ऐसे एकोनिया यशोदा ।
108.
ऐसे एकोनिया यशोदा ।
म्हणे तरी मी न सोडी तूते कदा ।
अंतरले काम माझा धंदा ।
राहे गोविंदा ऐसाचि ॥१॥
बोलोनिया ते ऐसे गेली ।
आपुल्या कामा वरीपडि झाली ।
पुढे कृष्णे युक्ति केली ।
अति विचित्र ते ऐका ॥२॥
मग त्या उपडुनिया उखळा ।
आला बाहेरी तया वेळा ।
दावे तैसेचि असता गळा ।
उखळ आडकवी वृक्षेसी ॥३॥
विमलारर्जुन कुबेरनंदन ।
नारदवचने शाप पावेन ।
होते राहिले वृक्ष होऊन ।
कृष्णचरणस्पशें उध्दरावया ॥४॥
त्याचे उदित झाले भाग्य ।
यालागी येऊनिया श्रीरंग ।
करिते झाले तो प्रयोग ।
सावध मने परियेसा ॥५॥
ते उभयताहि शेजारी ।
वाढले होते दिव्य सहस्त्रवर्षेंवरी ।
उंची पाहाता गगनोदरी ।
शाखपल्लव डोलती ॥६॥
त्या उभयता माजी उखळ ।
आडकवुनी कृष्ण् गोपाळ ।
तया नेटी देउनी चरणतळ ।
हेलावा देऊनि उपटिले ॥७॥
तिही गर्जना केली कैसी ।
प्रळयकाळींची विदयुल्लता जैसी ।
उध्दार पावेनिया हरिचरणासी ।
वंदूनिया ते गेले ॥८॥
ऐकोनिया तो घोषगजर ।
यशोदा धंवली अति सत्वर ।
पाहे तव तो सारंगधर ।
माजि वृक्षा पडियला ॥९॥
मग उचलूनिया करतळी ।
आलंगिला हदयमेळी ।
निढळ मेळउनी निढळी ।
अवलोकी वदन क्षणक्षणा ॥१०॥
म्हणे भ्यालिसी गे माझी माय ।
थोर केला म्या अन्याय ।
उखळी बांधलीसी हा अपाय ।
थोर वरुनि चूकला ॥११॥
मग सोडूनिया कंठीचे दावे ।
मुख पुसी निजपल्लवे ।
निळा म्हणे याची लाघवे ।
नेणवतीचि ब्रम्हादिका ॥१२॥
