साटोपे ॥८१॥
जेंवी विजू धगधगित । तैसा शूळ सिंदूरार्चित ।
जैसा देदीप्यमान पर्वत । तैसा भासत महाशूळ ॥८२॥

शूळप्रहार करताना कुंभकर्णालाच मूर्च्छा येते :

घाव हाणिता कपींद्रा । शूळ न फुटेचि वानरा ।
भवंडी आली निशाचरा । पडे माघारा चांचरित ॥८३॥
पुढे अशुद्धातें वमित । मूर्च्छापन्न हनुमंत ।
देखोनि कुंभकर्ण धांवत । कपीचा घात करावया ॥८४॥
हनुमंत अति विंदानीं । कुंभकर्ण धरोनि चरणी ।
गर्जत उठिला तो रणी । गरगरोनि भवंडित ॥८५॥
क्षणैक भवंडी भूतळीं । क्षणैक भवंडी नभःस्थळी ।
हनुमान वीर महाबळी । चक्रानुमेंळीं भवंडिला ॥८६॥
त्यासी टाकितां समुद्रतळी । समुद्र लागेल नाभिमूळीं ।
आपटितां पै भूतळी । होईल रांगोळी पाताळा ॥८७॥
यासी टाकितां अंबरी । गिळील विमानांचिया हारी ।
त्यासी मारुं कैशापरी । विचार करी हनुमंत ॥८८॥
कुंभकर्णायेवढें धेंडे । उचलोनियां कैवाडें ।
हनुमान मानला रणसुरवाडें । वाडेंकोडे नाचत ॥८९॥
श्रीराम संतोषोनि पूर्ण । सुग्रीवासी सांगे आपण ।
हनुमंताची आंगवण । रणविंदान पाहे पा ॥९०॥

सुग्रीवाची उत्स्फुर्त उडी :

ऐकता श्रीरामवचन । सुग्रीवासी आले स्फुरण ।
स्वये करोनि उड्डाण । कुंभकर्ण हांकिला ॥९१॥
एकावरी दोघे जण । हा पुरुषार्थ नव्हे जाण ।
हनुमंते कुंभकर्ण । स्वये आपण सोडिला ॥९२॥

हनुमंताचा संताप :

जैसा होता स्वये उचलिला । तैसाच तेथे उभा केला ।
निधडा हनुमंता दादुला । उडोनि आला श्रीरामापासीं ॥९३॥
घालोनिया लोटांगण । मस्तकी वंदोनिया चरण ।
हनुमंत कोपायमान । काय आपण बोलत ॥९४॥
हनुमान म्हणे श्रीरामाते । धूरलक्षण नाही तूतें ।
काय उणें देखोनि माते । सुग्रीवाते धाडिलें ॥९५॥
नाही वीर्य धैर्य सांडिलें । नाही उणेपण मज आले ।
सुग्रीवासी कोणे बोले । त्वा धाडिलें श्रीरामा ॥९६॥
धाडोनियां युद्धसंग्रामासीं । तुवा दिधले आणिकासी ।
गार्‍हाणे सांगूं कोणापासीं । उकसाबुकसीं स्फुंदत ॥९७॥
देखोनि हनुमंताची व्यथा । कृपा आली श्रीरघुनाथा ।
आलिंगोनी एकात्मता । आश्वासिता होय त्यासी ॥९८॥
हनुमंताच्या उदरांत । डोई घालोनि रघुनाथ ।
माझे अपराध समस्त । क्षमा निश्चित करी बापा ॥९९॥
पाहे हनुमंताचे रण । म्हणता त्यासी आले स्फुरण ।
मजही न पुसतां जाण । केले उड्डाण सुग्रीवे ॥१००॥
तुझी आण हनुमंता । सुग्रीव मज न पुसता ।
रणी आला साटोपता । सत्य वार्ता हे माझी ॥१०१॥
श्रीरामाच्या मृदु वचनी । हनुमान लोळें गडबडोनी ।
त्रिसत्य सत्य तुझी वाणी । वेदपुराणीं अति वंद्य ॥२॥
हनुमान चरणी ठेवोनि माथा । म्हणे सुखी जालो श्रीरघुनाथा ।
परिहार सुचो नको आता । पुढील कथा अवधारी ॥३॥
एका जनार्दना शरण । हनुमंतकुंभकर्णरण ।
जाहलें दोहींचे निरुपण अवधारा ॥१०४॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
हनुमंतकुंभकर्ण युद्धवर्णनं नाम षड्‌विंशततितमोऽध्यायः ॥२६॥
ओव्या ॥१०४॥ श्लोक ॥२८॥ एवं ॥१३२॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग