निरंतर तुम्ही करावा
1948.
निरंतर तुम्ही करावा विचार | भवाब्धीचा पार होय कैसा ॥१॥
जन्म गेले वाया विषयाचे संगे | भुलले वाउगे मायामोहे ॥२॥
अवघा करिता संसाराचा धंदा | वाचे वदा सदा हरिनाम ॥३॥
सर्वभावे एका विठोबाते भजा | आरते करा पूजा हरिभक्त ॥४॥
सर्व सुख होई तुम्हांला अपैते | न याल मागुते गर्भवासा ॥५॥
नामा म्हणे तुम्ही विचारूनि पहा | सर्वकाळ रहा संतसंगे ॥६॥
