एके ठायी अन्नपाणी ।
2847.
एके ठायी अन्नपाणी । ग्रासोग्रासी चिंतनी ॥१॥
वेळोवेळा जागवितो । दुजे येईल म्हणु भीतो ॥धृपद॥
नाही ही गुंतत उपचारी । मानदंभाचे वेव्हारी ॥२॥
तुका झालासे शाहाणा । आड लपे नारायणा ॥३॥
अर्थ :
मी एका देवाच्याच ठिकाणी माझे चित्त ठेवून अन्नपाणी सेवन करताना ते त्याला समर्पण करतो व घासाघासाला त्याचे चिंतन करतो. त्यामुळे मी वेळोवेळा देवाचे चिंतन करुन चित्ताला नेहमी जागृत ठेवत असतो देवावाचून दुसरे काहीही चित्तात येईल म्हणून मी खूप भीत आहे. मी देह उपचार करण्याबाबत व मानदंभाच्या व्यवहारामध्ये गुंतत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी आता शहाणा झालो आहे आणि या सर्व गोष्टीपासून अलिप्त राहण्यासाठी मी नारायणाच्या आड लपत आहे.
