संत चोखामेळा
2267.
संत चोखामेळा
चोखामेळियाने पाजियेले दही । पडो दिले नाही उणे त्याचे ॥१॥
तयाचे चरित्र परिसावे सादर । करितो नमस्कार सतजना ॥२॥
तयाची जे कांता तयाच सारिखी । भावार्थ नेटकी आवडीची ॥३॥
साधन द्वादशी आली एके काळी । उठोनि प्रात :— काळी काय बोले ॥४॥
उठी उठी कांते स्वयंपाक करी । आता येतील हरि पारण्यासी ॥५॥
तंव एक्या ब्राम्हणे आइकिली मात । तेणे दिवाणांत सांगितले ॥६॥
दिवाणाने दूत उआठविले त्यासी । चोखामेळियासी धरूनि आणा ॥७॥
दूती जाऊनिया धरुनी आणिले । म्हणे काय झाले चोखामेळा ॥८॥
विठोबासी दही पाजीत असता । कांहो माझ्या हाता आंसडीले ॥९॥
रडतो हा कांरे सभेसी पुसती । तो म्हणे वृत्तांत ऐसा झाला ॥१०॥
रुसूनिया विठो गेल म्हणऊनि । रडे दीर्घध्वनी करूनिया ॥११॥
म्हणती या महाराने देव बाटविला । जिवे मारायाला बैल जुंपा ॥१२॥
बांधोनिया पाय हांकियले बैल । धरूनि शिवळ विठो उभा ॥१३॥
उडती आसुड बइलांचे पाठी । मारिता हिंपुटी थोर झाली ॥१४॥
तयाची ते कांता उभी राहूनिया । म्हणे देवराया हात काढी ॥१५॥
खाइले जेविले त्याचा हा उपकार । दुबळीचा भ्रतार मारू पाहसी ॥१६॥
पाळिले पोसिले माझिया धन्याशी । उतराई झालासी ओढावया ॥१७॥
अन्नाची त्वा क्रिया नाहींरे राखिली । रांडकी त्वा केली चोखियाची ॥१८॥
काढी हात आता जाय परता उसण्या । जया पोट पोसण्या येथूनिया ॥१९॥
चोखा म्हणे रांडे विश्वाचा पोसणा । संतांचा देखणा विठो माझा ॥२०॥
जन लोक पुसती कोणा बोलतीस । ते म्हणे तुम्हांस काय दिसे ॥२१॥
अनंत ब्रम्हांडे जयाचे उदरी । त्याने चहूंकरी धरियले ॥२२॥
पीतांबरधारी घन:शाम मूर्ती । रखुमाईचा पति विठ्ठल हा ॥२३॥
समस्तांसी तेव्हा दिले दरुशन । केले समाधान नामा म्हणे ॥२४॥
