वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ३. अरण्यकाण्ड - अध्याय २३ › १७. रावणाने सीतेचे हरण

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088080 · अभंग क्र. १७

17.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

अरण्यकाण्ड

॥ अध्याय सतरावा ॥
जटायु-रावण युद्ध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

सीतेला रथात बसवून रावणाचे प्रयाण :

रावण करोनि सीताहरण । सवेग निघाला आपण ।
ते काळींचें गमनलक्षण । सावधान अवधारा ॥१॥

वामेन सीतां पद्माक्षीं मूर्धजेषु करेण सः ।
ऊर्वोस्तु दक्षिणेनैव परिजग्राह पाणिना ॥१॥
ततस्तां परुषैर्वाक्यैरभितर्ज्य महास्वनः ।
अंकेनादाय वैदेहीं रथमारोहयत्तदा ॥२॥

सीता बैसवितां रथासी । आंग टाकिलें भूमीसीं ।
रावणे धरोनिया केशीं । वाहोनि अंकासी बैसे रथी ॥२॥
अंकी बैसवितां पद्माश्री । तेणे रावण जाला सुखी ।
सीता जाली परम दुःखी । धांवा पोखी आक्रंदे ॥३॥

सीतेचा विलाप, आक्रंदन व लक्ष्मणाबद्दल अनुताप :

धांव पाव गां श्रीरघुवीरा । सवेग धांवे गा सौमित्रा ।
धांवे गा सौमित्रा । रावणे हरुनि भिक्षाद्वारा । लंकापुरा मज नेतो ॥४॥
केउता राम केउता रावण । कैसे केले माझे हरण ।
म्या अभिशापिला लक्ष्मण । ते पाप पूर्ण मज फळले ॥५॥
सौमित्र निष्पाप हरिदास । तो म्या छळिला अति संत्रास ।
आता कायसी रामाआस । माझी निरास म्या केली ॥६॥
सौमित्रा रामी अनन्यभक्ती । तो म्या छळिला अति वक्रोक्ती ।
त्या पापाची सद्यःप्रचीती । रावणाहातीं आतुडले ॥७॥
श्रीरामाज्ञासंरक्षण । सौमित्र दवडिला म्या छळून ।
तेणे पापें मज रावण झोंटीं धरोन नेतसे ॥८॥
लक्ष्मण मज मानी जननी । मी त्यासी म्हणे करिसी पत्‍नी ।
तेणे पापें फुते अवनी । महापापिणी मी एक ॥९॥
लक्ष्मणी मिथ्या अभिशाप । ते मज माझे फळले पाप ।
मज म्या दिधला संताप । दुःख अमूप मज माझे ॥१०॥
जे पुढिलांसी करी छळण । तेणे छळें छळें आपण ।
ते मज फळले संपूर्ण । जे केशाकर्षण रावणे ॥११॥
छळणाची शीघ्र गती । सौमित्र पावला श्रीरघुपती ।
मी तंव पडले रावणाचे हाती । बंधप्राप्ती पावले ॥१२॥
छळछद्मवक्रदृष्टी । महापापिनी मी ये सृष्टी ।
आता कैची श्रीरामभेटी । दुखःकोटी मज माझी ॥१३॥
आता नव्हे श्रीरामभेटी । श्रीराम न देखे दृष्टी ।
सौमित्रछळणासाठीं । दुःखकोटी मज माझ्या ॥१४॥
छळवाद्याचे निजमुख । श्रीराम न पाहे निःशेख ।
मज म्या दिधले अति दुःख । ऐसी अधोमुख विलपत ॥१५॥
महापाप्या परम गती । श्रीरामनाम जपतां अंतीं ।
त्याची करिसी तू निर्मुक्ती । तैशिया गती मज पावें ॥१६॥
लक्ष्मणाच्या छळवादीं । होणारासारिखी घडली बुद्धी ।
तेणे लागलीसे आधी । कृपानिधे कृपा करी ॥१७॥
मी तंव श्रीरामाची दासी । मजही गांगिले राक्षसी ।
आपली ब्रीदें सत्य करावयासी । धांव धांवण्या श्रीरामा ॥१८॥
लक्ष्मणा तुझे चरणी माथा । जरी तू मज मानिसील माता ।
तरी माझ्या छळणोक्ती समस्ता । क्षमा सर्वथा कराव्या ॥१९॥
श्रीरामभक्त तू निष्पाप । तुज माजी नाही गा कोप ।
माझ्या छळणाचा संताप । कृपानुरुप सांडावा ॥२०॥

हा लक्ष्मण महाबाहो गुरुचित्तप्रसादक ।
ह्रियमायां न जानासि रक्षसा पापकर्मणा ॥३॥
जीवितं सुखमर्थं च धर्महेतोः परित्यजन् ।
ह्रियमाणामधर्मेण मां राघव न पश्यसि ॥४॥

लक्ष्मणाचा धावा :

लक्ष्मणा वेगी धांव पाव । सवे घेवोनि श्रीराघव ।
रावणाचा हरुनि गर्व । छेदी सर्व प्रातापें ॥२१॥
तू का मजवरी रुसलासी । तुझे चरण झाडीन केशीं ।
थोर गांगिलें राक्षसी । कवणापासीं मी सांगों ॥२२॥
नेणे परपुरुषाची मात । त्या मज रावणे लाविला हात ।
दुःखे करी आकांत । का रघुनाथ विसरला ॥२३॥
छळोनि दवडिलासी दुरी । तो कोप सांडोनि जिव्हारीं ।
ऐसिये आकांतावसरीं । पावें झडकरीं सौमित्रा ॥२४॥
तू जनक तूंचि जननी । सखा सांगाती जिवलग वनी ।
वेगी पावें कळवळोनी । मजलागोनि सोडवावया ॥२५॥
विराध वधिला जिये बाणी । तोचि बान लावोनि गुणीं ।
प्रातापतेजें यावे गर्जोनी । मजलागोनी सोडवावया ॥२६॥

रामाचा धावा करुन, त्यांना मृगासाठी पाठविल्याबद्दल मनस्ताप :

पाप आहे माझे माथा । म्हणोनी नुपेक्षीं श्रीरघुनाथा ।
तुझे श्रीरामनाम स्मरता । पाप सर्वथा मज नाही ॥२७॥
महापापाच्या पर्वतकोडी । श्रीरामनाम क्षणे विभांडी ।
येवोनि कृपेने तांतडी । माझी बांदवडी सोडवीं ॥२८॥
सोडावया देवांची बांदवडी । वना आलासी निजप्रौढीं ।
माझी फेडावया सांकडीं । घाली उडी श्रीरामा ॥२९॥
म्या पाठविले मृगापाठी । हेचि माझी बुद्धि खोटी ।
श्रीरामेंसी पडली तुटी । दुःखकोटी मज माझ्या ॥३०॥
मागतां मृगांची कांचोळी । सर्व सुखाची जाली होळी ।
श्रीराम अंतरला महाबळी । धांवण्यार्थ छळीं सौमित्रा ॥३१॥

स्त्रियांनी पतिजवळ मागणे करु नयेः

भ्रतारापासीं जे मागणे । ते स्त्रियेचें निद्य जिणें ।
मागण्यानिमित्त मज रावणे । आकर्षणे निजबंदीं ॥३२॥
भ्रतात जे दे संतोषोन । ते स्त्रियेसी अति पावन ।
स्वमुखें मागतां आपण । दुःख दारुण पावले ॥३३॥
माझ्या मागण्याची कथा । माझी मजचि आली घाता ।
बंदीं पडले लंकानाथा । श्रीरघुनाथा अंतरले ॥३४॥

सीतेचा अनुताप :

ऐसी अतुतापें संतप्ता । आपली आपण अपराधता ।
स्वये अनुवादे सीता । दुःखार्थ अति दुःखी ॥३५॥
दूरी अंतरला रघुनंदन । त्यापासी गेला लक्ष्मण ।
माझे अत्यंत आक्रंदन । दोघे जण नायकती ॥३६॥
माझे उत्तर पडतें कानी । दोघे येते अति गर्जोनी ।
रावणा बाणी निर्दळोनी । अर्धक्षणी सोडविते ॥३७॥
निरोप धाडावया श्रीरामासी । सीता पाहे द्विजशिष्यांसी।
ब्राह्मण पळाले धाकेंसीं । निजपल्यांसी घेवोनी ॥३८॥
ते वेळी सीता पाहे आपण । वृक्षवल्लींस रिघे शरन ।
श्रीरामा सांगावे आपन । मज रावण नेतसे ॥३९॥

आमंत्रये जनस्थानं कर्णिकारांश्च पुष्पितान् ।
नमस्करोम्यहं तेभ्यो भर्तुः शंसत मां हृताम्॥५॥
यानि कानिचिदप्यत्र सत्वानि विविधानि च ।
सर्वाणि शरणं यामि मृगपक्षिगणानपि ॥६॥
दैवतानि च यान्सस्मिन्वने विविधपादपे ।
क्षिप्रं रामाय शंसध्वं सीतां हरति रावणः ॥७॥
विदित्वा तु महाबाहुरमुत्रापि महाबलः ।
आनेष्यति पराक्रम्य वैवस्वतहृतामपि ॥८॥

पंचवटीतील सर्व चराचर सृष्टीला सीतेचा संदेशः

जनस्थानीचे जन वन । त्यांसीं घालितें मी लोटांगण ।
श्रीरामा सांगावे आपण । केले सीताहरण रावणे ॥४०॥
कर्णिकारादि बिल्व आम्र । समस्त वृक्षा नमस्कार ।
श्रीरामा सांगावे शीघ्र । सीता दशवक्र नेतसे ॥४१॥
गुल्म लता तृण पाषाण । दैवते श्वापदें पक्षिगण ।
त्यांसी माझे लोटांगण । सांगावे आपण श्रीरामा ॥४२॥
सिंह व्याघ्रादि श्वापदें क्रूर । त्यांसी माझा नमस्कार ।
धांवण्या धाडावा श्रीरघुवीर । दशशिर वधावया ॥४३॥
काग बक कारंडक । हंस मयूर चातक शुक ।
श्रीरामा सांगावे आवश्यक । सीता दशमुख नेतसे ॥४४॥
जळदेवता वनदेवता । आकाशींच्या गुप्त देवता ।
तुम्ही सांगावे श्रीरघुनाथा । रावण सीता नेतसे ॥४५॥
श्रीरामा सांगावया जाण । वाचा पावोत तृण पाषाण ।
तिही सांगावे संपूर्न । सीता रावन नेतसे ॥४६॥
विनवीतसें पंचभूता । तुम्ही सांगावे श्रीरघुनाथा ।
धांवण्या धाडावा शीघ्रता । लंकानाथा वधावया ॥४७॥

रामांना समजल्याबरोबर ते मागोमाग येतीलच असा तिला विश्वास :

न भेटेता जनकबाळी । स्वर्ग मृत्य़ु आणि पाताळीं ।
श्रीराम घेवोनि घरधांडोळी । मज तत्काळी आणील ॥४८॥
माझे ऐकता हरण । सवेग येवोनि लक्ष्मण ।
रागे निर्दाळील रावन । अर्ध क्षण न लागता ॥४९॥
रामे ऐकता माझे हरन । जेथींचा तेथे सोडोनि बान ।
घायीं रावणाचा घेईल प्राण । सोडवण तेणे माझी करील ॥५०॥
लोकालोककुळाचळीं । लपविल्याही जनकबाळी ।
राम राक्षसा करील होळी । मज तत्काळी सोडविल ॥५१॥
रावणे माझा केलीया घात । ऐसा प्रतापी श्रीरघुनथ ।
पाडोनियां यमाचे दांत । मज निश्चित आणील ॥५२॥
माझिया प्रेमाचे आवडी । श्रीराम काळाची मुरडील नरडी ।
तेथे राक्षसें कोण बापुडीं । बाणी रोकडी निर्दळील ॥५३॥
ऐसिया प्रतापी श्रीरघुनाथा । माझिया दुस्तर आकांता ।
का पा न पवसीच तत्वता । म्हणोनि सीता विलपत ॥५४॥
सीता स्वये येचि अर्थीं । ज्या त्या येतसे काकुळती ।
सुद्धि सांगावी श्रीरघुपती । रावणवधार्थी शीघ्र यावे ॥५५॥
धांव पाव श्रीरामचंद्रा । वेगी यावे श्रीसौमित्रा ।
मज गांजिलें राक्षसेंद्रा । कृपासमुद्रा का न पावसी ॥५६॥
मरमर पापिया अदृष्टा । दुःखे फळलेंसी दुष्टा ।
वंचोनि श्रीरामवरिष्ठा । वश्य दुष्टा मज केले ॥५७॥
मी जनकबाळा जानकी । श्रीरामाची निजसेवकी ।
रावणे दुष्टे केले दुःखी । दशमुखी निर्बंध ॥५८॥
श्रीरामा तुझी अगाध थोरी । तुझे देहागार फोडिलें चोरीं ।
चोरोनि नेली तुझी अंतुरी । हे चराचरी तुझ लाज ॥५९॥
आपले लाजेकारणें । माझे करावे धांवणे ।
ऐसे सीतेचे आक्रंदणे । दीर्घस्वरे विलपत ॥६०॥
ऐकता सीताविलपन । व्याघ्रसिंहादि करिती रुदन ।
वृक्ष स्रवती संपूर्ण । गळती लोचन पक्ष्यांचें ॥६१॥
दुःखे फुटों पाहे अवनी । दुःखे द्रव आला पाषाणीं ।
दुःख न समाये गगनी । ऋषिजनी आकांत ॥६२॥

सीतेचा धावा ऐकून रावण घाबरला व तो आकाशमार्गाने जाऊ लागला :

ऐकोनि सीतेचे रुदन । रावण झाला कंपायमान ।
वेगे आलिया रघुनंदन । माझा प्राण घेईल ॥६३॥
जेणे मारिले खर दूषण । मारीच मारीला विंधोनि बाण ।
विराध मारिला संपूर्ण । अर्धक्षण लागेना ॥६४॥
ताटका सुबाहु मारिला जांण । विराध मारिला संपूर्ण ।
तो श्रीराम माझा घेईल प्राण । ऐसी रावणा धुकधुकी ॥६५॥
सीता करील दीर्घ रुदन । तिसी देवोनि आलिंगन ।
रथी बैसोनि रावण । लंघी गगन अति धाके ॥६६॥
रावणाची शक्ति केसी । सीता धरोनि पोटासीं ।
रथ चालवी आकाशी । येरी आक्रोशी आक्रंदे ॥६७॥
ऐकोनि आक्रंदतां सीता । तंव जटायु आला सकोपता ।
माझिया स्वामीची हे कांता । तिये गांजिता तू कोण ॥६८॥

ततः पर्वतकूताभस्तीक्ष्णतुंडः खगोत्तमः ।
वनस्पतिगतः श्रीरामान्व्याजहार शुभां गिरम् ॥९॥
दशग्रीवः स्थितो धर्मे पुराणे सत्यसंश्रवः ।
भ्रातस्त्वं निदितं कर्म कर्तुं नार्हसि सांप्रतम् ॥१०॥
राजा सर्वस्य लोकस्य रामो दशरथात्मजः ।
तस्यैषा लोकनाथस्ये धर्मपत्‍नी यशस्विनी ॥११॥
सीता नाम वरारोहा यां त्वं हर्तुमिहेच्छसि ।
कथं राजा स्थितो धर्मे परदारान्परामृशेत् ॥१२॥

मार्गांत जटायूचे आगमन :

रावणे सीता हरिता । तंव जतायु वनक्रीडे गेला होता ।
ऐकोनि जानकी आक्रंदतां । सवेगता तो आला ॥६९॥
त्रैलोक्यराजा श्रीरघुनाथ । मी जटायु श्रीरामभक्त ।
तू रावणा अति उन्मत्त । सीतेसी हात लाविता॥७०॥
पर्वतप्राय महाबळी । मी असता ये वनस्थळी ।
केवी नेसील जनकबाळी । रणरांगोळी मी करीन ॥७१॥
पंचवटीं आश्रमानिकट । बैसलें असता माझे मेट ।
तुज कैसेनि फुसेनि फुटेल वाट । महानष्ट तू परद्वारी ॥७२॥
श्रीरामारायाची अंतुरी । नेऊ पाहसी करोनि चोरी ।
चोरासी मी जीवे मारीं । तुझी उरी उरो नेदी ॥७३॥
चोरापासीं वस्तुजात । सोडवोनि करी घात ।
तेंवी सीता सोडवोनि येथ । तुझा निःपात करीन मी ॥७४॥
चौदा चौकड्यांचे राज्य शिरी । शेखी करों धांवसी चोरी ।
जळो रावणा तुझी थोरी । पापी परद्वारी महानष्ट ॥७५॥

यस्य त्वं लोकनाथस्य हत्वा भार्यां गमिष्यसि ।
वृंतादिव फलं त्वां तु पातयेयं रथोत्तमात् ॥१३॥

त्रैलोक्यस्वामी श्रीरघुनाथ । त्याची चोरोनि नेतां कांता ।
तुझ्या करीन निःपाता । जेंवी सदेंठ वृंताक ॥७६॥
जैसी का परिपक्क फळे । सदेंठ झडती वायुबळें ।
तैसी तुझी कंठनाळें । दाही शिरकमळे छेदीन ॥७७॥

जटायूने आपल्या पंखांच्या तडाख्याने रावणाचा रथ थांबवून त्याला युद्धाचे आव्हान :

जटायुपक्षवात दुर्धर । न चले रावणाचा रहंवर ।
मागे ओसरले रथाचे खर । तंव दशशिर क्षोभला ॥७८॥
धनुष्या वाहोनिया गुण । जटायु लक्षोनिया पूर्ण ।
नाळीकनाराचांचे वर्षे बाण । युद्ध दारुण मांडिले ॥७९॥
तुझ्या शस्त्रांचा कडकडाट । नखी पाखी करीन पीठ ।
माझी चंचु अति तिखट । दाही कंठ छेदीन ॥८०॥
अरे मी जटायु न भेटतां । रावणा तुझी प्रतापता ।
हिरोनि नेता श्रीरामकांता । तुज मी आता मारीन ॥८१॥
रावण कायसे बापुडे । दाहा तोंडांचें जड किडे ।
हाणोनियां चंचुवाडें । सवक्त्र हाडे फोडीन ॥८२॥
चोरिता श्रीरामाची कांता । किर्ति पळाली अपकिर्तिता ।
पापें शक्ति गेली लंकानाथा । तुज मारिता क्षण न लागे ॥८३॥
पापें जालासी निर्वीर्य । तुज युद्धी कैंचें धैर्य ।
मारोनियां राक्षस सर्व । श्रीरामकार्य साधीन ॥८४॥

रावण-जटायू युद्ध :

रावण वर्षे दुर्धर बाण । जटायु पांखीं उडवी पूर्ण ।
बाणप्रताप जाला क्षीण । रागे रावण क्षोभला ॥८५॥
जटायुपांखांच्या झडाडीं । विसां हाता वळें वेंगडी ।
दाही शिरें कांपती गढीं । धनुष्य ओढी न ओढवे ॥८६॥
जटायुपक्षांच्या आवर्ता । आवर्ती पाडीले लंकानाथा ।
पुढे ढळो नेदी रथा । अति विघाता पेटला ॥८७॥

युद्धामुळे मार्गात विलंब होऊअ लागल्यामुळे रावणाला राम येण्याची भीती :

रावण पावला आकांता । जटायु ढळो नेदी रथा ।
मागोनि आलिया श्रीरघुनाथा । माझ्या घाता तो करील ॥८८॥
मारीच बोलला सत्य वचन । करु जाता सीताहरण ।
आम्ही दोघे पावों मरण । ते प्रमाण दिसताहे ॥८९॥
नाही इंद्रजित कुंभकर्ण । नाही साह्य सैन्य प्रधान ।
मज मारिता राखेल कोण । अति उद्विग्न लंकानाथ ॥९०॥
अति प्रायासे सीता आली हाता । हे पावल्या लंकेआंतौता ।
तेथे येवो न शके रघुनाथा । दुर्घट पंथा क्रमेना ॥९१॥
लंकादुर्ग आणि गूढ । भोवता समुद्राचा अगड ।
श्रीराम मानवी अति जड । मार्ग अवघड कंठेना ॥९२॥
परी प्रस्तुत जटायु दारुण । दृढ ओढवले विघ्न ।
हे शंकरे करावे निवारण । लंकाभुवन तो पाववो ॥९३॥
पुढे जटायु मार्गरोधन । मागोनि आलिया श्रीरघुनंदन ।
माझा घेईल तो प्राण । धाके रावण धुकधुकी ॥९४॥
एकेचि वेळें शतबाण । जटायूतें विंधी रावण ।
येरें चुकविलें तळपोन । आला कोपोन झडपित ॥९५॥

ततोऽस्य सशरं चापं मुक्तामणिविभूषितम् ।
पक्षाभ्यां स महातेजा बभंज पतगेश्वरः ॥१४॥
सारथिं सस्थोपस्थं स जघान नखांकुरैः ।
कांचनोरश्छदान्दिव्यान्पिशाचवदनान्खरान् ॥१५॥
पुर्णचंद्रप्रतीकाशं छत्रं च व्यंजनैः सह ।
पातयामास वेगेन ग्राहिभी राक्षसैः सह ॥१६॥

रावणबाणाविषयी जतायू निर्भय, रावणाचे धनुष्य मोडून, मुकुट पाडून शरीरावर हल्ला :

रावणाच्या धनुष्यावरी । मुक्ताफळांच्या झालरी ।
सुवर्णबद्ध मणिमय मंजरी । घेवोनि करी विंधित ॥९६॥
जटायूने सवेग पांखीं । रावण झडपिला दाही मुखीं ।
चाप छेदोनि सांडिलें नखी । मुकुट मस्तकींचा पाडिला ॥९७॥
सवेंचि ध्वज छेदिला चांग । शशांकछत्राचा केला भंग ।
रावणाचे अंगप्रत्यंग । नखी सवेग विदारी ॥९८॥
जटायुपक्षवातावर्त । रावण चळचळां कापत ।
चंचूनें धरोनिया रथ । गगनाआंत उचलिया ॥९९॥
मग सीता धरोनि पोटासीं । रावण उडी टाकी वेगेंसीं ।
पिशाचवदन खर रथासी । नखाग्रेंसीं मारिले ॥१००॥

रावणाचा रथ, घोडे, सारथी यांचा विध्वंस :

तेथोनि टाकिता रहंवर । सारथी वारुवेसीं शतचूर ।
दणकां दुमदुमलें अंबर । दशशिर चळीं कांपे ॥१॥
मुहूर्ती केला छत्रपात । भंगिले चाप भंगिला रथ ।
रावण केला हताहत । धन्य पुरुषार्थ जटायूचा ॥२॥
देखोनि जटायु साटोप । स्वर्गी देव वानिती प्रताप ।
धन्य धन्य जटायूचे तप । केला प्रताप रामकाजीं ॥३॥
रावण विचारी निजचित्ता । जटायु आलिया न जिरे सीता ।
इसी सांडोनिया जाता । आली कघुता तिही लोकी ॥४॥
सहित पार्वतीमहेश । म्या आंदोळिला गिरि कैलास ।
आणी जिंकोनि कुबेरास । विमानास हरितलें ॥५॥
देवांचिया अमित कोडी । अद्यापि माझे बांदवडी ।
त्याहीं माझी गर्वझाडी । केलीं रोकडी येणे पक्षे ॥६॥
जटायुचंचु अति तिखट । शस्त्रसमुदाय केला सपाट ।
यापोसोनि न फुटे वाट । परम कष्ट रावणा ॥७॥

स भग्नधन्वा विरथो हताश्वो हातसारथिः ।
अंकेनादाय वैदेहीं पपात भुवि रावणः ॥१७॥

भंगिले धनुष्य भंगिला रथ । सारथि वारुवां केला घात ।
विरथी पदाती लंकानाथ । मग कपटार्थ मांडिला ॥८॥

रावण गुप्तरुपाने आकाशमार्गाने जातो :

राक्षसाची गुप्तस्थिती । कडिये घेवोनि सीता सती ।
रावण निघे खेचरगती । गगनपंथीं अति गुप्त ॥९॥
परी जटायूसी अरुणभेटी । त्यास सहज दिव्यदृष्टी ।
तेणे सीता नेतां देखोनि दृष्टी । रावणापाठीं लागला ॥११०॥

स विदार्य नखैस्तीक्ष्णैस्तस्य पृष्ठं समंतः ।
केशांश्चोत्पाटयामास नखपक्षमुखायुधः ॥१८॥
स तदा गृध्रराजेन किश्यमानो मुहुर्मुहुः ।
ततः क्रोढाद्दशग्रीवः सीतामुत्सृज्य वीर्यवान् ॥१९॥

तरीही जटायूने त्याला मार्गात गाठून घायाळ केले :

जटायु धांवला सरोखीं । सबळ बळे निजपांखीं ।
रावण झडपिला दाही मुखी । विदारी नखी सर्वांग ॥११॥
तिखत नखे दशशिरा । सर्वांगी लागल्या रुधिरधारा ।
देहांत मांडला दशशिरा । साह्य दुसरा नाही कोणी ॥१२॥
नखे पाखें चंचु तीक्ष्ण । घायीं घायवटला रावण ।
आता माझे न वांचिती प्राण । योद्धा दारुण जटायु ॥१३॥
जटायु तळपोनि आकाशी । केंस उत्पाटी दाढी मिशी ।
भेणे रावण कासाविसी । जीविता शेंसी सांडिले ॥१४॥

सीतेला सोडून रावण पळाला :

मारिचवाक्य सत्यभाषण । करिता जानकीचे हरण ।
अवश्य पावसील मरण । ते प्रमाण दिसताहे ॥१५॥
रावण म्हणे जानकी नेता । जटायु करील माझ्या घाता ।
भेणे सांडोनिया सीता । होय पळतां लंकानाथ ॥१६॥
जटायूने गांजिलें वनी । वेगी धांवा पावा कोणी ।
ऐसा रावण आक्रंदोनी । सीता सांडोनि पळाला ॥१७॥

सीता मुक्त झाल्यावर जटायूचे तिला अभयवचन :

तंव जटायु म्हणे लंकानाथा । जरी तुवा सांडिली सीता ।
तरी तुज न मारीं सर्वथा । जिवदान तुज दिधले ॥१८॥
रावणापासोनि जानकी । सुटोनि जाली अति सुखी ।
जटायु दाटुगा तिही लोकी । केवळ पक्षी म्हणो नये ॥१९॥
सीताहरण महापाप्यासी । उपडोनि दाढ्या मिशांसी ।
प्रायश्चित दिधले रावणासी । जटाय ऋषि धर्मात्मा ॥२०॥

स्वर्गस्थ देवांना चिंता :

जटायु सोडवितां सीतेसी । तंव स्वर्गी हडबड देवांसी ।
बंधनिर्मुक्त नव्हे आम्हांसी । सीता लंकेसी न वचता ॥२१॥

रावणाने परत येऊन जटायूला द्वंद्वंयुद्धाचे आव्हान दिले, पुन्हा रावणाचा पराजयः

ऐसे देवांचे मनोगत । तंव रावण जाला सावचित्त ।
मग होवोनिया निजयुद्धार्थ । पाचारित जटायूसी ॥२२॥
सीता होती मजपासीं । तेणे त्वा केले कासाविसी ।
आता युद्ध सावकासी । पुरुषार्थेसीं करु दोघे ॥२३॥
गुंफेसी नसतां श्रीरामलक्ष्मण । शून्य मंदिरी रिघे श्वान ।
तेंवी तुंवा सीता चोरुन । पलायमान भयभीत ॥२४॥
तुज कैचे दांदुलेपण । वेगी पळसी रामाभेण ।
मजसी करु पाहसी रण । तरी आंगवण पाहो तुझी ॥२५॥

तर्योर्महति संग्रामे बभूवातुलविक्रमः ।
राक्ष्सांना च मुख्यस्य पक्षिणां प्रवरस्य च ॥२०॥

दहा शिरे वीस भूजा । राक्षसांचा मुख्य राजा ।
पक्षी पावला युद्धा पैजा । बळसमाजां वरिष्ठ ॥२६॥
रावणाचे शस्त्र शर । पूर्वी जटायूने केले चूर ।
आता निजांगें दशशिर । मुष्टिप्रहार हाणों धांवे ॥२७॥
ऐसा अति क्रोधे दशशिर । बळे हाणिता करप्रहार ।
तंव नखे विदारिला कर । वेगे दुर्धर जटायु ॥२८॥
रागे हाणिता दृढ लात । तंव चंचुघाते करोति घात ।
रावण केला अस्ताव्यस्त । मग लंकानाथ गजबजिला ॥२९॥
तळपोनियां गगनी भरे । झडपा हाणोनी दाही शिरें ।
मस्तक भेदी चंचुचक्रें । मुखे नखाग्रें विदारी ॥३०॥
नखी पांखी चंचुधारें । रावणा लागले घायवारे ।
धाके धाके जिकडे सरे । तिकडे नखाग्रें मारिजे ॥३१॥
जटायुपक्षांचा आघात । रावण उडविला नभाआंत ।
गगनी भोवंडोनि आवर्त । पाडिला मूर्च्छित अधोमुख ॥३२॥
येथोनि पुरे पुरे रण । रावण दांतीं धरी तृण ।
अकाली ओढवले मरण । जटायु प्राणघातक ॥३३॥
मी म्हणे हे पाखरुं । परी हा धीर वीर महाशूरु ।
विसां बुजांचा केला चूरु । अति दुर्धरु जटायु ॥३४॥
जटायुनें लाविली सीक । दाही मुखेसीं विमुख ।
रावण पाडिला अधोमुख । जीवा संकट मांडले ॥३५॥
न चलेबळाची आंगवण । परम दुःखी जाला रावण ।
मग करावया जटायुछळण । कपट पूर्ण मांडिले ॥३६॥
मग रावण म्हणे लवला ही । दोघे झुंजों उसिणाघायीं ।
तंव जटायु म्हणे तुज शक्तीच नाही । उसिणें कैं फेडशील ॥३७॥
घाय आणितां ( हाणिता ) सवर्म । न पळे न ढळे तो योद्धा परम ।
तू नेणसी युद्धधर्म । व्यर्थ आक्रम बळाचा ॥३८॥

रावणाचे कपटी वर्तन. परस्परांचे मरण कशात आहे ते सांगावे, जटायूला रामांची शपथ :

घालोनि श्रीरामाची आण । जटायूसी पुसे रावण ।
तुझे कोणे ठायी मरण । सत्य संपूर्ण मज सांगे ॥३९॥
पडलिया अति आकांती । ओढवल्याही अंतगती ।
हरिभक्त असत्य न बोलती । जाण निश्चिती पक्षिनाथ ॥४०॥
भावार्थ दावोनि उदंड । मधुर शब्दीं असत्य लंड ।
त्याचे मुख नरकुंड ( नरककुंड ) । काळे तोड तयाचे ॥४१॥
जटायु म्हणे रावणासी । जरी तू निजमृत्यु सांगसी ।
तरी मी सांगेन तुजपासी । येरयेरांसी नेम जाला ॥४२॥

त्याप्रमाणे जटायू खरे व रावण खोटे सांगतो :

घातली श्रीरामाची आण । तरी असत्य न बोले गेलिया प्राण ।
दोही पाखी माझे मरण । सत्य संपूर्ण वदे पक्षी ॥४३॥
रावण छळवादी पातकी । मृत्यु सांगे ।
वामांगुष्ठनखी । जटायु सांगे दोही पाखी । युद्धसात्विकी सत्यवादी ॥४४॥

जटायूच्या मर्मावर रावणाचा आघात, अवंढापट्टा येथे रावणाचा अंगठा पडतोः

जटायु तळपोनियां देख । छेदिलें वामागुष्ठनख ।
तव हातातहीं आले पांख । येरें निःशंक उपडिले ॥४५॥
रावणाचा छदिला आगोठा । तेथे जाला अवंढापट्टा ।
त्रिंबकीच्या निकट घाटा । अवंढापट्टा प्रसिद्ध ॥४६॥
जटायूस येता मरण । पडल्या करीत श्रीरामस्मरण ।
नष्ट रावणे केले छळण । कुळ निर्दळण देखसी ॥४७॥
छळवादी अति दुष्ट । परम पापी क्रियानष्ट ।
परदारी अति पापिष्ट । भोगिसी कष्ट छळणाचें ॥४८॥
छळणाच्या कपटनिष्ठीं । जटायु मूर्च्छित पडला सृष्टी ।
श्रीरामाच्या निजभेटीं । आत्मा कंठी धरिलासे ॥४९॥
मुखीं श्रीरामनामस्मरण । चित्ती श्रीरामचिंतन ।
नयनी श्रीरामावलोकन । हृदयी ध्यान श्रीरामाचे ॥१५०॥

जटायू श्रीरामदर्शनाची वाट पाहात नमस्कार करीत राहातो :

श्रीरामरुप देखे पाषाण । श्रीरामरुप देखे तृण ।
वृक्ष वल्ली वन उपवन । देखे संपूर्ण श्रीराम ॥५१॥
श्रीरामकाजीं वेंचिता प्राण । श्रीराम कृपाळु आपण ।
सर्वरुपें स्वये संपूर्ण । आला वोरसोन भेटीसी ॥५२॥
जटायूचे निजपोटीं । अंतीं श्रीराम देखावा दृष्टी ।
देह पडता स्वये सृष्टी । आला भेटी निजभक्ता ॥५३॥
रावण नव्हे माझा वैरी । तो तंव परमार्था साह्यकारी ।
श्रीराम भेटविला चराचरी । सुखसागरीं सुखी केले ॥५४॥
निजभक्तांचें मनोगत । पुरवूं जाणे श्रीरघुनाथ ।
जटायु जन्ममरणातीत । आनंदभरित सुखी केला ॥५५॥
एकाजनार्दना शरण । जटायु छळणें वधी रावण ।
पुनरपि तो सीताहरण । करील आपण ते ऐका ॥१५६॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अरण्यकांडे एकाकारटीकायां
जटायुच्छनवधो नाम सप्तदशोध्यायः ॥१७॥
॥ ओव्या १५६ ॥ श्लोक २० ॥ एवं १७६ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग