॥ श्रीएकनाथमहाराजकृत
56.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय छप्पन्नावा ॥
लक्ष्मण व बिभीषण यांची श्रीरामांना विनंती
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
दूतांकडून अहिरावणवध ऐकून रावणाला चिंता :
दूतवचने रामचरित । अहिरावणाचा निजघात ।
ऐकोनिया लंकानाथ । तळमळित अति दुःखी ॥१॥
मंदोदरी सीतेजवळी । पाठविली अति कुशळी ।
अतियुक्तीं प्रबोधिली । कांही केले तरी वश नव्हे ॥२॥
जरी युद्ध करु समरांगणीं । तरी राम नाटोपे रणी ।
मस्तक पिटिता दशाननीं । कांही करणी चालेना ॥३॥
ऐसा झाला चिंतातुर । काय करु मी विचार ।
तंव आठवला महामंत्र । झाला शंकर प्रसन्न ॥४॥
पूर्वी रावणांसीं वरद । शिवे दिधला प्रसिद्ध ।
ते आठवलें विशुद्ध । होम अगाध मांडिला ॥५॥
करोनि शुद्ध स्नान । शंकर करावया प्रसन्न ।
मांडिलें अत्युग्र स्तवन । सावधान अवधारा ॥६॥
अद्य रामाभिभूतोऽहं स्तुत्वा विषमलोचनम् ।
सर्वलोकहरं देवं त्रिपुरघ्नं त्रिसामगम् ॥१॥
वरप्राप्तिसाठी रावणाची शिवाला प्रार्थना :
आसनी भोजनीं शयनी । श्रवणीं वदनी नयनी ।
श्रीरामे व्यापिले अनुदिनी । क्षणक्षणीं न विसंबे ॥७॥
धांव पाव गा शंकरा । त्रिपुरघ्ना त्रिनेत्रा ।
सामगायनगंभीरागिरा । गौरीहरा पाव वेगी ॥८॥
ईशाना पंचानना वीरा । वरप्रभु वरखड्गधरा ।
नरनारीआदि चराचरा । विश्वंभरा व्यापका ॥९॥
वरशूळायुधधरा । वर सकलयोगीश्वरां ।
वर सुरा असुरां । अयुधप्रवरा धारका ॥१०॥
चरचरा निजनित्या । सकळलोकशाश्वता ।
यज्ञमूर्ति यशभोक्ता । वरदात्या यज्ञांगा ॥११॥
सुराध्यक्षा गणाध्यक्षा । देवाध्यक्षा ।
योगपते योगाध्यक्षा । सर्वाध्यक्षा शूळपाणे ॥१२॥
शरणागता शरण्य । अभक्तासी करिसी दंडण ।
दक्षयज्ञविध्वंसन । स्वभक्तजनपाळका ॥१३॥
पुष्पधनुष्यभंजना । भाळनेत्र भवविनाशना ।
रुद्रविश्वजित अभिधाना । आधारस्थान विश्वाचें ॥१४॥
जय चिताभस्मोद्धूलना । जय पिनाकी वरासना ।
चंद्रचूडा विश्वभूषणा । शत्रुहनना शंकरा ॥१५॥
त्रिशूळखट्वांगधरा । नागभूषणा विचित्रा ।
वरदात्या वरेण्यवरा । वरकार्मुकधारका ॥१६॥
असता स्त्रियेसमवेत । ब्रह्मचर्य नित्यव्रत ।
परम योग हा अद्भुत । नित्य शोभत वीरासनी ॥१७॥
गंगाधर वेगसौम्य । भ्राजिष्णु अव्यय परम ।
अंधकांत उग्रकर्म। मातृमंडलमध्यग ॥१८॥
श्मशाननिलयरत । रूंडमाळा कपाळहस्त ।
अनंगांतक शत्रुप्रमथ । कालकालांतक दुरासदा ॥१९॥
नीळकंठा दुर्धर्पा । वृषभध्वजा वीरेशा ।
वृषस्कंधा वृषभाक्षा । श्रीमहेशा शाश्वता ॥२०॥
वृषपते सर्वजिजया । आनंद गिरिजाहृदया ।
कालचक्रप्रमेया । सुरवर्या सुरशा ॥२१॥
स्वामि शंकरा ऐक विनंती । सकळ कुळाची झाली शांती ।
मजही साधावया निश्र्तितीं । लागले आहेती सौमित्रराम ॥२२॥
आसनी भोजनी शयनी । गमनागमनी कर्माचरणीं ।
राम लागला अनुदिनी । क्षणक्षणीं सोडीना ॥२३॥
श्रीरामबाणाचें भय पाही । मज लागले सर्वा ठायी ।
अहर्निशी उसंत नाही । करु कायी आता मी ॥२४॥
धांव पाव गा शंकरा । निजजनकरुणाकरा ।
मी पडिलों दुःखसागरा । धांव उदार शूळपाणे ॥२५॥
रावणाला शंकराकडून वरप्राप्ती :
ऐकोनि रावणाची करुणा । कळवळला कैलासराणा ।
प्रत्यक्ष होवोनि जाणा । काय रावणा अनुवादे ॥२६॥
शिव प्रत्यक्ष व्हावया जाण । अति खडतर रामानुसंधान ।
लागलेसे बहुसाल जाण । भेटी त्रिनयना तेणे झाली ॥२७॥
आश्वासोनि दशशिर । बोलता झाला शंकर ।
पहिलें प्रसन्न होवोनि सत्वर । दिधला वर तो ऐका ॥२८॥
पूर्वी तुवा महावीरा । काढूनि सर्वांगाच्या शिरा ।
तुवा मस्तकाचा बरा । सज्जिलें यंत्रा अति युक्ती ॥२९॥
गांधर्वेण महाभाग कैलासे पर्वतोत्तमे ।
इदमाह महातेजाः शंकरो लोकपावनः ॥२॥
गंधर्वयुक्तीं सामगायन । अति मधुर तुवा जाण ।
करुन केले मज प्रसन्न । वर संपूर्ण मागावया ॥३०॥
युद्ध मांडिलिया समरांगणीं । वैरी जिणावया रणी ।
प्रार्थिलें कैलासभुवनी । विजयी त्रिभुवनी व्हावया ॥३१॥
तेणे काळे वरदान । तुझ म्या दिधले आपण ।
ते स्मरोनियां जाण । करी हवन अव्यग्र ॥३२॥
मजउद्देशे होम करिता । पावसी सकळ मनोरथा ।
झाली पाहिजे अविकळता । हेचि कठिणता मांडली ॥३३॥
सिद्धि पावलिया अविकळ । तरी कार्य साधे तत्काळ ।
रथ पावसील प्रबळ । दिव्यतुरंगांसमवेत ॥३४॥
तत्र यो दृश्यते दिव्यो रथस्तुरगसंयुतः ।
ज्वलनार्कप्रतीकाशं कवचं च महाप्रभम् ॥३॥
धनुर्माहेश्वरं चैव दिव्यं त्रिदशपूजितम् ।
मामकान्यपि चास्त्राणि ससंहाराणि सर्वशः ॥४॥
प्राप्यान्ति तव दुर्धर्षं शरं करिकरोपमम् ।
तमारुह्य रथं दीप्तं सर्वास्त्रपरिवारितम् ॥५॥
हनिष्यसि रणे शत्रून्यदि विघ्नो न ते भवेत् ॥६॥
अग्निकुंडामाझारी देख । साश्वरथ अलोलिक ।
देखसी गा तात्काळिक । ज्वलनार्कसमप्रभ ॥३५॥
अभेद्य कवच अति अपूर्व । शस्त्रास्त्रसामग्री सर्व ।
माहेश्वर चाप दिव्य । पावसी सर्व मदनग्रहें ॥३६॥
सुपूजितें माझी निजास्त्रें । संहारकारकें विचित्रें ।
पावसी तू परिकरे । शस्त्रास्त्रे दारुण ॥३७॥
त्या रथावरी बैसोनि वेगी । शस्त्रास्त्रे संयोगीं ।
युद्ध करिता रणरंगी । वैरी भंगी जातील ॥३८॥
प्रेरिलिया वैरियावरी जाये । उपसंहारिल्या हातासी ये ।
ऐसी शस्त्रास्त्रे पाहे । प्राप्त होती रथावरी ॥३९॥
होम निविघ्न सिद्धी जाय । तै सिद्ध होय कार्य ।
कांही उठलिया अपाय । घात होय कर्त्याचा ॥४०॥
ऐसे सांगोनि त्रिनयन । झाला अदृश्य आपण ।
येरें नमस्कारोनि जाण । मनी रावण संतोषला ॥४१॥
आता करोनिया याग । रथ पावेन अव्यंग ।
शस्त्रास्त्रे अनेग । सकळ सांग पावेन ॥४२॥
कोणा मनी न धरवे सर्वथा । ऐसी घोर कर्मे आचरेन आता ।
पराजय पावे रघुनाथा । तैशा अर्था साधीन ॥४३॥
एवमुक्त्वा महाबाहुः स्नात्वा जुहाव पावकम् ।
ब्राह्मणान्स्वस्तिवचनान्धनादिभिरतर्पयत् ॥७॥
मुक्त्वा शोकं च मानं मोहदर्पौ मदं तथा ।
आर्जवीं बुद्धिमास्थाय जपन्ब्रह्म सनातनम् ॥८॥
रत्कसंवीतवसनो रक्तमाल्यानुलेपनः ।
रक्तयज्ञोपवितश्च रक्तनेत्रकरस्तथा ॥९॥
रम्यं शिवालयं पुण्यं प्रविवेशाथ रावणः ।
शिवमभ्यर्च्य मंत्रैस्तु तत्र कर्म समारभत् ॥१०॥
रावणाची यज्ञासाठी तयारी :
ऐसे बोलोनि महाबाहो । विध्युक्त स्नान केले पहाहो ।
पुजोनि ब्राह्मणसमुदावो । स्वस्तिवचनलाहो पै केला ॥४४॥
देवोनि धनधान्यसंपत्ती । नाना रत्नांचिया जाती ।
विचित्र वसनें द्विजांप्रती । लंकापति अर्पित ॥४५॥
करोनिया स्वस्थांतः-करण । सांडोनिया मोह मान।
पुत्रादिशोक दारुण । तोही जाण सांडिला ॥४६॥
रावण श्रीरामाचा भक्त । रामी प्रेमा अत्यंत ।
अंतरी अनुराग अत्यद्भुत । तेणे आरक्त सबाह्य ॥४७॥
रक्तवस्त्रें परिकर । रक्तामाळा विचित्र ।
यज्ञोपवीत रक्तांबर । अत्युग्र । आवरणपूजा ॥४८॥
रक्तचंदनाची उटी परिकर । रम्य शिवालय मनोहर ।
तेथे बैसोनि दशशिर । होम एकाग्र आरंभी ॥४९॥
रक्तांबरनेत्र दारुण । करोनिया शिवार्चन ।
दृढ स्मरे शिवचरण । होमविधान आरंभी ॥५०॥
अति उग्र आवरणपूजा । यज्ञ राखावया वोजा ।
करिता झाला रावणराजा । बळसमाजा परिसा पा ॥५१॥
स्वस्थ रहावया अंतःकरण । समीप आनंदाचे आवरण ।
त्यामाजी मन घालिता जाण । विक्षेप आपण रिघो न शके ॥५२॥
सवेंचि दुसरा परिघ पूर्ण । महामोहाचा दारुण ।
समीप पावतां पारिखे जन । मोहे निमग्र स्वये होती ॥५३॥
जे आवरणीं प्रवेशतां । मार्ग भुलिजे स्वधर्मता ।
कार्याठव हरपे सर्वथा । मोहनिमग्रता स्वये होय ॥५४॥
तिसरी संकल्पाची नदी । रावणे निर्मिली मंत्रसिद्धीं ।
जिज्या संकल्पाची अवधी । स्वये विधि पावेना ॥५५॥
वैरिया रिगम कैचा तेथ । बुडती संकल्पविकल्पांत ।
गमनागमन न कळे तेथ । युद्धमात विसरती ॥५६॥
ऐसे कठिण तिसरें आवरण । चौथा झंझामारुत जाण ।
अंगी लागतांचि पूर्ण । अंगी भग्न होय प्राणी ॥५७॥
लागता तेथींचा वारा । पारख्या उडवी अंबरा ।
कोणा रिघो नेदी भीतरा । अद्भुत वारा आवरणीं ॥५८॥
पांचवे बाह्यावरण । त्याचे विपरीत चिन्ह ।
जो भेदू पाहे विदारुन । क्षुधा संपूर्ण व्यापिजे ॥५९॥
आवरणभेद धरिता पोटी । अनिवार क्षुधा उठी ।
कांही विचार न पडे दृष्टी । पडे सृष्टी मूर्च्छित ॥६०॥
यज्ञ राखावयाकारणें । अति उग्र पंचावरणें ।
पंचकोश ज्यांतें म्हणनें । रचिले रावने दुर्धर्षे ॥६१॥
हे पंचावरण जया भेदे । अहंरावण तया साधे ।
आणीक् आवरणे विविधे । परिस हग्दत सांगेन ॥६२॥
मंत्रावरण शस्त्रावरण । महाविखारांचे सर्पावरण ।
भूत प्रेत वेताळ जाण । गुप्तावरण तयांचें ॥६३॥
बाहिर परिधी राक्षसांची । शस्त्रास्त्रीं बाणले कवची ।
अहर्निशी शस्त्रे हातीचीं । कैसीं झळकती अंतरिक्षीं ॥६४॥
ऐसा अंतर्बाह्य निश्चित । राम साधावया सावचित्त ।
रावण होम असे करित । समाहित मानसें ॥६५॥
वानरसैन्यामध्ये रामनामाचा गजर व श्रीरामांना युद्धाला चलण्याची प्रार्थना :
येरीकडे दळभारी । सन्नद्धदळें कपिकेसरी ।
सन्नद्धबद्ध द्रुमकरी । रामनामगजरीं गर्जत ॥६६॥
विजयी झाला रघुराज । मारिला अहिरावण दुर्बीज ।
उभारिला लांगूलध्वज । कपिसमाज अति गजरें ॥६७॥
विजयी आमुचा कपिनाथ । मारोनियां पाताळनाथ ।
घेवोनि आला रघुनाथ । बळे अदभुत हनुमंत ॥६८॥
करोनि कामाक्षी प्रसन्न । भेदोनि पाताळभुवन ।
मारोनियां राक्षसगण । श्रीरघुनंदन आणिला ॥६९॥
विजयी श्रीरामचंद्र । विजयी आमुचा हनुमान वीर ।
विजयी सकळ वानरभार । कपि समग्र नाचती ॥७०॥
कायसा रावण महावीर । कायसे लंकादुर्ग दुस्तर ।
मारावया दशशिर । वानरभार उपरमती ॥७१॥
उठी चाल रघुनाथा । अद्यापि कायसी उदासता ।
क्षणे मारू लंकानाथा । आळस परता सांडीं स्वामी ॥७२॥
म्हणोनि घालिती लोटांगणी । लागती श्रीरामाच्या चरणी ।
रावणकपटेंकरोनी । झाली भंगाणी वानरा ॥७३॥
कपटेंकरीं वानर पडत । तुझ्या चरणरजें स्वयेंचि उठत ।
ऐसे क्षणोक्षणां घडत । तेणे बहुत दुःखरुप ॥७४॥
ऐसी गजबज करिती । अत्यंत येती काकुळती ।
युद्ध करावया रघुपती । प्रार्थिताती वानरे ॥७५॥
लक्ष्मणाचा श्रीरामांना रावणाचा वध करण्याविषयी आग्रह :
तंव उठिला सुमित्रानंदन । अत्यंत विनीत होऊन ।
प्रार्थिता झाला रघुनंदन । मधुर वचन बोलोनी ॥७६॥
ऐक स्वामी राघवा । तू रघुकुलाचा ओलावा ।
निजभक्तजनविसांवा । वचनगौरवा परिसावे ॥७७॥
भक्त पडता जन्मावर्ती । निवारिता तू रघुपती ।
तेथे कायसी युद्धख्याती । तू त्रिजगती तारक ॥७८॥
तू तारिसी नवल कोण । एकले तुझे नाम जाण ।
उच्चारिता रघुनंदन । भवबंधन निवारे ॥७९॥
एवढा तुझा नाममहिमा । तो तू जवळी असता श्रीरामा ।
अत्यंत क्लेश प्लंवगमां । ते सर्वोत्तमा चुकवावे ॥८०॥
नाम स्मरतां रघुनाथ । निवारे भवभ्रमाची मात ।
तो तू जवळी रघुनाथ । वानरा आकांत युद्धाचा ॥८१॥
एक एक गोळांगूळ । गिळू शके ब्रह्मांडगोळ ।
तेथे कायसे रावणाचे बळ । युद्ध तुंबळ करावया ॥८२॥
तथापि कपतयोद्धा रावण । नाही युद्धधर्मीं आंगवण ।
छळ छद्म करोनि जाण । वानरगण त्रासित ॥८३॥
जारण मारण स्तंभन । मोहन उच्चाटन वशीकरण ।
दुश्चित वैरी असता जाण । सिंतरुन मारावे ॥८४॥
ऐसा कपटयोद्धा दुरात्मा । संमुख येता संग्रामा ।
रावण वधावया श्रीरामा । प्लंवगमां सोडवीं ॥८५॥
दुष्टदळणीं साचार । सत्य एक श्रीरामचंद्र ।
स्वये धरिला अवतार । रावण किंकर ते किती ॥८६॥
तुझे ब्रीद पूर्वापर । करोनिया दुष्टसंहार ।
स्थापावे भक्त ऋषीश्वर । धर्म निरंतर रक्षावा ॥८७॥
सुख द्यावे जी दीजननां । प्रतिपाळावें गोब्राह्मणां ।
संरक्षावी भक्तसेना । रघुनंदना निजव्रता ॥८८॥
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥११॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥१२॥
श्रीरामांना लक्ष्मणाने प्रतिज्ञेचे स्मरण दिले
व रावणाच्या दुष्कृत्यांची हकिगत सांगितली :
तुझे निजव्रत श्रीरामा । दुष्ट प्रवर्तती अधर्मा ।
आच्छादिती स्वधर्मा । निंद्य कर्मा प्रवर्तत ॥८९॥
धर्मवाढी निःशेष मोडे । अधर्माची शीग चढे ।
सत्कर्माचा आवर्त पडे । सद्भक्ति बुडे सशेंडी ॥९०॥
ठसा पडे विपरीत । तिळतुल्य सत्कर्म आचरत ।
तेणेंच फुगारा धरित । त्रिदोषीं पडत निजकर्मे ॥९१॥
अकर्माचा फुटे फांटा । अधर्माचा चढे ताठा ।
स्वैर करिती पापचेष्टा । गर्वाचा मोठा फुगारा ॥९२॥
तापली त्रिविध तापें । वोसणती विषयजल्पें ।
अहंममतेचे निजसंकल्पें । अति अमूपें पीडती ॥९३॥
विषयरसें ओलावती । स्वयेंचि वियोगें सोकती ।
क्षणक्षणें काकुलती येती । पाणी मागती विषयांचें ॥९४॥
ते काळी वैद्यरावो । अवतरसी रामरावो ।
ब्रह्मरसमात्रा देवोनि पहा हो । रोग स्वयमेवो झाडिसी ॥९५॥
युगायुगाप्रती रामा । अवतरोनि मेघश्यामा ।
झाडा करिसी अधर्मा । पुरुषोत्तमा श्रीपते ॥९६॥
अत्यंत रोगें पीडिले देखसी । तेव्हा विधीचे डाग देसी ।
सत्कथेचें पथ्य लाविसी । अनुपान लाविसी सत्संग ॥९७॥
त्यासी दृढतेचें पथ्य । लाविसी सद्भक्तीसी नित्य ।
तेणे रोगाचें विगत । होय निश्चित क्षणे एके ॥९८॥
ऐसे तुझे निजभक्त । अहंरावणरोगग्रस्त ।
त्यांसी करावया निर्मुक्त । सज्जीकृत करी चाप ॥९९॥
देव घातले बांदवडी । सुरासुर देशधडी ।
ऋषीश्वरें भ्याली बापुडीं । देवोनि बुडी लपलीं गिरिकंदरी ॥१००॥
नवग्रहांची केली पाउटी । अग्नि धूतसे मळकटीं ।
विघ्नहर घेवोनि काठी। रासभांपाठी रावणा ॥१॥
मल्हारीदेव दावी दर्पण । मुख्य चंडिका तराळी जाण ।
कुंजें झाडी प्रभंजन । मेघ सडासंमार्जन करीतसे ॥२॥
इंद्र फुलारी वरुण बारी । यम त्याचा नाटिकारी ।
चंद्र छत्रकार दाही शिरी । दुर्दशा भारी देवांची ॥३॥
भोजन करावया रावण । पाक निपजवी हुताशन ।
किंचित आस्वाद चुकल्या जाण । करिती कंडण अग्नीसीं ॥४॥
एवढी दुर्दशा देवा । ऐकता त्रास उपजे जीवां ।
शीघ्र कुढवावे देवा । भक्ता करावा उत्सावो ॥५॥
आमची सीता माऊली । गंफेमाजी एकली ।
आक्रंदत धरोनि नेली । गूढ राखिली अशोकवनी ॥६॥
एकवस्त्रा मलिन पाही । मलिन केश नाहणें नाही ।
दीनवदन भूमिशायी । धरिली कांही चालेना ॥७॥
आला देखोनि हनुमंता । चरणावरी लोळे सीता ।
मज भेटवी रगुनाथा । शरण आता तुज आले ॥८॥
ऐकता तिचे करुणावचन । हृदयस्फोट होत जाण ।
मज द्यावे आज्ञापन । दशानन मारावया ॥९॥
दारुण शस्त्रे आम्हांपासीं । तेव्हांचि मारितो रावणासी ।
क्षणक्षणा तू निवारिसी । बळ स्वामीसीं चालेना ॥११०॥
आता तरी धरुन पुरुषार्थ । निर्दळीं हा लंकाना ।
नाही तरी होईल अनर्थ । कपटें घात करील ॥११॥
युगायुगाच्या ठायी । श्रीराम अवतरोनि लवलाही ।
दुष्ट मारोनि सर्वही । भक्त लवलाही स्थापावे ॥१२॥
ऐसी प्रतिज्ञा पूर्ण । वेदतुल्य तुझे वचन ।
तो वधोनिया रावण । भक्तसोडवण करी स्वामी ॥१३॥
मारोनियां खरदुषण । मुक्त करोनि जनस्थान ।
ब्राह्मणां दिधले दान । हर्षे ऋषिगण नांदती ॥१४॥
वाळी मारिला दारुण । मुक्त केले किष्किंधाभवन ।
सुग्रीवासी दिधले दान । सुखें वानरग्ण नांदती ॥१५॥
ताटका पापिणी आपण । मार्ग रोधितां अति दारुण ।
ते विंधोनि मारिली बाण । मुक्तगमन मार्गस्थां ॥१६॥
विश्वामित्रयागा जाण । केले राक्षसी रोधन ।
तेणे हर करोनि प्रसन्न । वरदान मागीतलें ॥१७॥
मानवी सूर्यवंशाप्रती । राम अवतरेल दाशरथी ।
तो राक्षसा करोनि शांती । याग निश्चिती राखील ॥१८॥
त्या शिववरदासाठीं । तुवा एकलेनि जगजेठी ।
मारोनि राक्षसकोटी । ऋषिइष्टी संपविली ॥१९॥
जे जे तुज शरण आले । ते ते क्षणे कुढाविले ।
तैसे साह्य पाहिजे केले । बिभीषणालागोनी ॥१२०॥
एक बिभीषण शरणागती । दुसरे शरण सुरपंक्ती ।
तिसरी माऊली सीता सती । अति काकुळती येतसे ॥२१॥
वानरभारेंसीं जुत्पती । तुज येताती काकुळ्ती।
आपणही करितो विनंती । लंकापती मारावा ॥२२॥
तुझी प्रतिज्ञा रघुपती । रावण मारावा निजहस्तीं ।
ते आपली वचनोक्तीं । साच निश्चिती करावी ॥२३॥
तुवा वाहिली असे आण । निजहस्तेंकरुनि रावण ।
स्वये मारावा आपण । ते वचन आठवीं ॥२४॥
तां प्रतिज्ञां पतिज्ञाय पुरा सत्यपराक्रमः ।
लघुः कश्चिदिवासत्वो नैव त्यत्कुं त्वमर्हसि ॥१३॥
न प्रतिज्ञां हि कुर्वन्ति वितथां सत्यवादिनः ।
लक्ष्मणं हि महत्वस्य प्रतिज्ञापरिपालनम् ॥१४॥
तदलं मास्तु ते वीर नैराश्यमुपगम्यते ।
वधेन रावणस्याद्य प्रतिज्ञामनुपालय ॥१५॥
न जीवन्यास्यते राम तव बाणपथ गमः ॥१६॥
लक्ष्मणाने सूर्यवंशामधील सत्यप्रतिज्ञ राजांची नावे व कृत्ये सांगितली :
सौमित्र म्हणे रघुनाथा । पूर्वप्रतिज्ञा आठवीं आता ।
सत्यप्रतिज्ञा शाश्वता । होई आता सन्नद्ध ॥२५॥
तुजसारिखे सत्वसंपन्न । अन्यथा न करिती प्रतिज्ञावचन ।
रावन बापुडे हीन दीन । त्यासी विलंबन कायसे ॥२६॥
तुझ्या सूर्यवंशात । सत्यप्रतिज्ञ राजे बहुत ।
तयांमध्ये संकळित । नामे सुनिश्चित सांगेन ॥२७॥
हरिश्चंद्र सूर्यवंशी । मिथ्या न करीच वचनासी ।
स्वप्रदान जागृतीसीं । देवोनि कैसी ख्याति केली ॥२८॥
निजराज्या देवोनि लात । एकाकी स्त्रीपुत्रसमवेत ।
निघता झाला त्वरित । स्वप्नवचनार्थसत्यत्वा ॥२९॥
स्वप्नदक्षिणेलागीं जाण । स्त्रीपुत्र दोघें विकून ।
डोंबाघरीं स्वये आपन । जळवाहन करीतसे ॥१३०॥
एकादशीव्रतालागीं जाण । निजपुत्राचें शिर कापून ।
मोहनीलागीं देई आपण । सत्यप्रतिज्ञ रुक्मांगद ॥३१॥
धर्मांगद त्याचा सुत । सत्यप्रतिज्ञ विख्यात ।
जनकभाकेलागीं उद्युक्त । शिर छेदवित आपुले ॥३२॥
स्वये तुवांचि रघुनाथा । सत्यत्व यावया दशरथा ।
अंगीकारिले महाव्रता । तीव्र आघाता साहोनी ॥३३॥
प्रार्थितां कौसल्या माता । उपेक्षोनि तिची कथा ।
वना निघालासी रघुनाथा । पितृवचनार्थालागूनी ॥३४॥
स्वहस्तें वसिष्ठ राज्य देता । उपेक्षोनि गुरुवचनार्था ।
स्वराज्या हाणोनि लाता । वना तत्वता आलासी ॥३५॥
अत्यंत करुणा भाकितां भरता । तुझे राज्य तुज देता ।
उपेक्षोनि त्या प्रेमार्था । वना तत्वता आलासी ॥३६॥
शिळी बुजोनि सागर । उतरोनि आणिला वानरभार ।
वेगी वधोनि दशशिर । करी राज्यधर बिभीषण ॥३७॥
तुझ्या बाणसंधानापुढें । रावण मशक बापुडे ।
सुटतां तुझे कुर्हाडे । मरे रोकडें क्षणार्धें ॥३८॥
सिंह प्रवेशतां वनी । होय मदगजां भंगाणीं ।
तेंवी रिघोनि राक्षसगणी । रावणा अवनी पाडीं रामा ॥३९॥
उदया येता दिवाकर । निशा हरपे सहित अंधार ।
त्रैलोक्य़ीं होय प्रकाशकर । स्वधर्माचार चालती ॥१४०॥
तेंवी रावणमोहनिशासुबद्ध । पडले अधार्माचें गडद ।
त्याचा छेदोनियां कंद । स्वधर्म विशद प्रकाशीं ॥४१॥
आपुल्या निजबाणकिरणेंकरीं । निरसीं रावणमोहअंधारी ।
भक्ता नित्योदय करी । स्वधर्मा करी उद्धार ॥४२॥
ऐकोनि सौमित्रवचन । पोटांतिल्या हर्षे पूर्ण ।
बोलता झाला आपण । राजा बिभीषण रामासी ॥४३॥
राजा म्हणावया हेंचि कारण । सौमित्रे प्रार्थिला रघुनंदन ।
तेंचि निवटूनियां रावण । लंके बिभीषण स्थापिला ॥४४॥
लक्ष्मणस्य तदा वाक्यं श्रुत्वा राजा बिभीषणः ।
उवाच हितमत्यंतं राघवं रघुनंदनम् ॥१७॥
एवमेतन्महाबाहो यथा वदति लक्ष्मणः ।
न प्रतिज्ञां हि कुर्वंति वितथां साधवो जनाः ॥१८॥
बिभीषणाने श्रीरामांना विनंती केली :
बिभीषणें घालोनि लिटांगण । विनविला रघुनंदन ।
जे बोलिला सुमित्रानंदन । यथार्थ वचन ते रामा ॥४५॥
जे बोलिला लक्ष्मण । श्रीरामा ते सत्यवचन ।
तुझे नाम सत्यप्रतिज्ञ । वेदवचन प्रसिद्ध ॥४६॥
श्रीराम सत्य वेदु । श्रीराम सत्य साधु ।
श्रीराम सत्य बोधु । भवबंधु जेथ नाही ॥४७॥
श्रीरामे सत्य शास्त्र । श्रीरामे सत्य मंत्र ।
श्रीरामे सत्य कर्मतंत्र । होय सर्वत्र अव्यंग ॥४८॥
श्रीरामे सत्य कीर्ती । श्रीरामे दृढ विरक्ती ।
श्रीरामे अढळ शांती । भक्त पावती भावार्थी ॥४९॥
श्रीरामे सत्य श्रुती । श्रीरामे सत्य स्मृती ।
श्रीरामे सत्य विश्रांती । भक्त पावती भावार्थी ॥१५०॥
तीर्थी व्रतीं क्षेत्रीं जाण । कामनापरत्वें देवतागण ।
त्यांच्या ठायी जे सत्यपण । ते कृपा संपूर्ण रामाची ॥५१॥
जगतीतळी जे जे सत्व । श्रीरामसत्वें ते सत्ववंत ।
ऐसा सत्यप्रतिज्ञ रघुनाथ । निजप्रतिज्ञा सत्य करी स्वामी ॥५२॥
सज्ज करोनि चापीं गुण । गुणीं प्रयोजोनि बान ।
वधीं दुरात्मा रावण । धर्मरोधन करीतसे ॥५३॥
विध्वंसय शरैस्तीक्ष्णैर्दिवा च यदि वर्तते ।
प्रतिज्ञां रघुशार्दुल सफलां कुरु मानद ॥१९॥
अति तिखट बाणधारी । रावणाचे देह विदारी ।
जेंवी मदगजातें चिरी । क्रोधेंकरी पंचानन ॥५४॥
इंद्र वृत्रातें विदारीं । मुरुलागी सुरारी ।
तेंवी रावणातें विदारीं । क्रोधेंकरीं श्रीरामा ॥५५॥
मधूलागीं मधुसूदन । हिरण्यकशिपूतें सिंहवदन ।
तैसा वधीं दशानन । क्रोधेंकरुन श्रीरामा ॥५६॥
येच समयी आजिंचे दिवसीं । वेगी धनुष्यातें हातवशीं ।
मारोनियां रावणासी । करी सकळांसीं उत्सावो ॥५७॥
ऐकोनि शरणागतवचन । आणि बंधूची विनवण ।
बोलता झाला रघुनंदन । निजजनकृपाळु ॥५८॥
एका जनार्दना शरण । सौमित्रा बिभीषणा जाण ।
देवोनियां समाधान । यागविध्वंसन करील ॥५९॥
राम शरणागता वत्सळु । राम निजजनस्नेहाळु ।
आर्तत्राणप्रतिपाळु । रणकल्लोळु श्रीराम ॥१६०॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
सौमित्रबिभीषणविज्ञापनं नाम षट्पंचाशत्तमोऽध्यायः ॥५६॥
ओंव्या ॥१६०॥ श्लोक ॥१९॥ एवं ॥१७९॥
