येऊनि जाऊनि करी गौळण
204.
येऊनि जाऊनि करी गौळणीचे कोड ।
पुरवूनि सकलही अंतरींची चाड ।
नेदी प्रेम त्याचे खंडो करी वाड ।
ऐसा कृपाळू हा सुखाचा सुरवाड वो ॥१॥
धन्यभाग्याचा त्या जन्मल्या संसारी ।
ज्यांचे ध्यानी मनी नित्यकाळ हरी ।
करीता काम काज दृष्टी यावरी ।
बोलता चालता जेविता निरंतरी वो ॥२॥
त्यांचा विकिला ऐसा रावे त्यांच्या घरी ।
पडिले काम काज तेहि आपण करी ।
नवचे पळभरी त्या सांडूनिया दुरी ।
त्यांची न लाजोचि म्हणविता कामारी वो ॥३॥
त्यांचा येवजाव सासुरे माहेर ।
झाला आपणाचि लेणे अलंकार ।
अवघे धन वित गोत परिचार ।
झाला नाम रुप दीर भावे वर वो ॥४॥
नेदी उरो त्या आणिक दुसरे ।
विण आपण वो सोयरे धायरे ।
गाई म्हशी पशु पोटींची लेकुरे ।
झाला घरदार त्यांचे एकसरे वो ॥५॥
खाती जेविती ते भोग सकळही ।
झाला आपणाचि संचरोनि देही ।
नेदी आपपर ऐसे दिसो काही ।
निळा म्हणे ऐसी ऐक्याची नवाई वो ॥६॥
