आता काशासाठी दुरी ।
2651.
आता काशासाठी दुरी । अंतर उरी राखिली ॥१॥
करी लवकरी मुळा । लहान तळा मुळींचिया ॥धृपद॥
दोही ठायी उद्वेगवाणे । दरुषणे निश्चिंती ॥२॥
तुका म्हणे वेग व्हावा । ऐसी जीवा उत्कंठा ॥३॥
अर्थ :
देवा तुम्ही तुमच्यात व आमच्यात अजूनही का भेद ठेवला आहे, का बरे आम्हाला तुमच्यापासून दूर करता ? देवा जे मूळ आहे ते म्हणजे तुझे स्वरुप आहे त्या मुळाशी माझे लहान मूळ म्हणजे माझ्या जीवाला त्या मूळ स्वरुपाशी लवकर एकरुप कर. देवा माझे मन संसारात आणि परमार्थामध्ये दोन्हीकडेही समाधानी नाही एकदा की तुझे आत्मस्वरुपाने दर्शन झाले की मग मी निश्चिंत होईन. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आपल्या दोघामधील भेद नष्ट व्हावा लवकरच तू मला तुझ्या स्वरुपाशी एकरुप करावे अशीच उत्कंठता माझ्या जीवाला आहे.
