॥ श्रीएकनाथमहाराजकृत
7.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
अरण्यकाण्ड
॥ अध्याय सातवा ॥
जटायूसह श्रीरामांचे पंचवटीत आगमन
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
अमृतरक्षणासाठी घेतलेली दक्षता :
अच्युत नाम धरोनि मानसी । गरुड निघाला अमृतासी ।
भावे वंदितां कश्यपासी । साह्य् सप्तऋषी त्यासी जाले ॥१॥
गरुडे अतिक्रमोनि गगन । सूक्ष्मरुप धरोनि जाण ।
परमामृत लक्षितां पूर्ण । तव बहु रक्षण अमृतासी ॥२॥
प्रथम सर्पांचें संपूर्ण । दुसरे रक्षण वरुण ।
तिसरें जाण यक्षगण । मरुद्गण ते चवथें ॥३॥
पांचवें रक्षण यमदूत । सहावे रक्षण शिवदूत ।
सातवे रक्षण विष्णुदूत । सावचित्त सर्वदा ॥४॥
योग्य वेळी गरुडाचे आक्रमण :
गरुडे साधोनयां सवडी । कुंडीं घालोनिया उडी ।
अमृत शोपोनियां तातडीं । अति झडाडी निघाला ॥५॥
तंव झाला हाहाकार । पक्षी नव्हे हा अमृतचोर ।
क्रधें उठीले विखार । शस्त्रसंभार सूटले ॥६॥
गरुडपंखांच्या झडाडीं । राखणीं मूर्च्छित बापुडीं ।
शस्त्रे पडती उबडी । सर्प कडाडी धाविन्नलें ॥७॥
रागे क्षोभता विखारीं नखाग्रघायीं त्यां विदारी ।
नकुळ पावला साहाकारी । सर्प माझारीं छेदित ॥८॥
व वरुणें घालोनि पाशांसी । गरुड आकळिला पक्षेंसीं ।
नकूळें करांडूनि पाशांसी । केले गरुडासी निर्मुक्त ॥९॥
गरुडाने वाटेत येणार्या देवांना स्वसामर्थ्याने पराभूत केले :
गरुडे झडपोनियां वरुणासी । उडविला तो आकाशी ।
भोंवडोनि दाही दिशी । पडे पृथ्वीसीं मूर्च्छित ॥१०॥
राखणाईत आपापरीं । विदारले नखाग्री ।
नकुळ केवळ सर्पारी । नानापरी छेदिले ॥११॥
ऐसे करोनि रणकंदन । गरुड वळंघला सर्प गगन ।
करोनिया अमृतपान । बळवाहन चालिला ॥१२॥
हाक वाजिन्नली वैकुंठीं । कोपे चालिला धूर्जटी ।
देवांच्या कोट्यनुकोटी। अमृतासाठीं धांविन्नल्या ॥१३॥
वेगी बैसोनि सुरगजासीं । इंद्र धांविन्नला वेगेंसीं ।
वज्र हाणितलें गरुडासीं । येरें वज्रासी गिळिले ॥१४॥
गरुडपंखांच्या झडाडीं । इंद्राची वळली मुरकुंडी ।
गज पळाले कडाडीं । देवांच्या कोडी पळाल्या ॥१५॥
गरुडपंखांचा पवन । देवा नाठवे निजस्थान ।
वाहुटुळीमाजी रजःकण । तैसे सुरगण भ्रमचक्री ॥१६॥
यम धांविन्नला कोपेंशीं । दंडें हाणितलें गरुडासी ।
तेणे गिळिले यमदंडासी । मग यमासी दंडिलें ॥१७॥
यमें जाचिलें बहुतांसी । गरुडे गाजिलें यमासी ।
करोनिया कासाविसी । यम धुळीसीं मेळविला ॥१८॥
यम गांजला नानापरी । कोण धांवेना कैवारी ।
देखोनि कुबेर पळे दूरी । सौजन्य करी गरुडासी ॥१९॥
बंधमोचन मातेसी । अमृत द्यावया कद्रूसी ।
धाडीन मणिमय कलशासी । अमृतासी सांठवण ॥२०॥
गरुडपंखांचे झडाडीं । दिग्गजें रानी पळाली बापुडीं ।
सुरासरांचिया कोडी । देशोधडी केलिया ॥२१॥
दैत्य दानव महाबळी । तेही मारिले रणकल्लोळी ।
धाके सर्प गेले पाताळीं । आतुर्बळी विनतात्मक ॥२२॥
मंत्रपूतजळशक्ती । युद्धा आला प्रजापती ।
तंव कमंडलु हिरोनि हाती । अच्युतशक्ति गिळियेला ॥२३॥
पित्याच्या पित्याचा पिता । भीड राखिली धर्मार्था ।
येरवी गरुड घोळसिता । घडी न लगतां ब्रह्मयासी ॥२४॥
महादेवें क्रोधानळी । गरुड हाणितला त्रिशूळीं ।
गरुड त्रिशूळातें गिळीं । शिव ते वेळीं विस्मित ॥२५॥
त्रिशूळ गिळावयाची शक्ती । हे कैंची या गरुडाप्रती ।
सदाशिव पाहे निश्चिंतीं । हृदयस्थित श्रीराम ॥२६॥
श्रीरामनामाच्या निजस्थितीं । गरुडे जिंतिली त्रिजगती ।
त्रिशूळ गिळावया ती शक्ती । जाली निश्चिती श्रीरामनामें ॥२७॥
हृदयी अमृत मुखी रामनाम । त्यासी कोण करी संग्राम ।
खुंटला शिवाचा पराक्रम । श्रीरामनाम परिसोन ॥२८॥
ऐकता श्रीरामाचे नाम । सदाशिवासई आले प्रेम ।
मूर्च्छित पावला विश्राम । युद्धसंग्राम विसरला ॥२९॥
गरुडे कश्यपाच्या उपदेशीं । नामे जिंतिले सदाशिवासी ।
कळिकाळाची गति कायसी । हरिभक्तांसी बाधावया ॥३०॥
निजभक्तासी द्यावयाचा भेटी । विष्णू पावला उठाउठी ।
चक्र हातवसूनियां मुष्टी । कृपादृष्टि पै आल ॥३१॥
श्रीमहाविष्णूचे आगमन :
लौकिकी दावी युद्धक्रम । परी भक्ताचे आवडे प्रेम ।
गरुड स्मरे नित्य नाम । पुरुषोत्तम तुष्टला ॥३२॥
जो सप्रेम स्मरे नाम । त्या अधीन पुरुषोत्तम ।
नामे संतुष्ट आत्माराम । भक्तकाम कृपाळु ॥३३॥
श्रद्धया हेलया नाम स्मरंति मम जंतवः ।
तेषां नाम सदा पार्थ वर्तते हृदये मम ॥१॥
श्रद्धें हेलया जो स्मरे नाम । त्याचे मी हृदयी नाम ।
नामनिष्ठाचे पुरवीं काम । नामे सुगम मत्प्राप्ति ॥३४॥
अमृत सोडवावया बळी । चक्र मोकली वनमाळी ।
गरुड चक्रांतेहीं गिळी । विस्मय सकळीं मानिजे ॥३५॥
दैत्यदानवमंडळीं । विष्णुचक्र सगळें गिळी ।
ऐसा कोणी नाही बळी । आतुर्बळी हा गरुड ॥३६॥
विष्णुचक्राचा महामार । घाये निर्दाळीत असुर ।
चक्र त्रैलोक्यी दुर्धर । गरुडे ते चक्र गट्ट केले ॥३७॥
स्मरतां राम हरि गोविंद । नामापासी परमानंद ।
त्यासी बाधूं न शके द्वंद्व । द्वंद्व निर्द्वंद्व हरिनामे ॥३८॥
नित्य नामाचा निजगजर । त्याअधीन चक्रधर ।
भक्ता बांधू न शके चक्र । हरि साचार त्यांपासी ॥३९॥
नाम स्मरतां निरंतर । तयापासी अहोरात्र ।
घरटी करी विष्णुचक्र । विघ्न दुर्धर निवटावया ॥४०॥
गरुडाचा पराक्रम पाहून त्याला वर देण्याचे वचन :
देवा भक्ता नाही अंतर । त्यांपासी तो निरंतर ।
यालागी बाधूं न शके चक्र । चक्र दुर्धर अभक्तां ॥४१॥
माझे निजचक्र गिळोन । गरुडा विजयी तू संपूर्ण ।
विष्णु म्हणे मि सुप्रसन्न । माग वरदान वेगेंसीं ॥४२॥
ज्या ज्या वरदाना मागसी । ते ते देईन अति उल्हासीं ।
ऐकोनी हासें आले गरुडासी । काय विष्णूसी बोलत ॥४३॥
तुवा जिंतिले नाही माते । वर देसी कोण्या अर्थे ।
मीच प्रसन्न जालो तूतें । मागसी ते देईन मी ॥४४॥
कश्यपगुरुचा हात माथा । तुझे अच्युत नाम नित्य स्मरतां ।
मज काय आहे अपूर्णता । मागसी आता ते देईन मी ॥४५॥
ऐसे ऐकोनि गरुडवचन । भाष्यबंधेईसीं गोंवून ।
विष्णु मागे वरदान । सावधान अवधारा ॥४६॥
तरी गरुडा होई माझे वाहन । नुल्लंघावे माझे वचन ।
नित्य व्हावे मजअधीन । हे वरदान मज देई । ४७ ॥
ऐकता विष्णूचें मागणे । गरुड विचारी निजमनें।
भाष्य देवोनिया न देणे । निंद्य जिणें तिही लोकी ॥४८॥
मिथ्या करितांचि भाक । देव पितर नित्य विमुख ।
ऐहिकी परत्रीं काळे मुख । नरकदुःख मिथ्यात्वे ॥४९॥
मिथ्या बोलती वितंड । नरका वचती ते षंढ ।
त्यांचे मुखचि नरककुंड । पाहो नये तोंड तयांचे ॥५०॥
मिथ्या अनुवादाची घाणी । तिही लोकी उठे पोहणी ।
पितर विमुख मुख देखोनी । मिथ्या वाणी तो नरक ॥५१॥
ऐसिऐसिया उपपत्ती । गरुडे विचारोनि चित्ती ।
जिवित्य द्यावे विष्णूच्या हाती । केवळ निश्चिती निर्धारु ॥५२॥
शरीर विष्णूचें वाहन जीवे । नुल्लंघी विष्णुवचन ।
काया वाचा मनें विष्णुअधीन । तेणे पावन तिही लोकी ॥५३॥
ऐसा करिता निर्धारु । हृदयी प्रगटला सद्गुरु ।
विवक प्रकाशिला सधरु । कृपाळु गुरु तो ऐका ॥५४॥
स्मरतां कश्यपाचे वचन । विष्णू परमात्मा ब्रह्म पूर्ण ।
हे गरुडासी बाणली खूण । समधान गरुवाक्यें ॥५५॥
गुरुवाक्यबोधस्थितीं । सकळ भयांची निवृत्ती ।
गुरुवाक्ये यशकीर्तीं । विजयाप्राप्ति गुरुवाक्यें ॥५६॥
ते गुरुवाक्य निर्धारितां । विष्णु चालकु निजचित्ता ।
विष्णु इंद्रियांतें नेमिता । सर्व सत्ता विषूची ॥५७॥
जगी विष्णूचि एकात्मता । तेथे मी देता तो मागता ।
हे तंव न घडे तत्वता । सर्व सत्ता विष्णूची ॥५८॥
ऐसे विचारोनि चित्ता । विष्णुचरणी ठेविला माथा ।
मज अर्पिता । तुज अधीनता सर्वस्वें ॥५९॥
माझे सत्व तत्त्व तू आपण । माझे जीवन तू परिपूर्ण ।
माझे जे का मीपण । तेंही तू संपूर्ण महाविष्णु ॥६०॥
गिडी साखर दोनी एक । तैसा तू स्वामी मी सेवक ।
मज तुज नाही वेगळिक । भिन्नत्व देख वर्ततां ॥६१॥
श्रीविष्णूचा निजसेवक । म्हणता गरुडासी परम हरिख ।
मज तुझे सेवेचें परम सुख । दृष्टिसन्मुख मज राखावे ॥६२॥
पाहता तुझे श्रीमुख । फिकें होय समाधिसुख ।
चरणी ठेविला मस्तक । दृष्टिसन्मुख मज ठेवी ॥६३॥
ऐकोनि गरुडाचें वचन । विष्णु झाला संतुष्टमान ।
दृष्टीपुढें नित्यस्थान । दिधले नेमून गरुडासी ॥६४॥
गरुडे पृष्टी दिधली देवासी । देवे दृष्टी दिधली गरुडासी ।
उल्हास देवभक्तांसी । गरुड हरिसेवेसी विनटला ॥६५॥
गरुड विनटोनि श्रीहरीं । काया वाच मनेंकरीं ।
जाला विष्णूचा आज्ञाधारी । जोडिल्या करी तिष्ठत ॥६६॥
देवा भक्ता जाले युद्ध । युद्ध नव्हे तो महाबोध ।
एकाजनार्दनी विनोद । परमानंद रणरंगीं ॥६७॥
विष्णु म्हणे खगेश्वर । तू माझा आज्ञाधार ।
तरी गिळिला जो शस्त्रसंभार । तो द्यावा सत्वर शिवादिकां ॥६८॥
जी शस्त्रे त्रैलोक्यी दुर्धर । राहू न शकती सुरसुर ।
काळ कांपे अहोरात्र । ती त्वा समग्र गिळियेलीं ॥६९॥
दंड त्रिशूळ वज्र चक्र । शस्त्रे गिळिलीं अति दुर्धर ।
जाले यशाचे डोंगर । कीर्तिसागर त्वा भरिले ॥७०॥
शूर वीर तू धैर्यलाठा । श्रेष्ठ यश तुझा वांटा ।
त्याही यशाच्या बांधल्या मोठा । सुरवरिष्ठां देई शस्त्रे ॥७१॥
उभय पक्षांचा आक्रम । तुझ शस्त्रांचे नाही काम ।
अदट दाटुगा पराक्रम । शस्त्रे सुरोत्तम गौरवीं ॥७२॥
यशःकिर्तीच्या उत्तरीं । गरुड गौरविला श्रीहरीं ।
तेणे तो लोळें पायांवरी । आज्ञा शिरी वंदिली ॥७३॥
यमासि दंड इंद्रासी वज्र । त्रिशूळें पूजिला श्रीशंकर ।
चक्रें पूजिला चक्रधर । गरुडे समग्र सुखी केले ॥७४॥
पाचारोनिया प्रजापती । कंमडलु दिधला त्याचे हतीं ।
अवघे जयजयकार करिती । आलिंगिती गरुडातें ॥७५॥
पुढील अमृताची कथा । इंद्र सांगे विव्हला ।
सर्पा अमृत पाजिता । होईल तत्वता ते विष ॥७६॥
सर्पांसी पाजिलिया पीयूष । तेंही परतें होय विष ।
अमृतावांचोनियां देख । निःशेख मरतील ॥७७॥
सुखरांची हरावया भूक । देवे निर्माण केले पीयूख ।
ते सर्पामुखीं होतांचि विष । अमर निःशेष मरतील ॥७८॥
अमृत दिधलिया सर्पांसी । स्वर्गस्थ मरतील उपवासी ।
यालागी युद्ध केले गरुडासीं । बळे अमृतासी हरावया ॥७९॥
तंव येणे उभयपक्षमेळीं । मर्दोनि सुरासुरांची फळी ।
शस्त्रे गिळोनियां सगळीं । निघे तत्काळी अमृतासी ॥८०॥
तंव विष्णु सुबुद्धि तत्वता । युद्धी गरुड न जिंकितां ।
त्यासी केली दृढ आप्तता । सुरकार्यार्था सधावया ॥८१॥
विष्णूनें थोर ख्याति केली । गरुड जो का आतुबळी ।
तो आकळोनि निजबोलीं । शस्त्रे देवविली आम्हांसी ॥८२॥
घालागीं बोलावया निश्चिती । आम्हांसी जाली उपपत्ती ।
तोचि श्रीविष्णु अमृतार्थी । सांगेल युक्ती गरुडासी ॥८३॥
अमृतावांचोनि निश्चिती । अमर मरणाते पावती ।
तेव्हा गरुडाची यशःकीर्ति । तेचि अपकिर्ति होईल ॥८४॥
ऐकोनि इंद्राच्या वचनासी । विष्णु बद्धि सांगे गरुडासी ।
जेणे साधे दोन्ही कार्यांसी । ते तुजपासी सांगेन ॥८५॥
मातेचे व्हावया बंधमोचन । सर्पा न घडे अमृतपान ।
तैसे सांगेन विंदान । सावधान अवधारी ॥८६॥
सर्पांसी कळो न देता । कद्रूसी द्यावे अमृता ।
अशुचिदोषें होईल गुप्तता । होवोनि सुस्नाता अमृत घेईं ॥८७॥
अमृतकल गंगातीरी । म्या ठेविलासें दूर्वांकुरी ।
मातृबंधमोचन करी । भावे नमस्कारी कद्रूतें ॥८८॥
तुवा करितांचि नमन । कद्रु सवेचि संतोषोन ।
करील मातेचे बंधमोचन । उत्तीर्ण म्हणोन तू जाई ॥८९॥
पुढे सर्पासी अमृतपान । करु न देती सुरगण ।
काकस्वरुपें झडपोन । नेती आपण अमृतकुंभा ॥९०॥
ऐसी विष्णूची युक्ती । गरुडासी सांगे दैवी गती ।
तेचि गरुडे धरोनि चित्ती । कद्रूप्रती पै आला ॥९१॥
कुबेर दे रत्नकुंभासी । अमृते भरोनियां त्यासी ।
गरुड आला कद्रूपासी । कद्रु गरुडासीं तुष्टली ॥९२॥
गरुडे पाचोरोनि माता । कद्रूपासीं अमृत देता ।
बंधनिर्मुक्त विनता । उल्हासता तरी कद्रू ॥९३॥
म्हणे धन्य विनतेसी । गरुड जन्मला तुझिये कुशीं ।
घेवोनि आला अमृतासी । मुक्त मातेसही येणे केले ॥९४॥
ऐकोनि कद्रूचें वचन । गरुड सांष्टागे करी नमन ।
कद्रूनें गरुडा आलिंगन । आशीर्वचन निजविजयी ॥९५॥
अशुचि स्पर्शता हे अमृत । जेथींचें तेथे होय गुप्त ।
यालागी होवोनि सुस्नात । स्वीकारा समस्त अमृतातें ॥९६॥
अमृतकुंभ गंगातीरी । मी ठेविला दुर्वांकरी ।
स्नान करोनिया समग्रीं । अमृताहारीं बैसावें ॥९७॥
अमृतकलश ठेवून । गरुडे आक्रमिले गगन ।
विनता निर्मुक्त होवोन । आली आपण निजधामा ॥९८॥
अमृत सेवावया प्रीती । सर्प आल्हादे स्नानें करिती ।
तंव कावळे अमृतार्थी । नेणो किती मिळाले ॥९९॥
इंद्रासी अमृताचा कळवळा। होवोनि आला डोमकावळा ।
अमृतकलश झडपोनि नेला । सर्पीं केला हाहाकार ॥१००॥
अमृत नेतां झडकरी । ते सांडले दूर्वांकुरीं ।
तेणे दूर्वा अमर महीवरी । अद्यापिवरी टवटविती ॥१॥
अमृत नेतां पै डोमकावळा । सर्प सोडिती विषाच्या गरळा ।
नकुळ सुरसाह्या पावला । सर्पा केला महामार ॥२॥
गरुडगति ते आकाशी । नकुळगति ते विवरासीं ।
वेगी येवोनि सर्पांपासीं । युद्धकंदनासी मांडिलें ॥३॥
सविख उभारोनि फडा । सर्प धांविती अमृतचाडा ।
गरुडे नकुळ धाडिला गाढा । सर्पासीं झगडा तेणे केला ॥४॥
केले दुखंड तिखंड पंचखंड । एक सर्प केले नवखंड ।
जे जे आतुर्बळी प्रचंड । ते ते शतखंड नकुळें केले ॥५॥
सर्पीं कवळोनि चौपासी । मारु जाती नकुळासी ।
गरुड पाठिराखा आकाशीं। तेणे तो सर्पांसी नाटोपे ॥६॥
घारी गीध गरुडाची सेना । सर्पा झडपोनि नेती गगना ।
एवं पन्नग पावोनि कंदना । अमृतपानाते मुकले ॥७॥
नकुळ मार करी भूतळीं । गरुड गीध घारी अंतराळी ।
रणी सर्पा केली खंदळी । भेणे पाताळीं रिघाले ॥८॥
गरुडे कैसी केली युक्ती । साधोनि मातेची निर्मुक्ती ।
आम्हा मारविलें नकुळाहातीं । अमृप्राप्ती कागासी ॥९॥
काग नव्हेति ते सुरवर । यालागी गरुडे केला कैवार ।
नकुळें केला महामार । अति दुर्धर सर्पांसी ॥११०॥
दर्भीं सांडले अमृत उदंड । सर्प चाटिती लावोनि तोंड ।
दर्भे जिव्हा जाल्या दुखंड । दुःख प्रचंड तेणे त्यांसी ॥११॥
अमृतस्वादाचिये भुली । दर्भ चाटिता जिव्हा चिरिली ।
शेखी काकुळती उरली । शीख लाविली निजकपटें ॥१२॥
पितृभक्ति मातृभक्ती । तेणे गरुडासी अमृतप्राप्ती ।
कद्रुकपटाचिये गती । सर्पं पावती अति दुःख ॥१३॥
सद्भावें भगवत्प्राप्ति । असद्भावें अधोगति ।
भगवद्भक्तां सुखप्राप्ति । दुःखप्राप्ति अभक्तां ॥१४॥
सर्पांपासोनि परमामृत । गरुडाचेनि देवा प्राप्त ।
इंद्रादि देव समस्त । गरुडे निश्चित सुखी केले ॥१५॥
देव पावोनि परमामृत । कुंडें भरलीं पाताळगत ।
राखण ठेवोनि इत्थंभूत । सूर समस्त सुखी केले ॥१६॥
त्रैलोक्यविजयी महावीर । धीर शूर अति उदार ।
हा गरुडाचा बडिवार । सविस्तर सांगितला ॥१७॥
गरुडे सुखी कश्यप पिता । सुखी केली विनता माता ।
सुखी केले सुरा समस्ता । विष्णुही तत्वता सुखी केला ॥१८॥
ऐसी गरुडाची ख्याती । तो पितृव्य मजला श्रीरघुपती ।
आणि आम्ही अरुणाची संतती । जटायु संपाती दोघे बंधु ॥१९॥
द्वौ पुत्रौ विनतायास्तु कथितौ गरुडारुणौ ।
तस्माज्जातोऽहमरुणात्संपाती च ममाग्रजः ॥२॥
जटायुरिति मां विद्धि श्येनीपुत्रमरिंदम ।
सीतां च तात रक्षिष्ये त्वयि याते सलक्ष्मणे ॥३॥
जटायूचे स्ववंशवर्णन व रामास आश्वासन :
विनतेचे गरुड अरुण । त्याचे सांगितले कथन ।
अरुणाचें आम्ही दोघे जण । जटायु आणि संपाती ॥१२०॥
अरुणा पित्याची आज्ञा चोख । सूर्यवंशी व्हावे सेवक ।
तेथे जन्मले रघुकुळटिळक । विश्वतारक जगद्वंद्य ॥२१॥
याचिलागीं सूर्यवंशी । सख्य केले दशरथासीं ।
त्याचा तू श्रीराम भेटलासी । आजि भाग्यासी सभाग्यता ॥२२॥
ऐसे बोलोनिया जाण । जटायु घाली लोटांगण ।
श्रीरामे दिधले आलिंगन । समाधान तेणे त्यासी ॥२३॥
तुज पंचवटीं वसतां । सेवा सांगावी श्रीरघुनाथा ।
म्हणोनि चरणी ठेविला माथा । निजसेवकता मज द्यावी ॥२४॥
पंचवटीस सीता ठेवून । श्रीराम आणि लक्ष्मण ।
मृग मारु गेलिया दोघे जण । सीतासंरक्षण मी कर्ता ॥२५॥
श्रीराम असता नसता । मी रक्षीन नित्य सीता ।
तेथे राक्षसभयाची कथा वार्ता । मज असता जे कैंची ॥२६॥
माझिया पराक्रमापुढें । राक्षसबळ ते बापुडे ।
कोण पाहील आश्रमाकडे । चहूंकडे मी रक्षीन ॥२७॥
मी तराळ आश्रमापासीं । घरटीं करीन अहर्निशी ।
सुखें राहावे आश्रमासी । मी विघ्नासी नेदीं रिघो ॥२८॥
करिता श्रीरामनामस्मरण । विघ्न तेंचि होय निर्विघ्न ।
तेथे मी काय रक्षीन दीन । सेवा करीन सद्भावे ॥२९॥
पंचवटीस जावे आवश्यक । मार्गद्रष्टा मी सेवक ।
सीता सौमित्र रघुकुळटिळक । आल्हादे देख नेईन ॥१३०॥
ऐसी ऐकोनि जटायूची गोष्टी । श्रीराम चालिला जगजेठी ।
मग तिघे जणें उठाउठी । पंचवटीं पावलीं ॥३१॥
गंगाजळतटनिकटी । देखोनिया पंचवटी ।
आल्हाद तिघांचिया पोटी । गंगातटी बसावया ॥३२॥
श्रीरामे वसविली पंचवटी । श्रीरामासन्मुख दृष्टी ।
जटायु राहे पर्वतपृष्ठी । करीत घरटी अहर्निशी ॥३३॥
एकाजनार्दना शरण । श्रीराम सीता लक्ष्मण ।
केले पंचवटिके आगमन । राक्षसदळण येथोनि ॥३४॥
राक्षस वधावया बोहणी । श्रीराम करील येथूनी ।
सुरस कथा रामायणी । श्रोती सज्जनी परिसावी ॥१३५॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अरण्यकांडे एकाकारटीकायां
श्रीरामसीतालक्ष्मणजटायुपंचवट्यागमनं नाम सप्तमोध्यायः ॥७॥
॥ ओंव्या १३५ ॥ श्लोक ३ ॥ एवं ॥१३८॥
