जाणीव नेणीव भगवंती न
82.
जाणीव नेणीव भगवंती नाही ।
हरिउच्चारणी पाही मोक्ष सदा ॥१॥
नारायण हरि उच्चार नामाचा ।
तेथे कळिकाळाचा रीघ नाही ॥२॥
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी ।
ते जीवजंतूंसी केंवी कळे ॥३॥
ज्ञानदेवा फळ नारायण पाठ ।
सर्वत्र वैकुंठ केले असे ॥४॥
अर्थ :
हा हुशार हा अनाडी हे भगवंत जाणत नाही. तो फक्त कोण सतत नामजप करते तेच पाहतो. व त्याला मोक्ष देतो. ज्याने नारायण हरि ही नामे जपली त्याला कळीकाळाची फिकिर करण्याचे कारण नाही. जो सतत नाम घेतो तो प्रमाणभूत होतो. ज्या हरिचे वर्णन वेदांना करता आले नाही ते जीवजंतुना कसे समजणार? सतत नारायण नामाचा पाठ केला तर सर्वत्र वैकुंठ निर्माण झाले आहे असे दिसते. असे माऊली सांगतात.
