जप तप कर्म क्रिया ने
81.
जप तप कर्म क्रिया नेम धर्म ।
सर्वांघटी राम भाव शुद्ध ॥१॥
न सोडी हा भावो टाकी रे संदेहो ।
रामकृष्ण टाहो नित्य फोडी ॥२॥
जाति वित्त गोत कुलशील मात ।
भजका त्वरीत भावयुक्त ॥३॥
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी ।
वैकुंठभुवनी घर केले ॥४॥
अर्थ :
जप तप वेदोक्त कर्मेसर्व नित्यनेम हे धर्माधिष्टित असुन त्यामुळे सर्वांमध्ये रामनामाचा भाव शुध्द रुपाने मनात बसतो. हा भाव सतत मनात ठेऊन संदेह टाकुन सतत रामकृष्ण नामाचा टाहो फुटावा. जाती, संपत्ती, कुळ ह्याचा आभिमान न धरता त्वरित भावनायुक्त मनाने हरिनाम घ्यावे. माझ्या मनात मी सतत हरिनाम जपल्याने मी वैकुंठालाच माझे घर बनवले असे माऊली सांगतात.
