वडिले दिले भूमिदान ।
3249.
वडिले दिले भूमिदान । ते जो मागे अभिळासून ॥१॥
अग्रपूजेचा अधिकारी । श्रेष्ठ दंड यमा घरी ॥धृपद॥
उभयकुळ समवेत । नरकी प्रवेश अद्भुत ॥२॥
तप्तलोहे भेटी । तुका म्हणे कल्पकोटी ॥३॥
अर्थ :
एखादयाच्या वडिलांनी भूमी दान म्हणून कोणालाही दिलेली असेल आणि ती भूमी दान दिलेली पुन्हा परत माघारी जो मागेल, मग तो यमाच्या घरी सर्वश्रेष्ठ दंड भोगणारा अधिकारी होऊन अग्रपूजेचा म्हणजे दंड भोगण्याचा अधिकारी होतो. यामध्ये अद्भूत गोष्ट अशी आहे तो एकटाच नरकामध्ये जात नाही तर आईचे आणि वडिलांचे दोन्हीही कुळ आपल्याबरोबर नरकात घेऊन जातो. तुकाराम महाराज म्हणतात, मग त्या पापी मनुष्याला कल्पकोटी तापलेल्या लोहाला भेट दयावी लागते.
