वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ६. युद्धकाण्ड - अध्याय ८४ › २३. रावणाचा शोक

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088131 · अभंग क्र. २३

23.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय तेविसावा ॥
रावण – मंदोदरी संवाद

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

कुंभकर्णाची गर्जना युद्धाला जाण्याची सिद्धता :

सन्नद्ध बद्ध सायुध पूर्ण । युद्धा निघतां कुंभकर्ण ।
काय बोलिला गर्जोन । एकला मारीन अवघ्याते ॥१॥
रामलक्ष्मणां करीन घात । वानर भक्षीन समस्त ।
अंगद सुग्रीव हनुमंत । फळशाखार्थ गिळीन ॥२॥
ऐकोनि कुंभकर्णगर्जन । रावणा आले अति स्फुरण ।
नगरी त्राहटिलें निशाण । युद्धा आपण निघावया ॥३॥

कुंभकर्णवचः श्रुत्वा रावणो लोकरावणः ।
गंतुमैच्छतिक्रोधः सर्वसैन्येत संवृतः ॥१॥
संग्राममभिकांक्षंतं रावण श्रुत्य भामिनी ।
तत्रोत्थाय ततो देवी नाम्ना मंदोदरी तथा ॥२॥
माल्यवंतं करे गृह्य यूपाक्षसहिता तथा ।
मंत्रिभिर्मंत्रतत्वज्ञैस्तथान्यैर्मंत्रिसत्तमैः ॥३॥
छत्रेणाध्रियमाणेन अतिकायपुरःसरा ।
चामरैर्वीज्यमानैश्च वीज्यमाना स्वलंकृता ॥४॥
सेवार्थं मार्गविपुलं ध्वजमाल्योपशोभितम् ।
उत्सारणं प्रकुर्वद्‌भिर्वेत्रझर्झरपाणिभिः ॥५॥

रावण युद्धावर जाणार हे ऐकून मंदोदरीचे आगमन :

रणी त्राहाटूनि निशाण । युद्धा निघतो दशानन ।
मंदोदरीने ऐकोन । आली आपण अति शिघ्र ॥४॥
सालंकृत मनोहर । मस्तकी शोभे शशांकच्छत्र ।
ढळताहे युग्मचामर । चाले सुंदर गडगर्जे ॥५॥
माल्यवंत आणि यूपाक्ष । आणिक मंत्री मंत्रदक्ष ।
विवेकवंत जाणिजे मुख्य । ते ते सकळिक सांगावे ॥६॥
सवे सखियांचा समाज । मार्गशोभा पुष्पध्वज ।
राजपत्‍नीची गमनवोज । दावीत सहज स्वये चाले ॥७॥
मार्ग संकुळितां निवार । करावया वेत्रपाणी वीर ।
वेत्रनादांचा झणत्कार । तेणे समग्र दूर पळती ॥८॥
अतिकाय जो रावणपुत्र । तेणे येवानि धरिले छत्र ।
देवांतक नरांतक कुंमर । युग्माचामर ढाळिती ॥९॥
जे सतीत्वाचें निजभूषण । जे रावणराजाचें मंडण ।
ते मंदोदरी आपण । सभास्थान पावली ॥१०॥

प्रविवेश सभां दिव्यां प्रभया द्योतमानया ।
प्राप्तां देवीं ततो राजा प्रियां मंदोदरीं तदा ॥६॥
दृष्ट्वा ससंभ्रमस्तूर्णं परिष्वज्य दशाननः ।
किमागमनकृत्यं ते देवि शिघ्रं तदुच्यताम् ॥७॥
तूर्णं मम समीपन्तु किमर्थं त्वमिहागता ।
मन्त्रिभिः सहिता किंतु ब्रूहि साध्वि यथातथम् ॥८॥

रावण मंदोदरीला येण्याचे कारण विचारितो :

मंदोदरी शोभायमान । प्रवेशली सभास्थान ।
तिसी देखोनि दशानन । दे अलिंगन अति प्रीती ॥११॥
रत्‍नपर्यंकीं आपणापासीं । बैसवोनि निजप्रियेसी ।
कोण कार्या तू आलीसी । ते मजपासीं शीघ्र सांगे ॥१२॥
प्रधानांसहित सुपुत्र । येथे आलीस अति सत्वर ।
यथातथ्य जो विचार । तो सांग समग्र मजपासीं ॥१३॥
कोण कार्योद्देशासाठी । तू आलीस माझिया भेटी ।
ते सांगावी गुह्य गोष्टीं । प्रीती मोठी मज तुझी ॥१४॥

एवमुक्ता तु राजानं प्रिया वचनमब्रवीत् ।
विश्वस्य शृणु राजेंद्र याचे त्वाहं कृतांजलिः ॥९॥
श्रुता मे नगरी रुद्धा श्रुता मे राक्षसा हताः ।
धूम्राक्षसहिता वीराः प्रहस्तेन सहैव तु ॥१०॥
भवान्वै युद्धकामश्च निर्गंतुं कृतनिश्चयः ।
इति संचिंत्य राजेंद्र ममागमनकारणम् ॥११॥

रावणाला मंदोदरीची विनंती :

सत्य सांग वा सुंदरी । आलीस कोण कार्यावरी ।
रावणे पुसतां अत्यादरीं । स्वये मंदोदरी अनुवादे ॥१५॥
कर जोडून तुम्हांप्रती । बहुता दिवसां करितें विनंती ।
अवधारोनियां भूपती माझी वचनोक्ती करावी ॥१६॥
स्त्रियेचें वचन केवळ ममता । तैसे नव्हे गा लंकानाथा ।
जे उपयोगी अर्थस्वार्था । जे परमार्था पावेन ॥१७॥
समुद्री तारोनि पाषाण । लंकेसी आले राम लक्ष्मण ।
वानरी रोधिलें लंकाभवन । हे अपूर्व देखोन मी आले ॥१८॥
वानरी व्याप्त लंकाभवन । रणी मारिले राक्षस गहन ।
धूम्राक्ष आणि अकंपन । मुख्य प्रधान प्रहस्त ॥१९॥
त्यांचे संगतीं थोर थोर । रणी पडले निशाचर ।
एकही न मरेचि वानर । युद्ध दुर्धर करितांही ॥२०॥
प्रहस्तादि वीर दारुण । कडकडाटे करिता रण ।
नाही उठले राम लक्ष्मण । वानरी भिडोन मारिले ॥२१॥
प्रहस्त एवढा वीर गहन । नीळे मारिला न लागता क्षण ।
येरा राक्षसांसी जाण । केले कंदन वानरी ॥२२॥
राक्षसा करावाया घात । मूळीं लागला हनुमंत ।
जो जो येतो युद्धाआंत । त्याचा निःपात करीतसे ॥२३॥
ऐसे जाणोनि संपूर्ण । श्रीरामासी करावया रण ।
केंवी निघता आपण । मुख्यत्वें प्राण द्यावया ॥२४॥
काल श्रीरामे रणांगणी । सोडिलासी जीवदानी ।
ते नाठवे तुझ्या मनी । पुढे मरावया रणी धावसीं ॥२५॥

न त्वं युक्तं प्रमुखतः स्थातुं तस्य महात्मनः ।
राघवस्य सौ‍मित्रेर्यस्य नास्ति समो युधि ॥१२॥
न च मानुषमात्रोऽस्ति रामो दशरथात्मजः ।
एकेन येन वै पूर्वं बहवो राक्षसा हताः ॥१३॥

मंदोदरीचे श्रीरामांच्या पराक्रमाविषयी विवेचन :

श्रीरामासी संमुख । राहू न शके दशमुख ।
रामप्रताप अलोलिक । राक्षसांतक श्रीराम ॥२६॥
ताटिका मारिली बाळपणी । मारीच उडविला बाण पिसारेनीं ।
सुबाहु मारिला यज्ञस्थानीं । राक्षसश्रेणीं समवेत ॥२७॥
रामे हरचाप भंगून । सभेमाजी दशानन ।
यथेष्ट पावला अपमान । श्रीरामेंसी रण तुम्हा न टिके ॥२८॥
येच सीतेच्या अभिलाषमेळीं । विराध मारिला आतुर्बळी ।
एक बाणे केली होळी । वनसमेळीं श्रीरामे ॥२९॥
शूर्पणखा करिता छळण । तिचे घेतले नाक कान ।
तिच्या कैवारालागी जाण । केले कंदन राक्षसा ॥३०॥
एकला पदाति श्रीरामचंद्र । मारिले त्रिशिरा दूषण खर ।
चवदा सहस्र निशाचर । रामे समग्र मारिले ॥३१॥
मारीच लागला मृगसमेळीं । कबंध छेदिला बाहुमेळी ।
बाणे एके छेदिला वाळी । जो आतुर्बळी तिही लोकी ॥३२॥
तुम्ही उद्विग्न वाळिभेण । त्याचा श्रीरामे घेतला प्राण ।
त्या श्रीरामासी करावया रण । आंगवण तुम्हा कैची ॥३३॥
समुद्री तारोनि पाषाण । लंके आणिले वानरगण ।
श्रीराम मनुष्य नव्हे जाण । अवतार पूर्ण परब्रह्म ॥३४॥
सीता देवोनि त्रिशुद्धी । रामासीं करावा संधी ।
श्रीरामेंसी रणसमृद्धी । विजयसिद्धी तुम्हा नाही ॥३५॥

प्रहस्तेन कृतं किंचिद्युभ्यता राक्षसे बले ।
धूम्राक्षेण च राजेंद्र नित्यं समरगाहिना ॥१४॥
महाकायेन च तथा महामायेन राक्षस ।
अकंपनेन वीरेण युध्यता राक्षसेश्वर ॥१५॥
तथा तैर्युध्यमोनश्च कि कृतं वानरे बले ।
न हतो यूथपः कश्चिद्वलादद्वेषेण रावण ॥१६॥
येषां नास्ति समो वीर्ये ते हता वानरैर्युधि ।
न चापि वानराः शक्या हंतुं पादपयोधिनः ॥१७॥

रावणबळेंसी समान । नावनिगें वीरसैन्य ।
युद्धा जावोनि प्रहस्त प्रधान । काय आंगवण तेणे केली ॥३६॥
रणी एकही वानरगण । प्रहस्ते न मारितांचि जाण ।
वानारीं त्याचा घेतला प्राण । सैन्य संपूर्ण मारुनी ॥३७॥
प्रहस्ताची ऐसी गती । धूम्राक्ष रणगर्वार्थी ।
नित्य कुंथे रणोन्मत्तीं । तोही कपिहस्तीं निमाला ॥३८॥
महाकाय महामाये । रणप्रवीण उभवोनि वाहे ।
लागता वानरघाये । आक्रंदे पाहे निमाले ॥३९॥
ज्याचेनि बळे दशानन । कळिकाळा न गणी आपण ।
वीर दुर्धर अकंपन । रिपुभंजन रणमर्दी ॥४०॥
तोही वानरी युद्ध करिता । मारिला पाणी न मागतां ।
विजय घेवोनि लंकानाथा । कोणी मागुता न येचि ॥४१॥
हे तंव वीर अति दारुण । युद्ध करिता अतिसत्राण ।
नुठतां राम लक्ष्मण । वानरींच जाण मारिले ॥४२॥
वानरी मारिले वीर सप्राण । अवघे राक्षस करिता रण ।
एकही न मरेचि वानरगण । राम लक्ष्मण वानरा ॥४३॥
रणी राक्षस निःशेष मरती । एकही न मरे कपिपती ।
श्रीराम पूर्ण अवतारमूर्ती । वानरार्थी रक्षिता ॥४४॥

रक्ष्यमाणास्तु रामेण सुग्रीवेण च पालिताः ।
तत्र ते रोचतां संधिः सह रामेण रावण॥१८॥
तस्य देवर्षयः सर्वे गन्धर्वाश्च जयैषिणः ।
विरोधं मा गमस्तेन संधिस्ते तेन रोचताम् ॥१९॥
रामभार्या सती ह्येषा रामाय प्रतिदयिताम् ।
बिभीषणेन चैवोक्तं पूर्वमेव महात्मना ॥२०॥
गतस्तत्रैव रामश्च तद्वचोयं करिष्यति ॥२१॥

वानरांसी करावया सळ । राक्षसांमाजी नाही बळ ।
कपि मारिती राक्षसदळ । संग्रामी प्रबळ भिडोनी ॥४५॥
रणी निमतां निशाचर । एकही न मरेचि वानर ।
कपिरक्षिता रामचंद्र । पूर्ण अवतार परब्रह्म ॥४६॥
सुग्रीव पाळी वानरभार । सुग्रीव पाळी श्रीरामचंद्र ।
श्रीरामबळे वानर । अजरामर निजविजयी ॥४७॥
ज्याचेनि विजयी वानर । त्यासी करावे नित्य मित्र ।
सखा करावा श्रीरामचंद्र । सीता सुंदर अर्पूनी ॥४८॥
तेथे आहे बिभीषण । तो संधि करील संपूर्ण ।
सीता देवोनि आपण । रिघावे शरण श्रीरामा ॥४९॥
श्रीरामा रिघाल्या शरण । सकळ कुळासी कल्याण ।
तुमचे चुकले मरण । कुंभकर्ण वांचेल ॥५०॥

तस्यास्तु वचनं श्रुत्वा प्रियाया राक्षसेश्वरः ।
उष्णं दीर्घ च निःश्वस्य च निरीक्ष्य समासदान् ॥२२॥
त्वया हि हितकांक्षिण्या वचो यद्वहुभाषितम् ।
न तन्मनसि मे देवि यत्प्रयोक्तं वै प्रियं प्रिये ॥२३॥
देवज्चित्वा रणे पूर्वं ससुरासुरमानवान ।
प्रणमे मानुषं कस्माद्वानरान्यःसमाश्रितः ॥२४॥
हस्ते मन्दोदरीं गृह्य वाचमेतदुवाचह ।
न तु संधिं करिष्यामि राघवेण सहैव ॥२५॥
वैदेहीं नार्पयिष्यामि नकरिष्यामि न संनतिम् ॥२६॥

मंदोदरीला रावणाचे निर्वाणीचे उत्तर :

ऐकोनि मंदोदरीचे वचन । रावणासी पडिले मौन ।
उगाचि राहिला आपण । अति उद्विग्न अनुतापी ॥५१॥
जिंतले सुरासुर दानव । पादाक्रांत केले विश्व ।
राम जाणे रणलाघव । तरी राघव वंदींना ॥५२॥
निधडा नव्हे श्रीरघुनाथ । केवळ वानरांचा आश्राइत ।
त्यासी मी वंदी लंकानाथ । तरी जगांत जघन्य ॥५३॥
रणी जातांही माझा प्राण । सीता देवोनि आपण ।
श्रीरामासी न रिघे शरण । सत्य भाषण हे माझे ॥५४॥
मंदोदरी धरोनि हाती । रावणे नेली एकांती ।
जीवींची जे निजगृह्योक्ती । स्वये तीप्रति सांगत ॥५५॥
शरण रिघा म्हणे बिभीषण । तैसेंचि सांगत कुंभकर्ण ।
आणीकही बहुसाल जन । रिघावे शरण तू म्हणसी ॥५६॥
मी का नायके आपण । तेही अर्थीचें कारण ।
ते तू ऐक सावधान । माझे ज्ञान हृदयस्थ ॥५७॥
म्या अभिलाषिली सीता सती । अन्यत्र मरण नरकप्राप्ती ।
श्रीरामहस्तें अंतगती । सायुज्यमुक्ति सहजचि ॥५८॥
लागोनि श्रीरामाचा बाण । रणी माझा गेलिया प्राण ।
तेव्हांच मी ब्रह्म पूर्ण । जन्म मरण मग कैचें ॥५९॥
पंचवटी रामासंमुख जाता । मीच पावतों सहुज्यता ।
सकळकुळउद्धारणार्था । आणिली सीता चोरोनी ॥६०॥
अंती राम राम स्मरता । रंक पावे सायुज्यता ।
श्रीरामहस्तें स्वये मरत । ब्रह्मपूर्णता पावेन ॥६१॥
लागोनि श्रीरामाचा बाण । जों माझा जाय प्राण ।
तो सीता न सोडी आपण । सत्य भाषण हे माझे ॥६२॥
लागता श्रीरामाचा बाण । माझ्या जन्ममरणासी ये मरण ।
मी होईन ब्रह्म परिपूर्ण । हे मज ज्ञान नारदोक्तें ॥६३॥
यालागी श्रीरामा न रिघे शरण । न वंदी श्रीरामाचे चरण ।
यालागी संदेह न मानी जाण । नारदवचनविश्वासें ॥६४॥
जरीं तू पतिव्रिता लाठी । तरी हे माझी गुह्य गोष्टीं ।
कोठे न वदावी वाक्पुटी । राखावी पोटी अति गृह्य ॥६५॥
एका जनार्दना शरण । मंदोदरी सुखसंपन्न ।
वंदोनि रावणाचे चरण । निघे आपण निजधामा ॥६६॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
रावणमंदोदरीसंवादो नाम त्रयोविंशतितमोऽध्यायः ॥२३॥
ओव्या ॥६६॥ श्लोक ॥२६॥ एवं ॥९२॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग