आवरी आवरी आपुला हरी
147.
आवरी आवरी आपुला हरी । दुर्बळाची केली चोरी ।
घरा जावयाची उरी । कृष्णे ठेविली नाही ॥१॥
गौळणी उतावेळी । आली यशोदेजवळी ।
आवरी आपुला वनमाळी । प्रळय आम्हा दिधला ॥२॥
कवाड भ्रांतीचे उघडिले कुलुप मायेचे मोडिले । शिंके अविद्येचे तोडिले ।
बाई तुझिया कृष्णे ॥३॥
होती क्रोधांची अर्गळा । हळूचि काढिलीसे बळा ।
होती अज्ञानाची खिळा । तीहि निर्मूळ केली ॥४॥
डेरा फोडिला दंभाचा । त्रिगुण तिवईस ठाव कैसा ।
प्रंपंच सडा हा ताकाचा । केला तुझिया कृष्णे ॥५॥
अहंकार होता ठोंबा । उपडिला धुसळखांबा ।
तोहि टाकिला स्वयंभा । बाई तुझिया कृष्णे ॥६॥
संचित हे शिळे लोणी । याचि केली धूळीधाणी ।
संकल्प विकल्प दुधाणी । तीही फोडिली कृष्णे ॥७॥
प्रारब्ध हे शिळे दही । माझे खादले गे बाई ।
क्रियमाण दुध साई । तींही मुखी वोतिली ॥८॥
द्वेष रांजण सगळे । स्पर्शे होती हात काळे ।
होते कामाचे ते पाळे । तेंहि फोडिले कृष्णे ॥९॥
सुचित दुश्चित घृत घागरी । लोभे भरल्या अहोत्या घरी ।
त्याही टाकिल्या बाहेरी । तुझिया कृष्णे ॥१०॥
कल्पनेची उतरंडी । याची केली फोडाफॊडी ।
होती आयुष्याची दुरडी । तेंही मोडिली कृष्णे ॥११॥
पोरे ग अचपळ आमुची । संगती धरली या कृष्णाची ।
मिळणी मिळाली तयांची । संसाराची शुद्धी नाही ॥१२॥
ऐशी वार्ता श्रवनी पडे । मग मी धांवोनि आले पुढे ।
होते द्वैताचे लुगडे । तेंही फिटोनि गेले ॥१३॥
आपआपणा विसरणे । कृष्णस्वरुपी मिळाले ।
एका जनार्दनी केले । बाई नवल चोज ॥१४॥
