मी पणे सगळा वेदु हरप
162.
मी पणे सगळा वेदु हरपला । शास्त्रांचा खुंटला अनुवाद ॥१॥
ते रूप सुंदर कृष्ण नाम सोपार । निरालंब गोचर गोकुळींचे ॥२॥
सेविता योगिया सुलभ दुर्गम । गौळिया सुगम नाम घेता ॥३॥
निवृत्ति निकट कृष्णनामसार । पापाचा संचार नाम छेदी ॥४॥
अर्थ:
ज्याचे वर्णन करायला मी पणा न सोडलेले वेद गेले ते तिथेच हरपले तर शास्त्रांना त्याचे वर्णन करता आले नाही.तेच परब्रह्म सुंदर व देखणे सगुण रुप घेऊन कृष्णनाम धारण करुन गोकुळात अवतरले आहे. सर्वत्र व्यापक व सोपे असणारे ते परब्रह्म योग्यांना समजायला अवघड होते व सगुण कृष्णरुपाच्या नामा मुळे त्या गौळ्यांना सोपे झाले आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, त्या कृष्णनामाच्या प्रभावाने पापाचा समुळ नाश होतो त्याच नामाचा मी निकट आश्रय केला आहे.
