स्वामीचिया सत्ता । आ
2846.
स्वामीचिया सत्ता । आधी वर्मे येती हाता । पुढती विशेषता । लाभे लाभ आगळा ॥१॥
कर्री कवतुकाचे बोल । परि जिव्हाळ्याची ओल । आवडे रसाळ । मायबापा लाडाचे ॥धृपद॥
मन मेळविले मना । नाही अभावी शाहणा । अंतरींच्या खुणा । वरी दिल्या उमटोनि ॥२॥
पराश्रमे काळा । अवघ्या जागविल्या वेळा । देवासी निराळा । तुका क्षण न सोडी ॥३॥
अर्थ :
स्वामीच्या सत्तेने प्रेमलक्षण वर्म आधी हाती येते. मग पुढे विवेक आणि वैराग्य याचा लाभ होऊन साक्षात्काराचा विशेष लाभ होतो. मी माझ्या स्वामीशी कौतुकाने बोलतो खरे परंतू त्या बोलण्यामध्ये प्रेमाच्या जिव्हाळयाचा ओलावा आहे. आणि असे रसाळ आणि लाडाचे माझे बोलणे आहे त्यामुळेच तर माझ्या मायबापाला ते आवडते. मी माझ्या स्वामीच्या मनाशी माझे मन मिळवून घेतले आहे भावहीन असलेला शहाणा मनुष्य मी नाही. मी माझ्या अंत:करणात ज्या खुणा आहेत त्याच खुणा वरती बाह्यरंगावर देखील उमटून दिल्या आहेत म्हणजे त्या स्पष्ट केलेल्या आहेत. मी माझ्या मनाला मोठया कष्टाने वेळोवेळी जागृत ठेवले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, त्यामुळे मी देवाला एक क्षण देखील सोडत नाही आणि त्याच्यापेक्षा वेगळा होऊन राहात नाही.
