भक्ती ते नमन वैराग्य
2128.
भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग । ज्ञान ब्रह्मी भोग ब्रम्हा तनु ॥१॥
देहाच्या निरसने पाविजे या ठाया । माझी ऐसी काया जव नव्हे ॥धृपद॥
उदक अग्नी धान्य जाल्या घडे पाक । एकाविण एक कामा नये ॥२॥
तुका म्हणे मज केले ते चांचणी । बडबडीची वाणी अथवा सत्य ॥३॥
अर्थ :
सर्व भूतमात्रांमध्ये एक देव आहे असे समजून सर्वांना नमस्कार करणे याला भक्ती म्हणतात. कोणत्याही गोष्टीची आसक्ती न करून त्याग करणे याला वैराग्य म्हणतात आणि ब्रम्ह स्वरूपाचा अनुभव घेऊन किंवा भोग घेऊन शरीर ब्रम्हरूप करणे याला ज्ञान म्हणतात. ज्यावेळी देहाविषयी संपूर्ण भावनेचा निरास होतो त्यावेळेस आपल्याला ब्रम्ह स्थिती प्राप्त होते जर देह माझा किंवा मी देहाचा आहे अशी भावना असेल तर त्यावेळी अशी ब्रम्हस्थिती प्राप्त होत नसते. जर स्वयंपाक करायचा असेल तर पाणी अग्नि आणि धान्य या तीन गोष्टी लागतात यापैकी एक जरी नसेल तर स्वयंपाक होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात जर कोणी भक्ती ज्ञान आणि वैराग्य याविषयी बडबड करू लागला तर तो सत्य बोलत आहे किंवा त्याला या तीनही स्थिती प्राप्त आहेत किंवा नाही याविषयी सत्यता पडताळण्याची किंवा त्याविषयी चाचणी करण्याचे मला चांगलेच कळते.
