ऐक ऐक सखये बाई नवल म
146.
ऐक ऐक सखये बाई नवल मी सांगु काई । त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेसी म्हणतो आई ॥१॥
देवकीने वाहिला यशोदेने पाळिला । पांडवांचा बंदीजन होऊनिय राहिला ॥२॥
ब्रह्मांडाची सांठवण योगीयाचे निजधन । चोरी केली म्हणऊनी उखळासी बंधन ॥३॥
सकळ तीर्थे जया चरणी सुलभ हा शूळपाणी । राधिकेसी म्हणे तुझी करीन वेणीफणी ॥४॥
शरण एका जनार्दनी कैवल्याचा मोक्षदानी । गाई गोप गोपीबाळा मेळविले आपुलेपणी ॥५॥
