॥ श्रीएकनाथमहाराजकृत
8.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
अरण्यकाण्ड
॥ अध्याय आठवा ॥
शूर्पणखेला विद्रूप करतात
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
स तां पंचवटीं गत्वा नानाशकुनिनादिताम् ।
उवाच भ्रातरं रामो लक्ष्मणं शुभलक्ष्मणम् ॥१॥
अयं देशः समः श्रीरान्तुप्पितस्तरुभिर्वृतः ।
इहाश्रमपदं रम्यं यथावत्कर्तमर्हसि ॥२॥
पंचवटीत आगमन व वनसौंदर्याने सर्वांना संतोष :
पंचवटीं । श्रीराम सुखावे देखोनि दृष्टी ।
सुखावली सीता गोरटी । आल्हाद पोटी सौमित्रा ॥१॥
श्रीरामा देखोनि आल्हादे । कोकिळा कूजती पंचमशब्दें ।
घुमरी घुमघुमती स्वानंदे । सुखानुवाद अति मधुर ॥२॥
श्रीरामा तू तू सीते तू तू । धन्य धन्य सुमित्रा तू तू ।
ऐसे कपोत कूजतू । पुण्यपुरुषार्थी ये वनी ॥३॥
स्वतःप्रमाण की परतःप्रमाण । प्रयोगोपाधीनें व्यावर्तित कोण ।
जहदजहल्लक्षणेचें काय प्रयोजन । शुक सारिका आपण विवादती ॥४॥
जेथे शुक बोले विचक्षण । आत्मा येथे स्वतःप्रमाण ।
तो जहदजहत् नेणे । श्रीराम पूर्ण लक्षावा ॥५॥
ऐसे पक्षी विवादती । तेणे सुखावे श्रीराममूर्ती ।
लक्ष्मण चमत्कारें चित्ती । सीता सती स्वानंदे ॥६॥
मयूर आनंदे नाचत । शुक पिंगळे अनुवादत ।
ये वनी बसल्या श्रीरघुनाथ । पुण्यपुरुषार्थ पावेल ॥७॥
अति पावन पंचवटी । श्रीराम वसल्या जगजेठी ।
मारील राक्षसांच्या कोटी । सुखसंतुष्टी तिही लोकी ॥८॥
ऐकोनि पक्ष्यांचें कूजित । संतोषला श्रीरघुनाथ ।
सौमित्रासी स्वये सांगत । आश्रम येथे निर्मावा ॥९॥
अरुणावरुणासंगमावर आश्रमस्थापना :
अरुणावरुणासंगम सार । प्राची सरस्वती पवित्र ।
लक्षून सुंदर कपालेश्वर । करी सत्वर स्वाश्रम ॥१०॥
गंगातीर सम सुशीळ । वृक्ष पुष्पित सफळ ।
मलयानिळसुपरिमळ । सुख प्रबळ यै वनी ॥११॥
तू तव निजसखा लक्ष्मण । सर्वांगे सुंदर सुलक्षण ।
येथे वसतां सुख संपूर्ण । करी निर्माण आश्रम ॥१२॥
अवमुक्तस्तु रामेण लक्ष्मणः परवीरहा ।
अचिरेणाश्रमं भ्रातुश्चकार सुमहाबलः ॥३॥
पर्णशालां सुविपुलां चकार सुनरोत्तमः ।
उपास्यां राघवस्यार्थे प्रेक्षणीयामनुत्तमाम् ॥४॥
लक्ष्मणाचे शुभ लक्षण । नां म्हणो नेणे आपण ।
शिरी वंदोनी श्रीरामचरण । करी निर्माण आश्रम ॥१३॥
यज्ञशाळा द्विजशाळा । जीवनशाळा शयनशाळा ।
निर्मिलिया पर्णशाळा । अति विशाळा ऋषिवासा ॥१४॥
वृंदावनें सुमनवने । शोभताती वने उपवनें ।
बिल्व अश्वत्थ मधुवनें । आम्रवनें मघमघित ॥१५॥
पंचपंच वृक्षांची दाटी । गंगातीरी निकटनिकटीं ।
त्यांमाजी शोभे पंचवटी । देखता दृष्टी मन निवे ॥१६॥
अरुणा वरुणा सरस्वती । त्रिवेणी वाहे आश्रमाप्रती ।
सुंदर कपालेश्वरस्थिती । सन्मुख भारती आश्रमी ॥१७॥
आश्रमातील दैनंदिनी :
पंचवटीं आश्रम सुहावा । हेचि श्रीरामाची निजसेवा ।
लक्ष्मणे केली सद्भावा । श्रीराघवसुखार्थी ॥१८॥
उत्तमोत्तम आश्रमस्थिती । देखोनि सुखावे श्रीरघुपती ।
लक्ष्मणासी अति प्रीती । सुखानुभूतीं आलिंगी ॥१९॥
स्वये श्रीरामसुखसमेळीं । नानापुष्पीं नानाफळीं ।
निजाश्रमी दिधली बळी । जनकबाळीसमवेत ॥२०॥
श्रीरामसीता आश्रमस्थिती । तेणे लक्ष्मणा सुखसंपत्ती ।
सेवा करावया अहोरातीं। उल्हास चित्ती चौगुणा ॥२१॥
कुश पुष्पें सुस्वाद फळे । शीतळ जळे सुपरिमळें ।
लक्ष्मण पुरवी सर्वकाळें । सेवाबळें उल्हासी ॥२२॥
श्रीरामसेवेचें निजसुख । लक्ष्मणासी आत्यंतिक ।
विसरला द्वंद्वदुःख । परम हरिख सेवेचा ॥२३॥
श्रीरामसीतेचें चरणतीर्थ । सौमित्र नित्य सेवित ।
सेवेसी विकिले जीवित सावचित्त सर्वार्थीं ॥२४॥
स्नानार्थ श्रीराम गेल्यावर सीतेचे कंबरेखालील वस्त्र व चोळी झोपेत अंगावरुन दूर होतेः
सीतेपासीं संरक्षण । श्रीरामे ठेवून लक्ष्मण ।
आपण करु गेला स्नान । अतिविंदान तेथे जाले ॥२५॥
श्रीरघुनाथासी देखता । कदा निद्रा न करी सीता ।
श्रीराम स्नाना गेला असता । विश्रामता निजेली ॥२६॥
लक्ष्मणाचे दृष्टीसमोरी । सीता स्वभावे निद्रा करी ।
वस्त्र उडालें गुह्यावरी । कुचांतरी निर्मुक्त ॥२७॥
तशाही प्रसंगी लक्ष्मण ध्यानमग्न :
सुमित्रासी श्रीरामध्यान । न देखे कुच न देखे जघन ।
सीता दिसताहे नग्न । हेंही ज्ञान तो नेणे ॥२८॥
श्रीराम करोनि आला स्नान । सीता दिसताहे नग्न ।
लक्ष्मणासी स्वये आपण । काय वचन बोलत ॥२९॥
अग्निकुंडसमा नारी घृतकुंभसमो नरः ।
दृष्ट्वा गुह्यं परस्त्रीणां कस्य नो चलितं मनः॥५॥
स्त्री तंव अग्निकुंड केवळ । नर घृतकुंभ तो विव्हळ ।
देखोनि नारीगृह्यस्थळ । मन निश्चळ कोणाचे ॥३०॥
लक्ष्मणोक्ति –
पिता यस्य शुचिर्भूतो माता चापि पपिव्रता ।
श्रीरामसेवानिरतस्तस्यैवं निश्चलं मनः॥६॥
राम-लक्ष्मणांचा संवाद :
पिता ज्याचा शुचिर्भूत । माता पतिव्रता निश्चित ।
श्रीरामसेवेनित्य रत । त्याचे चित्त चळेना ॥३१॥
श्रीरामभक्तांची निजस्थिती । गृह्यगुह्यार्थ देखती ।
तेणे चळेना चित्तवृत्ती । जाण निश्चिती श्रीरामा ॥३२॥
देहींचिया विकारवृत्ती । स्त्रीपुरुषत्वा अभिव्यक्तीं ।
देह देहातीत देखती । त्यांची वृत्ति चळेना ॥३३॥
सीता जगदंबा स्वये सृष्टी । पाहोनि लक्ष्मणाची कसवटी ।
ऐकोनि दोघांचिया गोष्टी स्वये उठी सलज्ज ॥३४॥
सीतेचा आदरभाव :
लक्ष्मणाची स्थिती देखता । सीतेने चरणी ठेविला माथा ।
स्वये श्रीराम जाला वंदिता । परमपूज्यता सौमित्रीं ॥३५॥
लक्ष्मणे घालोनि लोटांगण । दोहींचें मस्तकी धरिले चरण ।
सेवासुख द्यावे मज आपण । पूर्ण पूज्यपण श्रीरामी ॥३६॥
ऐकोनि सौमित्र वचन । श्रीरामे देता आलिंगन ।
दोघा नाठवे दोनीपण । जाले परिपूर्ण परब्रह्म ॥३७॥
पावोनिया पूर्ण बोध । लक्ष्मणा सेवेचा आल्हाद ।
सेवेलागीं जाला सावध । कथानुवाद अवधारा ॥३८॥
लक्ष्मण जावोनि वनासी । नित्य आणी वनफळांसी ।
तंव तेणे वनी एके दिवशी । आश्चर्यासी देखिले ॥३९॥
सांबराक्षसाची काळखड्ग प्राप्त्यर्थ तपश्चर्या :
शूर्पणखेचा लाडका सुत । सांब राक्षस विख्यात ।
काळखर्गाचे प्राप्त्यर्थ । करी वनांत तपश्चर्या ॥४०॥
सांबतपश्चर्या अति अद्भुत । खर्गार्थी एकाग्रचित्त ।
काळखर्ग होता प्राप्त । जाले विपरीत अदृष्टें॥४२॥
त्या खड्गाच्या मनातून साबाच्या हाती जावयाचे नसते म्हणून ते लक्ष्मणाच्या हाती जातेः
खर्ग उतरता सत्वर । तंव शस्त्रदेवता करी विचार ।
सांब महापापी दुर्धर । खर्गे अधोर करील ॥४३॥
निर्दाळील गोब्राह्मणां । वध करील दीनजना ।
त्याच्या हाती मी स्पर्शेना । शरण लक्ष्मणा मी होईन ॥४४॥
हा तंव धर्माचा साहाकारी । अकिंचनां कैवारी ।
दीनजनांतें उद्धरी । याच्या करी मी पावेन ॥४५॥
सांब जे जाळींत तप करीत । लक्ष्मण फळे तोडी तेथ ।
खर्ग येवोनियां त्वरित । होय हस्तगत सौमित्रा ॥४६॥
त्याची धार पाहाण्यासाठी घाव मारतो तो नेमका झाडीतील सांबावर पडून त्याचा मृत्यू :
वनफळे आसुंडिता । अवचटे काळखर्ग आले हाता ।
लक्ष्मण पाहे सभोंवता । तंव खर्गदाता न दिसेचि ॥४७॥
खर्गे सुखावला करतळी । हरिखें वेळोवेळां तुळी ।
वाहों पहावया तोडी जाळी । सांब ते वेळीं निवटिला ॥४८॥
घावो अतिशये दुर्धर । जाळीसहित तुटले शिर ।
भंडभडां वाहे रुधिर । चिंतातुर सौमित्र ॥४९॥
कोण तपस्वी होता येथ । मज घडला ब्रह्मघात ।
स्वर्गी क्षोभेल दशरथ । सत्य श्रीरघुनाथ क्षोभेले ॥५०॥
कैचे खर्ग आले हाता । तेणे हत्या बैसली माथरां ।
कैसेनि भेटो श्रीरघुनाथा । चिती चिंता अनिवार ॥५१॥
ब्रह्महत्या दोष घडला असावा अशा शंकेने लक्ष्मण व्याकुळ :
ब्रह्महत्यार्याचे मुख । श्रीराम न पाहे सन्मुख ।
जीवी लागली धुकधुक । परम दुःख सौमित्रा ॥५२॥
माता पिता बंधु गोत । माझा श्रीराम समर्थ ।
त्यासी सांगों वृत्तांत । प्रायश्चितार्थ पुसेन ॥५३॥
करिता श्रीरामनामस्मरण । कोटि दोषा होय दहन ।
त्यासी जालिया अनन्य शरण । हत्याहरण निमेषार्धे ॥५४॥
मुखी श्रीरामनामवृत्ति । हृदयी श्रीरामाची मूर्ति ।
पावलापावलीं श्रीरामस्थितीं । दोषनिवृत्ति श्रीरामे ॥५५॥
श्रीरामस्थिती पाउल पडे । तेणे समाधिसुख गाढे ।
प्रायश्चित्त जाले बापुडे । श्रीरामाकडे पाहतांचि ॥५६॥
हत्याभयें श्रीरामस्थिती । दृढ धरोनिया चित्ती ।
पुसावया प्रायश्चित्तार्थी । आला निश्चिती सौमित्र ॥५७॥
श्रीराम सीता पुसे आपण । स्त्रियेंवाचून लक्ष्मण ।
दिसताहे अति उद्विग्न । दीनवदन आभासे ॥५८॥
श्रीराम म्हणे सीतेप्रती । सौमित्र नव्हे विषयार्थी ।
दिसे नूतन खर्गाची प्राप्ती । कांही वनाप्रती प्रवर्तलें ॥५९॥
तंव लक्ष्मणे येवोनि आपण । साष्टांग घातले लोटांगण ।
दोष घडला जी संपूर्ण । कृपा आपण करावी ॥६०॥
जयजयाजी श्रीरघुनाथा । अनाथबंधो दीननाथा ।
कृपा करी गा भगवंता । मज रक्षिता आन नाही ॥६१॥
तळी धरित्री पाहता । वरी आकाश न्याहळितां ।
दाही दिशा धांडोळिता । मज श्रीरघुनाथा आन नाही ॥६२॥
मी तंव नेणे माता पिता । बंधु भगिनी तूंचि तत्वता ।
कौसल्येनें निरुपिले वना येता । मज रक्षिता तूंचि तू ॥६३॥
लक्ष्मणाचे दीन वचन । ऐकोनिया श्रीरघुनंदन ।
मग संकेत पुसे आपण । येरु मस्तक खलावून । सांगता होय ॥६४॥
वनी वनफळे तोडितां । अवचित खर्ग आले हाता ।
त्याचा घावो पाहू जाता । जाळी त्या अर्था तोडिली ॥६५॥
तंव जाळींत तप करीत । तपस्वी होता वारुळांत ।
त्याचा मज घडला घात । प्रायश्चित्तार्थ मज सांगा ॥६६॥
श्रीरामांनी मृतदेहाचा वर्ण विचारला :
ऐकोनि सौमित्राचे वचन । मग बोलला श्रीरघुनंदन ।
वैश्य क्षत्रिय की शूद्र ब्राह्मण । वधिला कोण जाळीमाजी ॥६७॥
न करिता हा इत्यर्थ । सांगता न ये प्रायश्चित्तार्थ ।
लक्ष्मण धाडिला त्वरित । परीक्षार्थ प्रेताच्या ॥६८॥
शोध केल्यावर तो देह राक्षसाचा असल्याचे कळून आले :
लक्ष्मण ते शरीर पाहे डोळा । भ्यासुर मुख दाढा विक्राळा ।
खापराऐसा सबाह्य काळा । नेत्र अनलासारिखे ॥६९॥
लक्ष्मण सांगे इत्यर्थ । मज घडला राक्षसघात ।
ऐकोनि हांसे श्रीरघुनाथ । मुख्य धर्मार्थ हा आम्हा ॥७०॥
त्यामुळे ब्रह्महत्या झालीच नाही :
तुज नाही निजज्ञान । शस्त्रदेवता अति सज्ञान ।
तिणें जाणोनि आपण । दृष्टनिर्दळण स्वये केले ॥७१॥
तो जरी सावध असता । तरी करिता तुझिये घाता ।
तुज प्रसन्न शस्त्रदेवता । न झुंजतां निर्दाळिला ॥७२॥
राक्षस अतुर्बळी होता । दुर्धर तपी शस्त्रप्राप्त्यर्था ।
दुष्टावरी क्षोभोनि शस्त्रदेवता । त्याच्याचि घाता तिणें केले ॥७३॥
तपस्व्याच्या केले घाता । दोष बैसला माझे माथा ।
ऐसे न म्हणावें तत्वता । दोष सर्वथा न मानावा ॥७४॥
लक्ष्मणाला परमानंद :
करावया राक्षसांचे घात । आम्ही आलो असों या वनांत ।
शस्त्रे धरोनि तुझा हात । केला प्राणांत दृष्टाचा ॥७५॥
तू तंव नव्हेसी कर्मकर्था । तुझ्या धरोनिया हाता ।
दुष्ट दमिला शस्त्रदेखता । दोष सर्वथा तुज नाही ॥७६॥
दोष नाही तुझे माथा । पुसणे न लगे प्रायश्चिता ।
ऐसे श्रीराम बोलता । उल्हासता सौमित्रा ॥७७॥
धन्य ज्ञान श्रीरघुनाथा । शोधोनि काढिले इत्यर्था ।
मी तंव नव्हे कर्मकर्ता दोष सर्वथा मज नाही ॥७८॥
धन्य धन्य श्रीरामकृपा । म्या घेतलें दोषसंकल्पा ।
तोचि केला निर्विकल्पा । पुण्य पाप मज नाही ॥७९॥
ऐस बोलोनि लक्ष्मण । मस्तकी धरिले श्रीरामचरण ।
श्रीरामे दिधले आलिंगन । समाधान सुबंधू ॥८०॥
श्रीरामाचे निजभक्त । कर्मे करोनि अलिप्त ।
हरिभक्तांचें पढतां चरित्र । नित्यमुक्त महादोषी ॥८१॥
करावया राक्षसांच्या घाता । काळखड्ग आले आता ।
श्रीरामे पूजिलें सद्भावता । काळ सर्वथा साह्य आम्हा ॥८२॥
काळ साह्य जाला स्वभावतां । काळखर्ग आले न प्रार्थितां ।
राक्षसनिर्दळणीं आता । जाण तत्वता सौमित्रा ॥८३॥
राक्षसवधाने दोष नाही :
राक्षस वधावया रणी । आजिपासून जाहली बोहणी ।
तेथोनि विचरता वनी । सावधानीं वर्तावे ॥८४॥
याचा सूड घ्यावयासी । राक्षस तील कपटवेषी ।
योगी संन्यासी तापसी । विश्वास त्यांसीं न करावा ॥८५॥
अगत्य मानेल कर्तव्यता । ते मज पुसावी तत्वता ।
मज पुसल्याविण सर्वथा। अल्पही कार्यार्था न करावे ॥८६॥
शिरी वंदून श्रीरामवचन । सौमित्रा सदा सावधान ।
तंव तेथे करावया पुत्रशोधन । होईल आगमन शूर्पणखेचे ॥८७॥
शूर्पणखेला पडलेले वाईट स्वप्न :
शूर्पणखा स्वये लंकेसी । देखती जाली दुष्ट स्वनांसी ।
पट्टाभिषेक होता सांबासी । चरणघातेंसीं लोटिला ॥८८॥
मस्तकी शेंदुराचा टिळा । गळा आरक्त कण्हेराच्या माळा ।
मुख माखिलें काजळा । भोंवता पाळा गोळांगुळांचा ॥८९॥
सर्वांगी तेलमज्जन । नग्न गर्दभावरी आरोहण ।
दक्षिणदिशे करुनि गमन । गोमयर्हदीं प्रवेशला ॥९०॥
शूर्पणखा सांगे रावणासी । दुष्ट स्वप्न देखिले सांबासी ।
मी जाईन पद्मपुरासी । विमानेंसीं ते आली ॥९१॥
रावणाला निवेदन व तिचे पद्मपुरास आगमन, मुलाचे निधन कळल्यावरुन तिचा शोक :
भेटोनि त्रिशिराखरदूषणांसी । मग पाहू आली ते सांबासी ।
देखोनि त्याच्या शिरच्छेदासी । आक्रंदेंसीं आरंबळे ॥९२॥
काय विंदान जाले यासी । कोण उठली गे विवसी ।
काळ कृतांत भीती ज्यासी । तेणे भूमीसी स्वीकारिलें ॥९३॥
हा स्वभावे उघडी दृष्टी । तै सुरासुर पळती दिक्पुटीं ।
कळिकाळाची निवटे दृष्टी । तो हा हठी पडला भूमीं ॥९४॥
तुज म्या नवस केले बहुवस । अश्वत्थसेवा आणि उपवास ।
थोर धरिली तुझी आस । तो तू उदास जालासी ॥९५॥
तुझिया देखोनि मुखकमळा । मज तंव पान्हा सुतला बाळा ।
तो सांब परलोकासी गेला । मजसी अबोला धरुनिया ॥९६॥
ऐसे विलाप अनेक । मुखावरी ठेवी मुख ।
हा हा कोणे वधिला बाळक । थोर दुःख मज दिधले ॥९७॥
रडोनि काय करु येथ । कोणे केला पुत्रघात ।
त्यासी पहावया निश्चित । वन समस्त ते शोधी ॥९८॥
लक्ष्मण दिसताच त्याच्या सूडाचा निर्धार :
तंव खड्गसहित धनुष्यबाण । वनी देखिला लक्ष्मण ।
सांबजीवघाती हाचि संपूर्ण । त्याचे भक्षण मी करीन ॥९९॥
सांब वधिला करिता ध्यान । तो जरी असता सावधान ।
तरी याचे करिता सगट प्राशन । बळ संपूर्ण सांबासी ॥१००॥
सांब माझा अतुर्बळी । येणे वधिला ध्यानसमेळीं ।
यासी मी सगळेंचि गिळीं । करीन रांगोळी हाडांची ॥१॥
माझा सांब वधिला येणे । सांगों खरादिकां गार्हाणे ।
ते मज लाजिरवाणे । मारुन नेणे त्यांपासी ॥२॥
त्याचे अंगी बळ संपूर्ण । सबळ बळाचें लक्षण ।
डोळा दोनी सहस्त्रनयन । आणि नागचिन्ह बाहूंसी ॥३॥
डोळ्यांमाजी कूर्मदृष्टी । कळिकाळां न चळे पुष्टी ।
शेषशयनचिन्ह पृष्टीं आंगवण ॥४॥
तिचे वेषांतर :
यासी बहें गिळू जाता । हा करील माझ्या घाता ।
दळून मारावा सर्वथा । याची कांता होवोनी ॥५॥
स्वरुपरुपें अति सुंदर । अलंकार ल्याली मनोहर ।
वांकी अंदुवांचा गजर । उभी समोर सौमित्रा ॥६॥
शीसफूल राखडी फरा गोंडा । पोफळ चापेकळी केतकी दांडा ।
दोही हाती जडित चुडा । मुखी विडा सुरंग ॥७॥
अंगी मदुवीची कांचोळी । गळा हार एकावळी ।
पाठीवर वेणी मोकळीं । गोंडा दुफुलीसहित ॥८॥
नेसली क्षीरोदकपाटोळा । मध्यभागी जडित कटिमेखळा ।
हळदी उटिली मुखकमळा । काजळ डोळा भळभळीत ॥९॥
शूर्पणखेची लक्ष्मणाला लग्नाची विनंती :
डोळे मोडी लक्ष्मणाकडे । दुडीपीडी करुनियां पाया पडे ।
लाजोनि पाठिमोरी मुरडे । पाहे देहूडे लक्ष्मणासी ॥११०॥
मी तरी कुबेराची भगिनी । तुमचे प्राप्तीलोगोनी ।
बैसलें होते अनुष्ठानीं । धर्म पत्नी मी होईन ॥११॥
सुंदर आवळे डोळ्यांसी । परी रामाज्ञा आठवे लक्ष्मणासी ।
राक्षस येती कपटवेषीं। विश्वास त्यांसीं न धरावा ॥१२॥
ती घेवोनि कमळमाळा । घालूं आली लक्ष्मणाच्या गळा ।
येरू मनोनि विटाळा । परता सरला सक्रोध ॥१३॥
मजसारिखी सुंदर कांता । वनी मिनलिया एकांता ।
नपुंसकही न सरे मागुता । तुझी पुरुषता सभय का ॥१४॥
ती तव तुझी केवळ चरणदासी । सेवा करीन अहर्निशी ।
शयन करु पर्णशेजेसीं । शंका मानसी न धरावी ॥१५॥
माझा भोगिल्या गुह्यार्थ । कळेल सर्वही भावार्थ ।
माझेनि संगें पुरुषार्थ । जगी विख्यात पावाल ॥१६॥
लक्ष्मणाने सांगितल्यावरुन ती रामांकडे जाते :
सौमित्र म्हणे ऐक आता । श्रीराम माझा ज्येष्ठ भ्राता ।
त्याची आज्ञा मज न होता । तुझ सर्वथा नांगीकारीं ॥१७॥
श्रीराम ज्येष्ठ बंधु तो कैसा । कोण पुरुषार्थ कैसी दशा ।
समूळ आणावया मानासा । मार्गजिज्ञासा पूसत ॥१८॥
येणेंचि मार्गे गंगातटीं । श्रीरामाश्रम पंचवटीं ।
श्रीरामे वसे जगजेठी । सीता गोरटीसमवेत ॥१९॥
माझ्या पुत्राचे हे वैरी । रम्याश्रम गंगातीरी ।
नांदतीती बरव्या परी । सीता सुंदरी प्रियतमा ॥१२०॥
श्रीराम आणि लक्ष्मण । दोघे छळून मी मारीन ।
सीता सुंदरी नेऊन । स्वये अर्पीन लंकानाथा ॥२१॥
लक्ष्मणाला आपल्याबरोबर लग्न करण्यास आज्ञा देण्याची ती विनंती करते :
मग पंचवटीस जाऊन । श्रीरामा घालोनि लोटांगण ।
भाउजी वंदितें श्रीचरण । बाईसी शरण सर्वभावे ॥२२॥
मी तंव तुमची धाकटी जाऊ । मजवरी कृपा करावी बहू ।
भावे धाकटे भाऊ । लग्नगौरवू न मानिती ॥२३॥
भावे साचे आज्ञेवीण । माझे न करिती पाणिग्रहण ।
भाऊजींसी तुम्ही सांगून । लावावें लग्न सौमित्रासीं ॥२४॥
सीता म्हणे श्रीरामासी । सौमित्र कष्टताहे अहर्निशी ।
सुंदर कांता । जोडिली त्यासी । मज वनवासी सांगतिणी ॥२५॥
श्रीरामांना तिच्या डोळ्यांवरुन तिची ओळख पटतेः
श्रीराम पाहे जंव सुंदरी । उलट बाहुल्या देखे नेत्री ।
हे तंव केवळ निशाचरी । छळणावारीं आलीसे ॥२६॥
तिचा जाणोनि भावार्थ । हांसोनि बोले श्रीरघुनाथ ।
माझा सौमित्रीं संकेत । असे विपरीत एक सुंदरी ॥२७॥
पाठीसी लिहिल्या अक्षरासीं । आज्ञा माने सौमित्रासी ।
पत्र न माने वो तयासी । मुखवचनासी मानीना ॥२८॥
रामांकडून तिची बोळवपण :
आज्ञा मागता एकाएक । मुहूर्ती श्रीरामी विमुख ।
पतीसी पत्र दाविता देख । तेथेंही विमुख म्या व्हावे ॥२९॥
विमुखपणाचा सोहळा । मुळींच आला माझ्या कपाळा ।
लग्नपत्रिका न दिसे डोळा । श्रीराम भोळा म्हणो नये ॥३०॥
दोघा छळावें हे माझे मत । परी श्रीराम छळणासी नव्हे प्राप्त ।
आपलें कळो नेदी वृत्त । पत्र गुप्त पृष्ठभागी ॥३१॥
पृष्ठभागीं आज्ञा लग्न । वनी लक्ष्मण निर्दळीन ।
मग निर्दळावया श्रीरघुनंदन । खर दूषण आणीन ॥३२॥
पद्मपुरा निकटानिकटीं । श्रीराम मारिजेल राक्षससुभटीं ।
सीता हिरोनि गोरटी । नेईन भेटी लंकानाथा ॥३३॥
श्रीराम दुबाहु माणूस । खर दूषण उग्र राक्षस ।
श्रीरामा मारिता न लगे निमेष । सीता लंकेश भोगील ॥३४॥
पुत्रवैरी वधावा पुढे । विचार केला निजनिवाडे ।
सलज्ज बोले सीतेपुढे । मज सांकडें ओढवले ॥३५॥
नेम केलासे भावेंसी । लग्नपत्रिका ते पाठीसी ।
पाठिमोरी मी बैसू कैसी । भाउजींसी तुम्ही सांगा ॥३६॥
पाठिमोरी बैसता जाण । लाजें जाईल माझा प्राण ।
बाइजी सांगोनि आपण । पत्र लिहोन करी द्यावे ॥३७॥
स्त्रियांचे जिणें लज्जायुक्त । बाइजी जाणा तुम्ही समस्त ।
प्रार्थोंनियां श्रीरघुनाथ । पत्रलिखित करी द्यावे ॥३८॥
श्रीरामाचा निजभावार्थ । पत्र दिधलिया वाचील अर्थ ।
मग करु धांवेल अनर्थ । केला विपतीतार्थ यालागी ॥३९॥
सौमित्राते वरू पाहसी । तरी पत्र लिहूं दे पाठीसी ।
नाही तरी जावोनि वनासी । येईल मनासी तो वरी ॥१४०॥
ऐसे ऐकोनि श्रीरामवचन । उकसाबुकसी करी रुदन ।
जळो ते आणिकाचे वदन । श्रीलक्ष्मण निजपति ॥४१॥
भाउजी शिवतें तुमचे चरण । मी तंव पतिव्रता संपुर्ण ।
प्राणपति श्रीलक्ष्मण । तुम्ही कठिण न वदावें ॥४२॥
मग श्रीराम बोले धर्मवचन । ज्येष्ठ भावजयी मातेसमान ।
कनिष्ठ ते लेंकरुं जाण । लाजेसी कारण असेना ॥४३॥
मग श्रीरामापुढें पाठिमोरी । येवोनि बैसली झडकरी ।
पत्र लिहावे पाठीवरी । आज्ञाधारी मि तुमची ॥४४॥
तिच्या पाठीवर लक्ष्मणास सूचना :
शूर्पणखेची न पडे दृष्टी । पत्र लिहिलें कटिपृष्ठीं ।
पत्रीं लिही विकत गोष्टी । सावधानदृष्टीं अवधारा ॥४५॥
सहनासिक सगटओष्ठ । वेगे करावे सरसपाट ।
हाचि इचा शेंसपाट । आज्ञा वरिष्ठ हे माझी ॥४६॥
करु नये स्त्रीहनन । यालागी इचा राखावा प्राण ।
करावे नासिकाच्छेदन । हेंचि सुलग्न पै इयेचें ॥४७॥
काय लिहीलें पाठीसी । हे तो न कळे शुर्पणखेसी ।
वंदोनि श्रीरामसीतेसीं । लक्ष्मणापासीं ते आली ॥४८॥
वेगी घेवोनिया माळेसी । वरू आली लक्ष्मणासीं ।
तो कोपला अतिशयेंसीं । निर्लज्ज होसी तू एक ॥४९॥
श्रीरामाचे आज्ञेवीण । मी न करी पाणिग्रहण ।
जळो तुझे काळे वदन । आज्ञेविण वरुं येसी ॥१५०॥
भाउजी कृपाळु । तिही दिधले आज्ञापन ।
परी तुम्हांपासीं कठिणपण । सांगेन खूण ते ऐका ॥५१॥
भाउजी श्यामसुंदर जगजेठी । बाइजी चांपेकळी गोरटी ।
मज भेटलीं पंचवटीं । आज्ञा वाक्पुटी वरावें तुम्हा ॥५२॥
तोंडीचे तोंडी आज्ञापन । सौमित्र म्हणे मानी कोण ।
तोंडीचे तोडीं होईल वरण । सत्य जाण सुंदरी ॥५३॥
माझा विश्वास नाही तुम्हासी । जन्म कंठणे पायापासीं ।
लटिके बोलिल्या चरणांसी । मुख श्रीरामासी केंवी दावू ॥५४॥
थोर श्रमलेति वनांतीं । चरण तळहातीन हाती ।
दोघें शयन करु एकांती । तेणे विश्रांति पावाल ॥५५॥
लक्ष्मण म्हणे तू तंव लंड । बोलाची बडबड उदंड ।
घाय हाणोनि फोडीन तोंड । तू वेश्या रांड व्यभिचारिणी ॥५६॥
श्रीरामाचे हस्तलिखित । देखल्यावीण न लावी हात ।
जवळी आलिया करीन घात । म्हणोनि खर्गा हात घातला ॥५७॥
म्हणे मी कपाळकरीटी । सत्य न माने माझी गोष्टी ।
श्रीरामलिखित पहा दृष्टी । म्हणोनि पृष्ठी दाविली ॥५८॥
श्रीरामांच्या सूचनेप्रमाणे तिची संभावना :
श्रीरामाची हस्ताक्षरें । सार्थक वाचिली सौमित्रे ।
वेणी दंड धरोनि करे । बलात्कारें पाडिली ॥५९॥
मी काय धाकुटी कर्णकुमारी । मज झोंबोनि पाडिता पृथ्वीवरी ।
मीच पडतें धरणीवरी । पुरुषार्थ करी प्राणनाथा ॥१६०॥
पाय देवोनि उरावरी । सओष्ठनासिका शस्त्रधारीं ।
सरसकटून क्षणामाझारीं । राहिला दुरी शस्त्रेसी ॥६१॥
घाये उडविलें कपटपण । क्रूर राक्षसी अति दारुण ।
बारा हस्त एकैक स्तन । नाकेंवीण विक्राळ ॥६२॥
तिचा आक्रोश व पलायन :
शंख करी सुबद्ध । फफें करीत निघें शब्द ।
नाकेंवीण अति विरुद्ध । धरिला क्रोध सौमित्रीं ॥६३॥
जैसे म्या केले कपट । तैसेचि जाले सपाट ।
याचा मी भरीन घोंट । मुख अचाट पसरिले ॥६४॥
मूख पसरी गिळावयासी । तंव लक्ष्मण शस्त्रातें हातवसीं ।
घाव घालावा जो शिसी । तंव राक्षसी पळाली ॥६५॥
लक्ष्मणाने घडलेले श्रीरामांना निवेदन केले :
सौमित्र आला पंचवटीं । श्रीरामासी सांगितली गोष्टी ।
समूळ राक्षसी ते खोटी । टाळी पिटिती परस्पर ॥६६॥
धन्य श्रीराम सूर्यवंशी । कपटी ओळखिली राक्षसी ।
पत्र लिहिलें पाठीसी । तेणे म्या तिसी दंडिलें ॥६७॥
पत्र पडतें तिच्या हाती । तै ते भोवती आम्हांभोंवती ।
भली श्रीरामे केली युक्ती । पुष्ठपत्रार्थी दंडविली ॥६८॥
तुझी आज्ञा आत्यंतिक । आज्ञेनें तिसी लाविली सीक ।
सओष्ठ छेदोनि नासिक । विरुप देख ते केली ॥६९॥
सुपायीएवढी नखे देखा । यालागी म्हणती शूर्पणखा ।
सौमित्रे छेदोनि नासिका । टाकिलें उदकामाझारीं ॥१७०॥
शूर्पणखेचे छेदिलें नाक । ते तीर्थी मासे निर्नासिक ।
अद्यापि देखती लोक ऐसी सुटंक दंडिली ॥७१॥
तिचा न घ्यावा निजप्राण । ऐसी तुझी आज्ञा पूर्ण ।
यालागी ते राखिली जाण । गेली पळोन पद्मपुरा ॥७२॥
तंव सीतेसी म्हणे रघुनंदन । सुमित्रपत्नीचें लग्न ।
नासिका लावोनि सुलग्न । आला सावधान सौमित्र ॥७३॥
या घटनेपासून राक्षसांशी भांडणाला प्रारंभ :
रणबोहलें सोहळियाकारणें । होईल बाणाचें उटणे ।
अशुद्धे आंबा शिपणें । तळी बसविणें शस्त्राचें ॥७४॥
येथे नाचेल रणधेंडा । ओवाळणी पडती राक्षसमुंडा ।
आयणी पायणी दोही कडां । शस्त्रे भडभडा पडतील ॥६५॥
श्रीराम बोलिला आपण । झाले कलहासी कारण ।
त्रिशिरा आणि खर दूषण । निर्दळीन रणकंदनें ॥७६॥
ऐसे बोलतांचि जाण । बाहूंसी आले स्फुरण ।
करावया अरिमर्दन । धनुष्यबाण उचलिले ॥७७॥
एकाजनार्दना शरण । शरण आले श्रीरामा स्फुरण ।
निर्दळील खरदूषण । श्रोती अवधान मज द्यावे ॥७८॥
इति भावार्थरामायणे अरण्यकांडे एकाकारटीकायां
शूर्पणखाविरुपकरणं नामाष्टमोऽध्यायः ॥८॥
॥ ओंव्या १७८ ॥ श्लोक ६ ॥ एवं १८४ ॥
