निमिष नलगे मन वेधिता
817.
निमिष नलगे मन वेधिता ।
येवढी तुझी स्वरूपता ॥१॥
विठोबा नेणो कैसी भेटी ।
उरणे नाही जीवेसाठी ॥२॥
उरले उपाधी कारणे ।
ते त्वा नेमिले दरूशने ॥३॥
निवृत्तिदासा वेगळे ।
सांगावया नाही उरले ॥४॥
अर्थ :
हे श्रीकृष्णा, तुला पाहिल्यावर एका क्षणाचाही विलंब न होता तुझ्या स्वरूपाचा आमच्या मनाला वेध लागून जातो. एवढी तुझ्या स्वरूपाची योग्यता आहे. तुझ्या भेटीचे आश्चर्य हे आहे की तुझ्या भेटीला येणाऱ्याचा जीवभाव तू उरू देत नाहीस. जो वेगळेपणा दिसतो तो फक्त अविद्या उपाधिमुळेच दिसतो. अशा तऱ्हेचे तुझ्या दर्शनाचे शास्त्र तू निश्चित करून ठेवले आहेस. वरील बोध सांगण्यालादेखील मला त्या पांडुरंगरायांनी वेगळे ठेवले नाही. असे निवृतीदास माऊली ज्ञानदेव सांगतात.
