योगीयांचे चिंतनी न ब
1390.
योगीयांचे चिंतनी न बैसे । यज्ञ यागादिकांसीं जो न गिवसे । तो भाविकांचें कीर्तनासरिसें । नाचतसें आनंदें ॥१॥
तो भाविकांचे कीर्तनी आपुलें । सुख अनुभवी वहिले । प्रेमे ब्रह्मानंदी डोले । वैष्णावांचें सदनीं ॥२॥
यज्ञांचें अवदानीं न धाये । तो क्षीरापतीलागीं मुख पसरुनि धांवें । केवढे नवले सांगावे । या वैष्णवसुखाचें ॥३॥
सुख येते समाधानीं । म्हणोनि सुख जनार्दनी । एका जनार्दनाचे चरणी । सप्रेमें विनटला ॥४॥
